Click point vedvati chiplunkar patience theater movie in series Actor Artist Hemant Dhome ysh 95 | Loksatta

क्लिक पॉईंट : सर्व खेळ पेशन्सचा

रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधला अभिनेता, लेखक आणि आता चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेला कलाकार म्हणजे हेमंत ढोमे.

क्लिक पॉईंट : सर्व खेळ पेशन्सचा
हेमंत ढोमे

वेदवती चिपळूणकर

रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधला अभिनेता, लेखक आणि आता चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेला कलाकार म्हणजे हेमंत ढोमे. ‘झिम्मा’सारखा हाऊसफुल चित्रपट दिल्यानंतर आता त्याचं दिग्दर्शन असलेला ‘सनी’ हा चित्रपटदेखील या आठवडय़ात प्रदर्शित होत आहे. साध्याशा वाटणाऱ्या विषयावर हलकाफुलका आणि तरीही गांभीर्याने पाहावा असा चित्रपट, असं या दोन्ही चित्रपटांचं वैशिष्टय़ म्हणता येईल. सायन्समधून मास्टर्स केलेल्या हेमंतमध्ये कलेची आवड शाळेपासूनच रुजत गेली.

 हेमंतचे वडील पोलिसात होते. हेमंत म्हणतो, ‘खालापूर – खोपोली इथे माझ्या वडिलांचं पोिस्टग होतं आणि माझी शाळा कर्जतला होती. त्यावेळी एक दारूचं प्रकरण घडलं ज्याच्या नंतर पोलीस डिपार्टमेंटने जनजागृतीची मोहीम हाती घेतली. त्या जनजागृतीसाठी पथनाटय़ं करायची ठरली आणि त्यामध्ये मी भाग घेतला. त्यात काही फार अभिनय करावा लागला असं नाही, पण तिथून मला या माध्यमाची गोडी लागली’. अकरावीत असताना त्याने लेखक क्षितिज पटवर्धन याची ‘मर्मभेद’ ही एकांकिका केली. ‘ते माझं पहिलं सीरियस काम! मी बाबांच्या नोकरीमुळे वेगवेगळय़ा गावात राहिलेलो होतो, त्यामुळे माझ्या भाषेला वेगळा लहेजा होता. उच्चार, शब्दफेक, डिक्शन या सगळय़ावर त्यावेळी मी काम केलं. नंतर मी एम. एस. सी. साठी इंग्लंडमध्ये होतो तेव्हा मला माझ्या या आवडीची अधिक जाणीव झाली’, असं हेमंत सांगतो. भारतात परतल्यानंतर हेमंतने या आवडीला प्रत्यक्ष कामाचं स्वरुप दिलं. त्याने रंगभूमीवरून या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं.

 ‘पुरुषोत्तम करंडक’साठी क्षितिज पटवर्धन लिखित ‘तो, ती आणि तेवीस’ या एकांकिकेत आबासाहेब गरवारे महाविद्यालयासाठी हेमंतने काम केलं. हेमंत सांगतो, ‘आपल्याला जे करायचं आहे त्यातलं सगळं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आदित्य सरपोतदार, प्रकाश कुंटे यांच्या चित्रपटांमध्ये जेव्हा मी काम केलं तेव्हा प्री – प्रॉडक्शनपासून चित्रपटाची शेवटची पिंट्र येईपर्यंत मी त्यांच्यासोबत काम करायचो, त्यांना मदत करायचो, ते काय काय करत आहेत ते पहायचो, आणि तेही माझे प्रश्न सहन करून मला नीट समजावून सांगायचे’.आपल्याला आपल्या क्षेत्राबद्दल कोणीही कधीही काहीही विचारलं तर आपल्याला सगळय़ाची उत्तरं आली पाहिजेत असा हेमंतचा आग्रह असतो. या आग्रहामुळेच मी लायटिंग, सोर्स, कॅमेरा, टेक्निक, पोस्ट प्रॉडक्शन, एडिटिंग अशा सगळय़ाच गोष्टींमध्ये लक्ष घालून शिकून घेतलं, असं त्याने सांगितलं. लेखन, दिग्दर्शन क्षेत्राकडे लक्ष वळवताना हेमंतला या अनुभवाचा, ज्ञानाचा, माहितीचा खूप उपयोग झाला, असं तो सांगतो.

