एका निर्मनुष्य बेटावर एक साधुबुवा राहायचे. धोंडिबा त्यांच्या दर्शनाला गेला. साधु बुवांनी डोळे उघडले, आजूबाजूला पाहिलं आणि म्हटलं, ‘तू नावेतून उतरून नारळाच्या झाडाखाली दोन शहाळ्यांचं पाणी प्यायलास. मग पूर्वेला चाळीस पावलं चालून वाळूत बसलास, थोडा वेळ डुलकी घेतलीस आणि मग भेळ खात इथपर्यंत आलास’. धोंडिबा चाट पडला. ‘महाराज, आपण खरे अंतर्यामी आहात!’ साधुबुवा हसले, ‘छे ! मी फक्त तुझ्या मागे पाहिलं. वाळूतली तुझी पावलं, उरलेली शहाळी, सांडलेले कुरमुरे – हे सगळे तुझ्या हालचालींचे ठसे आहेत. त्यातूनच मला काय केलंस तेच नव्हे, तर तुझा स्वभावही समजला. तू आळशी आणि बेफिकीर आहेस!’ धोंडिबाने आपली जन्मपत्रिका साधुबुवांना दिली. ते पाहून बुवा म्हणाले तुझ्या घरी बायको आणि ४ मुलं आहेत. मागच्या महिन्यात तू १० किलो तांदूळ घेतले आहेस. धोंडिबा डोळे विस्फारून काही म्हणायच्या आतच बुवा म्हणाले ‘तू मूर्खही आहेस, कारण ही पत्रिका नसून रेशनकार्ड आहे’.
डिजिटल जगात वावरताना आपणही कळत नकळत अशी माहिती देत असतो. काही माहिती आपण स्वत:हून देतो तर काही वेळा वाळूत चालताना उमटणाऱ्या पावलांसारख्या नकळत पाऊलखुणा मागे राहत जातात. ब्राउजिंग, सर्चिंग, पोस्टिंग अशा कृतीतून आपण जे माहितीचे ठसे सोडत जातो, ते म्हणजे डिजिटल फूटप्रिंट. जवळजवळ प्रत्येक ऑनलाइन क्रियेतून काही ना काही डिजिटल फूटप्रिंट्स तयार होत असतात.
तुम्ही गूगलवर ‘पावसाळ्यात फिरण्याची ५ टॉप ठिकाणं’ शोधली, गुगल मॅपवर ठोसेघरचं लोकेशन पाहिलं. फेसबुकवर एखाद्या राजकीय पोस्टला लाइक केलं, इंस्टाग्रामवर एखादं रील पाहून हसवणारी इमोजी टाकली, झोमॅटोवर पिझ्झा ऑर्डर केला, अॅमेझॉनवरून हेडसेट्स मागवले, यूट्यूबवर एखादा मोटिव्हेशनल व्हिडीओ पाहिला. डिजिटल आयुष्यात या कृती करून आपण विसरूनही गेलो, पण त्या इंटरनेटवर तुमच्या नावाने एकेक डिजिटल ठसा उमटवला गेला.
तसं पाहिलं तर हे ठसे लहान वाटू शकतात, पण अशा रोजच्या अनेक कृती आणि त्यांची अनेक वर्षांची एकूण गोळाबेरीज केली तर ती मोठी ठरते. या सगळ्या कृती एकमेकांशी फारशा संबंधित नसल्यासारख्या वाटू शकतात, पण हे ठिपके जोडत जोडत आपल्या डिजिटल छबीची रांगोळी साकार होत असते. आपलं नाव, वय, पत्ता, शिक्षण, ऑफिस अशा वैयक्तिक माहितीबरोबरच आपला स्वभाव, आवडीनिवडी, सवयी, खरेदीचा कल, विचारसरणी, राजकीय कल, धार्मिक श्रद्धा असं आपलं समग्र व्यक्तिमत्त्वही त्यातून उलगडतं. हे प्रोफाइल इतकं अचूक असतं की बऱ्याचदा आपल्याला स्वत:विषयी जितकी माहिती नाही, त्यापेक्षा अधिक माहिती डिजिटल जगताला आपल्याबद्दल असते.
