मितेश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायोलिनवर पाश्चिमात्य आणि भारतीय अशा दोन्ही संगीतांतील सूर लीलया छेडणारी श्रुती भावे आहे, आजची कल्लाकार. पाश्चिमात्य संगीताची कास तिने धरली असली तरी भारतीय शास्त्रीय संगीताचा तिचा पायाही भक्कम आहे. जागतिक संगीत दिनानिमित्त जाणून घेऊया या अष्टपैलू कलाकाराविषयी..

श्रुतीला संगीताचं बाळकडू घरातूनच मिळालं. त्यांचं संपूर्ण घराणंच संगीतप्रेमी. आई सरिता भावे यांचं माहेर मध्य प्रदेशचं. त्यामुळे त्यांनी ख्याल संगीतासोबत ठुमरी आणि गझलचेही संस्कार श्रुतीवर केले. तर वडील राजेंद्र भावे हे मात्र महाराष्ट्रातल्या सांगलीचे. त्यांच्यामुळे श्रुतीवर खाडिलकर नाटय़संगीताचा प्रभाव पडला. शिवाय ते व्हायोलिनवादक. त्यामुळे संगीताची आवड असणं, श्रुतीसाठी आपसूकच आलेलं होतं. पण श्रुतीला मात्र शाळेत असल्यापासून नृत्याची आवड होती. पण नृत्यनिकेतन घरापासून लांब असल्यानं ते शिक्षण थांबलं. त्यामुळे मग आता बाबांच्या व्हायोलिनवादनाचा वसा तरी श्रुतीने घ्यावा, असं तिच्या आईला वाटत होतं.

श्रुतीला व्हायोलिन आवडत असलं तरी रियाजाचा मात्र कंटाळा येई. पण आई रियाजाच्या बाबतीत कडक होती. तिने श्रुतीला उत्तम शिक्षण मिळावं म्हणून पद्मश्री पंडित डी के दातार यांच्याकडे प्रशिक्षण वर्गाला पाठवलं. त्यानंतर कला रामनाथ यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. दोन्ही गुरू चांगले होते, पण कला रामनाथ भयंकर शिस्तीच्या होत्या. प्रत्येक राग त्या अक्षरश शंभर वेळा वाजवून घेत, जेणेकरून त्यात काही चूक होऊ नये. या कडक शिस्तीचं फळ मात्र सकारात्मक मिळालं. श्रुतीचा सराव उत्तम होऊ  लागला. व्हायोलिनविषयीचं प्रेम वाढीस लागलं.

अकरावीत चर्चगेटच्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयात श्रुतीने प्रवेश घेतला. तिची मित्रमंडळी विविध महोत्सवांत सहभागी होत, पण तिचा रियाज आणि अनुभव इतरांच्या मानाने कमी असल्याने तिला कशातच सहभागी होता येत नव्हतं. पण त्या तालमींतून आणि धामधुमीतून श्रुतीला खूप काही शिकायला मिळालं.

घरच्या सांगीतिक वातावरणामुळे श्रुती फक्त वादकच नव्हे तर गायकही आहे. सारेगमपच्या एका पर्वात ती वादक म्हणून सहभागी झाली होती. तसेच ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेचं शीर्षकगीत तिने वैशाली भैसने-माडेसोबत गायलं होतं. गेल्या ९ वर्षांच्या कारकीर्दीत श्रुतीने अनेक दिग्गज कलाकारांसमवेत काम केलं आहे. कमलेश भडकमकर, सोनू निगम, अतिफ अस्लम, सलील कुलकर्णी, अमित त्रिवेदी, अशोक पत्की, चिनार महेश आदी अनेक दिग्गजांसोबत काम केलं आहे. ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांच्यासोबतचा किस्सा श्रुती सांगते. एकदा त्यांच्या नाटकासाठी संगीत दिलं जात होतं. त्या वेळी रेकॉर्डिगच्या वेळी माइक आणि साऊंडची जरा अडचण होती, त्यामुळे श्रुतीच्या व्हायोलिनचा आवाज मोडकांपर्यंत पोहोचत नव्हता. तेव्हा ते ओरडले, ‘अरे कोण आहे ही मुलगी हिचा आवाजही येत नाही.’ ती खूप घाबरली होती. पण चार दिवसांनी त्यांनी तिचं वादन ऐकलं तेव्हा ते म्हणाले की, ‘तुझ्या हातात मख्खन आहे गं. किती गोड वाजवतेस तू!’ हे ऐकल्यावर तिच्या जिवात जीव आला. श्रुतीला तिच्या सांगीतीक कामगिरीसाठी ‘सुधीर फडके युवान्मेष पुरस्कार’, ‘रतीलाल भावसार युवागौरव’ आदी सन्मान मिळाले आहेत. पण हे सन्मान म्हणजे केवळ मिरवायचे नसतात, तर त्यामुळे कला समृद्ध करण्याची आपली जबाबदारी आणखी वाढते, असं श्रुती नम्रपणे म्हणते.

