साकी मलोसे

सध्या मी आणि माझे सहकारी केनियाच्या सरकारला कन्सल्ट करत आहोत. आमची चारजणांची टीम एका विषयावर मागच्या सेमिस्टरपासून काम करते आहे. आम्ही शिकलो, संशोधन करतो आहोत, ती गोष्ट प्रत्यक्षात एका देशात आकार घेणार आहे. एका देशाचं शिक्षण खातं आमच्या सूचना लक्षात घेऊन त्यांचं शैक्षणिक धोरण ठरवणार आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी आम्हाला केनियाला दोन आठवडय़ांसाठी बोलावलं आहे. याच प्रवासाची तयारी करता करता मी तुमच्याशी या गप्पा मारते आहे. सगळं कसं कालपरवाच घडल्यासारखं वाटतं आहे..

मागच्या जानेवारीत मी या विद्यापीठात मास्टर्सच्या प्रवेशासाठी अर्ज केला होता. त्याआधी वर्षभर परदेशी शिकायचा विचार मनात घोळत होता. माझा नवरा प्रमोद इथे पीएच.डी.साठी अर्ज करणार होता. त्याच्यासोबत मी इथे आल्यावर काय करावं, शिक्षण घ्यावं की नोकरी करावी, हा विचार सुरू होता. मागच्या वर्षी मला एक शिष्यवृत्ती मिळाली होती. ‘टीच फॉर ऑल’ या जागतिक स्तरावरील संस्थेतर्फे पेरू आणि फिनलँड देशात आयोजित केलेल्या जागतिक संमेलनासाठी निवडण्यात आलेल्या ३०जणांमध्ये माझी १३ देशांतून निवड झाली होती. भारतातल्या तीनजणांमध्ये मी एकटीच मुलगी होते. मी ‘टीच फॉर इंडिया’चं प्रतिनिधित्व केलं. शिक्षण क्षेत्रात, प्रामुख्याने शैक्षणिक धोरण क्षेत्रात काम करणाऱ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली होती. पेरू आणि फिनलंड या दोन्ही देशांत आमची शैक्षणिक सहल नेण्यात आली होती. आम्ही तिथल्या शाळा बघितल्या. शिक्षकांशी, शिक्षणमंत्र्यांशी संवाद साधला. यानिमित्ताने शिक्षणव्यवस्थांवर चांगलंच विचारमंथन झालं. बरंच काही नवं शिकायला मिळालं. नवी मित्रमंडळी मिळाली आणि अधिकची ऊर्जाही.. शिक्षणक्षेत्रातील प्रश्नांनाही उत्तरं असतात, हेही प्रत्ययास आलं. त्याबद्दल आणखीन शिकायला आवडेल असं वाटलं. या सगळ्या गोष्टींमुळे परदेशी शिकायचा निर्णय पक्का झाला.

मग शिक्षणक्षेत्रातल्या सहकाऱ्यांशी, मित्रमंडळींशी पुढल्या संधी, कामाचं स्वरूप आदी मुद्दय़ांवर चर्चा केली. आमची आम्हीच थोडीशी शोधाशोध करून अमेरिका आणि इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये अर्ज पाठवले होते. अमेरिकेतील चारही विद्यापीठांकडून माझी निवड होऊन अंशत: शिष्यवृत्तीही मिळाली. हार्वर्डचीच निवड करण्याचं कारण म्हणजे माझ्या आवडीच्या विषयाचं या विद्यापीठातलं संशोधन खूप चांगलं आहे. शिवाय एका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला की, हार्वर्डचे सगळे रिसोर्सेस (संसाधनं) वापरण्याची संधी मिळते. म्हणजे मी ‘हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशन’मध्ये ‘इंटरनॅशनल एज्युकेशन पॉलिसी’ (आंतरराष्ट्रीय शैक्षणिक धोरण) हा वर्षभराचा अभ्यासक्रम शिकते आहे तरी मला इथल्या कुठल्याही ग्रंथालयातली पुस्तकं वाचायला मिळू शकतात. इथल्या कोणत्याही प्राध्यापकांची वेळ घेऊन मी अभ्यासविषयाची चर्चा करू शकते. हार्वर्डच्या दुसऱ्या महाविद्यालयांमध्ये अन्य विषयही शिकू शकते. उदाहरणार्थ-या सेमिस्टरला हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये मी एक विषय घेणार आहे. ‘हार्वर्ड हेल्थ स्कूल’मध्ये एक विषय घ्यायचा विचार चालू आहे.

