‘‘काय मग, या फ्रेंडशिप डेसाठी काय प्लॅन आहे?’’
ऑगस्टचा पहिला रविवार जसजसा जवळ येतो, तसतसा हमखास विचारला जाणारा हा प्रश्न. पण त्याची उत्तरं मात्र काळाबरोबर काहीशी बदललेली. एकेकाळी उत्तर असायचं … ‘‘सगळी मंडळी भेटणार, फिरायला जाऊ, धमाल करू!’’
मग आलं – ‘‘फोनवर भरपूर गप्पा मारू.’’ काळ पुढे सरकला, संवाद संक्षिप्त होत गेला -‘‘मेसेज करू, विश करू.’’ आणि हल्ली? ‘‘फ्रेंडशिप डेचे मिम्स पाठवू, कोणे एके काळी भेटलो होतो तो फोटो शोधून स्टेटसला लावू, त्यात एकमेकांना टॅग करू…’’ पण प्रत्यक्ष बोलणं?. कदाचितच नाहीच!
एकीकडे एका क्लिकवर भेटणं होतंय, एका मेसेजवर बोलणं होतंय, पण दुसरीकडे हा संवाद काहीसा खुंटतो आहे. नुसतं लाईक आणि ईमोजी टाकून भावनिक कोरडेपणा येतो. आणि नकळत एक प्रश्न मनात रुंजी घालतो. या डिजिटल जिंदगीत सोशल मीडियाने, इंटरनेटने मैत्रीची व्याख्याच बदलून टाकली आहे का?
मानव मुळातच सामाजिक प्राणी आहे, हे केवळ भावनिकच नाही तर जीवशास्त्रीय आणि मेंदूशास्त्रीयदृष्ट्याही खरं आहे. मानवशास्त्र सांगतं की आदिम काळात जमातींमध्ये मैत्री म्हणजे सुरक्षितता, सामायिक संसाधनं आणि सहजीवनाची हमी होती. एकटं राहण्यापेक्षा छोट्या समूहात राहून अन्न-वस्त्र वाटून घेत, संरक्षण मिळवत आपण टिकून राहिलो. उत्क्रांत झालो. या प्रक्रियेत नात्यांची वीण गुंफली गेली. आजही मैत्री केवळ भावनिक गरज नाही, तर ती आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर थेट परिणाम करणारी शक्ती आहे. प्रख्यात विकासवादी जीवशास्त्रज्ञ डॉ. लॉरेन ब्रेंट म्हणतात, मैत्री फक्त भावनिक चैन नाही तर तिचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यांच्या अभ्यासानुसार, ज्या व्यक्तींच्या आयुष्यात सच्चे मित्र असतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असते, तणावाचं प्रमाण कमी होतं आणि आयुष्यमान वाढतं. कारण मैत्रीच्या नात्यातून मेंदूमध्ये ‘ऑक्सिटॉसिन’ आणि ‘डोपामिन’सारखे आनंददायक रसायने स्रावत असतात, जी आत्मीयता, विश्वास आणि आनंदाची भावना निर्माण करतात.
