ब्रॅण्डनामा : डी’मार्ट

दमाणींनी कोणत्याही डी’मार्ट शोरूमची जागा भाडय़ाने घेतली नाही.

ब्रॅण्डनामा : डी’मार्ट

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

बाजारहाट हा शब्द अतिशय सुकर करणाऱ्या रिटेल साखळ्या भारतात आल्या आणि भारतीयांच्या खरेदीची व्याख्या बदलू लागली. हातात पिशवी घेऊन दुकानात जाणे मग तिथल्या गर्दीतून वाट काढत आपली यादी पुढे रेमटवणे. दुकानदार जे सोपवील ते घेऊन परतणे या सगळ्या अनुभवावर फुल्ली मारत ग्राहकाला निवडीचा अनुभव देत, आपल्याला हवं ते उत्पादन प्रत्यक्ष हाताळण्याची आणि किमतीत तुलना करण्याची संधी देत, गारेगार अनुभव देणाऱ्या रिटेल साखळीतील एक मोठं नाव म्हणजे डी’मार्ट. भारतीय शहरी भागातील मंडळींसाठी हा ब्रॅण्ड नवा नाही. आणि दिवसेंदिवस डी’मार्ट चा होणारा विस्तार पाहता लवकरच तो खेडोपाडी पोहोचेल यात शंका नाही. या परिचित ब्रॅण्डची ही अपरिचित कहाणी.

या सुपरिचित ब्रॅण्डचे सर्वेसर्वा आहेत राधाकृष्ण दमाणी. बिर्ला-अंबानी यांच्याप्रमाणे फारसं प्रकाशझोतात नसलेलं हे व्यक्तिमत्त्व आपल्याला माहीत नसणं स्वाभाविक आहे, कारण प्रसिद्धी, भारंभार मुलाखती, पत्रकार परिषदा यांपासून राधाकृष्ण दमाणी लांब असतात. ‘स्टॉक एक्स्चेंज’मध्ये शेअर ब्रोकर म्हणून सुपरिचित असलेल्या दमाणी यांनी भारतात रुजू घातलेली रिटेल संस्कृती ओळखून या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. सुरुवात स्वतंत्र आउटलेटपासून करण्याऐवजी नेरुळ येथील ‘अपना बाजार’चं दुकान त्यांनी प्रथम विकत घेतलं. ते चालवून पाहिलं आणि त्यानंतर ‘डी फॉर दमाणी’ यांचं डी’मार्ट २००२ साली पवई इथल्या शोरूममधून सुरू झालं. धडाकेबाज जाहिराती करण्याऐवजी स्वस्त पण चांगला माल ग्राहकांना विकायचा हा दमाणी यांचा दृष्टिकोन पक्का होता आणि त्यामुळे अतिशय शांतपणे त्यांनी व्यवसाय विस्ताराला सुरुवात केली. जीवनावश्यक रोजच्या वापरातील वस्तू डी’मार्टमध्ये उपलब्ध करून देताना दमाणी यांनी अवलंबलेली नीती कोणत्याही नवउद्योजकासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकेल.

दमाणींनी कोणत्याही डी’मार्ट शोरूमची जागा भाडय़ाने घेतली नाही. ती खरेदी केली. त्याचा त्यांना दीर्घकालीन फायदा झाला. दमाणी यांनी उद्योग सुरू केल्यानंतर तो विस्तारण्याची बिलकूल घाई केली नाही. लहान लहान पावलांनी विस्तारणाऱ्या व्यवसायावर उत्तम नियंत्रण ठेवता येते हे त्यांना माहीत होते. जनसंपर्क हा मुद्दा नेहमीच डी’मार्टने महत्त्वाचा मानला. पुरवठादारांसोबत उत्तम संबंध प्रस्थापित केल्याने ‘आऊट ऑफ स्टॉक’ होण्याची वेळ डी’मार्टवर क्वचितच येते.

