जिमवेअर आणि स्पोर्ट्सवेअरमध्ये सध्या काय नवीन आहे? जिमला जायच्या कपडय़ांबरोबर स्टायलिंग कसं हवं आणि ट्रेण्डी जिम लुकसाठी नेमकं काय करायला हवं? याच्या टिप्स..

‘आता ठरलं.. पुढच्या महिन्यापासून जिमला जाणारच. पोट सुटलंय.’ दर महिन्यात असे संकल्प घराघरांतून ऐकू येतात.  सोबत जिम मेंबरशिपचे फॉम्र्स भरले जातात आणि मग जिमवेअरची खरेदी उत्साहात केली जाते. जिम, स्पोर्ट्सचा विषय जिमवेअर, स्पोर्ट्सवेअरशिवाय पूर्ण होत नाही. व्यायाम करताना, खेळताना शरीराच्या हालचालीत व्यवस्थितपणा आणण्यासाठी विशिष्ट प्रकारचे, आरामदायी कपडे घालण्याची गरज असते; पण आता जिमवेअरकडे केवळ गरज म्हणून पाहिले जात नाही, तर एक स्टाइल स्टेटमेंट म्हणून त्यांनाही फॅशनविश्वात मानाचं स्थान मिळालं आहे. त्यामुळे कित्येक बडे ब्रॅण्ड्स स्पोर्ट्सवेअर, जिमवेअरची खास कलेक्शन्स काढू लागले आहेत. सध्या जिम, योगा हे ऑफिस कल्चर, कॉलेज कल्चरचा भाग बनले आहेत. बरेचदा ऑफिस आणि कॉलेजच्या वेळा आणि जिमची वेळ यांची सांगड घालावी लागते. अशा वेळी रोज जिमच्या कपडय़ांची वेगळी बॅग घेऊन जाण्याऐवजी डे ड्रेसिंगमधला फक्त शर्ट किंवा ट्राऊझर बदलण्याकडे अनेकांचा कल असतो. या कपडय़ांची महत्त्वाची खासियत असते, त्यांचा आरामदायीपणा. त्यामुळे सध्या जिमवेअर जिमच नाही तर कॉलेज, ऑफिसवेअरचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. स्वेटशर्ट, जेगिंग, हुडीज, जॉगर्स पँट हे तरुणाईमध्ये परवलीचे शब्द झाले आहेत. सध्या या जिमवेअरचं अस्तित्व केवळ जिमपुरतं मर्यादित राहिलं नसून ते रोजच्या वॉडरोबमध्ये सामावलं गेलंय. त्यामुळे त्यांचा स्टाइल कोशंटसुद्धा वाढला आहे.
15

उपयुक्तता महत्त्वाची
जिमवेअर किंवा स्पोर्ट्सवेअर फॅशनचा भाग बनले असले, तरी एखाद्या विशिष्ट खेळासाठी किंवा व्यायाम करताना विशिष्ट कपडे घालण्याची गरज या गुणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्या लुककडे लक्ष देण्याआधी तुम्हाला जिमवेअर नक्की कशासाठी हवेत, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. बास्केटबॉल खेळाडू रनर्स शूज घालून खेळू शकत नाही. जिमवेअर आणि योगावेअरमध्येही फरक असतो. जिममध्ये शक्यतो लेगिंग, ट्रॅक पँट, फिटेड गंजी अशा फिटेड कपडय़ांचा वापर अधिक होतो. तर योगावेअरमध्ये शक्यतो धोतीपँट, टी-शर्ट असे लूज कपडे असतात. तसेच या कपडय़ांची किंमतसुद्धा बऱ्यापैकी महाग असते. त्यामुळे केवळ स्टाइल म्हणून गरजेपेक्षा अधिक किमतीचे आणि अयोग्य कपडे घेण्यात अर्थ नाही.