पूर्वीची मैत्री शाळेच्या बाकांवर, कॉलेजच्या कट्ट्यांवर, गल्लीतल्या नाक्यावर आपसूकच घडायची. एकत्र खेळणं, गप्पा मारणं, चहाच्या टपरीवर रेंगाळणं, मित्रांशी संपर्क ठेवायचा तर प्रत्यक्ष भेटी, पत्रं किंवा लँडलाइनवर तासन् तास बोलणं, असं असायचं. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने मैत्रीची व्याख्या आणि व्याप्ती दोन्ही पालटलं. ऑर्कुटपासून सुरू झालेला प्रवास फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटपर्यंत आला. आता इन्स्टंट मेसेजिंग, व्हिडीओ कॉल्स आणि सोशल मीडियामुळे मित्रांशी जोडणं क्षणार्धात शक्य आहे. मित्र कितीही लांब असला, तरी व्हॉट्सअपवर एक मेसेज, झूमवर कॉल किंवा स्नॅपचॅटवर स्ट्रीक पाठवला की संपर्कात राहता येतं. भावना व्यक्त करण्यासाठी आता शब्दांपेक्षा इमोजी, मिम्स आणि व्हिडीओ कॉल्स जास्त बोलके ठरतात. मैत्रीतली ही झटपट कनेक्टिव्हिटी आणि नव्या प्रकारे व्यक्त होण्याची पद्धत यामुळे मित्रांचं जग जवळ आलंय, पण त्याच वेळी मैत्रीच्या खोलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
नव्या युगात मैत्रीचे रूपच बदलले आहे. पूर्वी प्रत्यक्ष भेटीशिवाय मैत्री अशक्य वाटायची. मैत्री फुलायला भेटीगाठी, प्रत्यक्ष गप्पा या अनिवार्य होत्या. आता मात्र सोशल मीडियामुळे आपण कुठल्याही कोपऱ्यात असलो, तरी आपल्या मित्रांशी रोजच्या रोज संपर्कात राहू शकतो. ग्लोबल डिजिटल रिपोर्ट २०२५ नुसार, ५० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीय इंटरनेट वापरकर्ते प्रामुख्याने मित्र आणि कुटुंबाशी संपर्कात राहण्यासाठी ऑनलाइन येत असतात. अंतरं संपलेली आहेत आणि संवाद अधिक सोपा झालाय. स्टेट्स, स्टोरी यातून त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी थेट न सांगताही कळतात. शाळेतले जुने मित्र, जुने शेजारी कदाचित सोशल मीडिया नसता तर संपर्कात राहिले नसते. शाळा, कॉलेज, ऑफिस मेट, जिम बडीज अशा विविध व्हॉटसअप ग्रुपमधून आता गप्पाटप्पा रंगतात. याशिवाय, मिम्स हे मैत्रीत संवादाचं नवं माध्यम बनलं आहे. भावना व्यक्त करणं असो की नर्म विनोद किंवा टोमण्यांची कोपरखळी पानभर शब्दांपेक्षा एक मिम पुरेसं ठरतं.
डिजिटल माध्यमांमुळे मैत्री आता केवळ शेजारपाजार, शाळा-कॉलेज ऑफिसपुरती मर्यादित राहिलेली नाही. इंटरनेटमुळे मैत्रीही जागतिक झाली आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी जोडलं जाणं शक्य झालं आहे. विविध विषयांच्या फेसबुक पेजेसवर समान आवडींची माणसं एकत्र येतात, त्यातून मैत्रीची नाती फुलतात. डिजिटल मैत्रीने अशा अनेकांना व्यक्त होण्याची नवी संधी दिली आहे. अंतर्मुख स्वभावाचे किंवा प्रत्यक्ष समोर व्यक्त होण्यात संकोच वाटणारे लोकही आता ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर अधिक मोकळेपणाने बोलू लागले आहेत. शिवाय, इंटरनेटमुळे विविध संस्कृती, भाषा, जगभरचे विचार आणि जगण्याच्या पद्धती यांचा आपल्याला परिचय होतो आणि त्यामुळे मैत्रीचं परिमाणही विस्तारतं.
सध्या गेमिंगनेसुद्धा तरुणांच्या मैत्रीत रंग भरला आहे. आता मित्र फक्त शाळेत किंवा गल्लीत नाही, तर PUBG, Free Fire किंवा डिस्कॉर्डवर भेटतात. डिजिटल जगात जशी मैत्रीची नवीन दालनं खुली झाली आहेत, तशा काही नव्या समस्यादेखील तयार झाल्या आहेत. बऱ्याचदा प्रत्यक्ष न भेटता झालेली ऑनलाइन मैत्री अनेकदा वरवरची ठरण्याची शक्यता असते. जेव्हा आपण एखाद्याला भेटतो, सोबत वेळ घालवतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे उलगडतात. आवडीनिवडी, स्वभाव समजतो. आणि मग ‘‘समशील: समव्यसनेषु सख्यम्’’ या उक्तीनुसार मैत्री जुळते.
