गावाला व्यक्तिमत्त्व देणाऱ्या, त्याचं वैशिष्टय़ जपणाऱ्या खाऊगल्ल्या आणि त्या निमित्ताने त्या गावाशहरांची चवदार सफर या पाक्षिक सदरातून..

जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक म्हणून बनारस किंवा वाराणसीची ओळख आहे. गंगामैया ही या काशीची ओळख. जवळपास ८५ घाट असणाऱ्या या शहरामध्ये काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर अनेकांचे पाय वळतात ते इथल्या गल्ल्यांमध्ये बनारसी खाऊची लज्जत चाखण्यासाठी. ‘ये गंगा मया की नगरी है.. इहा के मेहमान भी शिवजी का रूप होते है..’ अशी इथल्या स्थानिकांची धारणा आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान तुम्ही बनारसला गेलात तर इथे तुमच्या पाहुणचारामध्ये कोणत्याही प्रकारची कसर बाकी ठेवली जाणार नाही.

भारतातील प्रत्येक राज्याची, शहराची स्वत:ची अशी एक ओळख असते. पण, ती ओळख काही आधार कार्डाप्रमाणे यांत्रिक नाही हे खरं. विविध धर्माचे, प्रांताचे, व्यक्तिमत्त्वाचे लोक, त्यांचं राहणीमान, संस्कृती हे सर्व घटक प्रत्येक शहराची ओळख बनले आहेत. बनारस- हे शहर तर अशा सांस्कृतिक शहराचा मेरुमणी.  गंगा नदी या शहराचं महत्त्व आणखीनच वाढवते. ‘शिव की नगरी’, किंवा ‘काशीनगरी’ म्हणूनही बनारसच्या आसपासचा भाग ओळखला जातो. जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक म्हणून बनारस किंवा वाराणसीची ओळख आहे. ‘ये गंगा मया की नगरी है.. इहा के मेहमान भी शिवजी का रूप होते है..’ अशी इथल्या स्थानिकांची धारणा आहे. इथल्या वातावरणात निर्मळ असा आध्यात्मिक सुवास तरळत असल्यामुळे इथलं वातावरणही तसंच आहे. बनारसमध्ये गंगेच्या घाटावर उभं राहून गंगा आरती अनुभवणं हा आयुष्यभर लक्षात राहील असा ठेवा आहे. इथल्या आध्यात्मिक वातावरणाने अनेक जण भारावून जातात, त्याचप्रमाणे इथल्या खाऊगल्ल्याही अनेकांना तृप्तीची भावना देतात. गंगा नदी, काशी विश्वनाथाचं मंदिर आणि सोबतच इथल्या इतर काही मंदिरांना भेट दिल्यानंतर आणि ‘बम भोले’.. असं म्हणत देवदेवतांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपोआपच पाय वळतात जुन्या खाऊगल्ल्यांकडे.

जुन्या काशी विश्वनाथ मंदिर परिसरात, त्याच मार्गावर कचोरीवाली गल्ली (कचौडीवाली गली) प्रसिद्ध आहे. इथे जिभेचे आंबटगोड चोचले पुरविण्यासाठी विविध दुकानं सज्ज आहेत. काही दुकानांमध्ये तर ग्राहकांच्या लांबच लांब रांगाही लागतात. मंदिर परिसरात सिधगिरिबाग येथे ‘काशी चाट भंडार’ हे एक प्रसिद्ध दुकान आहे. इथे ‘पालक चाट’, ‘टमाटर चाट’, ‘आलू चाट’ असे विविध पद्धतीचे चाट मिळतात. फक्त या एकाच दुकानात नाही तर, बनारसमध्ये अशा अनेक ठेल्यांवर चाटचे नाना खट्टे-मीठे प्रकार मिळतात. मोंगा चाट, दिना चाट भंडार ही काही प्रसिद्ध चाटची दुकानं स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत.

