विनय जोशी

२८ फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन. शाळेतला एक विषय किंवा शिक्षणाची एक शाखा इतकाच विज्ञानाचा मर्यादित अर्थ नाही. विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकारणं हे खरंतर आपलं संविधानिक कर्तव्य आहे.

Constitution of India
संविधानभान: मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे
trade and technology farmers marathi news
शेतकऱ्यांना कुबड्या नको, स्वातंत्र्य द्या!
Loksatta sanvidhan bhan Constitution of India Living Wage Living wage Decent standard of life
संविधानभान: दर्जेदार जीवनाची हमी
BJP has undeniably grown in Kerala Kerala CPI chief Binoy Viswam
केरळमधील निष्ठावान मतदारही भाजपाकडे गेले; आत्मपरीक्षणाची गरज डाव्यांनी केली मान्य
No religious markers permitted in Indian Army dress regulations
टिळा वा तत्सम धार्मिक प्रतीकांना मनाई; लष्कराने सैनिकांना का करून दिली गणवेश नियमांची आठवण?
loksatta explained Why did the issue of milk price flare up in the state
विश्लेषण: राज्यात दूध दराचा प्रश्न का चिघळला?
Upsc Preparation Indian Society and Social Issuाे
Upsc ची तयारी: भारतीय समाज आणि सामाजिक प्रश्न
UPSC Preparation Indian Society and Social Issues
upscची तयारी: भारतीय समाज आणि सामाजिक प्रश्न

सप्टेंबर १९२१. एक तरुण भारतीय शास्त्रज्ञ आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावरून मायदेशी परतत होता. जहाजावरून दूरपर्यंत पसरलेला अथांग समुद्र आणि वर अनंत आकाश पाहताना त्याला प्रश्न पडला – समुद्र निळा का दिसतो? आकाशाच्या निळाईचे प्रतिबिंब पडून? मग आकाश तरी निळे का? खरंतर हा अगदी साधा प्रश्न. सगळ्यांनाच पडत आलेला. तारे का चमकतात? पक्षी कसे उडतात? इंद्रधनुष्य कधी दिसते? या आणि अशा अनेक मूलभूत प्रश्नांच्या पंगतीतला. त्या तरुणाने भारतात परत आल्यावर याच प्रश्नाच्या अनुषंगाने अगदी सोपी आणि स्वस्त सामुग्री वापरत संशोधन केलं. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी त्याने आपलं प्रकाशाच्या विकिरणासंदर्भात केलेलं संशोधन जाहीर केलं. या शोधाबद्दल त्याला १९३० चं भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं. भारताला पहिला नोबेल देणारा हा तरुण म्हणजे प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन.

आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांबद्दल का? कसे? केव्हा? कोण? असे प्रश्न पडत कुतूहल जागं होतं. मग निरीक्षण करून काहीतरी गृहीतक मांडलं जातं. या अनुषंगाने शास्त्रशुद्ध प्रयोग केले जातात. यातून अधिकाधिक माहिती जमवून तिचं विश्लेषण केलं जातं. आणि यातून मिळणाऱ्या निष्कर्षातून त्या प्रश्नाचं उत्तर सापडतं. अशा निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेलं तर्कसुसंगत आणि उपयोजित ज्ञान म्हणजे विज्ञान !!! लॅटिन भाषेतील सायन्शिया (अर्थ – ज्ञान, जागरूकता) या शब्दावरून ‘सायन्स’ हा शब्द तयार झालेला आहे.

हेही वाचा >>> लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

शाळेतला एक विषय इतकाच विज्ञानाचा मर्यादित अर्थ नाही. अणूंच्या अंतर्गत मूलकणांतील क्रियांपासून तर आकाशगंगेपलीकडील प्रचंड दीर्घिकांच्या विस्तारापर्यंत असंख्य विषयांचा अभ्यास विज्ञानात होतो. कला, वाणिज्य आणि इतर प्रवाहातील विद्यार्थ्यांना विज्ञान हे फक्त विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्यांचं आहे असा गैरसमज आढळतो. खरंतर विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक भारतीयाने आणि पर्यायाने तरुणांनीदेखील जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत वागावे हे आपलं संविधानिक कर्तव्य आहे. या विज्ञानवादाचा जागर करण्याचा दिवस म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन.

भारताचा विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना पुढे आली तेव्हा विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन सचिव डॉ. वसंतराव गोवारीकर यांनी कोणत्याही वैज्ञानिकाचा जन्मदिन – मृत्युदिन न निवडता २८ फेब्रुवारी हा दिवस सुचवला. भारताला पहिला नोबेल पुरस्कार मिळवून देणारा विज्ञान आविष्कार ज्या दिवशी सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी जगासमोर मांडला तो हा दिवस. देशात वैज्ञानिक संशोधनाला गती मिळावी त्याचबरोबर जनसामान्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा हा या दिवसाचा उद्देश. या दिवशी देशातल्या अनेक विज्ञान संशोधन संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये यात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यासाठी एक मध्यवर्ती विषय सुचवला जातो.