डिजिटल विश्वात मात्र बऱ्याचदा फक्त चांगलं तेच दाखवलं जात असतं. त्यामुळे स्क्रीनपल्याडची व्यक्ती खरी कशी आहे, याचा अंदाज येणं कठीण होतं. त्यामुळे काही वेळेस नंतर विसंवाद होऊ शकतो. अपेक्षा न जुळल्याने इंटरेस्ट कमी होतो आणि मग अचानक ‘घोस्टिंग’ — म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता संवाद बंद केला जातो. यामुळे नैराश्य आणि गैरसमज होण्याची शक्यता असते. कधी कधी ही डिजिटल मैत्री खोटी निघते. फेक प्रोफाइल्समुळे खोटं व्यक्तिमत्त्व उभं केलं जातं आणि त्यातून आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर प्रकारही घडू शकतात.
आपल्या ओळखीच्या आणि घनिष्ठ मित्रांबाबतीत देखील आजकाल प्रत्यक्ष भेटण्याऐवजी ऑनलाइन संवादच अधिक होतो. यातही बऱ्याचदा लाइक, इमोजी आणि एक-दोन वाक्यांचे चॅट यानंतर बोलणं खुंटतं. स्टेट्समुळे रोजच्या घडामोडी कळत असल्याने एकमेकांची आवर्जून ख्यालीखुशाली विचारणं मागे पडतं. संवादाचे एक एक दोर कापले जातात. मित्राचा मूड, त्याची अडचण किंवा क्षणिक उदासीनता… हे संवादाशिवाय समजणं कठीण असतं. अशा वेळी पाठवलेली एखादी पोस्ट, उपहासात्मक मिम्स, इमोजी यामुळे गैरसमजसुद्धा होऊ शकतात. अनेकदा तर सगळे मित्र प्रत्यक्ष भेटले, तरी पाच मिनिटांनी सगळे आपापल्या मोबाइलमध्ये मग्न होतात. संवाद हा मैत्रीचा गाभा असतो, तो काहीसा यातून हरवत चालला आहे. अर्थात, हे सगळीकडे आणि सगळ्यांच्या बाबतीत होतं असं नाही.
ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ रॉबिन डनबार यांच्या सिद्धांतानुसार मेंदूतील निओकॉर्टेक्स या भागाचा आकार आणि आपण किती जटिल सामाजिक नातेसंबंध हाताळू शकतो याचा थेट संबंध असतो. परिणामी, मानवी मेंदूच्या आकारानुसार आपण सुमारे १५० स्थिर आणि अर्थपूर्ण नातेसंबंध जपण्यास सक्षम आहोत. डनबार यांच्या मते, आपल्या ओळखींच्या विविध पातळ्या असतात. आपल्याला अधूनमधून गाठभेट होणारे, थोडाफार संवाद असणारे सुमारे १०० – १५० कॅज्युअल मित्र असू शकतात. त्यातून जरा अधिक ओळखीचे, अधिक संवाद साधणारे ३० – ५० जण आपले मित्र ठरू शकतात. पुढे त्यातून १० – १५ जण असे असतात ज्यांना आपण ‘चांगले मित्र’ म्हणू शकतो. यांच्यासोबत विश्वासाचं नातं अधिक गडद झालेलं असतं. आणि या सर्वांतून उरतात काही खास … अगदी कुटुंबासारखे ‘बेस्ट फ्रेंड्स’. डनबार यांच्या मते ही संख्या आहे – पाच. या जिगर के तुकडे बडीज सोबत आपण आपल्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टी सुख-दु:ख, खेद-खंत, संघर्ष- स्वप्नं सगळं काही शेअर करू शकतो.
डिजिटल युगात, विशेषत: सोशल मीडियामुळे आपण हजारो लोकांशी ‘कनेक्टेड’ असतो. पण आपल्या मेंदूच्या नैसर्गिक क्षमता आणि भावनिक मर्यादा बदलल्या नाहीत. आपण कितीही ‘फॉलोअर्स’ किंवा ‘फ्रेंड्स’ यादीत जोडले तरीही खरी जवळीक आणि विश्वास त्याच मर्यादित संख्येपुरती असते. परिणामी सोशल मीडियावरची अनेक नाती वरवरची, तात्पुरती ठरण्याची शक्यता असते. फेसबुकवर शेकडो मित्र आहेत, इंस्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत, पण गरज पडल्यावर यातला कोण धावून येईल? हा प्रश्न नक्कीच डोळे उघडणारा ठरेल.