टोमॅटो, बटाटा, मटार, गरम मसाला यांचं मऊसर मिश्रण आणि ते बनवणारे कष्टकरी हात या पदार्थाची चव आणखीनच वाढवतात यात शंकाच नाही. बनारसमध्ये मिळणाऱ्या चाटची चव जिभेवर तरळत राहावी अशीच आहे. कुल्हड म्हणजेच मातीच्या एका छोटय़ा वाडग्यात टमाटर चाट दिलं जातं. टोमॅटो आणि बटाटय़ाच्या मिश्रणात वरून टोमॅटोचा रस्सा घातला जातो. आपल्या र्तीदार मिसळीची – विशेषत कटाच्या रश्शाची आठवण तेव्हा आवर्जून येतेच. हा प्रकार मिसळीसारखा झणझणीत मात्र नाही. टोमॅटो चाट हा प्रकार तव्यावरून आपल्या कुल्हडमध्ये येईपर्यंतची प्रक्रियाही बघण्याजोगी असते. त्यामुळे संधी मिळाली तर, हे ‘मेकिंग ऑफ चाट’ नक्की पाहा.

बनारसमध्ये मंदिरांमधील मंत्रोच्चाराच्या आवाजाने दिवसाची सुरुवात होते. अशा पहिल्या प्रहरीही इथल्या खाऊगल्ल्या जाग्या असतात, हे विशेष. दिवसाची सुरुवात मस्त बनारसी चहा आणि त्यासोबतच बन-मस्क्याने करू शकता. होय, बनारस आणि बन-मस्का.. हे कॉम्बिनेशन थोडंसं खटकत असलं तरीही बनारसमध्येही बन-मस्का चांगलाच आवडीचा आहे. बनारस िहदू युनिव्हर्सिटीच्या परिसरात लंका इथे मिळणाऱ्या बन-मस्क्याला अनेकांची पसंती आहे. या पवित्र भूमिमध्ये आल्यावर गंगेच्या पाण्यात एक डुबकी लावण्यासाठी सारेच आग्रही असतात, तीच आस असते इथे मिळणाऱ्या जिलेबी आणि लस्सीची चव चाखण्याची. बनारसमध्ये खरं तर कोणत्याही मिठाईच्या दुकानामध्ये तुम्ही जिलेबीची चव चाखू शकता. गरमागरम, साखरेच्या पाकात घोळवलेल्या जिलेबीला कशाचीच तोड नाही. जिलेबीचाच आणखी एक प्रकार बनारसमध्ये मिळतो. हा प्रकार सहसा इतरत्र कुठेही मिळत नसावा. असा हा प्रकार म्हणजे ‘जिलेबा’. याचं वजन दोन किलोच्या आसपास असावं. जिलेबा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर, एक प्रकारची अगडबंब जिलेबीच आहे. जिलेबा हा प्रकार पर्यटकांच्या जास्त आवडीचा असला तरीही स्थानिकांच्या सांगण्यानुसार इथली जिलेबीच जास्त चविष्ट आहे. चाट खाऊन झाल्यानंतर त्या चटपटीत चवीमागोमाग गोडाच्या पदार्थाचा पाठपुरावा करत असताना बनारसच्या गल्ल्यांमधून फिरताना एक पदार्थ अनेकांचे लक्ष वेधतो, तो म्हणजे गुलाबजाम. माव्याचे खरपूस तळलेले गोळे, त्यावरून घरंगळणारा घट्ट साखरेचा पाक आणि जिभेवर विरघळणारे गुलाबजाम खाताना तुम्ही ‘भय्या और दो..’ अस्सं म्हटल्यावाचून राहणार नाही.

