उन्हाळ्याच्या दिवसांत बर्फाचा थंडगार गोळा खाण्याची मजा काही औरच असते. लहानपणापासून खाबूने या गोळ्याच्या नादात अनेक शर्ट खराब केले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यातही असा शर्ट खराब करण्यासारखा गोळा खाबूला मुलुंड पश्चिमेला फेमस गोळेवाल्याकडे खायला मिळाला..

सध्या खाबू मोशायला एक वेगळाच नाद लागला आहे. दर दिवशी खाबू मोशाय वेदर अपडेट देणाऱ्या वेगवेगळ्या साइट्सना भेट देऊन दिवसातले चांगले दोन-चार तास त्या साइट्सवर घालवत असतो. सकाळी आणि संध्याकाळी मुंबईच्या वेधशाळेला फोन करून आजचं तापमान आणि पुढील ४८ तासांमधील हवामानाची स्थिती या गोष्टींची माहिती गोळा करतो. प्राण डोळ्यांत जमा करून शेअर बाजारातला निर्देशांक मिनिटा-मिनिटाला तपासणाऱ्या शेअर दलालांप्रमाणेच तापमापकात उसळी घेणाऱ्या पाऱ्याकडे खाबू मोशाय नजर ठेवून आहे. एकीकडे पाऱ्याची उसळी, तर दुसरीकडे पावसाळी ढगांची प्रगती अशा विचित्र कचाटय़ात खाबू सापडलाय. त्यामुळेच कदाचित खाबूला इतरांपेक्षा जास्त घाम फुटला आहे.
या वातावरणात एक थंड झुळूक म्हणून गेल्याच आठवडय़ात खाबूला खादाड बुचकीचा फोन आला. गेल्या वेळी खाबू आणि बुचकी चहा प्यायला गेले होते. या वेळी काहीतरी थंड खायला घाल, असा धोशा खादाड बुचकीने खाबूकडे लावला. खादाड बुचकीला काहीतरी हवंय, तेदेखील थंड म्हटल्यावर खाबूने बाबू खवैय्या, फ्राइड मन्या वगैरे दोस्त मंडळींना कामाला लावलं. दुसऱ्या दिवशी खाबूच्या गुर्जरमित्राने, चमन ढोकळ्याने खाबूला ‘केम छो’ असं विचारत ‘मुलुंड वेस्टमां एकदम सरस बर्फनों गोला’ मिळतो, अशी माहिती दिली. चमन ढोकळा हा गुजराती असल्याने खाण्यापिण्याच्या बाबतीत एकदम शौकीन, हे वेगळं सांगायला नकोच. नुसताच शौकीन नाही, तर चोखंदळही. त्यात सामिषही खाणारा. त्यामुळे खाबूची आणि चमनची कुंडली विशेष जमते. चमनने ही माहिती दिल्यावर खाबूने खादाड बुचकीला एकदम टेचात फोन करून, ‘चल, तुला थंडगार पदार्थ खायला घालतो’ असं सांगितलं.
12
वास्तविक बर्फाच्या गोळ्यात वेगळं काय असणार, हा प्रश्न खाबूच्या मनात डोकावला होता. पण चमन ढोकळा ‘सरस’ म्हणतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी भारी असणार, हा विश्वास खाबूला होता. बर्फाचा गोळा म्हटल्यावर खाबूला त्याचं बालपण आठवलं. शाळेत असताना शनिवारी अर्धा दिवस शाळा सुटायची. त्या वेळी सकाळी शाळेत पोहोचल्या पोहोचल्या शेजारच्या दुष्मन तुकडीशी मॅचची डील करण्याचं काम अनेकदा खाबूकडे यायचं. दोन पीरिएड्सच्या मध्ये खाबू आणि एखादा मित्र असं शिष्टमंडळ दुष्मन तुकडीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मॅचची सुपारी आणायचं. दहा-दहा ओव्हरची मॅच, हरणारी टीम जिंकणाऱ्या टीमला गोळा खायला घालणार, अशा टम्र्स अॅण्ड कण्डिशन्स ठरायच्या. शाळा सुटली रे सुटली की दोन्ही तुकडय़ांमधली पोरं जवळच्या मैदानात गोळा व्हायची. बॅटी, बॉल आणि स्टम्प्स आणले जायचे. खेळणारी २२ पोरं आणि बघणारी ४४ पोरं यांचा एकच गलका व्हायचा. साधारण प्रत्येक बॉल टाकल्यानंतर विकेटकीपरपासून बाऊंडरीवर उभ्या असलेल्या फिल्डपर्यंत सगळे जण पीचभोवती जमा होऊन अंपायर झालेल्या पोराशी हुज्जत घालायचे. अशी ती मॅच आरामात चार तास चालायची. मग हरलेल्या टीममधली काही चतुर पोरं हळूच पळ काढायची आणि उरलेल्या पोरांना जिंकलेल्या टीमबरोबरच त्यांच्या तुकडीतल्या इतरांनाही गोळा खायला घालायचा भरुदड बसायचा. खाबूची टीम हरल्यानंतर त्याच्या वर्गातले चतुर लोक अनेकदा पळून जायचे आणि खाबूच्या त्यावेळच्या चिमुकल्या खिशाला हा भरुदड अनेकदा भरायला लागायचा.