 वेगवेगळय़ा माध्यमांतून प्रेक्षकांना भेटणारा हेमंत ‘नवा गडी नवं राज्य’ या व्यावसायिक नाटकातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. क्षितिज पटवर्धन लिखित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित या नाटकामुळे हेमंतला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. त्यावेळचा एक अनुभव हेमंत सांगतो, ‘सुरुवातीला थोडी अडखळत धावणारी या नाटकाची गाडी ‘झी गौरव’च्या नामांकनामुळे वेगाने धावायला लागली. त्यानंतर प्रयोग हाऊसफुल व्हायला लागले. पुण्यातल्या एका प्रयोगाला देवस्थळी नावाचे एक काका नाटक संपल्यावर मला मागे येऊन भेटले. वयाने खूप मोठे असलेल्या काकांनी अचानक मला नमस्कार केला. मला कसंतरी झालं, पण ते म्हणाले संपूर्ण नाटकभर प्रेक्षकांवरची पकड सुटू न देणारा अभिनेता इतक्या काळात पाहिला नव्हता. या आधी अशोक सराफ यांची प्रेक्षकांवर अशीच पकड असायची, प्रेक्षकांचं पूर्ण मनोरंजन ते करायचे. तसा नट खूप काळात पाहिला नव्हता. असं म्हणून त्यांनी मला एक चांदीचं नाणं दिलं जे त्यांच्या आजोबांनी त्यांना दिलं होतं. ते नाणं देताना काका मला म्हणाले तुला लक्ष्मीची कधी कमी पडणार नाही. त्यांचं ते प्रेम पाहिल्यापासून ते आता आमचे फॅमिली मेंबरच झाले आहेत. अशा पद्धतीने इतक्या आपुलकीने जेव्हा कोणी प्रेक्षक बोलतात, तेव्हा आपण करत असलेल्या कामाचं समाधान मिळतं.’

 हेमंतने केवळ त्याच्या झालेल्या कौतुकातूनच नाही तर त्याला आलेल्या नैराश्यात्मक अनुभवातूनही स्वत:ला घडवलं आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकाच्या वेळी प्रेक्षकांचं मला भरभरून प्रेम मिळालं. त्या दरम्यान मात्र एकदा असं झालं की मी सिनेमाच्या चित्रीकरणासाठीसुद्धा तारीख दिली होती आणि त्याच दिवशी नाटकाचा प्रयोग होता. मी वेळेवर पोहोचू शकलो नाही आणि प्रयोग रद्द करावा लागला. त्यानंतर मी ते नाटक सोडलं, मात्र माझ्या प्रतिमेबद्दल खूप उलटसुलट चर्चा संपूर्ण क्षेत्रात सगळय़ांमध्ये झाल्या. एकावेळी जमतील तेवढीच कामं घ्यायला हवीत आणि नाही म्हणता यायला हवं हे मला त्यामुळे समजलं, असं हेमंत म्हणतो. ‘मधल्या काळात मला फार काही काम मिळालं नाही. काही चर्चा ऐकून मात्र मला असं वाटायला लागलं की मी इतका वाईट माणूस नाही आहे आणि हे मला सिद्ध करायला हवं. त्या काळात मी स्वत:वर काम केलं. नंतर मला ‘सावधान शुभमंगल’ हे नाटक मिळालं आणि थोडय़ा काळाने माझ्याबद्दलचं लोकांचं मत पुन्हा चांगल्या अर्थाने बदललं’, अशी आठवण सांगतानाच आपल्याबद्दलची मतं आपणच बदलू शकतो हे सगळय़ांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असं हेमंत म्हणतो. हे क्षेत्र अनिश्चित आहे आणि प्रत्येकच क्षेत्रात स्पर्धा आहे. काळानुसार आपण अपडेट झालो नाही तर स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर स्वत:ला बदलत राहणं आणि नवीन गोष्टी शिकत राहणं महत्त्वाचं, असा कानमंत्र हेमंतने तरुणाईसाठी दिला आहे.

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2022 at 14:39 IST
Next Story
‘ब्रॅण्ड’ टेल : वेरो मोदा बीईंग ट्रेण्डी