आपल्या विविध ऑनलाइन कृतीतून सक्रिय आणि निष्क्रिय अशा दोन प्रकारचे डिजिटल ठसे तयार होत असतात. आपण जाणीवपूर्वक केलेल्या कृतींमधून तयार होणारा ठसा म्हणजे अॅक्टिव्ह फूटप्रिंट. आपण गूगलवर विशिष्ट माहिती शोधली, अमेझॉनवर रिव्ह्यू दिला, इंस्टाग्रामला स्टोरी टाकली, ट्रिपमध्ये फेसबुकला ‘चेक इन’ केलं, फोटो अपलोड केले, काही ट्विट केलं, पोस्ट लिहिली अशा कृतींतून आपण स्वत:हून फूटप्रिंट तयार करत असतो. आपल्या आवडीच्या पोस्ट्सना लाइक करणं, कमेंट करणं, ऑनलाइन फॉर्ममध्ये नाव, ईमेल, पत्ता अशी माहिती भरणं, लिंक्डइनवर आपलं प्रोफाइल अपडेट करणं या सगळ्या कृती आपल्या डिजिटल ओळखीचे ठसे उमटवत असतात.
पॅसिव्ह फूटप्रिंट्स मात्र आपल्या नकळत तयार होत असतात. आपण ज्या वेबसाइट्स वापरतो, त्या आपला आयपी अॅड्रेस, कुकीज आणि कॅशेच्या मदतीने आपली माहिती टिपतात. आपलं लोकेशन, त्या वेबसाइटवर घालवलेला वेळ, वापरलेली पेमेंट पद्धत यांचा मागोवा ठेवला जातो. शॉपिंग पोर्टल्स आपण कोणते प्रॉडक्ट्स शोधतो, काय विकत घेतो, कोणत्या वेळी काय जास्त खरेदी करतो, याची सतत नोंद घेतात. सोशल मीडिया साइटचे अल्गोरिदम आपण कोणत्या पोस्ट्सना लाइक करतो, कोणते रील्स पाहतो, काय शेअर करतो, कोणत्या ग्रुप्समध्ये सक्रिय असतो, हे सगळं एका विशिष्ट पॅटर्ननुसार नोंदवतात. आपण अनेक अॅप्सना सहजपणे कॉन्टॅक्ट्स, फोटो गॅलरी, लोकेशन वापरण्याची परवानगी देतो. ही माहिती त्या अॅपच्या सर्व्हरवर साठवली जाते. काही अॅप्स तर पार्श्वभूमीत चालू राहून ऑनलाइन वर्तन सतत ट्रॅक करत असतात. यातून काहीही पोस्ट न करता, काहीही शेअर न करता फक्त मोबाइल हातात घेऊन अॅप्स वापरणं, ब्राउझिंग करणं, स्क्रोल करणं यावरूनही आपल्या सवयी, स्वभाव, आर्थिक स्थिती, वैयक्तिक आवडीनिवडी यांचं अचूक प्रोफाइल तयार केलं जातं.
या फूटप्रिंट्स क्षणिक आहेत असंही आपल्याला वाटू शकतं. स्नॅपचॅटवरील मेसेज पाहता क्षणी नाहीसे होतात, इंस्टाग्राम आणि फेसबुक स्टोरीज २४ तासात ऑटो डिलीट होतात, आपणच केलेल्या पोस्ट, कमेंट्स डिलीट करायची सोय आहेच आणि ब्राउझरची, अॅप्सची हिस्टरी ‘क्लिअर’ केली की वाटतं, झालं! सगळं पुसलं गेलं. सगळ्यात शेवटी फोन फॅक्टरी रिसेट करणं, सोशल मीडिया प्रोफाइल डिलीट करणं, असा रामबाण उपायही आहेच. पण, इंटरनेटच्या जगतात एक म्हण आहे, ‘वन्स ऑन द इंटरनेट, ऑल्वेज ऑन द इंटरनेट’. एकदा का एखादी गोष्ट ऑनलाइन टाकली गेली की, ती कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जतन झालेली असते. कधी वेबसाईटच्या सर्व्हरवर, कधी बॅकअपमध्ये, तर कधी एखाद्या थर्ड पार्टी अॅपमध्ये, कधी कोणाच्या स्क्रीनशॉटमध्ये. फेसबुक बऱ्याचदा आपण मागच्या वर्षी काय स्टोरी टाकली होती याची आठवण करून देतं, हे त्याचंच उदाहरण. आपण फारफार तर अॅक्टिव्ह फूटप्रिंट काही प्रमाणात डिलीट करू शकू, पण आपल्या नकळत जमा झालेल्या पॅसिव्ह फूटप्रिंटवर आपलं नियंत्रण नाही.