याशिवाय, मैत्रीच्या पारंपरिक पातळ्या- परिचित, हितैषी, मित्र, सुहृद, सखा या डिजिटल जगात धूसर होऊ लागतात. एखाद्याशी ऑनलाइन चॅटमध्ये एकदा चांगलं बोलणं झालं, की लगेच ‘बेस्टी’ म्हणून ओळख होऊ लागते. ‘A friend in need is a friend indeed’ या ऐवजी आपल्या पोस्ट नेहमी लाइक करतो, तो खरा मित्र अशी व्याख्या बदलू शकते. लाइक- कमेंटच्या पारड्यात मैत्रीचं मोल तोलायची ही सवय खऱ्या आयुष्यात नाती जोडतानादेखील कायम राहू शकते.
या पार्श्वभूमीवर, डिजिटल मैत्री पुन्हा नव्याने समजून घेण्याची गरज आहे. मैत्री म्हणजे फक्त मेसेजच्या माध्यमातून कनेक्टेड राहणं नव्हे. मैत्रीत भावनिक जवळीक, पारदर्शकता आणि परस्पर आदर असतो. ती केवळ स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टेटस अपडेट्स किंवा रिप्लायवरून समजली जाऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांशी केवळ चॅटवर विसंबून न राहता, अधूनमधून फोन किंवा व्हिडिओ कॉल करावेत. ख्यालीखुशाली विचारावी, गप्पांचे फड रंगवावेत आणि अर्थातच प्रत्यक्ष भेटींचं स्थान अजूनही अतिशय महत्त्वाचं आहे. डिजिटल साधनं केवळ पूरक ठरावीत, पर्याय नसावीत, हे लक्षात घेणं गरजेचं.
ऑनलाइन मैत्रीतही काही मर्यादा ओळखणं गरजेचं आहे. प्रत्येकजण लगेच रिप्लाय करेलच असं नाही, प्रत्येक संवादात भरभरून भावना व्यक्त केल्याच पाहिजेत असं नाही. ‘शेअर-शेअर’चा खेळ न खेळता मनापासून संवाद साधणं हेच मैत्रीचं खरं रूप आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, व्यग्र दिनक्रमातून जरा वेळ बाजूला काढून आपल्या जिवलग मित्रांना प्रत्यक्ष भेटावं. जेव्हा सगळे मित्र एकत्र जमतील, तेव्हा मोबाइल बाजूला ठेवावा.
एका मुलाखतीत इतिहासकार यूवल नोआ हरारी यांनी मार्क झुकरबर्गला विचारलं होतं, ‘फेसबुकचं काम लोकांना एकमेकांशी ‘कनेक्ट’ करून भेटवणं आहे की फक्त त्यांना स्क्रीनवर टिकवून ठेवणं?’ हरारी यांची चिंता अशी होती की फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मच्या एंगेजमेंट मेट्रिक्समुळे क्लिक, लाइक्स कमेंट्सच्या मोहजालात मैत्री हरवून जाते आहे. त्यांच्या या प्रश्नातून डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या मर्यादा उघड होतातच, पण मैत्री जपण्याची जबाबदारी मात्र आपलीच आहे, हेही अधोरेखित होतं.
मैत्रीचा उत्सव असणारा ‘फ्रेंडशिप डे’ काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हा विचार नक्कीच महत्त्वाचा ठरतो. यानिमित्ताने डोळे बंद करून स्वत:ला प्रश्न विचारावा. समजा आपण आपलं बर्थडे नोटिफिकेशन ऑफ केलं तर यादीतले किती मित्र आपल्याला वाढदिवसाला वीश करतील? दिवसभरासाठी सोशल मीडियापासून लॉगआउट झालो, तर कितीजण आपल्याला फोन करून खुशाली विचारतील? त्यांची नावं मनात नोंदवावी आणि फ्रेंडशिप डेला त्यांना आवर्जून शुभेच्छा द्याव्यात. अजून एक प्रश्न – समजा ५ दिवसांसाठी आपण मोबाइल बंद करून बसलो तर किती मित्र आपल्याला शोधत आपल्या घरी येतील? उत्तर मिळताच क्षणी फ्रेंडशिप डेची वाट न बघता आपल्या या जिवलगांना भेटून दोस्ती की झप्पी द्यावी! काय मग, या फ्रेंडशिप डेसाठी तुमचा काय प्लॅन आहे?
viva@expressindia.com