अशा रिटेल साखळीतील दुकानात खरेदी करताना त्यावर मिळणारी सवलत म्हणजे गौडबंगाल आहे असं आपल्याला वाटतं पण त्याला दुसरी बाजूही असते. रोजच्या वापरातील वस्तूंवर डी’मार्टमध्ये भरघोस सवलत मिळते, कारण रिटेल साखळीतील मंडळी पुरवठादारांना आठवडय़ाने किंवा महिन्याने पैसे चुकते करत असताना डी’मार्टने मात्र ताबडतोब पैसे द्यायचे धोरण ठेवले. लगेच पैसे मिळतात पाहिल्यावर पुरवठादारांनीही वस्तू कमी किमतीत डी’मार्टला विकायला सुरुवात केली. त्यामुळे बाहेरपेक्षा दैनंदिन वापराच्या वस्तू इथे कमी किमतीत उपलब्ध होऊ  लागल्या. हेच धोरण आता अन्य रिटेल साखळ्यांनी अवलंबायला सुरुवात केली आहे पण या कल्पनेचं श्रेय डी’मार्टला जातं.

याव्यतिरिक्त डी’मार्टचं एक खास वैशिष्टय़ म्हणजे इतर मोठय़ा रिटेल ब्रॅण्ड्सप्रमाणे शोरूम चकाचक करण्यावर, इंटेरियर करण्यावर डी’मार्टने अजिबात भर दिलेला नाही. सगळी शोरूम्स वातानुकूलित पण अगदी साधी आहेत. तिथे खर्च वाचवून डी’मार्ट ग्राहकांना सवलत देण्यावर भर देतं. इथल्या कोणत्याही सर्वसामान्य उत्पादनावर सरासरी ३% सवलत मिळतेच. ही विचारसरणी राधाकृष्ण दमाणी यांच्या जीवनमानाला साजेशी आहे, कारण स्वत: इतक्या मोठय़ा उद्योगाचा डोलारा सांभाळणारे राधाकृष्ण दमाणी पांढरं शर्ट आणि पांढरी विजार अशा साध्या पोशाखात सदैव वावरतात.

१५ वर्षांनंतर डी’मार्ट १४० स्टोअर्ससह आणि ४००० कोटींच्या उलाढालीसह भारतातील महत्त्वाच्या शहरांत विस्तारलंय. ही उलाढाल बिर्ला आणि अंबानी ग्रूपच्या रिटेल साखळ्यांपेक्षा जास्त आहे.

ग्राहकांना खरेदीचा श्रीमंती शाही अनुभव देण्यापेक्षा साधेपणातून त्याच्या खिशाची श्रीमंती वाढवण्याचा दमाणींचा विचार अचूक ठरलेला दिसतो. डी’मार्टमध्ये खरेदी करणाऱ्यांचा वर्गावर्ग भेद नाही. डाळ-तांदळापासून साबणापर्यंत सगळ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी इथे गरीब आणि श्रीमंत दोघेही महिन्याचं सामान भरायला एका रांगेत उभे राहतात. याचं कारण एकच.. खरेदी हा कितीही स्टेट्सचा प्रश्न करायचा म्हटला तरी ‘डेली डिस्काउंट, डेली सेव्हिंग्ज’ या टॅगलाइनपुढे सगळ्यांची मान झुकते. ग्राहकाची ही मानसिकता ओळखल्यामुळेच आतापर्यंत सुरू झालेलं डी’मार्टचं एकही शोरूम बंद न होता पूर्णत: नफ्यात आहे. डी’मार्टचा वर्धिष्णू हिरवा लोगो हेच दाखवतो.

ग्राहकांना तरी दुसरं काय हवं असतं? दैनंदिन वापराच्या वस्तू रास्त भावात मिळाव्यात. आणि हे काम कोणत्याही गाजावाजाविना डी’मार्ट उत्तम प्रकारे करतंय. ब्रॅण्ड डी’मार्टकडे पाहताना म्हणूनच आठवण येते.. हळूहळू पण निश्चितपणे शर्यत जिंकणाऱ्या कासवाची!

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2017 at 00:35 IST
Next Story
Watchलेले काही : ग्रॅण्ड घरगुती सर्कस
Exit mobile version