इतक्या सगळ्या जमा झालेल्या माहितीचा नक्की उपयोग काय? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आपल्या डिजिटल फूटप्रिंट्समधून गोळा झालेली माहिती अनेक कंपन्या, संस्था आणि तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा वापरत असतात. या माहितीचा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे आपल्याला ‘योग्य’ त्या जाहिराती दाखवणं. उदाहरणार्थ, आपण गूगलवर फिटनेस आणि व्यायामाविषयी सर्च केलं असेल, तर नंतर सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर आपल्याला प्रोटीन पावडर, ऑनलाइन योगा क्लासेस, फिटनेस गॅजेट्स अशा जाहिराती दिसू लागतात. इंस्टाग्रामवर जर आपण वारंवार टुरिस्ट व्हिडीओ पाहत असाल, तर लगेच ट्रॅव्हल पॅकेजेस, हॉटेल ऑफर्स किंवा व्हिसा एजन्सींच्या पोस्ट्स आपल्याला दिसायला लागतात. हे सगळं डिजिटल प्रोफाइलिंगच्या आधारे घडत असत. आपली आवड, गरज, वय, आर्थिक क्षमता अशा बाबी लक्षात घेऊनच आपल्याला ‘बरोबर’ त्या गोष्टी दाखवल्या जातात. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबसारखे प्लॅटफॉर्म्स आपलं कंटेंट पाहण्याचं वर्तन लक्षात घेऊन, तसाच कंटेंट पुन:पुन्हा आपल्यासमोर आणतात, जेणेकरून आपण त्यावर अधिक वेळ घालवू आणि त्या अॅप्सचा वापर अधिक वाढेल.
फक्त या वेबसाइट्स आणि सोशल मीडिया कंपन्याच आपल्यावर लक्ष ठेवून आहेत असं नाही. ऑनलाइन जगात आपण कसे वागतो, काय करतो यावर अनेकांचं लक्ष असतं. अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर आपणही त्याचा डीपी, लाइक केलेलं पेज, शेअर केलेल्या पोस्ट्स म्हणजेच त्याच्या डिजिटल प्रोफाइलवरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावतो. असंच लोक आपल्या बाबतीतही करत असतात. परदेशी विद्यापीठात शिष्यवृत्ती किंवा प्रवेशप्रक्रिये दरम्यान विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्तन, डिजिटल प्रोफाइल तपासली जाते. काही इन्शुरन्स कंपन्या ग्राहकांचं रिस्क प्रोफाइल समजून घेण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया वर्तनाचा आधार घेतात. आता लग्न जमवतानासुद्धा डिजिटल प्रोफाइल गुणमिलन महत्त्वाचं ठरतं आहे. आपली डिजिटल प्रोफाइल आपल्या व्यावसायिक ओळखीचा भाग बनली आहेत. LinkedIn आणि सोशल मीडिया प्रोफाइल जणू आता समांतर बायोडेटा बनले आहेत. नुकतीच मुंबईत घडलेली एक घटना लक्षवेधी ठरते. एका उमेदवाराला एका स्टार्टअपकडून ? २२ लाख वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली होती, पण त्याच्या LinkedIn वरील आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे ती ऑफर रद्द करण्यात आली. ही एक अपवादात्मक घटना नाही. ZipDo च्या २०२४ –२५ च्या अहवालानुसार, जवळपास ७० ते ७३ टक्के कंपन्या उमेदवारांचं सोशल मीडिया प्रोफाइल तपासतात. ४१ टक्के उमेदवारांना केवळ त्यांच्या डिजिटल वर्तनामुळे नोकरी नाकारण्यात आली आहे.
डिजिटल फूटप्रिंटचा CIBIL स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या एका ब्लॉगनुसार, आज कर्ज देणाऱ्या कंपन्या पारंपरिक तपासणीसोबतच ऑनलाइन खरेदी, बिल भरण्याची शिस्त, सोशल मीडियावरील वर्तन यावरूनही एखाद्याची आर्थिक पत, कर्ज फेडण्याची क्षमता आणि इच्छा यांचा अंदाज घेतात.
गुन्हेगारही डिजिटल पाऊलखुणांच्या मागावर असतात. आपल्या सोशल मीडिया पोस्ट्सवरून आपण नकळत आपली आर्थिक स्थिती, घराचा पत्ता, सुट्टीचं नियोजन अशा अनेक गोष्टी जगजाहीर करतो. ही सगळी माहिती एखाद्या चोरासाठी किंवा सायबर गुन्हेगारासाठी संधी ठरू शकते. आपली जन्मतारीख, मुलाबाळांची नावं, पेटचं नाव, फेवरेट टीम अशी आपण शेअर केलेली वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांना आपल्या बँकिंग किंवा इतर महत्त्वाचा पासवर्डचा अंदाज बांधण्यात मदत करते. आपल्या डिजिटल प्रोफाइलवरून आपला स्वभाव, सवयी, आर्थिक सवयी किंवा कमकुवतपणा समजून घेता येतो. याचा गैरवापर करून ओळख चोरी (identity theft), आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंग, किंवा फिशिंग अॅटॅक्स घडू शकतात.