आमच्या दोघांचाही वेगळा वेगळा स्टुडंट व्हिसा होता. त्यामुळे तो मिळण्याचं थोडंसं टेन्शन होतं. बाकीची कामं फारसा त्रास न होता झाली. उलट थोडासा ताण घर आवरून, बंद करून यायचा होता. इथे येऊन आता सहा महिने झाले आहेत. महाविद्यालय सुरू होताना आम्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरून आलेल्या विद्यार्थ्यांची एक कार्यशाळा घेतली गेली. आम्हाला कोणकोणत्या बदलांना कसं सामोरं जायचं आहे, त्याबद्दलची माहिती सांगितली. अभ्यासविषयक सगळ्या संसाधनांबद्दल सांगितलं. त्यानंतर आमच्या महाविद्यालयाचं ओरिएंटेशन झालं. तेव्हा आमच्या डीन ब्रिजेट टेरी लॉन्ग यांचं भाषण ऐकून मी फारच प्रभावित झाले. आतापर्यंत अशा बाजाची भाषणं यूटय़ूबवरच ऐकली होती. ते भाषण प्रत्यक्षात ऐकताना आपसूकच आपण ‘हार्वर्ड’मध्ये आहोत, ही जाणीव ठळकपणे अधोरेखित झाली. पहिल्या दोन दिवसांत काही प्राध्यापकांनी त्यांच्या संशोधनाविषयी, त्यांच्या विषयाबद्दल माहिती सांगितली. त्यापैकी कोणतं व्याख्यान ऐकायचं, याची निवड आम्हा विद्यार्थ्यांच्या हाती होती. एका सेमिस्टरमध्ये आपल्याला विषय निवडता येतात. शेवटी अभ्यासाच्या आपल्या मानवी मर्यादा लक्षात घेऊन ४ ते ५ विषयच निवडले जातात. त्या आवडीच्या विषयांतही खूप पर्याय उपलब्ध असल्याने चांगल्या अर्थानं भयानक गोंधळ उडतो की कोणता विषय घ्यावा? ही निवड करताना विषयांच्या वेळेच्या गणितांचं कोडंही सोडवावं लागतं. सुरुवातीच्या एका आठवडय़ाला ‘शॉपिंग वीक’ असं म्हटलं जातं. त्यात प्राध्यापक अर्ध्या तासाचं एक सेशन घेतात. विषय आणि संधींबद्दल सांगतात. विद्यार्थ्यांच्या शंकांना उत्तरं देतात.

विद्यार्थ्यांसाठी एक अ‍ॅडव्हायझर नेमला जातो. हे प्राध्यापक अकादमिक अ‍ॅडव्हायझर असतात. आठवडाभराच्या सेशननंतर या अ‍ॅडव्हायझरकडे जाऊन आपला विषय निवडीचा विचार त्यांना सांगून त्याविषयी सखोल चर्चा होते. मग त्या विषयांची अंतिम निवड केली जाते. माझे अ‍ॅडव्हायझर प्राध्यापक डेव्हिस यांनी भारतात खूप संशोधन केलेलं आहे. त्यामुळे माझं आधीचं काम आणि पुढचे डोक्यात असणारे विचार ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ  शकतात. ते मला सर्वतोपरी चांगलं मार्गदर्शन करतात. साधारणपणे अ‍ॅडव्हायझर सेमिस्टरमध्ये दोन वेळा भेटले तरी ठीक मानलं जातं. त्यांचा विषय घेतल्याने लेक्चर्सना आम्ही भेटलोच, शिवाय त्यांची वेळ घेऊन त्यांना अनेक शंकाही विचारल्या. या सेमिस्टरमध्ये इंटर्नशिप करता येईल का, यासंबंधीही त्यांना विचारलं. ख्रिसमसच्या सुट्टीत ते पनामाला घरी गेले होते. तरीही त्यांनी आणखी काही प्रश्न मनात असतील तर ई-मेल कर. प्रवासात असल्याने कदाचित उशिरा का होईना, पण मी ई-मेलला उत्तर नक्कीच देईन, असं आवर्जून सांगितलं.

