वाचन.. शतकानुशतके आपल्याला समृद्ध करत आलेला एक छंद ! मात्र गेल्या काही वर्षांत अनेक जण ‘‘आजकालची मुलं वाचतात कुठे, आमच्या वेळेसारखं थोडंच आहे आता?’’ असा नकाराचा सूरही लावतात. पण खरंच आज आम्ही काय वाचतो, का वाचतो आणि मुळात वाचतो का?
आम्ही का वाचतो?
साठय़े महाविद्यालय, पुण्यातील स. प. महाविद्यालय, विरारमधले विवा महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांशी याच प्रश्नावर गप्पा मारत होतो. ‘‘सभोवताली इतक्या नकारात्मक घटना घडत असतात, इतक्या वाईट बाबी सातत्याने प्रोजेक्ट होत असतात की सकारात्मक दृष्टिकोनासाठी काहीतरी उपाय कृत्रिमपणे योजावे लागतात. म्हणून मग संदीप वासलेकर यांचे ‘एका दिशेचा शोध’सारखं पुस्तक एकदम भारावून टाकणारं वाटतं’’, असं विवातील मथिली म्हणाली. पुण्यातील स. प. महाविद्यालयातील कुणाल, साठय़ेतील आशुतोष यांचे मतही विलक्षण होते. या दोघांच्या मते, वाचताना ‘‘माझ्या आयुष्यात आनंद कसा मिळवता येईल, या प्रश्नाचे नेमके उत्तर आम्हाला सापडलेले नाही. पण लोकांना, मान्यवरांना तो कसा काय मिळाला याची वर्णने वाचताना काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते’’, म्हणून वाचायला आवडते.. अनिल अवचट यांनी लिहिलेलं ‘कार्यरत’, भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं ‘टìनग पॉइंट’, रश्मी बन्सल यांनी लिहिलेली ‘कनेक्ट द डॉट्स’ आणि ‘स्टे हंग्री, स्टे फूलिश’, संदीपकुमार साळुंखे यांनी लिहिलेलं ‘हम होंगे कामयाब’ अशी मराठी पुस्तकांची यादी मुंबई-पुण्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुलांकडून सकारण पुढे येत होती.
आम्ही काय काय वाचतो?
या तरुणाईला व्यक्तिमत्त्व विकास, छोटय़ा-छोटय़ा प्रेमकथा (ज्या दोन-तीन तासांच्या प्रवासात सहज वाचून होतात.), सकारात्मक विचारसरणीची पुस्तके वाचायला आवडतात. पण सध्या या तरुणाईच्या मनावर सर्वाधिक गारूड आहे ते आमिष त्रिपाठी यांच्या ‘शिवा ट्रायोलॉजी’चे.. हे असं का, आपला नेहमीचा बाळबोध प्रश्न. वसईच्या वर्तक महाविद्यालयातील ऋग्वेद म्हणाला, इतिहास हा विषय शाळेत खूप रूक्ष वाटला होता, पण इतिहासाचा संदर्भाने जर कोणी आजच्या तरुणाईच्या भाषेत जर वर्तमान उलगडत असेल तर कोणाला नाही आवडणार? काय काय वाचतो, याचे नेमके उत्तर म्हणजे – ‘तरुणांना समजेल-रुचेल अशा भाषेत लिहिलेलं वर्तमानाशी जोडलं गेलेलं लेणं’.. मग यामध्ये, कृष्णमेघ कुंटे यांनी लिहिलेलं ‘एका रानवेडय़ाची शोधयात्रा’ येतं, आणि पी. साईनाथ यांचं अनुवादित ‘दुष्काळ आवडे सर्वाना’ही येतं.. ‘सिक्रेट ऑफ द नागाज्’, ‘इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’ आणि ‘द ओथ ऑफ द वायुपुत्राज्’ ही आमिष यांची पुस्तके येतात, तशीच शिव खेरा यांची ‘जगा पण सन्मानानं’, ‘यश तुमच्या हाती’ अशी पुस्तकेही भावतात.

तरुणाईच्या कपाटातील ‘प्रिय पुस्तके’
१. संदीप खरे यांचे – मौनाची भाषांतरे आणि नेणिवेची अक्षरे हे काव्यसंग्रह
२. अच्युत गोडबोले यांचे मुसाफीर
३. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय कादंबरी
४. व. पु. काळे यांचे वपुर्झा आणि पाणपोई
५. आश्विन सांघवी यांचे चाणक्य चँट्स
६. चेतन भगत यांचे ‘थ्री मिस्टेक्स् ऑफ माय लाइफ’

तरुणाईच्या पसंतीची टॉप फाइव्ह
* आमिष त्रिपाठी लिखित सिक्रेट ऑफ द नागाज्, इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा आणि द ओथ ऑफ द वायुपुत्राज्
* संदीप वासलेकर लिखित एका दिशेचा शोध
* रश्मी बन्सल लिखित कनेक्ट द डॉट्स आणि स्टे हंग्री-स्टे फूलिश