पण कोणीही हरो वा जिंको, हा गोळा एकदम सॉल्लीडच असायचा. मैदानाजवळ उभा असलेला तो गोळेवाला खाबूला त्या वेळी सँटाक्लॉजसारखा वाटायचा. त्याच्या समोरच्या त्या रंगीबेरंगी द्रव्य भरलेल्या बाटल्या, मीठ आणि चाट मसाला शिंपडण्याच्या छोटय़ा डब्या, चम्मच गोळा खाण्यासाठीचे काचेचे ग्लास आणि चमचे, साध्या गोळ्यासाठीच्या कांडय़ा, असा सरंजाम खाबूला जाम आवडायचा. आपल्याजवळील यंत्रामध्ये बर्फाची लादी ठेवून तो ते चाक गर्रगर्र फिरवायचा. बर्फाचा कीस हातावर घेऊन तो जवळच्या ग्लासमध्ये टाकायचा. ग्लासमध्ये लाकडी काडी व्यवस्थित ठेवलेली असायची. त्या काडीभोवती तो बर्फ गच्च दाबून बसवल्यानंतर अलगद ग्लास फिरवून तो बर्फाचा पांढराशुभ्र गोळा गुंडाळलेली काडी बाहेर काढायचा. मग त्यावर शांतपणे मीठ आणि मसाला टाकायचा. बाजूच्या बाटल्यांमधले रंग एक एक करून त्या बर्फावर ओतायचा. ते रंग बर्फात झिरपायचे, कधी कधी खालीही सांडायचे. मग एका हातात गोळा आणि दुसरा हात खाली सांडणारा रंग पकडण्यासाठी गोळ्याखाली धरून तो थंडगार गोळा ओठाला लावत स्स.. स्स.. करत सगळ्यात पहिले तो रंग शोषून घ्यायचा. मग त्या गोळेवाल्या भैयाला, ‘भैया, और कलर डालो ना..’ असं सांगत शर्टावर सांडणाऱ्या रंगाकडे दुर्लक्ष करत गोळा खात राहायचा..
मुलुंड स्टेशन पश्चिमेला खादाड बुचकीची वाट बघत थांबलेला खाबू नॉस्टॅल्जिक झाला होता. खादाड बुचकीने त्याच्या खांद्यावर चापटी मारून त्याला भूतलावर आणलं. पश्चिमेला स्टेशनच्या बाहेर पडल्यावर रुळांना समांतर जाणाऱ्या रस्त्यावरून खाबू आणि खादाड बुचकी चालते झाले. थोडं अंतर चालल्यावर त्यांना महात्मा गांधी मार्ग अशी पाटी दिसली आणि त्यांनी तो मार्ग निवडला. थोडं पुढे चालल्यावर डाव्या बाजूला खाबूला फेमस गोळावाला अशी पाटी दिसली. गांधी रोडवरच्या महावीर स्पोर्ट्सच्या बाहेरच हा गोळेवाला बसतो. घाटकोपरच्या खाऊ गल्लीतील पूजा गोळेवाल्याचेच हे भाईबंद.
या गोळेवाल्याकडेही ३० ते १३० रुपये या रेंजमध्ये मलई गोळा, ड्रायफ्रूट गोळा, स्पेशल गोळा, साधा गोळा, बादशाही गोळा आणि फेमस गोळा असे गोळ्याचे विविध प्रकार मिळतात. इतर वेळी डाएट कॉन्शस वगैरे असलेली खादाड बुचकी मलई म्हटल्यावर वेडी होते. त्यामुळे खादाड बुचकीने स्पेशल गोळ्यावरही मलई असते, हे विचारून घेत स्पेशल गोळा मागवला. तर खाबूने आपल्या शाळेतल्या आठवणींना जागत साधा गोळा मागितला. या गोळेवाल्याने दोन प्लेटमध्ये बर्फाचा गोळा तयार केला. या गोळ्यावर मीठ-मसाला टाकून तशीच कृती केली. दरम्यान, खादाड बुचकीने मागवलेल्या गोळ्यावर त्याने एक डावभर मलई ओतली. खाबूला कसंसंच झालं होतं. वास्तविक खाबूला गोळ्यावर मलई वगैरे टाकून खाण्याची आयडिया पसंत नव्हती. गेल्या खेपेला खाऊगल्लीत इतर गोष्टी खाल्लय़ामुळे पोट भरल्याचा बहाणा करून खाबूने हा मलई गोळा टाळला होता. पण खादाड बुचकीबरोबर नाईलाज होता. खाबूने मागवलेला साधा गोळा मात्र त्याने खाबूच्या आवडीनुसार सगळे रंग ओतून खाबूपुढे पेश केला. त्या गोळ्याचा एकंदरीत आकार बघूनच खाबूला आपल्याला दीड गोळे खायला लागणार, याची खात्री पटली होती. कारण खादाड बुचकी एवढा गोळा पोटात ढकलणं शक्यच नव्हतं. खाबूने आधी आपला साधा गोळा मिटक्या मारत संपवला आणि मग मलई गोळा नामक प्रकाराकडे मोर्चा वळवला. बर्फावर ओतलेली मलई आणि त्यावर उधळलेले रंग अशीही किमया करू शकतील, असं खाबूला स्वप्नातही वाटलं नव्हतं. थंडगार मलई, मध्येच लागणारा बर्फ, त्यावर कुस्करून टाकलेले ड्रायफ्रुट्स, चॉकलेटचे तुकडे यांमुळे बहार आली होती. खाबूने तो अर्धा गोळाही आनंदाने मटकावला.
एवढय़ात त्या गोळेवाल्याच्या गाडीवर गोळा खायला आलेल्या कुटुंबातील लहान मुलानं भोकाड लावलं होतं. त्याला हा डिशमधला गोळा पसंत नव्हता. त्याला तो लाकडाची काडी खुपसलेला आणि हातात घऊन स्स.. स्स.. करत खायचा गोळाच हवा होता. खाबूचं दुर्दैव! त्या गोळेवाल्याकडे लाकडाची काडी होती, त्यावर तो बर्फ किसून गोळाही तयार करून देत होता आणि त्या मुलानं खाबूला वेडावून दाखवत चांगलं स्स.. स्स.. करत तो गोळा मटकावला. मलई गोळा खाऊन थंडावलेल्या खाबूच्या अंगाचा भडका उडाला आणि खाबू स्वत:वर चरफडत मुलुंड स्थानकाच्या दिशेने चालता झाला.

cold Tourist Spots in Maharashtra Heat Up, Matheran See Rising Temperatures, Mahabaleshwar See Rising Temperatures, Matheran, Mahabaleshwar, Rising Temperatures, Mumbai temperature rising, thane temperature rising, summer news,
थंड हवेची ठिकाणे तापली, मुंबई ठाण्यात उन्हाचा तडाखा
forest fire
उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग; लष्कर, हवाई दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
150 scrap godowns burnt down in Pimpri-Chinchwad
पिंपरी- चिंचवडमध्ये दिडशे भंगार गोडाऊन जळून खाक; १८ तासानंतरही धुमसतेय आग
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग

कुठे : फेमस गोळेवाला
कसे जाल : मुलुंड स्टेशन पश्चिमेकडे मुंबईच्या दिशेने बाहेर पडा. महात्मा गांधी रोड कुठे, असं विचारलं, तर शेंबडं पोरही तुम्हाला रस्ता सांगेल. महात्मा गांधी रोडला लागल्यावर डाव्या बाजूला महावीर स्पोर्ट्स दुकान बघत चला. दुकानाच्या अगदी बाहेरच फेमस गोळेवाला दिसेल.