माझा मिडटर्मपर्यंतचा वेळ इथल्या अभ्यास पद्धतीशी अ‍ॅडजस्ट होण्यात गेला. प्रत्येक लेक्चरच्या आधी प्रीरीडिंग्ज (पुस्तकातल्या काही भागाचं आधीच वाचन करणं) असतात. ते आधीच सांगितलं जातं. गेल्या सेमिस्टरमधले काही विषय असे होते की त्यासाठी मला एकेका पुस्तकाची दीडशे पानं वाचायला लागत होती. या गोष्टीचा अंदाज यायला मला वेळ लागला. हार्वर्डमध्ये शिकवणारे प्राध्यापक असूनही त्यांच्याशी सहज संपर्क साधता येतो. त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. माणुसकीने वागणारे आहेत. वर्गात कुणी कुणाला जज करत नाहीत. सकाळच्या लेक्चरला येणारे विद्यार्थी नाश्ता करताना, चहा-कॉफी पिताना नोट्स लिहून घेतात, शिकतात. सुरुवातीला मला हे ऑकवर्ड वाटलं होतं. आता माझी भीड थोडीशी चेपली आहे. आता कधीतरी मीही चहा-कॉफी घेते. मोकळ्या वातावरणात शिकणं नक्कीच प्रभावी ठरतं.

शिकवताना बरेचदा केसबेस मेथड वापरली जाते. ही पद्धती सगळ्यात आधी हार्वर्डनं सुरू केली. आता ती जगभरात वापरली जाते आहे. आपल्याकडे ही पद्धती आयआयएम्समध्ये वापरली जाते. एकेक केस घेऊन त्यावर चर्चा केली जाते. काही वेळा विषयांनुसार वेगवेगळ्या देशांमधले रिसर्च पेपर्स वाचून त्यावर चर्चा केली जाते. उदाहरणार्थ-आम्ही पॉलिटिक्स ऑफ एज्युकेशन या संदर्भात ही पद्धत वापरली होती. ते खूप इंटरेस्टिंग होतं. एका विषयांतर्गत संशोधन कसं करावं, ते सविस्तरपणे शिकलो. ते शिकवणारे प्राध्यापक मॅकेनटायर यांनी सेमिस्टरच्या सुरुवातीला सांगितलं होतं की, ‘आठवडय़ातले काही दिवस मी आपल्या स्टडीरूममध्ये बसलेला दिसेन. तिथे बिनधास्तपणे येऊन तुमच्या शंका मला विचारा.’ खरं तर आमचे सगळेच प्राध्यापक प्रचंड व्यग्र असतात. त्यांचे स्वत:चे शिकवायचे विषय, अ‍ॅडव्हायझर पदाची जबाबदारी, स्वत:चं संशोधन या सगळ्या व्यवधानांतून विद्यार्थ्यांसाठी इतका वेळ काढणं, ही फारच मोठी गोष्ट आहे.

