मितेश रतीश जोशी

उन्हाळय़ात सूर्य आग ओकू लागला आणि पारा चढू लागला की भटक्यांची पावले उत्तर भारताकडे वळतात. मानवाच्या मूलभूत गरजेपैकी एक गरज म्हणजे ‘पर्यटन’ होय. अशा या भारताच्या पूर्वेपासून ते उत्तरेपर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या कुशीत स्वत:चा उद्योग सुरू करून करिअरचा एक अनोखा मार्ग निवडण्याचा कल तरुणांमध्ये दिसू लागला आहे.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

अन्न-वस्त्र-निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. या मूलभूत गरजा संपल्या की मग तो हौसेमौजेच्या गोष्टींकडे वळतो. मनाला छान वाटणाऱ्या गोष्टी करायला लागतो. त्यामध्ये पर्यटनाचा समावेश अगदी प्राथमिकतेने होतो. पण केवळ आपल्या आवडत्या प्रदेशातील भटकंतीपुरते हे पर्यटन मर्यादित न राहता त्या शहराच्या प्रेमात पडून तिथे स्वतंत्र उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचे धाडस काही महाराष्ट्रीय तरुण-तरुणींनी दाखवले आहे.

सिंधू नदीच्या किनारी आणि काराकोरम, हिमालय पर्वतरांगांच्या मधोमध वसलेले ठिकाण म्हणजे लेह लडाख. प्रत्येक पर्यटक, गिर्यारोहकांचे स्वप्न असते की त्याने आयुष्यात एकदा तरी लेहला भेट द्यावी. मुंबईतील कौस्तुभ दळवी आणि ग्रीष्मा सोले या दोन तरुण तुर्कानी बॅग पकिंग क्षेत्रात व लेहच्या इतिहासात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांच्या यशामागची कहाणी रंजक आहे. सुरुवातीला २०१३ साली लेहमध्ये भटकंती करण्याच्या निमित्ताने गेलेले कौस्तुभ आणि ग्रीष्मा लेहच्या रांगडय़ा रूपाच्या प्रेमात पडले. इतके प्रेमात पडले की आपण मुंबई सोडून इथेच येऊन राहूयात हा विचार त्यांच्या मनात आला. शहरी जीवनशैलीपासून लांब येऊन एक वेगळी मोकळीढाकळी लाइफस्टाइल आपल्याला या निमित्ताने जगता येईल हा त्यांचा हेतू होता, पण हा हेतू सत्यात उतरवायचा कसा हा प्रश्न त्यांना पडला. कौस्तुभ हा स्पोर्ट्समध्ये तर ग्रीष्मा टूर ऑर्गनायझेशनमध्ये पटाईत होती. टूरच्या निमित्ताने ग्रीष्माच्या लेह वाऱ्या वाढत गेल्या व आपसूकच लेहला येऊन राहण्याचा विचारही पक्का होत गेला, पण नुसतेच येऊन सेटल व्हायचे कसे ? सतत लेहला येणे-जाणे वाढल्याने त्यांच्या लक्षात आले की इथे बॅग पॅकर्सची संख्या मोठी आहे. परदेशी पाहुणेही ये जा करत आहेत, मात्र इथे त्यांच्या निवासासाठी बॅग पॅकिंग हॉस्टेलच नाही. लडाख सहलीचा एकूण खर्च लक्षात घेता इथे वास्तव्यासाठी खिशाला परवडणारी जागा उपलब्ध असावी असे या दोघांनाही सतत जाणवत होते. जी मंडळी हॉस्टेलमध्ये येऊन राहू शकतात अशी मंडळी तर लेहमध्ये आहेत, पण हॉस्टेलच नाही आहे हे लक्षात घेऊन त्यांनी लेहमध्ये बॅग पॅकिंग हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. २०१८ साली त्यांनी लेहमध्ये सर्वात पहिले बॅग पॅकिंग हॉस्टेल ‘रोव्हर्स डेन’ या नावाने सुरू केले. मुख्य बाजार आणि शांती स्तूपाच्या जवळ असणाऱ्या चाळीस वर्ष जुन्या लडाखी घराचं आधुनिक आनंददायी रूप म्हणजे हे रोव्हर्स डेन हॉस्टेल.  बॅग पॅकर्स आणि बायकर्स यांच्यासाठी विशेषत्वाने हे हॉस्टेल ग्रीष्मा आणि कौस्तुभने सजवले आहे.

