‘डिजिटल जिंदगी’च्या मागच्या सदरात ‘फिल्टर बबल’ या संकल्पनेची तोंडओळख आपण करून घेतली. आपल्या आवडीनिवडी, त्यानुसार गूगलवर केले जाणारे सर्च, एकाच विषयावर मिळणारे वेगवेगळे परिणाम, त्यातून तयार होणारे अल्गोरिदम्स आणि त्याने कळतनकळत व्यापलेलं आपलं आयुष्य हा भाग आपण मागच्या लेखात समजून घेतला होता. या लेखात ‘फिल्टर बबल’ हा विषय अजून काही उदाहरणांसह आणखी विस्ताराने मांडला आहे.

आपण घरी आहोत, ऑफिसमध्ये आहोत की प्रवासात आहोत इथपासून ते आपण मोबाइल वापरत आहोत की डेस्कटॉपवर काही सर्च करतो आहोत, यावरूनदेखील सर्च इंजिन्सवरचे रिझल्ट्स बदलले जातात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, सर्च इंजिन्स, ऑनलाइन शॉपिंग पोर्टल्स या आणि अशा इतर सगळ्या वेबसाइट्स असे फिल्टर बबल का तयार करतात? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी रोजच्या जीवनातील उदाहरण बघता येईल. समजा आपण भाजी घ्यायला रोज बाजारात जात असू. आपण सोमवारी बटाटे, मंगळवारी पालेभाज्या, एकादशीला रताळे असं काही घेतो, असा काहीसा पॅटर्न एखाद्या चाणाक्ष भाजीवाल्याच्या लक्षात आला. आपण बाजारात गेल्यावर त्याने या… या पाटील मॅडम म्हणून अगदी नाव घेऊन स्वागत केलं. आपण काही मागायच्या आतच आपल्या पॅटर्नप्रमाणे आपल्याला भाजी दाखवली. अळूची भाजी घेतल्यावर आंबटचुका पण लागतो हे आठवून त्याची जुडी आपण न मागता दिली. तर आपल्यासाठी स्वर्ग दोन बोटे उरला असेल. आपण बाजारातली इतर दुकानं सोडून कायम त्याच भाजीवाल्याकडून भाजी घेत राहू. डिजिटल जीवनातही असंच घडतं.

सगळ्या वेबसाइट्सना आपण कायम त्यांनाच भेट द्यावी आणि तिथला आपला वावर जास्त असावा असं वाटत असतं. त्यामुळे आपल्या डिजिटल वावराला ते खास पर्सनल टच देतात. पुलंच्या ‘खोगीरभरती’मधला पट्टीचा पानवाला जसा त्याच्या ग्राहकांच्या आवडीचं पान लक्षात ठेवून त्यांनी मागायच्या आत ते सादर करायचा, अगदी तसंच ते आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कंटेन्ट दाखवतात. दुपारच्या फावल्या वेळात रेसिपीचे व्हिडीओ बघण्याची आवड असणाऱ्या एखाद्या गृहिणीला जर यूट्यूब उघडल्यावर उगाच फुटबॉल मॅच किंवा कुक्कुटपालन याविषयी माहिती असे तिच्या दृष्टीने निरर्थक व्हिडीओ दिसू लागले, तर ती कंटाळून यूट्यूब बंद करेल. असं होऊ नये म्हणून यूट्यूब तिला कायम रेसिपीचे व्हिडीओ दाखवत राहील.

अर्थात, याचे आपल्यासाठी काही फायदेदेखील आहेत. इंटरनेटवर माहितीचा महापूर आहे. पर्सनलाइज्ड ब्राऊझिंगमुळे अनावश्यक माहिती टाळून आपल्याला उपयुक्त असलेली किंवा आपल्याला आवडणारी माहिती आपल्याला मिळते. यातून आपला वेळ वाचतो. ‘बातम्या’ असं सर्च केल्यावर उगाच बेल्जियम किंवा आल्बेनियाच्या बातम्या न दिसता आपल्या प्रदेशाच्या बातम्या आपल्याला दिसतात, पण आपल्याला स्पेस मिशन्समध्ये आवड आहे हे अल्गोरिदमच्या लक्षात आलं असेल तर सुनीता विल्यम्स आणि स्पेस स्टेशन याविषयीच्या बातम्या आपल्याला अग्रक्रमाने दिसतात. आपण पुण्यात असताना रेस्टॉरंट असं सर्च केल्यावर उगाच नागपूरच्या हॉटेल्सची माहिती दिसायला लागली तर आपण वैतागून जाऊ. त्यापेक्षा पुण्यात आपण कुठे उभे आहोत त्यानुसार जवळचे भारी फूड जॉइंट दिसले तर आपलाच वेळ वाचतो, पण हे प्रकरण दिसतं तितकं सोपंदेखील नाही. याचे जसे फायदे तसे तोटेसुद्धा आहेत. आपला नेहमीचा भाजीवाला आपल्याला सोमवारी बटाटे, मंगळवारी पालेभाजी देताना ‘मॅडम आज गवार एकदम ताजी आहे, घेऊन जा’ असं कधी तरी सहज काही वेगळं सुचवतो. ‘फिल्टर बबल’मुळे असं होत नाही. आपण मांजरीचे १० व्हिडीओ पाहिले की आपल्याला फक्त मांजरच आवडते, असा समज करून एखादासुद्धा कुत्र्याचा व्हिडीओ दाखवला जात नाही.

