‘देढ इश्किया’, ‘हाय-वे’, ‘क्वीन’, ‘फाइंडिंग फॅनी’, ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या सगळ्या चित्रपटांतून एक वेगळ्या धाटणीची नायिका समोर आली. एकीकडे ‘डीडीएलजे’ हजारावा आठवडा साजरा करतोय आणि दुसरीकडे त्यातल्या ‘सिमरन’चे सर्वगुणसंपन्नतेचे संस्कार नव्या नायिका झुगारून टाकताना दिसताहेत. वर्षभरात आलेल्या चित्रपटांवरून दिसलेली बदलत्या तरुणाईची झलक.

मुंबईतल्या मराठा मंदिरातल्या ‘त्या’ खास शोसाठी आजही तितकीच गर्दी होतीये.. २० ऑक्टोबर १९९५ ला भारतातल्या सिनेमाप्रेमी तरुणाईला बदलणाऱ्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाचं प्रदर्शन झालं. त्याच्या हजारावा आठवडा एकीकडे साजरा होत असताना अगदी वेगळ्या प्रकारचे चित्रपटही तरुणाई डोक्यावर घेताना दिसतेय. प्रेमात पडण्याचा सल्ला देणारा हा त्या वेळचा चित्रपट त्या काळातल्या यंगिस्तानच्या डोक्यात जे काही घर करून बसला की गल्लोगल्ली अनेक राज आणि सिमरन दिसू लागले. या वर्षी या चित्रपटानं आजपर्यंतच्या सगळ्या सिनेमाचं रेकॉर्ड तोडत सगळ्यात जास्त दिवस बॉक्स ऑफिसवर चालण्याचा मान मिळवलाय. महत्त्वाचं हे की अजूनही तरुण टाळकी फॅशन, क्रेझ, आणि शाहरुखच्या प्रेमापोटी अजूनही मराठा मंदिरला भेट देतात. त्या पोस्टरसमोर उभं राहून फोटो काढतात आणि फेसबुकवर लाइक मिळवतात.
 vv30त्या काळात प्रेमाचा महिमा सांगणारा चित्रपट एकीकडे लोकप्रियतेचे रेकॉर्ड तोडत असतानाच त्याच वर्षांत डीडीएलजेपेक्षा अगदी वेगळ्या ढंगाचे विषय चित्रपटातनं आले आणि तरुणाईनं तेही डोक्यावर घेतले. स्वप्नाळू दुनियेतून आता अधिक रिअॅलिस्टिक जग दाखवणारे चित्रपट आजच्या तरुणाईला आवडायला लागले आहेत. ‘डीडीएलजे’सारख्या चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या गोष्टी, सगळे विचार बाजूला ठेवत २०१४ मध्ये चंदेरी दुनियेनं सत्यतेकडे झुकणारे विषय मांडले, टिपिकल बॉलीवूडची मांडणी दूर सारत आत्ताच्या पिढीचे चित्रपट दिले आणि तेही आत्ताच्याच पिढीनं डोक्यावर उचलून धरले.
‘देढ इश्किया’, ‘हाय-वे’, ‘क्वीन’, ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या सगळ्या चित्रपटांतून सिमरनचे सगळे सर्वगुणसंपन्नतेचे संस्कार झुगारून टाकलेले पाहायला मिळाले आणि तरीही त्या सगळ्या नायिकांच्या भूमिका तरुणाईच्या मनात घर करून गेल्या. हिरो आणि हिरोईनचं बोलणं बोल्ड झालं आणि वागणं सर्वसामान्य झालं. तुमच्या-आमच्यासारखं बोलणारी पात्रं पाहताना त्यांच्याशी स्वत:ला कुठे तरी रिलेट केलं जाऊ लागलंय. चित्रपटातली आवडलेली कोणतीही गोष्ट आणि न आवडलेली गोष्ट लगेच सोशल नेटवर्कवर शेअर केली जाते. अशाच गोष्टींमधून मग आलिया भटचे विनोद सर्वात जास्त लाइक मिळवू लागले. एकीकडे आलियाचे सगळे चित्रपट आवडत असतानाच तिच्यावरचे विनोदही तेवढेच फॉरवर्ड होत आहेत हे विशेष.
vv28rएकीकडे सिमरन संस्कारी.. आणि राज थोडासा फॉरवर्ड विचारांचा, हे ९० च्या दशकाचं चित्र. आताच्या चित्रपटात थोडं उलट झालंय.. हिरोईन जास्त बिडीकाडी करू लागलीये.. आणि हिरो थोडा सभ्य राहू लागलाय. चित्रपटांमध्ये दिसणारं हे आत्ताच्या पिढीचं चित्र अगदी हुबेहूब चितारलं जातंय. अपवादाला सल्लू आणि शाहरुखचे काही चित्रपट आहेत, ज्यात अजूनही हिरोच खरा हिरो आहे. पण त्या चित्रपटानंतरही ‘ते काहीसुद्धा दाखवलंय हो’ अशी प्रतिक्रिया ‘दिलवाले’च्या  वेळेस कधीही येत नव्हती.