रसगुल्ले आणि रसमलाई या बंगाली पदार्थाचं प्रस्थ बनारसमध्येही आहे. इथल्या रसमलाईचा जिभेवर तरळणारा स्वाद म्हणजे आहाहा! गंगा घाटाच्या आसपासच्या परिसरात सर करत असताना आणखीन एक पदार्थ तुम्हाला खुणावेल. तो पदार्थ म्हणजे दहीबडे. बनारसच्या खाऊगल्ल्यांमध्ये लहान-मोठय़ा दुकानांत अवघ्या २५ ते ४० रुपयांमध्ये तुमच्यासमोर येणारी दहीवडय़ाची प्लेट एकदा खाऊन पोट भरेल तर नवलच. बनारस म्हटलं की रबडी आणि कुल्हडमधली लस्सी आलीच. दूधदुभत्याचं प्रस्थ या यूपीच्या सांस्कृतिक राजधानीत आहेच. ताज्या आणि स्निग्ध दुधामध्ये इथे रबडी आणि लस्सी बनवली जाते. इथे मिळणारी लस्सी पिताना एक वेगळीच चव जिभेवर तरळते. ही लस्सी पंजाबी लस्सीपेक्षा निराळी चव देते. ती चव जाणून घेण्यासाठी एकदा तरी इथली लस्सी प्यायलाच हवी. इथल्या लस्सीची एक खासियत म्हणजे कुल्हडमध्ये दिल्या जाणाऱ्या या लस्सीवर रबडी घालून दिली जाते. त्यामुळे ही मलाईदार रबडीयुक्त लस्सी जिभेला घोळवतच पुढे जाते. लस्सीसाठी इथे फेमस आहे पहलवान लस्सी हे दुकान.

‘बनारस आए.. और बबुआ पान नही खाया तो क्या खाया..’ असं प्रचलित वाक्य इथे एखाद्या स्थानिकाच्या तोंडून नक्कीच ऐकायला मिळेल. बनारसमध्ये बऱ्याच पानांच्या दुकानांमध्ये विविध प्रकारची पानं मिळतात. इथे पानांच्या विविध प्रकारांनी सेंच्युरीच मारली आहे म्हणायला हरकत नाही. त्याशिवाय बनारसी ठंडाईबद्दल काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. चित्रपट आणि मालिकांमध्ये थंडाईचा जो काही ट्रेंड आला आहे तो इथूनच आला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ‘केसरी’ या दुकानामध्ये मिळणारी ठंडाई एका लांबट ग्लासामध्ये दिली जाते. महाशिवरात्री आणि होळीच्या दिवसांमध्ये तर या थंडाईचं महत्त्व फारच आहे. थंडाईचा आणखी एक प्रकार इथे मिळतो. पण, जो सर्वाच्याच पसंतीस येतो असे नाही. अस्सल खवय्ये असाल तर एकदा तरी हा प्रकार खाऊन पाहावाच. हा धाडसी अट्टहास असेल तर तहान भागवण्यासाठी इथे मिळणारी भांगवाली थंडाई नक्की ट्राय करा.

भारतातील अनेक राज्यांमध्ये ज्याप्रमाणे पंजाबी खाण्याचा प्रभाव पाहायला मिळतो, त्याप्रमाणे इथे पंजाबी खाण्याचा फारसा प्रभाव नाहीये. त्यामुळेच कदाचित स्थानिक पदार्थाची चव इथे कायम टिकून आहे. शाकाहारी खाणाऱ्यांसाठी बनारस नगरी म्हणजे विविध चवींचा चविष्ट पेटारच जणू. फार क्वचित ठिकाणी मांसाहारींसाठी  एखादं दुकान दिसेलही. त्यामुळे ‘बनारस में जो आएगा वो कभी मायूस नही जाएगा’ हेच खरं. तेव्हा वाट कसली पाहताय, ‘बोला बम भोले, आणि खा बनारसचे आलू छोले’.

गावोगावच्या खाऊगल्लीचे फोटो आणि माहिती पाठवा

देशभरातील वेगवेगळ्या गावा-शहरांमध्ये भटकंतीदरम्यान/वास्तव्यात तुमच्याही नजरेला (आणि मग जिभेला) असे वैशिष्टय़पूर्ण पदार्थ लागलेच असतील. गावोगावच्या अशा खाऊगल्ल्या आणि त्यातल्या पदार्थाविषयी आम्हाला कळवा. सोबत तुमचं नाव, संपर्क क्रमांक आणि पदार्थाचे/खाऊगल्लीचे फोटोही पाठवा. लेख लिहिलात तर ४०० शब्दांपेक्षा अधिक मोठा नसावा. लेख, माहिती आणि फोटो पाठवण्यासाठी आमचा इ मेल – viva@expressindia.com किंवा viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये खाऊगल्ली असा उल्लेख आवर्जून करावा. निवडक लेखांना प्रसिद्धी दिली जाईल.

viva@expressindia.com