scorecardresearch

गुढी फॅशनची!

दोन वर्षांनंतर अखेरीस सणवार दणक्यात साजरे करण्याचा उत्साह आणि आनंद मनामनांत दाटला आहे. रंगारंग होळीचा सण झाल्यानंतर सगळय़ांना वेध लागले आहेत ते गुढी पाडव्याचे.

गुढी फॅशनची!

तेजश्री गायकवाड
दोन वर्षांनंतर अखेरीस सणवार दणक्यात साजरे करण्याचा उत्साह आणि आनंद मनामनांत दाटला आहे. रंगारंग होळीचा सण झाल्यानंतर सगळय़ांना वेध लागले आहेत ते गुढी पाडव्याचे. मराठी नववर्षांचे जल्लोषात स्वागत करणारा गुढी पाडवा म्हणजे शोभायात्रा. आणि शोभायात्रा म्हणजे खास मराठमोळी फॅशन आणि स्टाईलचा तडका. पारंपरिक साज करून एकमेकांना भेटण्याचा, शुभेच्छा देण्याचा हा खास सण. या सणाच्या दिवशीचं फॅशन महात्म्य हे तसं न संपणारं.. यावर्षी गेल्या दोन वर्षांतील कसर भरून काढत फॅशनचीही गुढी उभारण्याची संधी पाडव्याच्या निमित्ताने मिळाली आहे. त्यामुळे यंदा शोभायात्रेला हजेरी लावताना पारंपरिक पेहरावाला थोडा आधुनिकतेचा साज चढवत हा क्षण खास कसा कराल? याविषयी काही टिप्स..
साडी
पारंपरिक कपडे म्हटलं की साडीचा पहिला क्रमांक लागतो. साडीमध्ये जसे अनेक प्रकार आहेत तसेच साडी नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत. साडी नेसणं म्हणजे खरं तर एक मोठा सुंदर कपडा अंगाभोवती छान पद्धतीने ड्रेप करणं. या ड्रेपिंग स्टाइलमध्ये तुम्ही थोडा जरी बदल केला तरी तुम्हाला नवीन लूक सहज मिळू शकतो. फॅशनविश्वाचे चक्र पुन्हा फिरून जुन्या काळातील फॅशनकडे वळतेच. फक्त जुनी फॅशन नव्याने येताना त्यात काही तरी नवीन एलिमेंट असतो. साडीमध्येही सध्या ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील ट्रेण्ड पुन्हा आला आहे. त्या काळातील सिल्कच्या साडयमंना थोडा नवीन टच देऊन अनेक डिझायनर्सनी वेगवेगळय़ा प्रकारे साडी बाजारात आणली आहे. सिल्कची साडी म्हणजे हेवी आणि शाइनी कापड, ब्राइट रंग असं रूप डोळय़ासमोर येतं. पण आता आलेल्या फॅशननुसार थोडी कमी शाइन असलेलं सिल्क आणि स्काय ब्ल्यू, पोपटी रंग, पिंक असे ट्रेण्डमध्ये असणारे रंग तुम्हाला सिल्क साडय़ांमध्येही दिसतील. पूर्ण साडीपेक्षा फक्त साडीच्या पदरावर सिल्कची बॉर्डर असलेल्या साडय़म या फेस्टिव्ह सीझनमध्ये ट्रेण्डमध्ये असणार आहेत.
सलवार कमीज
साडी नको म्हटलं की दुसरा हमखास पर्याय उभा राहतो तो पंजाबी ड्रेस, अनारकली ड्रेस, कुर्ती लेगिंग अशा आऊटफिटचा. यामध्ये बेसिक पटियाला सलवार आणि त्यावर घातली जाणारी शॉर्ट कुर्ती किंवा कमीज नेहमीच ट्रेण्डमध्ये असते. पण यंदा हीच पटियाला सलवार वेगळय़ा रूपात म्हणजेच धोती पॅन्ट्सच्या रूपाने बाजारात आली आहे. धोती पॅन्ट्सची फॅशन काही वर्षांपूर्वी बाजारात आली होती. आता तीच फॅशन थोडा हटके लूक घेऊन पुन्हा ट्रेण्डमध्ये आली आहे. या धोती पँट्सवरती तुम्ही क्रेप, पारंपरिक टॉप, कुर्ती, केप, फ्रंट आणि साइड कट कुर्ती घालू शकता. याखेरीज नेहमीप्रमाणे लेगिंग्जवरती शॉर्ट लेंग्थ ते अगदी अँकल लेंग्थपर्यंतची कुर्तीही ट्रेण्डमध्ये आहे. कुर्ती आणि स्ट्रेट पँट्सचाही पर्याय नक्की ट्राय करून बघा.
प्लाझो आणि कुर्ती-टॉप
फेस्टिवल सीझन असला तरी आपलं ऑफिस, कॉलेज किंवा अनेक दुसरी कामं सुरूच असतात. अशा वेळी आपल्याला पारंपरिक कपडे तर घालायचे असतात, पण त्याचबरोबर प्रवास करताना, धावपळ करताना कम्फर्ट देईल असे कपडेही हवे असतात. यासाठी ट्रेण्डमध्ये असणारी प्लाझो आणि कुर्ती किंवा टॉप तुम्ही घालू शकता. साधी ब्राइट रंगाची प्लाझो आणि त्यावर फ्रंट कट कुर्ती, स्ट्रेट कट कुर्ती, शॉर्ट कुर्ती, असमान हेमलाइन असलेली कुर्ती ट्रेण्डमध्ये आहेत. अशाच प्रकारे पारंपरिक हातमागावरील कपडय़मंपासून बनवलेल्या प्लाझो पँट्स, साडीपासून बनवलेली प्लाझो यावर तुम्ही वेस्टर्न टॉप घालू शकता. वेस्टर्न टॉपमध्ये क्रॉप टॉप, वेस्टर्न शर्ट, प्लेन टीशर्ट, केप असे अप्पर गारमेंट्स घालू शकता. या स्टाईलवर तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरी, बोल्ड नेकपीस, मोठे कानातले घालून लूक पूर्ण करू शकता.
टॉप आणि स्कर्ट
फेस्टिवल सीझनमध्ये हमखास स्कर्ट घातले जातात. पारंपरिक स्कर्टवरती वेस्टर्न टॉप किंवा वेस्टर्न स्कर्टवर पारंपरिक टॉप असं कॉम्बिनेशन वापरू शकतो. पारंपरिक पिंट्र्स किंवा कापडापासून बनवलेला स्कर्ट आणि त्यावरती केप, शर्ट, ऑफशर्ट टॉप, कोल्ड स्लीव्ह टॉप घालून वेगळा लूक मिळवता येतो. आणि वेस्टर्न प्लेन स्कर्टवरती फ्रंट कट टॉप, ब्लाऊज, टीशर्ट घालू शकता. या दोन्ही लूकवर नेकपीस, जॅकेट्स, स्टोल, ओढणी वापरू शकता.
viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2022 at 02:58 IST

संबंधित बातम्या