प्रा. शिवाजीराव भोसले हे नाव माहिती नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात सापडणे दुर्मीळ. त्यांची व्याख्याने, लिखाण यांनी चिंतनशील माणसांना भरपूर खाद्य दिले. अशापैकीच एक पौष्टिक खाद्य म्हणून ज्या पुस्तकाचा उल्लेख करता येईल असे पुस्तक म्हणजे यक्षप्रश्न!
ज्या विविध प्रश्नांचा मागोवा मानवी मन घेऊ पाहते, ज्या प्रश्नांबद्दल मानवी मनात प्रचंड कुतूहल असते, अशा प्रश्नांचा ऊहापोह या पुस्तकात लहान लहान लेखांद्वारे केला गेला आहे. प्रस्तावनेतच लेखकाने म्हटल्याप्रमाणे, हे मुक्त चिंतन असले तरीही स्वैर चिंतन नाही. यात मांडलेले विचार साधार आणि तर्कसंगतीने मांडले गेले आहेत. विचारप्रिय माणसाला विचारांपेक्षा अधिक प्रिय काय असेल, तेव्हा विचार करण्यासाठी उद्युक्त करायचा हा एक प्रयत्न असल्याचे स्वत: प्राचार्य लिहितात.
या पुस्तकात असे कोणकोणते प्रश्न आहेत? देव आहे काय? देव आहे तर मग हे जग असे का असते? हे कोडे अजूनही का उलगडत नाही? या पहिल्या तीन लेखांमधून, मानवाला पडलेल्या सर्वात आदिम प्रश्नावर भोसले यांनी आपले तात्त्विक चिंतन मांडले आहे. त्यात ईश्वर हा श्रद्धाविषय मानायचा की ज्ञानविषय या मुद्दय़ावरील मते व्यक्त करून प्राचार्य लिहितात की, जे घडते ते अस्तित्वात येण्यामागील अज्ञाताचा हात नाकारता येईल का? विश्व हे रचनाबद्ध आहे, त्याच्या व्यापारामागे एक सूत्र आहे, त्याच्या गतीत कमालीचे सातत्य आणि अचूकता आहे, एक जीवननगर कोणाच्याही दृश्य प्रयत्नांशिवाय उभे राहते, यामागे अज्ञात शक्ती आहे हे नाकारता येईल का? आपल्या श्रद्धेला किंवा अश्रद्धेला जराही न दुखावता प्राचार्यानी या प्रश्नावर निश्चितच वाचकाला अंतर्मुख केले आहे.
असेच पुढचे लेखही झपाटून टाकतात.. मी कोण, ध्यान, योग आणि व्यक्तिमत्त्व, हे व्यक्तिमत्त्व सुधारता येते काय? माणूस ‘असा’ का वागतो, व्यक्तिमत्त्वाची पडझड थांबेल का? अशा प्रश्नांचा ऊहापोह त्यापुढील लेखांमध्ये केला गेला आहे. माणसाची जगण्याची निसर्गदत्त प्रेरणा कोणती असावी, या मध्यवर्ती संकल्पनेभोवती हे लेख गुंफले गेले आहेत. याच ओघात लेखक बुद्धिमत्ता म्हणजे काय, स्मृती म्हणजे काय, शिक्षणाचा नेमका अर्थ काय? या प्रश्नांवरील चिंतन तर्कशुद्ध पद्धतीने आपल्यासमोर मांडतात.
भारताच्या सध्याच्या राजकीय पोकळीच्या पाश्र्वभूमीवर आपल्याला आकर्षून घेणारे विषय म्हणजे, नेतृत्वाचे व्याकरण आणि लोकराज्याचे अंतरंग.. भूभाग, लोक, शासन आणि सार्वभौमत्व या चार मूलभूत घटकांनी तयार होणारे ‘राज्य’ ‘राष्ट्र’ केव्हा होते याचे उत्तर शिवाजीराव भोसले आपल्याला देतात. ज्या संस्कृतीच्या नावाने आपण नानविध भाष्ये करतो ती संस्कृती म्हणजे नेमके काय आणि संस्कृती आणि सुधारणा यांतील द्वंद्व किंवा कदाचित अद्वैत प्राचार्यानी सहज-साध्या आणि सोप्या उदाहरणांद्वारे उलगडून दाखविले आहे.
काळाच्या कसोटीवर काही संकल्पना कायम राहतात. अशा संकल्पनांचा नैतिकतेचा पाया दृढ असतो. पण नियती नावाची गोष्ट हा पाया हादरवण्याचा प्रयत्न करताना दिसते. नीती आणि नियती या लेखात प्राचार्यानी यावर भाष्य केले आहे. मोठी माणसे ही मोठी का झाली, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे मोठेपण कशात तोलायचे, आपल्यात आपण किमान कोणते बदल करावयास हवेत याबद्दलचे विचार भोसले आपल्याला शेवटून दुसऱ्या लेखात देतात. प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आणि उन्नत नागरिकत्व यात आपल्याला भारताची एक राष्ट्र म्हणून नेमकी गरज काय आहे हे जाणवल्यावाचून राहत नाही.
सर्वात शेवटचा लेख हा या पुस्तकाच्या शीर्षकाची माहिती विशद करतो. जीवनाच्या सर्व अंगांचा सांगोपांग विचार करणारा संशोधन वृत्तीचा विलास हाच यक्षप्रश्नांचा आधुनिक पर्याय झाला, असे सांगत आजच्या माणसाची नेमकी अडचण कोणती यावर प्राचार्य नोंदवितात की, आजच्या सामान्य माणसाला बरेच कळते पण त्याला कशाचेच पुरते आणि पायाशुद्ध ज्ञान नाही आणि हेच या पुस्तकाचे सार आहे. याच मुद्दय़ावर खरे चिंतन आणि त्यातून व्यक्तिमत्त्व सुधारणा होणे आवश्यक आहे.
पुस्तक – यक्षप्रश्न
लेखक – प्रा. शिवाजीराव भोसले
प्रकाशक – अक्षरब्रह्म प्रकाशन
पृष्ठे – २४८
मूल्य – २००/-
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2013 रोजी प्रकाशित
बुक शेल्फ : आयुष्याला पडणारे यक्षप्रश्न..
प्रा. शिवाजीराव भोसले हे नाव माहिती नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात सापडणे दुर्मीळ. त्यांची व्याख्याने, लिखाण यांनी चिंतनशील माणसांना भरपूर खाद्य दिले. अशापैकीच एक पौष्टिक खाद्य म्हणून ज्या पुस्तकाचा उल्लेख करता येईल असे पुस्तक म्हणजे यक्षप्रश्न!
First published on: 10-05-2013 at 12:37 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difficult questions raising of life