‘हैदर’, ‘दावत-ए-इश्क’, ‘फाइंडिंग फेनी’, ‘मेरी कोम’, ‘बॉबी जासूस’, ‘एक व्हिलन’, ‘सिटीलाइट्स’ अशा वेगळ्या धाटणीच्या सिनेमाला तरुणाईनं आवर्जून हजेरी लावली हे विशेष. या सिनेमाच्या नायिका अगदी वेगळ्या होत्या, स्वत:च्या अस्तित्त्वाचा स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या, महत्त्वाकांक्षी आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या. प्रत्येक दिग्दर्शकाच्या निर्मितीनुसार चित्रपट पाहण्याची कला हळूहळू प्रेक्षकांमध्ये रुजू लागलीये जी ‘दिलवाले..’च्या सुमारास अजिबातच नव्हती.
२०१४ च्या चित्रपटांमध्ये एकीकडे विचारांनी प्रगल्भ, जुन्याला आपल्या पद्धतीनं वळवत नव्याची कास धरणारी युवा पिढी दिसत असतानाच दुसरीकडे त्याच नव्या पिढीचं भकास आणि ओंगळवाणं रूपही पाहायला मिळालं. यारियाँ, बेवकूफियाँ, हमशकल्स, शौकिन्स यांसारख्या फिल्ममधून नव्या पिढीचं भरकटणंच समोर येत गेलं.
अन्न-वस्त्र-निवाऱ्यासोबतच व्हॉट्स अप, ट्विटर, फेसबुक या गोष्टी गरजेच्या बनलेल्या नव्या पिढीला ‘चार बोतल व्होडका’ही तेवढीच आवडायला लागलीय.
एकीकडे २४ व्या वर्षी बॉलीवूडचा सुपरडुपर हिट सिनेमा देणाऱ्या आदित्य चोप्राचा सिनेमा त्याच्या विशीत पोहोचलेला असताना इम्तियाज अलीसारख्या नव्या पोरांनी धमाका उडवून दिलाय तो प्रेमकहाणीत आणलेल्या रियालिटीचा. ‘दिलवाले’मध्ये सिमरन तिची जिंदगी जिण्यासाठी धावतपळत राजचाच हात धरून रेल्वेत चढण्याचा हट्ट करत असताना..दुसरीकडे लैंगिक शोषणाला बळी पडलेली ‘हायवे’मधली वीरा सगळी शान ओ शौकत बाजूला सारत महाबीरसारख्या गुंडाच्या प्रेमात पडते. त्याला आपल्या प्रेमात पडायला भाग पाडते. एकीकडे सिमरन-राजचं बहरत जाणारं प्रेम आणि स्वप्नवत जिंदगी असताना दुसरीकडे आपल्याच हनिमूनसाठी एकटीच बाहेर पडलेली, लग्न मोडलेली ‘क्वीन’मधली राणी आपली खरी जिंदगी जगायला एकटी बाहेर पडतीये. ‘दावत-ए-इश्क’मध्ये मुलीनं फसवूनही आपलं हॉटेल अभिमानानं चालवणारा मुलगा तिच्यासोबत सगळी जिंदगी घालवण्याची स्वप्नं पाहतोय. वर्षांच्या शेवटाला अंगावर फक्त रेडिओ घालून रुळांवरून पळणारा ‘पीके’तला नायकही भेटीला आलाय.. आणि हाच बदललेल्या बॉलीवूडचा नवा चेहरा आहे..आपल्या सारखंच काही तरी चित्रपटात पाहताना त्यातली पात्रं स्वत:शी रिलेट करताना येणारा अनुभव मनाशी बाळगणारी पिढी ‘दिलवाले’नं पदा केली.. आणि ‘हायवे’, ‘क्वीन’सारख्या चित्रपटानं तेव्हाच्या तरुणाईबरोबरच आताच्या पिढीलाही आपलंस केलं, हा या बदललेल्या बॉलीवूड फिल्ममधला खरा फरक आहे.