अर्थात, हे हॉस्टेल उभे करण्यासाठी महिनाभर लेहमध्ये येऊन राहणे, भरपूर जागा फिरून पाहिल्यानंतर आपल्याला आवडलेल्या जागी हॉस्टेल उभे करणे यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आपण राहतो त्या शहरात हॉटेल सुरू करणे आणि दूर वेगळय़ाच शहरात येऊन उद्योग-व्यवसाय उभा करणे यात खूप तफावत आहे, याबदद्ल सांगताना कौस्तुभ म्हणतो, सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ, मोनेस्ट्रीज, गिर्यारोहकांचे नंदनवन, निसर्गाचे विविधांगी दर्शन अशी रेलचेल असणाऱ्या लेहमध्ये सुरुवातीच्या काळात काम करताना सगळय़ात पहिले आव्हान उभे ठाकले ते कोविडचे. अतिशय मेहनत घेऊन २०१८ साली सुरू केलेले हॉस्टेल २०२० मध्ये चांगलेच नावारूपाला आले आणि कोविडमुळे ठप्प झाले. अनेक उद्योग बंद होताना आम्ही पाहात होतो, पण अशा परिस्थितीतही आम्ही नाउमेद झालो नाही. जिद्दीने सुरू केलेले हॉस्टेल बंद करायचे नाही. तितक्याच जिद्दीने पुढे चालवायचे. आमच्या कुटुंबीयांनासुद्धा आमचा हा निर्णय पटला व तेही आमच्या पाठीशी उभे राहिले म्हणून आम्ही हे आव्हान सहज पेलू शकलो. सणवार आल्यावर घरच्यांची आठवण यायची. दादर – लालबागसारख्या भागात मोठे झाल्यामुळे गणपतीत तर अधिक सुनेसुने वाटायचे. ही परिस्थितीसुद्धा आम्ही बदलली. आम्ही गेली तीन – चार वर्ष लडाखमध्ये गणपती बसवत आहोत. तिथे ग्रीष्मा स्वत: उकडीचे मोदक बनवते. रोज संध्याकाळी आरती होते. अस्सल लडाखी लोक आता दरवर्षी आवर्जून दर्शनालाही येतात, असे तो सांगतो. 

दगडी बांधकाम, लाकडी फर्निचर, टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून केलेली बसण्याची व्यवस्था आणि या सर्वातून दिसणारी लडाखी संस्कृती, हेरिटेज वारसा जपण्याचाही प्रयत्न कौस्तुभ-ग्रीष्मा करत आहेत. नुकतेच त्यांनी ‘हेरिटेज चुबी बाय रोव्हर्स डेन’ या नावाने एक नवीन हॉटेल सुरू केले आहे. ज्या वास्तूत हे हॉटेल सुरू आहे, ती वास्तू साठ वर्ष जुनी असून दगड, माती आणि लाकूड या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून तयार करण्यात आली आहे. लडाखी लोकांच्या जीवनशैलीला अनुसरून आणि लडाखी वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असलेली ही वास्तू आहे. लवकरच लेहच्या या थंडगार वास्तूत चमचमीत महाराष्ट्रीय पदार्थाचा आस्वाद घेता येणार आहे. लेहमध्ये ग्रीष्मा आणि कौस्तुभ महाराष्ट्रीय कुझिन सुरू करणार आहेत. याविषयी ग्रीष्मा म्हणाली, ‘लेहमध्ये सगळय़ात जास्त महाराष्ट्रीय आणि गुजराती पर्यटकांचा ओढा आहे. इथे नॉर्थ इंडियन कुझिन मिळते, जे सतत खाऊन लोकांना कंटाळा येतो. त्यामुळे आम्ही घरचा स्वाद देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे या निमित्ताने सगळय़ांची उत्तम खाण्याची सोय होईल. कोणाचीच लेहला येऊन खाण्यामुळे त्रास झाला अशी तक्रार नसेल’, असा विश्वास तिने व्यक्त केला. 