स्पोर्ट्सवेअर टू स्ट्रीटवेअर
आधी म्हटल्याप्रमाणे स्पोर्ट्सवेअर केवळ जिम किंवा खेळाच्या मैदानापुरते राहिलेले नाहीत. ते स्ट्रीटवेअरचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. तुम्ही खेळून किंवा जिमला जाऊन आलात म्हणून घामाच्या धारा, चिकचिकीतपणा मिरविण्यापेक्षा कूल स्पोर्टी लुक मिरविण्याचा प्रयत्न करायचा असतो आज. त्या दृष्टीने कपडय़ांचं सिलेक्शन करायला हवं.

गॅजेट गुरू
जिमसाठी खास गॅजेट्स बाजारात पाहायला मिळतात. तुमच्या गरजेनुसार मोबाइल धरून ठेवणारा हाताचा बँड, हार्टबीट मोजणारे घडय़ाळ अशी काही गॅजेट्स ट्राय करायला हरकत नाही. एखादा फंकी हेडफोनसुद्धा जिमवेअरसोबत जुळून येतो.

 मिनिमल मेकअप
जिमला जातोय म्हणजे मेकअपचं काय काम? असा विचार सयुक्तिक असला, तरी आजच्या अनेक मुलींना घराबाहेर जाताना मेक-अपशिवाय जाणं मान्य नसतं. आता जिममध्ये जातानाही अपटूडेट राहण्याकडे कल असतो. शक्यतो वॉटरप्रूफ मेकअप वापरा, जेणेकरून घामासोबत मेकअप स्मज होण्याची भीती नसते. न्यूड मेकअप जिमसाठी उत्तम. डार्क लीपकलर, आय मेकअप करणं टाळा.

* जिमवेअरचे रंग, पॅटर्न याकडे थोडं लक्ष द्या. पेस्टल कलर्स जिमवेअरमध्ये उठून दिसतात. विशेषत: ग्रेच्या शेड्स ऑल टाइम हिट आहेत; पण त्यांच्यासोबत हॉट पिंक, फ्लोरोसंट ग्रीन, निऑन ब्ल्यू, चेरी रेड, नारंगी, लेमन यलो असा ब्राइट नजरेत भरणारा रंगही असू द्या. या कपडय़ांचं स्टायलिंग कसं करता आहात, त्यालाही महत्त्व आहे.
* जिममध्ये जेगिंगसोबतच्या गंजीवर बाहेर पडताना एखादा स्वेटशर्ट घातला तरी मस्त लुक मिळतो. हुडी, ओव्हरसाइज टी-शर्ट, स्पोर्ट जॅकेट तर अशा वेळी जवळ हवंच.
* एरवी जिमवेअर खरेदी करताना सेट घेण्याऐवजी पँट, टी-शर्ट वेगवेगळ्या ठिकाणांवरून घेतला जातो. कित्येकदा एखादी ट्रॅकपँट घेतल्यावर कपाटातला टी-शर्ट घालून वेळ निभावली जाते; पण त्याऐवजी एकच पण पूर्ण जिमसेट घेण्याला प्राधान्य द्या.
* बऱ्याच जिमवेअरमध्ये सध्या कलरसोबतच प्रिंट्समध्येसुद्धा प्रयोग केलेले पाहायला मिळतात. तेही नक्कीच ट्राय करा.
* क्रॉप टॉप, बॅकलेस गंजी, टँक टॉप, हॉल्टरनेक गंजी अशा कपडय़ांनी मिळणारा सेक्सी येट कॅज्युअल लुक जिमसाठी छान दिसतो.
* पण हे कपडे फार थोडय़ा मुलींना कॅरी करता येतात. त्यामुळे पुरेसा कॉन्फिडन्स असल्याशिवाय याच्या वाटेला जाऊ नका.
* कॅप, हेअरबँड, रिस्टबँड या छोटय़ा अॅक्सेसरीज जिम लुकला कूल बनवतात. स्पोर्ट्शूजसोबतच सॉक्ससुद्धा फंकी असणं गरजेचं आहे.