लग्नकार्यात जसं साडय़ा, दागिने पारखून घेतात त्याचप्रमाणे गौरी, गणपतीच्या दागिन्यांसाठी दुकानं पालथी घातली जातात. काही जण तर खास हवे तसे दागिने घडवून घेतात. यंदा गौरीच्या साडय़ा प्रथेप्रमाणे काठापदराच्या असल्या तरी त्यात नवीन रंग, नवीन डिझाइन दिसताहेत. सध्या गाजत असलेल्या ‘जय मल्हार’ या मालिकेतील म्हाळसा आणि बानू यांच्या दागिन्यांची स्टाइल गौरीच्या दागिन्यांमध्ये दिसून येतेय. म्हाळसाची ठुशी, पोहे हार, बानूची नथ तर लक्ष्मीचा लक्ष्मीहार आणि कंबरपट्टा पसंतीस उतरतोय. त्याचप्रमाणे पाच-सहा पदरी मोहनमाळ आणि मध्ये नक्षी असलेलं पेंडंट घातलं की गौरी अगदी भरल्यासारखी वाटते. गौरीच्या दागिन्यांमध्ये यंदा मोराची नक्षी जास्त आढळून आली. कडं आणि बाजूबंदामध्ये मोदकाची, कुयरीची डिझाइन पाहायला मिळतेय. गौरीसाठी हेअर अ‍ॅक्सेसरीजची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होतेय. खोप्यात घालण्याच्या दागिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं, चांदणीची नक्षी आहे. गौरीच्या मंगळसूत्रापासून ते टिकली-बिंदीपर्यंत सगळ्या गोष्टीत वैविध्य पाहायला मिळतंय. अँटिक गोल्डसोबतच या वर्षी अमेरिकन डायमंडच्या दागिन्यांनादेखील जास्त मागणी आहे. काही जण स्वत:च्या आवडीनुसार दागिने घडवून घेतात. मुंबईच्या लालबाग मार्केटमध्ये, पुण्याच्या रविवार पेठेत ते बनवून घेण्यासाठी रीघ लागली आहे. बाप्पाच्या दागिन्यांमध्ये मोदकहार यंदा लोकांना जास्त भावतोय. सोंड पट्टा, शाल, कंठी, बाली, बाजूबंद यामध्ये नानाविध डिझाइन्स पाहायला मिळताहेत. मोत्याचा मुकुट किंवा मोराची नक्षी असलेला खडय़ांच्या मुकुटाकडे ग्राहकांचा जास्त कल आहे. शिवाय गणपतीपुढे ठेवायचे जास्वंदीचे फूल, दुर्वा, मोदक यातही खूप डिझाइन्स मार्केटमध्ये आल्या आहेत. आपल्या घरी गणपती बसणार नसतील तरी या नवीन वस्तू, दागिने इतके सुंदर आहेत की तुम्ही एक नजर तर टाकलीच पाहिजे.
अमृता अरुण – viva.loksatta@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewellery for gauri ganapati
First published on: 18-09-2015 at 01:27 IST