प्रत्येक विषयाची वेगळी वेबसाइट आहे. त्यावर संदर्भ पुस्तकं, संशोधनं, प्रबंध आदींच्या लिंक दिलेल्या असतात. पुस्तकांची यादी दिलेली असते. असाईनमेंट त्यावरच सबमिट करायच्या असतात. निकालही तिथेच लागतो. इथे ‘इंटर लायब्ररी लोन’ हा प्रकार आहे. मला हवं असलेलं पुस्तक माझ्या महाविद्यालयाच्या लायब्ररीत नसेल तर ही लायब्ररी हार्वर्डच्या अन्य महाविद्यालयाच्या लायब्ररीशी कनेक्टेड आहे. शिवाय बोस्टनमध्ये अन्य युनिव्हर्सिटीजच्या लायब्ररीशीही कनेक्टेड आहे. त्यामुळे तिथेही विचारणा होऊन आठडय़ाभरात ते वाचायला मिळतं. मला भारतातल्या आंगणवाडय़ांविषयीचं पुस्तक इंटर लायब्ररी लोनद्वारे मिळालं. तुम्हाला हवी तितकी पुस्तकं एका सेमिस्टरच्या कालावधीत लायब्ररीतून घेता येऊ  शकतात. इथे रिसर्च लायब्ररियन आहेत. मला एका विषयाबाबत माहिती हवी होती की त्यावर संशोधन झालं आहे का, त्यावर प्राध्यापकांनी मला रिसर्च लायब्ररियनना भेटायला सांगितलं. ते ती माहिती सांगतात किंवा ती माहिती कशी शोधायची ते सांगतात.

सध्या मी स्ट्रन्स यांच्या कुटुंबात राहाते आहे. हे अमेरिकन कुटुंब फारच प्रेमळ आहे. आम्ही केलेल्या पदार्थाची देवघेव करतो. ख्रिसमसची भेट म्हणून मला घरची सदस्य मानून त्यांनी मला विचारपूर्वक भेट दिली. थँक्स गिव्हिंगला बोलावलं होतं. तेव्हा त्यांनी आमटी करून वाढ, असं सांगितलं होतं. माझ्या हातचा आलं घातलेला चहा त्यांना फार आवडतो. आता केनियाहून परतल्यावर पुढचं सेमिस्टर सुरू होईल. त्यात पुन्हा शॉपिंग वीक होईल. पुन्हा विषय निवडीची प्रक्रिया होईल. लेक्चर्स सुरू होतील. इथे सातत्याने गुणांकन होतं. सेमिस्टरच्या सुरुवातीलाच अभ्यासक्रम देताना आठवडय़ाभरात काय सबमिट करायचं आहे, ते सांगितलेलं असतं. ते तसं सबमिट करावं लागतं. आत्ता केनियाला जाणाऱ्या आमच्या टीममध्ये बाकीचे तीनजण अमेरिकन आहेत. माझी मित्रमंडळी विविध देशांतली असून त्यांची ओळख अनेक निमित्ताने झाली. मिडटर्म परीक्षेच्या दिवशी रात्री कॅम्पसमध्ये गरब्याचा कार्यक्रम ठेवला होता. परीक्षा संपवून, थोडं तयार होऊन खेळायला जाण्याकडे आमचं लक्ष लागलं होतं. एकदा बॉलरूम डान्स आयोजित केला होता, पण आम्ही त्याचा डिस्कोच करून टाकला. त्या कार्यक्रमाची थीम हॅरी पॉटर होती. तसं माझ्याकडे काहीच नसल्याने मी मोठय़ा धाडसाने लाल-सोनेरी रंगाची साडी नेसून गेले. थोडी नव्‍‌र्हस होऊन गेले खरी, पण आपली साडी तिथे हिट झाली. अनोळखी लोकांनीही साडीला दाद दिली. असे अनेक कार्यक्रम होत असले तरी अभ्यासाच्या वेळा सांभाळून त्यांना हजेरी लावली जाते. शिवाय हार्वर्डमधल्या व्याख्यानांच्या कार्यक्रमात अनेक क्षेत्रांतील मान्यवर हजेरी लावतात. या व्याख्यानांना सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हजर राहता येतं. अभ्यासक्रम संपल्यावर पुढे शिक्षणक्षेत्रात काम करायचा मानस आहे. तूर्तास, केनिया प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करायचं असून आता त्या तयारीला लागते. बाय.

कानमंत्र

स्वत:वर विश्वास ठेवा आणि स्वत:ला कमी लेखू नका.

संधी खूप उपलब्ध आहेत, वेळेचं व्यवस्थापन करून त्यांचा लाभ घ्या.

viva@expressindia.com

शब्दांकन : राधिका कुंटे