वेदवती चिपळूणकर

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही व्यक्तिरेखा एकाच चित्रपटात साकारणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात दुहेरी भूमिका करण्याचं आव्हान गश्मीरने स्वीकारलं आणि प्रेक्षकांच्याही ते पसंतीस उतरलं. चित्रपट, मालिका आणि आता रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक अशा अनेक माध्यमांतून आणि भूमिकांमधून गश्मीर प्रेक्षकांना भेटला आहे.

shahid-kapoor-rang-de-basanti
‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार देण्याचा शाहिद कपूरला होतोय पश्चात्ताप; अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने मला…”
kabhi-haan-kabhi-naa
‘कभी हां कभी ना’च्या रिमेकमध्ये शाहरुख खानची भूमिका कुणी करावी? सूचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या, “हे पात्र…”
“…तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेऊन आपल्याला मार्ग दाखवतील”, ‘या’ मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…
riteish deshmukh announce raja shivaji historical movie
शिवजयंतीच्या मुहूर्तावर रितेश देशमुखची मोठी घोषणा! २०२५ मध्ये मोठ्या पडद्यावर येणार ‘राजा शिवाजी’, पोस्टर आलं समोर

सिनेमा पाहण्याचं वेड असलेला गश्मीर हळूहळू चित्रपटांच्या प्रेमात पडत गेला आणि त्याला त्याची आवड सापडली. सिनेमा एका अर्थी त्याच्या घरात असला तरी त्याबद्दलचं प्रेम ही त्याची अनुभवाची गोष्ट होती. तो सांगतो, ‘‘मी शाळेत होतो तेव्हा ओटीटी वगैरे आजच्यासारखी कुठलीच माध्यमं नव्हती. त्यामुळे थिएटरमध्ये नसलेले सिनेमे बघायचे असतील तर खूप शोधाशोध करावी लागायची. मी नववी- दहावीत असताना आमच्या इथे पुण्यात ‘सिनेमा पॅराडिसो लायब्ररी’ नावाची चित्रपटांची लायब्ररी होती. त्यांच्याकडे स्पॅनिश, जर्मन, इंग्रजी, रशियन, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट, कलर्ड, मराठी, हिंदूी असे सगळे जगभरातले आणि सगळय़ा काळातले सिनेमे मिळायचे.’’ ही लायब्ररी त्याचं सिनेमाप्रेम वाढवण्यासाठी एका अर्थी कारणीभूत ठरली. ‘‘आमचा तिघांचा ग्रुप होता. एका वेळी लायब्ररीतून पाच सिनेमे घेता यायचे. आम्ही दोन दिवसांत पाच सिनेमे बघून संपवायचो. अशा पद्धतीने आम्ही वर्षभरात त्यांच्याकडचे सगळे सिनेमे बघून संपवले. ते बघत असताना मला जाणवलं की, स्टोरीटेलिंग हा भाग मला आवडत होता, मग माध्यम कोणतंही असो! त्यामुळे मी तेव्हाच ठरवलं, की याच क्षेत्रात काम करायचं,’’ असं गश्मीर सांगतो. गोष्टी सांगण्यासाठी उपलब्ध असलेल्या सगळय़ा माध्यमांचा उपयोग करून घेणं हेच गश्मीरला भविष्यात करायचं होतं आणि त्याची ही दिशा त्याला शाळेत असतानाच मिळाली होती.

