विनय नारकर

महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेची महाराणी जर पैठणी असेल तर चंद्रकळा ही राजकन्या ठरावी. राणीची कीर्ती दिगंतात पसरली, राजकन्येला मात्र लोकांनी आठवणीच्या हळव्या कोपऱ्यात जपले, अशीच काहीशी अवस्था चंद्रकळेच्या बाबतीत म्हणता येईल.

अगदी आपल्या कवींनीसुद्धा महाराणीचा दिमाख जपला आणि राजकन्येला तिला साजेशा नजाकतीनेच कवितेतून पेश केले.

स्वामी कुवलयानंद गुणे यांच्या शब्दात..

कृष्णाची स्वारी अपुल्या जाणार

मंदिरावरुन, जननी गे ॥

चंद्रकला नेसू काळी?

कोणती घालू काचोळी? ॥

जननी गे ॥

‘चंद्रकळा’ ही अशा खास क्षणांकरता जपली जायची. मराठी साहित्यात चंद्रकळा अनेक कवितांमधून, गौळणींमधून भेटते. आणि तरीही तिच्याबद्दल माहिती असणारे तसे थोडेच अशी आजची अवस्था आहे.

घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात

माहेरी जा, सुवासाची कर बरसात

सुखी आहे पोर -सांग आईच्या कानात

आई, भाऊसाठी परी मन खंतावतं

विसरली का गं, भादव्यात वर्स झालं

माहेरीच्या सुखाला गं, मन आचवलं

फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो

चंद्रकळेचा गं, शेव ओलाचिंब होतो

अशी सुखदु:खात साथ देणारी चंद्रकळा मराठी स्त्रियांनी आपल्या आठवणीत जपावी यांत नवल काय.. एकनाथ आपल्या एका गौळणीत म्हणतात.. ‘नेसले गं बाई चंद्रकळा ठिपक्यांची.. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या कृष्णाची..’

म्हणजे किमान एकनाथांच्या काळापासून चंद्रकळा आहे. सुरवातीची चंद्रकळा साडी म्हणजे नऊवारी इरकली साडी. तिचे खास महत्त्व मकर संक्रांतीला. नव्या नवरीला पहिल्या संक्रांतीला हे लेणं द्यायचं. चंद्रकळा म्हणजे काळी.. काळी चंद्रकळा ही द्विरुक्ती झाली. क्वचित इंडिगो रंगातही ती असायची. कालांतराने इतर रंग चंद्रकळेत आल्याने असे झाले.

एरवी आपण ज्या काळ्या रंगाशी फटकून वागतो, त्याला इतके महत्त्व का यावे? ख्यातनाम क्विल्ट आर्टिस्ट गीता खंडेलवाल म्हणतात, संक्रांतीत येणाऱ्या रात्री मोठय़ा असतात, त्यानंतर त्या छोटय़ा होत जातात. संक्रांतीच्या मोठय़ा रात्रीमुळे ही आली काळी चंद्रकळा. चांदणी रात्र पांघरल्याचा अनुभव देणारी साडी म्हणजे चंद्रकळा. थंडीत येणाऱ्या संक्रांतीला काळा रंग वापरणे हेही वातावरणाच्या दृष्टीने सुसंगतच आहे.

शांता शेळकेंनीही आपल्या गीतात दादाला वहिनी कशी हवी याचं वर्णन करताना याच साडीचा उल्लेख केला आहे. ‘गोऱ्या गोऱ्या वहिनीला अंधाराची साडी, अंधाराच्या साडीला चांदण्यांची खडी.’ इरकली चंद्रकळेवर चांदण्याच्या आकाराची खडी असायची. ही खडी कालांतराने निघायची. चंद्रकळा नामशेष होण्याचं हेही एक कारण होतं.

काळ्या इरकली साडीवर पांढऱ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा करून ही खास चंद्रकळा बनवली जायची. यांत इतर रंगांतही वेगवेगळे बुट्टे काढून ही नटवली जायची. अशा प्रकारची अद्भुत कशिदा केलेली एक चंद्रकळा पुण्याच्या केळकर संग्रहालयात पाहायला मिळते. अहिल्याबाई किर्लोस्कर यांनी ती संग्रहालयास भेट दिली आहे. ही साधारण दीडशे वर्षे जुनी आहे. यावरची कशिदाकारी, बारकावे, बुट्टय़ांचे प्रकार आणि एकूणच रचना सगळंच अप्रतिम आहे. या साडीवर काही जागी आरसे वापरून चंद्र चांदण्यांचा परिणाम साधला आहे. काही कशिद्याच्या चंद्रकळांमध्ये संक्रांतीच्या हलव्यासारखे बुट्टेसुद्धा काढले जात.

चांदण्या रात्रीची कल्पनाही विस्तारत गेली पण चंद्रकळा नाही. काही जुन्या पैठण्या बघायला तरी मिळतात. चंद्रकळा जवळपास नामशेषच झाली. मग चंद्रकळा सापडली ती काही चित्रांत आणि छायाचित्रांत. बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई राजे यांनी नेसलेली ही तलम मसलीनची चंदेरीची चंद्रकळा पाहून मन वेडावून जातं. ही विणलेल्या अर्धचंद्राच्या बुट्टीने सजली आहे. राजा रविवर्माच्या चित्रांत पैठणीची ऊठबस जास्त आहे. रावबहादूर धुरंधरांनी मात्र एका चित्रात अगदी तालेवार चंद्रकळा रंगवली आहे. यात चंद्रकोर आणि चांदणी यांची विणलेली बुट्टी अतिशय रुबाबदार दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रकळा ही काही पैठणी, बनारस यांसारखी टेक्सटाइल परंपरा नाही. हे एक डिझाइन आहे. हे तिचं वेगळेपण आहे. आधी इरकली साडय़ांमध्ये बनायचं मग चंदेरीतही बनायची, काळ्या पैठणीलाही नंतर नंतर चंद्रकळा म्हटलं जाऊ  लागलं. कालांतराने चंद्रकळा अदृश्य झाली पण संक्रांतीला असणारं काळ्या साडीचं महत्त्व आजही महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात अबाधित आहे.