सतलज, रावी, बियास, स्पिती, चम्बा अशा नद्यांनी सुजलाम् सुफलाम् झालेल्या, पर्वतांच्या माथ्यावर बर्फाचे मुकुट मिरवणाऱ्या आणि सूचिपर्णी अरण्याची हिरवाई धारण केलेल्या हिमाचल प्रदेशातील पर्यटनाचा अनुभव हा कायमच आनंददायी असतो. हिमाचल म्हटल्यावर सर्वात आधी जोडी आठवते ती शिमला-मनालीची. रूकांक्षी रिनायत आणि धनंजय कोडे या ध्येयवेडय़ा जोडप्याने याच मनाली, धरमशाला, जिभी आणि स्पिती व्हॅली अशा एक नाही तर तब्बल चार ठिकाणी ‘यंग मॉंक’ या नावाने स्वत:चे हॉस्टेल थाटले आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगावसारख्या छोटेखानी गावातील धनंजयला घरापासून लांब जाऊन हॉस्टेल सुरू करावेसे का वाटले? असा प्रश्न त्याला विचारला असता तो म्हणाला, ‘माझी बायको रूकांक्षी गिर्यारोहक आहे. त्यामुळे तिने मला हिमाचल प्रदेशमध्ये ट्रेकिंग किंवा ट्रॅव्हल कंपनी सुरू करण्याचा सल्ला दिला. या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी २०१८ साली आम्ही दोघे मनालीला आलो. तोपर्यंत आम्हाला बजेट ट्रॅव्हल, बॅग पॅकिंग ट्रॅव्हल याबाबतची कल्पना नव्हती. ती माहिती मी पहिल्यांदा करून घेतली. तेव्हा मला कळले की ट्रॅव्हल किंवा ट्रेकिंग कंपनी सुरू करण्यापेक्षा हॉस्टेल सुरू करावे. यासाठी हा सुवर्णकाळ आहे. ट्रॅव्हलर्सची ही डिमांड लक्षात घेऊन आम्ही २०१९ साली ओल्ड मनालीमध्ये पहिले हॉस्टेल सुरू केले. नवीन जागा, नवीन राज्य आणि त्यात अनोळखी माणसे. काही अडचण आली तर वेळप्रसंगी साथ द्यायला नातेवाईक-मित्रही जवळ नाहीत, ही भीती तर मनात होतीच. पण हळूहळू रुळलो. कोविडमध्ये दिवस हलाखीचे होते, पण त्यानंतर आलेल्या वर्केशनच्या ट्रेण्डमुळे आम्हाला पुन्हा काम करण्यासाठी एक ऊर्जा मिळाली’. 

हिमाचल प्रदेशमधील ऑफ बीट ठिकाण म्हणजे स्पिती व्हॅली. हिमाचल प्रदेशची हद्द जिथे लडाखला भिडली आहे, तिथला हा प्रदेश म्हणजे हिमालयाच्या रौद्रसुंदर रूपाचे दर्शन घडवणारा अनवट भाग. नुकतेच धनंजयने इथेही स्वत:चे हॉस्टेल थाटले आहे. धनंजय हा स्वत: पेशाने शेफ आहे. त्याच्या हॉस्टेलमधील एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याने आपल्या प्रत्येक हॉस्टेलमध्ये पुस्तकांसाठी एक कोपरा ठेवला आहे. धनंजय या संकल्पनेविषयी सांगतो, ‘वाचनाची गोडी लागावी आणि वाचनासाठी पर्यटकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही ही चळवळ चालवत आहोत. सगळी पुस्तके आम्ही विकायला ठेवली आहेत. पुस्तकांबरोबरच एक गुल्लक ठेवली आहे. तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे पैसे तुम्ही त्या गुल्लकमध्ये टाका, पण पुस्तक घेऊन वाचा हा त्यामागचा उद्देश आहे. जमलेले पैसे आम्ही आमच्याकडे काम करणाऱ्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो’.

घाईगर्दीच्या शहरी जीवनात येणारा ताण हिमाचल प्रदेशचा निसर्ग पाहून निघून जातो. या भूमीवर एका विलक्षण शांतीचा अनुभव येतो. बौद्ध धर्माच्या पगडय़ामुळे हिमाचल प्रदेशला आध्यात्मिक पार्श्वभूमीही आहे. मनोरंजनाच्या दुनियेपासून दूर जाऊन इथे मोकळय़ा वातावरणात शांततेसाठी आलेली ही आनंदी माणसे एकमेकांशी जोडली गेली. माणसांशी जोडले जाण्याची हीच आवड व्यवसायातही परिवर्तित करण्याची जिद्द, प्रयत्न या तरुणाईने सोडले नाहीत. एका वेगळय़ा शहरात जाऊन तिथे शून्यातून नवनिर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्याची तरुणाईची ही जिद्द प्रेरणादायी अशीच आहे.