राधिका कुंटे

एकीनं भूतकाळात केलेल्या प्रवासाचा दुसरीने वर्तमानात केलेला अभ्यास. भूतकाळ आणि वर्तमानाच्या दुव्यांचे बिंदू जोडताना स्त्रियांच्या प्रवासलेखनातील मनोविश्वाच्या प्रवासाचं भविष्यातील स्वरूप हलकेच रेखाटणाऱ्या पल्लवी बाबरच्या संशोधन प्रवासाविषयी जाणून घेऊया.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
indian man killed in canada
कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…

प्रवास आपण सगळेच करतो. हा प्रवास देश-परदेशात असतो. प्रवास करताना काही प्रश्न पडतात. काही उत्तरं क्षणिक असतात तर काही उत्तरं त्यांचा अभ्यास करण्याजोगी असतात. हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विचार, अभ्यास करायला लावतात. आपल्याला पडलेल्या प्रश्नांचा रीतसर अभ्यास करणाऱ्यांपैकी एक आहे पल्लवी बाबर. गेली सहा वर्ष ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्या ‘डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस’मध्ये ती अतिथी अध्यापिका आहे. शिकवत फ्रेंच असली तरी ती मुळात कलाशाखेची विद्यार्थिनी नाही. बारावीनंतर पुण्यातील ‘अलियॉन्स फ्राँसेज’मध्ये तिने फ्रेंच शिकायला सुरुवात केली. फ्रेंचच्या सहा लेव्हल्स शिकायला साधारण तीन वर्ष लागतात. शिकता शिकता फ्रेंच भाषा आवडायला लागली तरीही त्यात करिअर करायचं ठरलं नव्हतं. तेव्हा बी.एम.सी.सी. महाविद्यालयात बी.कॉम.ही करत होती. गुरू उमाताई टिळक यांच्याकडे ती भरतनाटय़म्ही शिकत होती आणि विशारदची परीक्षा देणार होती. बी.कॉम.ची पदवी मिळाली; तेव्हा फ्रेंचच्या सहाही लेव्हल्स पूर्ण झाल्या. सहाही लेव्हल्स पूर्ण करणाऱ्या भारतातल्या पहिल्याच काही बॅचमध्ये तिचा समावेश होता.

पुढे पल्लवीने उमाताईंना असिस्ट करायला सुरुवात केली. तिला मुळातच साहित्याची गोडी असल्याने ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्या ‘डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस’मधून तिने एम.ए. केलं. या टप्प्यानंतर तिला फ्रेंच भाषा शिकवावी असं वाटलं. फ्रेंच सरकार त्यांच्या ‘असिस्ताना’ या कार्यक्रमाअंतर्गत देशोदेशीच्या विविध भाषिक आणि फ्रेंच भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या युवावर्गाला फ्रान्समधल्या त्या त्या भाषा शिकवणाऱ्या शालेय शिक्षकांचे साहाय्यक (असिस्टंट-असिस्ताना) म्हणून सात महिने फ्रान्समध्ये राहण्यासाठी आमंत्रित करतं. ती लील शहरात राहिली होती. इंग्रजी शिकवण्यासोबत नृत्याचे वर्गही घ्यायची. स्वत:च्या दोन सादरीकरणाच्या कार्यक्रमांसह तिने अपंग मुलांसाठी कार्यशाळाही घेतली.

फ्रान्समधून परतल्याावर पल्लवीने ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्याच ‘डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस’मध्ये शिकवायलाही सुरुवात केली. त्याबरोबरीने तिने एम.फिल.च्या अभ्यासाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना ती फ्रेंच भाषा शिकवत असली तरी तिचा भर फ्रेंच साहित्याचा अभ्यास करण्यावर आहे. प्रवास करताना स्त्री किंवा पुरुषांचा दृष्टिकोन आणि समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, या मुद्दय़ाचा अभ्यास करावासा तिला वाटला. कारण ती फ्रन्समध्ये गेली होती; तेव्हा राहणीमान, जीवनमान, वेशभूषा, संस्कृती वगैरे अनेक प्रश्नांचा भडिमार तिच्यावर झाला. त्यामुळे तिला कल्चरल शॉक बसला. तसंच अनेक प्रश्न पडले आणि त्यावर तिचं मन:चिंतन सुरू झालं. जवळपास चार महिने या सगळ्या प्रश्नांचं प्रतिबिंब साहित्यात कसं पडलं असेल, यावर विचार सुरू होता. भारतात परतल्यावर एम.फिल.च्या प्रबंधासाठी तिने स्त्रियांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांचा शोध घ्यायला सुरुवात केली. ‘माझ्या पहिल्या फ्रान्सवारीच्या अनुभवावरून माझ्या डोक्यात इतरजणींचे प्रवासानुभव कसे असतील, त्यांच्या लिखाणात ते कसे उतरले असतील. अशा विचारांची आवर्तनं सुरू झाली, असे ती सांगते.