या वर्षीसाठी विज्ञान दिनाचा विषय आहे, ‘विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’. देशाच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान आवश्यक असतेच, पण शाश्वत विकास साधत आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान अधिक महत्त्वपूर्ण ठरते. यातून इतर देशांवर अवलंबून राहणं कमी होतं, आत्मनिर्भरता वाढीस लागते. स्वदेशी तंत्रज्ञान स्थानिक परिस्थिती, संस्कृती आणि सामाजिक गरजा समजून घेऊन विकसित केलेलं असतं. देशातील विविध प्रदेशांतील हवामान, पर्जन्यमान, मातीचा पोत यांचा विचार करत बनवलेलं स्वदेशी संकरित बियाणं हे आयात बियाणांपेक्षा अधिक कार्यक्षम ठरतात. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचंच ठरतं. आधार या स्वदेशी तंत्रज्ञान प्रणालीने शासकीय सेवा, सामाजिक कल्याण, वैयक्तिक ओळख अशा आघाडींवर क्रांती घडवली आहे. अंतराळ विज्ञान, कृषी, आरोग्य, दळणवळण, रसायनशास्त्र, वैद्याक अशा सर्वच क्षेत्रांत जोमाने विकसित होणारं स्वदेशी तंत्रज्ञान देशाच्या प्रगतीला वेगवान गती मिळवून देत आहे.

हेही वाचा >>> भ्रष्टाचारमुक्त

स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाला हातभार कसा लागतो हे दाखवायला अंतराळ संशोधन क्षेत्राची कामगिरी पथदर्शक आहे. सुरुवातीला आपले उपग्रह सोडायला इतर देशांवर अवलंबून राहणाऱ्या भारताने शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नातून उत्तुंग झेप घेतली. ८०च्या दशकात भारतीय राष्ट्रीय उपग्रह – इन्सॅट ही भूस्थिर उपग्रहांची मालिका विकसित झाल्याने दूरसंचार, आकाशवाणी, दूरदर्शन प्रसार इत्यादी क्षेत्रांत क्रांती आली. ९०च्या दशकांत बदलत्या भूराजकीय परिस्थितीमुळे क्रायोजेनिक इंजिन मिळण्यात अडचणी आल्यांनतर स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचे तंत्रज्ञान विकसित केलं गेलं. आणि मग जीएसएलव्हीचं नवं युग सुरू झालं. चांद्रयान, मंगळयान, ‘नाविक’ ही स्थितीदर्शक यंत्रणा (जीपीएस), एकाच उड्डाणात तब्बल १०४ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण असे कितीतरी विक्रम स्वदेशी तंत्रज्ञानामुळे शक्य झाले.

देशाच्या प्रगतीत स्वदेशी संशोधन आणि नवकल्पना यांना चालना देण्याच्या हेतूने अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF) कायद्यातील तरतुदी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी अमलात आणल्या गेल्या आहेत. याद्वारे ANRF देशातील विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था, प्रयोगशाळांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि उद्याोजकतेसाठी प्रोत्साहन देईल. ‘इन्स्पायर योजने’द्वारे शालेय पातळीपासून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हायला हातभार लागतो आहे. नवीन शैक्षणिक धोरणात विज्ञान शिक्षणात प्रयोगशीलता आणि विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक प्रवीणता विकसित करण्याकडेही लक्ष दिले गेले आहे. संशोधनात महिलांची टक्केवारी वाढावी या हेतूने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने ‘किरण कार्यक्रम’ सुरू केला आहे. अलीकडच्या काही वर्षांत पेटंटिंग प्रक्रियेत सुधारणा होत सुलभता आली आहे. परिणामी भारतीय पेटंट कार्यालयाच्या अहवालानुसार २०१३ मध्ये पेटंट फाइलिंग १७ टक्क्यांनी वाढून ९०,३०९ वर पोहोचले आहे.

या घोडदौडीत खासगी क्षेत्रदेखील सामील आहे. नव्या व्यावसायिक संधींमुळे खासगी उद्याोजक संशोधन क्षेत्राकडे वळू लागले. त्यांच्या भागीदारीतून कमी खर्चात आणि उच्च गुणवत्तेसह तंत्रज्ञान विकसित होऊ शकते हे लक्षात आल्याने सरकारी संस्थांनीदेखील आपली दारे उघडली आहेत. यातून खासगी कंपन्या आणि सरकारी संस्था यांच्या सहकार्याचे नवे युग सुरू झाले. भारताच्या चांद्रयान मोहिमेत गोदरेज एरोस्पेस, एल अॅण्ड टी, वालचंदनगर इंडस्ट्रीज यांचा मोठा वाटा होता हे याचं प्रातिनिधिक उदाहरण.

स्वदेशी तंत्रज्ञान विकासाच्या या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत आजचे तरुण. दर्जेदार शिक्षण, संशोधनाला प्रोत्साहन याचसोबत रोजगार आणि नवउद्यामतेला चालना यामुळे संधींचे आकाश खुणावते आहे. गरज आहे इतर निरर्थक बाबींतून लक्ष काढून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची. ‘थ्री इडियट’ चित्रपटात लग्नात बिन बुलाया मेहमान असलेला रँचो पकडला गेल्यावर चटकन थाप मारतो की आम्ही विज्ञानाचे प्रतिनिधी म्हणून इथं प्रयोग करायला आलो आहोत. आणि या थापेतून सुचलेला प्रकल्प तो पूर्ण बनावतो आणि शेवटी त्याचा भन्नाट डेमोसुद्धा दाखवतो. धर्म, वंश, रंग, जात, राजकीय विचारसरणी यांच्या अभिनिवेशात तुम्ही कोणाच्या बाजूने असा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा तरुणाईनेदेखील हेच उत्तर द्यावं – हम सायन्स की तरफ से है. देशापुढच्या सर्व समस्यांचे निदान वैज्ञानिक प्रगतीत आहे ही शहाणीव गरजेची. हा वैज्ञानिक दृष्टिकोन तरुणांत रुजत राहो, ही या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने सदिच्छा!!

viva@expressindia.com