यातून ‘एको चेम्बर्स’ तयार होण्याची शक्यता असते. ‘फिल्टर बबल’मध्ये आपल्याच आवडी आणि विचारसरणीचा प्रतिध्वनी असा घुमतो की इतर आवाज ऐकू येईनासे होतात. आपण ‘अ’ या राजकीय पक्षाला फॉलो करत असू तर ‘अ’चा उदो उदो करणाऱ्या बातम्या आणि कन्टेन्ट आपल्याला दिसत राहतात. यातून विरोधातल्या ‘ब’ पक्षाची बातमी किंवा त्यांचा एखादा मुद्दा योग्य असला तरी आपल्याला दिसत नाही. यातून सगळीकडे फक्त ‘अ’ पक्षाचीच हवा आहे, असा गैरसमज होऊ शकतो. हे क्रिकेट, फुटबॉल टीम्स, सिनेमा, कला असं सगळ्याच क्षेत्राच्या बाबतीत घडू शकतं. यातून आपल्यापेक्षा वेगळ्या राजकीय, सामाजिक विचारसरणीचा, वेगळ्या कलाप्रकाराची आवड असणारा कोणी असू शकतो हे हळूहळू विसरलं जाण्याची शक्यता असते.

‘फिल्टर बबल’मुळे आपल्या आवडीनिवडी, छंदांपैकी एकाच गोष्टीचं उदात्तीकरण होण्याची शक्यता असते. एखाद्याला गाण्याची आवड आहे, स्केचिंग छान जमतं, पण इंटरनेटवर त्याने बागकामाचे व्हिडीओ जास्त पाहिले असतील तर अल्गोरिदमच्या मते त्या व्यक्तीची ती एकच आवड आहे. वाचनाची आवड म्हणून वाचनालयात अनेक प्रकारची पुस्तकं बघितली जातात, आणली जातात पण किंडलवर जर पुलंची दोन पुस्तकं वाचली तर सतत त्यांचीच पुस्तकं सुचवली जातात. यातून एकाच प्रकारच्या आवडीचं प्रस्थ नकळत वाढण्याची शक्यता असते. खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्याला साहित्य संमेलनाची बातमी दिसणारच नाही. बॉलीवूड गाणी ऐकणाऱ्यांना चुकूनही शास्त्रीय संगीत सुचवलं जाणार नाही. यातून आपला दृष्टिकोन संकुचित होण्याची शक्यता असते.

‘फिल्टर बबल’मुळे वेबसाइटचा सत्य काय याऐवजी प्रिय काय यावर अधिक भर असतो. एखाद्या ‘फ्लॅट अर्थ’ थिअरीवर विश्वास असणाऱ्याला इंटरनेट ‘बाबा रे पृथ्वी गोल आहे. मान्य कर’ असं न सांगता उगाच याच विषयाच्या खोट्या खळबळजनक पोस्ट दाखवत राहील. जगात काय चाललंय ते खरं न दिसता आपल्या आवडीनुसार फिल्टर होऊन आपल्याला दाखवलं जातं. ‘फिल्टर बबल’मुळे येणारा हा संकुचित दृष्टिकोन, एकांगी विचार, विरोधी मतांचा अनादर हळूहळू खऱ्या जीवनातदेखील डोकवायला लागतो, ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. अर्थात, याने घाबरून जाऊन इंटरनेटच न वापरणं किंवा कायम इनकॉग्निटो मोडवर असणं हे उपाय नक्कीच व्यावहारिक नाहीत. पर्सनलाइज्ड ब्राऊझिंग हे काही प्रमाणात आपल्यासाठी सोयीचं आहे. फक्त या बुडबुड्यात न अडकणं इष्ट. यासाठी वेळोवेळी ब्राऊझिंग हिस्टरी आणि कॅशे साफ करून, यूट्यूबचे फीड्स रिसेट करून वेबसाइटच्या डोक्यातली आपली आभासी प्रतिमा काही प्रमाणात पुसता येईल. आठवड्यातून एखाद्या फावल्या वेळी आपल्या आवडीनिवडी, कल यांच्यापेक्षा पूर्ण विरोधात असलेल्या विषयांच्या विरोधी ब्राऊझिंग करून बघता येईल. किंवा कधी एखाद्या नव्या विषयांवरचे लेख वाचता येतील, पॉडकास्ट बघता येतील.

इतर वेळीदेखील शोध घेताना दाखवल्या गेलेल्या पहिल्या लिंकवर विश्वास न ठेवता इतर स्राोतांकडून देखील सत्यता तपासली गेली पाहिजे. दिसणारं सगळं आहे ते खरं मानून त्यात रमण्यापेक्षा मेंदूला चिकित्सात्मक विचारांची (Critical thinking) सवय लावता येऊ शकते. ‘सत्यं शृणुयात् प्रियं शृणुयात्’ या संस्कृत वचनाच्या चालीवर ‘सत्यं शृणुयात् प्रियं शृणुयात्, प्रियं च नानृतम् शृणुयात्’ हा मंत्र उपयुक्त ठरेल. खरं ऐकावं, आपल्या आवडीचं ऐकावं, पण आवडीचं आहे म्हणून खोटं मात्र ऐकू नये, वाचू नये, पाहू नये हे भान जपणं महत्त्वाचं आहे.

viva@expressindia.com