फ्रान्स किंवा युरोपमध्ये प्रवास केलेल्या आशियायी लेखिकांनी काही लिहिलं आहे का, असा शोधही घेतल्याचे ती सांगते, पण हाती फारसं काही लागलं नाही. मग उलटा शोध घेतल्यावर फ्रेंच पुरातत्त्व शास्त्रज्ञ, फिरस्ती, कादंबरीकार आणि लेखिका असणाऱ्या जान दियलाफ्वा हिने तत्कालीन पर्शियामध्ये (इराण-इराक) १८८१ मध्ये केलेल्या प्रवासाचं वर्णन असलेल्या ‘छं ढी१२ी ’ं उँं’ीिप्ीी३ ’ं र४२्रंल्ली’ या पुस्तकाचा संदर्भ मिळाला. मात्र ते प्रत्यक्षात हाती पडण्यासाठी बराच खटाटोप करावा लागला आणि अभ्यासाला सुरुवात झाली, असे ती सांगते. पल्लवी पुढे म्हणते की, ‘जानने त्या काळात पुरुषवेश परिधान करून हा प्रवास केला होता. तिचे पती लष्करात असल्याने तशाच पुरुषी पोशाखात ती फिरायची. इस्लामी घरांत जाऊन तिथल्या स्त्रियांना ती प्रत्यक्ष भेटली. त्यांची छायाचित्रंही काढली. या सगळ्या तिच्या नजरेनं पाहिलेल्या, टिपलेल्या गोष्टी, तो काळ तिच्या लिखाणात आणि छायाचित्रांत उतरला आहे’. त्याचा अभ्यास पल्लवीने केला. फ्रेंचमध्ये लिहिलेल्या पल्लवीचा प्रबंधाचा विषय (ओरिएंट, द ओरिएंटव वुमन अ‍ॅण्ड द सेल्फ) हा आहे. ती सांगते की, ‘माझ्या लिखाणात एलेन शॉवॉल्टर या अमेरिकन स्त्रीवादी समीक्षकेचा गायनोक्रिटिसिझम हा स्त्रीवादी विचार वापरला आहे. गायनोक्रिटिसिझम म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांविषयी लिहिलेल्या किंवा स्त्रियांच्या लिखाणाचा स्त्रीकेंद्री दृष्टिकोनातून केलेला सखोल अभ्यास. त्या दृष्टीने जानचं हे प्रवासवर्णन वाचून अभ्यास केला. माझ्या अभ्यासप्रबंधात भाषा, संस्कृती, देहबोली आदी प्रकरणं लिहिली’.

संशोधनात पुढय़ातलं लिखाण आणि त्यातून निघणारे निष्कर्ष महत्त्वाचे असतात. आपले विचार नेमक्या शब्दांत आणि तेही परदेशी भाषेत मांडायचे असल्याने विचार करायला आणि ते प्रत्यक्ष लिखाणात उतरायला तिला थोडा वेळ लागला. कारण स्त्रीवादावर अनेक पुस्तकं आहेत, पण या विषयाशी निगडित कोणती आहेत, त्यातले विचार कसे आहेत हे पारखून ती निवडणं हे एक आव्हान होतं. वेगवेगळ्या संस्कृतींतल्या स्त्रिया वेगवेगळ्या संस्कृतींत जातात, तेव्हा स्वत:विषयी विचार करण्याची, स्वत:ला काही प्रश्न विचारायची संधी त्यांना मिळते, असं वाटल्याने ही चौकट तिने आखली. त्यामुळे हा अभ्यास करताना शेवटपर्यंत काहीतरी नवीन शिकायला मिळेल, वेगळं काही गवसेल असं तिला वाटत राहिलं आणि हा विचार हीच तिची प्रेरणा होती. कधी फ्रेंच भाषेतील पुस्तकं चटकन मिळाली नाहीत. कधी काही फ्रेंच शब्द-संकल्पना पटकन उलगडल्या नाहीत. तेव्हा वेळोवेळी डॉ. उज्ज्वला जोगळेकर याचं मोलाचं मार्गदर्शन तिला लाभलं. हा ८० पानांचा प्रबंध फ्रेंच भाषेत लिहिणं हेही तिच्यासाठी एक आव्हान होतं. मात्र आवडीचा विषय असल्यानं तिला पुरेसा आत्मविश्वास वाटत होता.