श्रुतीच्या आयुष्याला एक सूरमयी वळण मिळालं ते इंडिवा ग्रुपमुळे. त्याबद्दल श्रुती सांगते की, ‘‘मी आणि हंसिका अय्यर कौशल इनामदार यांच्या एका प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करीत होतो. त्याच सुमारास मर्लिन डिसूझा, विवियन पोचा आणि हंसिका या तिघी जणी केवळ महिलांचा बँड स्थापन करण्याचं स्वप्न पाहत होत्या. त्या उत्तम वादक आणि गायक मुलीच्या शोधात होत्या. कौशलच्या प्रोजेक्टमध्ये मी व्हायोलिन वाजवलं आणि चांगली गायलेसुद्धा. त्यामुळे हंसिकाने त्यांच्या बॅण्डमध्ये सहभागी होण्यासाठी विचारलं. मी लगेचच माझा होकार कळवला. पण मला व्हायोलिन शास्त्रीय, पारंपरिक पद्धतीने बैठकीवर बसून वाजवण्याची सवय होती. या ग्रुपमध्ये काम करायचं तर मला उभं राहून व्हायोलिन वाजवावं लागणार होतं. ही गोष्ट माझ्यासाठी फारच आव्हानात्मक होती. जवळपास महिनाभर उभ्याने व्हायोलिनवादनाचा सराव करावा लागला. सरावादरम्यान माझा हात आणि चेहरा प्रचंड दुखत असे.  या बँडमुळे पाश्चिमात्य संगीत, पॉप कल्चर, इंडोवेस्टर्न म्युझिक, जॅझसारख्या संगीतप्रकारांचं सादरीकरण मी करू शकले. माझ्या विचारसरणीची चौकट बदलली. व्हायोलिनवादनातही मी पद्धतशीर बदल केला.’’ श्रुतीच्या इंडिया बँडने यूके, यूएसए, आफ्रिका, नेदरलँड, सिंगापूर, मलेशिया आदी देशांत कार्यक्रम केले आहेत. त्या देशांतल्या कार्यक्रमांसोबत श्रुतीला तिथली संगीतसंस्कृतीही अनुभवायला मिळाली. हा बँड आता नव्या रूपात रसिकांसमोर येणार आहे.  अनेक भारतीय भाषांमधली गाणीही आता रसिक प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.

आज घडीला अनेक मुली गायन आणि वादनाकडे वळत आहेत. करिअर म्हणून याकडे पाहत आहेत. त्याबद्दल श्रुती म्हणते, ज्या मुलींना मतस्वातंत्र्य आणि स्वतच्या वेळेचा सदुपयोग करण्याची संधी मिळत आहे त्यांनी तिचा पुरेपूर वापर करावा. वादनामध्ये एक उत्तम करिअर होऊ शकतं. फक्त त्यासाठी कष्ट आवश्यक आहेत. लवकरच श्रुती खास मुलींसाठी व्हायोलिनचे प्रशिक्षण वर्ग सुरू करणार आहे. तिच्या सुरेल वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा!

इंडिवा या बँडमुळे मी पाश्चिमात्य संगीत, पॉप कल्चर, इंडोवेस्टर्न म्युझिक, जॅझसारख्या संगीतप्रकारांचं सादरीकरण  करू शकले. माझ्या विचारसरणीची चौकट बदलली.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Classical violin player shruti bhave
First published on: 16-06-2017 at 00:38 IST