कॉलेज, ऑफिस ते अगदी बाहेर शॉपिंग किंवा पार्टीसाठी बाहेर पडायचं असेल तर अंगावरचे कपडे जितके फॅशनेबल हवेत, तितकंच महत्त्व त्या कपड्यांना अनुसरून कोणत्या अॅक्सेसरीज आपण वापरतो आहोत याकडेही तितकंच लक्ष द्यावं लागतं आणि वरील कोणत्याही कारणाने बाहेर पडताना हातातली वा खांद्यावरची पर्स ही सगळ्यात गरजेची आणि तितक्याच आवडीची गोष्ट आहे. त्यामुळे आपण कुठल्या कारणाने बाहेर पडतो आहोत, आपले कपडे कुठल्या पद्धतीचे आहेत याचा विचार करून बॅगचीही निवड केली जाते. हल्ली बॅग किंवा पर्समध्येही अनेक पॅटर्न्स, प्रिंट्स पाहायला मिळतात. अर्थात, पर्सची निवड करताना ऋतुमानाचाही विचार करणं आवश्यक ठरतं. अनेकदा उन्हाळ्यात ज्या लाइट रंगाच्या पर्सवर भर दिला जातो, त्या पावसाची चाहूल लागली की कपाटात बंद होतात आणि त्याऐवजी डार्क शेड्सच्या वॉटर रेसिस्टंट पर्सना अधिक पसंती मिळते.
उन्हाळ्यामध्ये सामान्यत: लाइट शेड्स वापरल्या जातात. कपडे, डेकोर, अॅक्सेसरीज सगळ्यांमध्येच फिक्या रंगांची चलती असते. समरमधल्या बॅग्सवर उन्हाळ्यात सूट होतील अशा पद्धतीचे पॅटर्न्स, डिझाइन्स, प्रिंट्स असतात. याच बॅग्स जेव्हा पावसाळ्यात येतात तेव्हा त्यांची डिझाइन्स, कलर पॅलेट, प्रिंट्स बदलतात. आजकाल पुन्हा एकदा केवळ फॅशन आणि लुक्सपेक्षा अधिक महत्त्व ‘सोय’ या बाबीला यायला लागल्याने उन्हाळा आणि पावसाळ्यानुसार बॅग्सचे खण आणि पॉकेट्स बदलण्याचा ट्रेण्डसुद्धा मार्केटमध्ये पाहायला मिळतो.
या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये छोट्या,बॅग्स, लहान साइजच्या टोट बॅग्स या ट्रेण्डमध्ये आहेत. वेगवेगळ्या आकारांच्या हँडबॅग्स आणि पर्स अनेक सेलेब्रिटींनी वापरल्या आहेत. त्यामुळे साहजिकच त्या स्ट्रीट फॅशनमध्येसुद्धा दिसायला लागल्या आहेत. बोट शेप, स्क्वेअर शेप, पेंटॅगॉन शेपच्या बॅग्स सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. त्यांचा आकार लहानमोठा असतो आणि त्यानुसार त्याच्या बेल्टची लांबी ठरते. बोट शेप बॅग्स या साधारणत: सिंगल खणाच्या किंवा डबल खणाच्या असतात. पॉकेट्सची जास्त संख्या ही पेंटॅगॉन आणि स्क्वेअर शेपमध्ये पाहायला मिळते. पर्सच्या बाहेर डिझायनर आणि तरीही उपयुक्त छोटी पॉकेट्स स्क्वेअर आणि पेंटॅगॉन बॅग्सना हमखास पाहायला मिळतात. जिओमेट्रिक शेप हा सध्याचा ट्रेण्ड पर्सेसमध्ये पाहायला मिळतो आहे. मात्र त्याच वेळी छोटे क्लचेसही तितकेच वापरले जात आहेत. मिनी बॅग्स किंवा क्लच दोन्ही फॅशन-कम-युटीलिटी या कॅटेगरीमध्ये बसतात. इसेन्शियल्स सोबत ठेवण्यासाठी मिनी बॅग्स उपयोगी पडतात. मिनी बॅग्स किंवा क्लच यांना शेपचं फारसं काही वेगळेपण नसलं तरी त्यात बॅगी दिसणाऱ्या डिझाइन्स, ज्यात स्टोरेजही जास्त मिळतं, अशी डिझाइन्स जास्त पसंत केली जातात.
उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाताना बॅग्सचे रंग मात्र हलक्या, लाइट शेड्सपासून डार्क शेड्सकडे जाताना दिसतील. व्हाइट, पेस्टल, क्रीम, बेज असे रंग असलेल्या बॅग्स आणि पर्स पावसाळ्यात मात्र ब्राऊन, ब्लॅक, ग्रे, डीप ब्लू अशा ‘शेड्स ऑफ डार्क’मध्ये पाहायला मिळतील. रिअल लेदरपेक्षा अॅनिमल-फ्रेंडली पर्यायांची सध्या चलती असल्याने वेगन लेदर वगैरे प्रकारातली मटेरिअल्स पर्स आणि बॅग्समध्ये दिसून येतील. मेंटेनन्सला सोपी अशी मटेरिअल्स खासकरून पावसाळ्यात वापरली जातात. त्यामुळे आर्टिफिशियल मटेरियल वापरून बॅग्सना सिंपल आणि एलिगंट ठेवण्याचा प्रयत्न पावसाळ्यात पाहायला मिळतो. वॉटर-प्रूफ असणाऱ्या बॅग्स किंवा निदान वॉटर रेसिस्टंट असणारी मटेरिअल्स हीसुद्धा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ट्रेण्डमध्ये दिसून येतात.
स्टायलिंगच्या दृष्टीने पाहिलं तर बॅग्स आणि पर्सना बाहेरून बेल्ट, बकल्स, बटन्स, बीड्स, थ्री-डी प्रिटिंग अशा पद्धतींनी स्टाइल केलेल्या दिसून येतात. डेनिम व्हाइब्स देण्यासाठी बॅग्समध्ये काही वेळा वेगवेगळ्या ठिकाणी थोडा – थोडा डेनिमचा वापर केला जातो. हँडल्स किंवा पॉकेट अथवा चेनची हेम अशा ठिकाणी डेनिम वापरून बॅगला डेनिम टच दिला जातो. बॅग मटेरियलऐवजी क्राफ्टेड किंवा स्कल्प्टेड हँडल्स हाही ट्रेण्ड सध्या पाहायला मिळतो आहे.
बॅग्स किंवा पर्स ही केवळ युटीलिटी नसून फॅशन स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट पीस म्हणून आजकाल मिरवली जाते. उन्हाळा असो वा पावसाळा, त्याच्या पॅटर्न्स आणि कलर्समध्ये बदल होतो, मात्र त्यांचं स्टायलिंगमधलं महत्त्व कमी होत नाही.
वेदवती चिपळूणकर परांजपे
viva@expressindia.com