पल्लवीच्या मते, तेव्हा जाननी केलेल्या प्रवासात तिला काही सांस्कृतिक धक्के बसले होते. तेव्हा लिखाणाचं क्षेत्रही पुरुषप्रधान होतं. पुरुषी दृष्टिकोनाची-नजरेची किनार त्या लिखाणाला होती. मात्र अद्याप पुरुषी लिखाणाइतका अभ्यास स्त्रियांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांचा झालेला नाही. साहित्याच्या अभ्यासकांच्या मते, स्त्रियांचं लिखाण अनेकदा बाजूला सारलं गेलं. जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता प्रवास करण्याआधी आपण त्या ठिकाणाची लोकांची छायाचित्रं किंवा चित्रफीत बघू शकतो. ही साधनं नसल्याने जानला तो सांस्कृतिक फरक प्रकर्षांने जाणवला असणार. हा फरक फ्रान्सवारीत मलाही जाणवला होता. मात्र शेवटी प्रत्यक्ष घेतलेला अनुभव तितकाच नवीन असतो. म्हणून हा विषय अजूनही तितकाच कालसुसंगत आहे, कारण त्यावर प्रश्न विचारले गेले पाहिजेत. गेल्या साठेक वर्षांत या प्रश्नांचा विचार व्हायला सुरुवात झाली आहे. पण तो अधिक सखोल झाला तर अनेक उत्तरं सापडू शकतील, असं पल्लवी म्हणते.

जान या स्त्रियांना त्यांच्या घरात जाऊन भेटली. त्यांच्या छायाचित्रांसोबत त्यांची वेशभूषा, दागदागिने, संस्कृती, देहबोली आदींची वर्णनंही तिनं केली आहेत. पल्लवी म्हणते की, ‘या  पुस्तकात जवळपास तीनशे छायाचित्रांचा समावेश आहे. त्यातली मी ४० निवडली आणि प्रबंधाच्या सुसंगत त्यांची मांडणी केली. या निवडीसाठी मी अंतर, विषय, वर्णन आणि छायाचित्राचा मेळ, ठिकाण, तिचा दृष्टिकोन आदी काही निकषांची चाळणी लावली. हे सगळं करताना जाननं या स्त्रियांच्या अंतरंगात डोकावण्याचा खूप प्रयत्न केला. पण भाषिक अडथळ्यामुळे हे प्रयत्न तोकडे पडले. हे प्रयत्न छायाचित्रांच्या माध्यमांतून जाणवतात. अधिकाधिक भेटींमध्ये होणारा सुसंवाद आणि मोकळेपणा दिसू लागतो. हे पुस्तक कसं छापलं गेलं, डिझाइन कोणते वापरले, नकाशांचा वापर करत पुस्तकात वेगळेपणा आणायचा प्रयत्न कसा केला आदी गोष्टी अभ्यासल्या’.

पल्लवीला फ्रान्सला पुन्हा एकदा जायची संधी मिळाली ती २०१६ मध्ये. ‘इंटरनॅशनल टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी (BELC) जवळपास ८० देशांमधले शिक्षक आले होते. भारतातर्फे चारजणांची निवड झाली होती. तिथे तिने नृत्यसादरीकरण केलं. फ्रेंच भाषा शिकण्याइतकंच ती संस्कृती जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. केवळ पुस्तकी भाषा शिकवण्यापेक्षा असे शिकण्याचे अनेकविध अनुभव घेणं आणि नंतर विद्यार्थ्यांना शिकवणं यातून भाषेसह ती संस्कृतीही आपसूकच त्यांच्यापर्यंत पोहोचते, हे तिचं निरीक्षण आहे. ती सांगते की ‘फ्रान्समध्ये दोन आठवडय़ांसाठी दुसऱ्यांदा गेले तेव्हा प्रबंधाचं काम सत्तर टक्के  पूर्ण झालं होतं. तिथे या लेखिकेचा अभ्यास फारसा केला गेलेला नाही. बऱ्याच लोकांना ती माहिती नाही. प्रवासवर्णनं बारकाईनं अभ्यासणाऱ्यांना ती माहिती आहे. त्यामुळे मी तिच्या पुस्तकाचा अभ्यास करते आहे म्हटल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कौतुक वाटलं. अनेकांना माझ्या अभ्यासविषयाबद्दल सांगून आणखी काही संदर्भ, पुस्तकं मिळतात का, हे चाचपडत होते’.

ती सांगते की, प्रवासाने आपली पूर्वग्रहदूषित विचारसरणी बरीचशी पुसट होते आणि विचारांच्या कक्षा रुंदावतात. चांगल्या नवीन गोष्टींचा स्वीकार केला जातो. हेच ती तिच्या विद्यार्थ्यांनाही सांगते की, ‘प्रवाहात पोहायचा प्रयत्न करा, अनुभव गाठीशी बांधत जा, त्यातून नवे विचार सुचतील, काही प्रश्न पडतील, त्यांना सामोरं जाऊन त्यांची उत्तरं शोधा. साचेबद्धपणानं स्वविकासात येणारा अडथळा पार करा’. पुढे साहित्यातच पीएचडी करायचा तिचा विचार आहे. संशोधनात सातत्य राखत त्यासंबंधी परिषदा, चर्चासत्रांना हजेरी लावायची आहे. वेळात वेळ काढून नृत्य शिकवणं हा तिच्या जिवाभावाचा विषय आहे. तिच्या या सगळ्या उपक्रमी प्रवासासाठी तिला शुभेच्छा.

viva@expressindia.com