आज शिक्षणापासून बँकिंगपर्यंत, शॉपिंगपासून सरकारी सेवांपर्यंत, जवळपास प्रत्येक गोष्ट आता ऑनलाइन झाली आहे. त्यामुळे डिजिटल फूटप्रट्सिं पूर्णपणे टाळणं शक्य नाही, मात्र यातून होणारे संभाव्य परिणाम आणि धोके लक्षात घेऊन काही खबरदारी आपण नक्कीच घेऊ शकतो. जेवढं जास्त शेअरिंग, तेवढे जास्त फूटप्रट्सिं. म्हणून ओव्हरशेअरिंग टाळायलाच हवं. आपण नकळत आपली वैयक्तिक माहिती जगजाहीर करत नाही ना हेही पाहायला हवं. सोशल मीडियावर काही ‘शेअर’ करण्याआधी दोनदा विचार करणं अत्यावश्यक आहे. पुढे जाऊन आपलीच प्रतिमा आपुलीच वैरी ठरू नये, यासाठी जबाबदारीने पोस्ट करणं महत्त्वाचं आहे. प्रोफाइलची प्रायव्हसी ‘पब्लिक’ न ठेवता ‘फ्रेंड्स ओन्ली’ ठेवणं अधिक सुरक्षित आहे. आपण व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड करत असलेले मेसेज, इन्स्टाग्रामवर पाठवत असलेल्या रील्स, फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्ट्स किंवा रिट्विट केलेली ट्विट्स या सगळ्या गोष्टी केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित राहत नाहीत. यामधून समोरच्याला आपली आवड-निवड, विचारसरणी आणि एकूणच व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधता येतो, याचं भान सतत राखलं गेलं पाहिजे.
पॅसिव्ह फूटप्रिंटच्या बाबतीतही काही प्रमाणात खबरदारी घेणं शक्य आहे. नवीन अॅप्स इन्स्टॉल करताना त्या कोणत्या परवानग्या मागतात याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. एखादा अॅप जर फोटो गॅलरी, लोकेशन, कॉन्टॅक्ट्स, मायक्रोफोन यांच्याविषयी गरज नसतानाही परवानगी मागत असेल, तर ते संशयास्पद ठरू शकतं. अनावश्यक अॅप्स इन्स्टॉल करणं किंवा त्यांना गरजेपेक्षा जास्त अधिकार देणं टाळावं. वेब ब्राउझिंग करताना ‘अॅक्सेप्ट ऑल कुकीज’ करण्याऐवजी ‘मॅनेज सेटिंग्ज’ किंवा ‘रिजेक्ट नॉन – इसेन्सिशयल कुकीज’ यासारखे पर्याय निवडणं अधिक सुरक्षित ठरतं. वेळोवेळी ब्राउझरची हिस्ट्री, कॅशे आणि कुकीज क्लिअर करणं तसेच योग्य वेळी इनकॉग्निटो मोडचा वापर करणं हेही फायद्याचं ठरू शकतं.
थोडं ‘स्मार्ट’ होऊन डिजिटल फूटप्रिंटचा उपयोग आपल्याच भल्यासाठी करता येऊ शकतो. सजगपणे वागलो, तर आपली डिजिटल प्रतिमा उजळवणंही शक्य आहे. आपण ज्या क्षेत्रात करिअर करू इच्छितो किंवा ज्या विषयांमध्ये रस घेतो, त्या विषयांशी संबंधित लेख, पोस्ट, रील्स आपण स्वत: तयार करू शकतो किंवा चांगली माहिती शेअर करून सकारात्मक प्रभाव निर्माण करू शकतो. सार्वजनिक मुद्द्यांवर जबाबदारीने आणि समजूतदारपणे मत मांडता येतं. LinkedIn, GitHub, ब्लॉग्स, पोर्टफोलिओ साइट्स यांसारख्या व्यासपीठांचा वापर करून आपली कौशल्यं आणि प्रोजेक्ट्स दाखवता येतात.
आपल्या डिजिटल पाऊलखुणा उमटणारच आहेत. हे टाळता येणं शक्य नाही, पण त्यांचा मागोवा ठगांनी घेऊ नये याची दक्षता घेणं आपल्या हाती आहे. तसंच, या पाऊलखुणा पाहून आपली वाट योग्य दिशेलाच जाते आहे, याची खात्री इतरांना आणि आपल्यालाही वाटायला हवी. म्हणूनच, आपण टाकलेलं प्रत्येक डिजिटल पाऊल जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने टाकणं अत्यावश्यक आहे. तूच आहेस तुझ्या (डिजिटल) जीवनाचा शिल्पकार हा मंत्र महत्त्वाचा!
viva@expressindia.com