मनोरंजन क्षेत्राकडे करिअर म्हणून बघताना गश्मीरने कधीच कोणता बॅकअप ऑप्शन ठेवला नव्हता, असं तो सांगतो. या इंडस्ट्रीत काही कामं वर्क होतील, काही वर्क होणार नाहीत याची शक्यता गृहीत धरूनच करिअरला सुरुवात करावी असं त्याचं मत आहे. तो म्हणतो, ‘‘बॅकअप ऑप्शन ठेवणारे कलाकार हे व्यावसायिक नव्हे तर हौशी कलाकार असतात. समजा, मी उद्या डॉक्टर होण्यासाठी मेडिकलचं शिक्षण घेतलं आणि त्याला बॅकअप म्हणून इंजिनीअिरगचंही शिक्षण घेतलं.. असं करता येतं का? डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करता आली नाही तर इंजिनीअर म्हणून नोकरी करता येईल, असं म्हणून मी दोन पदव्या एकाच वेळी घेऊ शकतो का? हा महत्त्वाचा प्रश्न आणि दुसरं म्हणजे तसा बॅकअप मी ठेवला तर मी कोणत्याही एका प्रोफेशनला पूर्ण न्याय देऊ शकेन का? हाही विचार करायला हवा,’’ असं तो म्हणतो. मग कलाकार म्हणून काम करताना बॅकअप कशासाठी? आपलं काम वर्क होणार नाही, अशा नकारात्मक विचाराने करिअरची सुरुवात का करावी? असा प्रश्न उपस्थित करतानाच थोडा प्रॅक्टिकल आणि वास्तववादी विचार करूनच कामाला सुरुवात करायला हवी, असं मत तो मांडतो. ‘‘आपलं एखादं काम आवडत नाही आहे याचा अर्थ कदाचित आपलं काही तरी चुकत असेल, काही तरी कमी पडत असेल. चूक मान्य केली की सुधारायला वाव असतो आणि मग बॅकअप प्लॅनची गरज पडत नाही,’’ असं गश्मीरचं ठाम मत आहे. मनोरंजन क्षेत्र अस्थिर आहे, असंही गश्मीर मानत नाही. त्याच्या मते सर्वच क्षेत्रं अस्थिर आहेत. आत्ताचं जग हे ‘परफॉर्मन्स ओरिएंटेड’ असल्याने सर्वच क्षेत्रांत अनिश्चितता आहे, असं त्याचं म्हणणं आहे. क्षेत्र कुठलंही असो आपण आपल्या कामात गरजेच्या सुधारणा करत राहिलो तरच ही अस्थिरता आपल्यापासून लांब राहते, हा त्याचा विचार निश्चितच तरुणाईला आपल्या करिअरकडे सकारात्मकतेने पाहायला शिकवतो. 

गश्मीरला त्याच्या कामाची पोचपावती प्रेक्षकांनी दिली तर ते सर्वाधिक आवडतं. लोकांकडून मिळणारा प्रतिसाद आपल्याला काम करायला उत्साह देत राहतो, असं तो म्हणतो. तो सांगतो, ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात आम्ही केलेला प्रयोग ही मोठी रिस्क होती, पण लोकांना ती आवडली आणि त्यांनी तशा प्रतिक्रिया व्यक्तही केल्या. माझ्या चित्रपटाच्या सेटवर जो कर्मचारी वर्ग असतो तोही माझ्या कामाने समाधानी असतो आणि तीही माझ्यासाठी चांगली भावना असते, असं तो म्हणतो. ‘‘मी काही सतत त्यांचं कौतुक करत नाही, येता-जाता त्यांना गिफ्ट्स देत नाही किंवा रोज त्या सगळय़ांशी बोलणं होतं असंही नाही; पण त्यांच्याकडून जी आत्मीयता मिळते ती समाधानकारक असते. मी शांतपणे माझं काम एफिशियंटली करतो आणि निघून जातो; पण कदाचित यामुळेच सगळे रिलीव्ह्ड् असतात आणि माझ्या कामामुळे माझ्याशी जोडलेले राहतात,’’ असा आपल्या कामाचा अनुभवही तो निखळपणे सांगतो. 

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात कधी ना कधी अवघड वाट येते. संघर्ष करावा लागतो. गश्मीरच्या करिअर प्रवासातही एक अवघड काळ होता जेव्हा त्याने कोणताही अनुभव नसताना स्वत:चं घर गहाण ठेवून चित्रपट प्रोडय़ूस केला होता. मात्र तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. त्या वेळीदेखील त्याला कधीही आपली करिअरची निवड चुकली असं वाटलं नाही, उलट या प्रसंगातून तो खूप शिकला, असं तो म्हणतो. स्वत:वरच्या मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात या, तात्पुरत्या प्रसिद्धीच्या भरवशावर राहू नका, हे गश्मीर पुन:पुन्हा बजावून सांगतो. तात्पुरती प्रसिद्धी एक दिवस टिकते, दुसऱ्या दिवशी लोक तुम्हाला विसरलेले असतात आणि तुम्ही पुन्हा सुरुवातीच्या टप्प्यावर येऊन थांबता, अशा शब्दांत करिअरच्या अनवट आव्हानांची जाणीवही तो करून देतो. ‘आपल्याला हवं तसं काम मिळत नाही, तोपर्यंत मिळेल ते काम करावं लागतं. तरच एक दिवस हवंय तसं काम मिळतं’, हे गश्मीरचं तत्त्व आहे. गश्मीरचे अनुभवाचे बोल आणि त्याची मुळातच सगळय़ा गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी याच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात काही ना काही ठोस कार्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असणाऱ्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे.