|| तेजश्री गायकवाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॅशन इंडस्ट्रीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. परंतु गेल्या दोन वर्षात कोविडमुळे इतर इंडस्ट्रीप्रमाणे जिवंत राहण्यासाठी फॅशन इंडस्ट्रीनेही डिजिटल टेक्नॉलॉजीचा आधार घेत अनेक प्रयोग केले. या प्रयोगाने अनेक नवीन कल्पनांना जन्म दिला. या नव्याने जन्माला आलेल्या कल्पना आता फॅशन इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि उभारणीसाठी मदत करत आहेत.

आपण सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये न्यू नॉर्मलसह जेवढं जमेल त्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहोत, तसंच फॅशन इंडस्ट्रीमध्येही घडतं आहे. वेगवेगळ्या स्तरावरचे फॅशन शो असोत वा अन्य कार्यक्रम डिजिटल स्वरूपात होत आहेत. ‘सायबर फॅशन मार्केट’ या संकल्पनेने लॉकडाऊनमध्येच जन्म घेतला. हे असं मार्केट आहे जिथे तुम्ही कपडय़ांना हात लावू शकत नाही, प्रत्यक्ष हे कपडे परिधान करू शकत नाही आणि तरीही हेच कपडे घातलेले तुमचे फोटो सोशल मीडियावर किंवा अन्य ठिकाणी पोस्ट करू शकता. या कपडयांसाठी अगदी लाखभर रुपयेसुद्धा मोजले जात आहेत. ही भन्नाट कल्पना सोशल मीडियाचा दिवसेंदिवस वाढता वापर बघता कधीच ‘आउट ऑफ फॅशन’ जाणार नाही हे लक्षात येतं.

फॅशन उद्योग हळू हळू सावरत असला तरी ‘फास्ट फॅशन’ या संकल्पनेला थोडा थांबा नक्कीच लागला आहे. ‘फास्ट फॅशन’ म्हणजे एकदम फास्ट, काही काळातच बदलली जाणारी फॅशन. खरंतर ही फॅशन इंडस्ट्रीमधली अतिशय धोकादायक संकल्पना आहे. कारण यामध्ये सातत्याने नवीन कपडे बाजारात येतात आणि साहजिकच ग्राहक ते खरेदी करत राहतात. पुढचे कपडे लगेच खरेदी करायचे असल्यामुळे आधीचे कपडे एक-दोनदा वापरून फेकून दिले जातात किंवा तसेच पडून राहतात. आणि त्याचा साठा वाढतच राहतो. हे कपडे अनेकदा नैसर्गिक कापडापासून बनवलेले नसतात त्यामुळे याचा कचरा वाढत राहतो. करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक तंगीच्या काळात या फॅशन संकल्पनेला थोडा रोख लागला आहे. आता ग्राहक विचारपूर्वक, गरजेपुरते कपडे घेतात. तर अनेकदा उपलब्ध कपडे रिसायकल किंवा अपसायकल करून पुन्हा नव्या रूपात कसे वापरात आणता येतील याचे पर्यायही ऑनलाइनच चोखाळले जातात.

‘फास्ट फॅशन’प्रमाणेच फॉर्मल आणि कॅज्यूअल कपडे वापरणंही कमी झालं आहे. अजूनही सुरू असलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेमुळे ऑफिसवेअर संकल्पनेतही पूर्ण बदल झाला आहे. अगदीच कपडे खरेदी करायचे असतील तर लोक नाईट ड्रेस, नाईट सूट, पायजमा, टी-शर्ट विकत घेताना दिसतात. घरूनच काम करायचं असल्याने हे कपडेच त्यांना सगळ्यात जास्त कम्फर्ट देतात. मॉल, दुकानावरच्या निर्बंधांमुळे  आणि करोना संर्सगाच्या भीतीमुळे ट्रायल रूम अनेक ठिकाणी बंदच आहेत. या आणि अशा अन्य कारणांमुळे अनेकजण प्रत्यक्ष मॉल वा दुकानात जाऊन कपडे खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन कपडे खरेदी मोठ्या प्रमाणावर करत आहेत.

कपड्यांबरोबरच अ‍ॅक्सेसरीज इंडस्ट्रीमध्येही मोठे बदल झाले. बाहेर जायचं नसल्याने कोणत्याही प्रकारच्या बॅगची खरेदी होत नाही. लोकांना करोनामुळे फिटनेसचं महत्त्व समजल्याने टिपिकल घड्याळ बाजूला करून लोक आता फिटनेस बँडकडे वळले आहेत. फूटवेअरच्या खरेदीवरही काही प्रमाणात रोख लागलाच आहे. फॅशन इंडस्ट्रीसोबत नेहमी असणारी ब्युटी इंडस्ट्री तरी यातून कशी वाचेल? कमीत कमी मेकअप करणारेही लिपस्टिक आवर्जून लावतात. पण ही लिपस्टिक मास्कला लागते किंवा लावली तरी दिसत नाही यामुळे अनेकांनी याची खरेदी लांबवली आहे. घडयाळ, दागिने, ब्युटीप्रॉडक्ट्स कोणत्याही अ‍ॅक्सेसरीज असतील त्या दुकानातून खरेदी करणं ही प्रथा कधीच मागे पडली आहे. ई कॉमर्सवर सातत्याने उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि ट्रेण्ड्सचे सोपे अनुकरण यामुळे याची खरेदी ऑनलाइनच केली जाते.

फॅशनचा विचार करता ऑनलाइनवर सुरू झालेल्या खरेदीपासून ब्युटी टिप्सच्या डीआयवाय व्हिडीओपर्यंत डिजिटल किंवा ऑनलाइन झालेलं आपलं फॅशन विश्व सहजी बदलणारं नाही. ऑनलाईन फॅशनमुळे जे ट्रेण्ड आपल्याला सवयीचे झाले आहेत ते लगेच बदलण्याची शक्यताही फार कमी आहे. त्याचं कारण अर्थातच करोना आणि त्यामुळे बदललेल्या आपल्या जीवनशैलीत आहे. या नवीन जीवनशैलीत फॅशनमधला कम्फर्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहेच, शिवाय पैशांची, वेळेची बचत आहे आणि सोबतीला संसर्गाची भीती याचीही कमीजास्त प्रमाणात जोड असणार आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion on online fashion industry technology program digital cyber fashion market akp
First published on: 07-01-2022 at 01:06 IST