लहानपणी ऐकलेली बडबडगीतं मोठेपणी वेगळ्याच कारणाने पुन्हा पुन्हा आठवतात. स्वप्नात पाहिली राणीची बाग.. हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग.. ही त्या गीतातील ओळ तेव्हा मजेशीर वाटायची. सध्या मात्र या हत्तीच्या पाठीवरून सगळ्या जगभर रंगांची, फॅशनची जादू फिरणार आहे. महत्वाचं म्हणजे हत्तीच्या पाठीवर हे रंगीबेरंगी जादूचं बिऱ्हाड थाटण्यामागचं कारणही ‘हत्ती’च आहे. लोकसंख्येचा फुगा वाढतोय तसा जंगलं कमी होत चालली आहेत. आणि त्यामुळे या सुंदर, भव्य आणि महाकाय प्राण्याचं घरच हरवलंय. त्यांना त्यांचं जंगलातलं घर पुन्हा मिळवून देण्यासाठी ‘एलिफंट परेड इंडिया’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात सुबोध गुप्ता, गौरव गुप्ता, तरूण ताहिलियानी, सब्यसाची मुखर्जी यांसारखी देशभरातील नामांकित फॅशन डिझायनर्स, कलाकार मंडळी सहभागी होणार आहेत.

माणूस नावाचा प्राणी सगळ्या गोष्टी अंगाशी आल्या की मग खबरदारी बाळगायला लागतो हे सर्वमान्य आहे. म्हणजे जोपर्यंत तहान लागत नाही तोपर्यंत विहीर खोदायची नाही आणि खोदायला लागला की गराजेपलीकडे जाऊन  शक्य तितक्या विहिरी खोदत रहायच्या ही माणसाची वृत्ती आहे. निसर्ग देतो म्हणून फक्त गरजेपुरतं न घेता ओरबाडून घेणं यातला हा प्रकार. पण माणसाचं हे ओरबाडून घेणं सध्या वन्यजीवांच्या प्राणांवर बेतू लागलंय. गोवा-कारवार भागात ऐन वस्तीतून हत्तींचा कळप शिरल्याने पिकांची, मानवी वस्तीची नासधूस झाल्याच्या घटना आपण पाहिल्याच नाहीत असं नाहीत. पण जंगलात गुण्यागोविंदाने आपल्या कुटुंबकबिल्यासह राहणाऱ्या या प्राण्याला असं भरवस्तीत शिरायची गरज का लागली?, याचा आपण सहसा विचार करत नाही. मात्र हा विचार जागतिक स्तरावर सुरू झाला असून गेली काही वर्ष त्यासाठी ‘एलिफंट परेड’ नावाची मोहिम सुरू करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर #ElephantParadeIndia नावाची हॅशटॅग मोहीम धुमाकूळ घालते आहे. आपापल्या कल्पनाशक्तीतून साकारलेले रंगीत हत्तींचे फोटो #ElephantParadeIndia असा (पान २ वर) (पान १ वरून) हॅशटॅग लावून पोस्ट केले जात आहेत. असे १०१ रंगीबेरंगी हत्तींचे पुतळे तयार करण्यात येणार आहेत आणि हे करण्याची धुरा यावेळी फॅशन डिझायनर्सच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

आशियाई हत्तींना वाचवण्यासाठी ‘एलिफंट परेड इंडिया’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. याआधी अशी एलिफंट परेड लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती. १०१ रंगीबेरंगी हत्तींचे हे पुतळे याच महिन्यात पहिल्यांदा जयपूरमध्ये दाखल होतील. त्यानंतर फेब्रुवारीत मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी हे हत्ती पहायला मिळतील. मार्चमध्ये मुंबईतच भव्य सोहळ्यात हे हत्ती विराजमान झाल्यानंतर मग लंडनमध्ये त्यांचा लिलाव केला जाणार आहे. या रंगीबेरंगी मोहिमेतून साधणार काय?, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. लंडनमध्ये होणाऱ्या लिलावातून जो निधी गोळा होईल त्यातून भारत आणि अन्य आशियाई देशांतून जिथे जिथे हत्तींचा मार्ग जंगलातून जातो अशा १०१ ठिकाणच्या जागा विकत घेण्यात येणार आहेत. या जागांवर हत्तींना त्यांचे घर मिळावे, अशी ही योजना असून यात अगदी फॅशन डिझायनर्सपासून आदिवासी कलाकारांपर्यंत समाजातील सगळ्या स्तरातील कलाकारांना सहभागी करून घेण्यात आले आहे हे विशेष. फॅशनविश्वात हत्तीचा हा प्रवेश नवीन नाही. केवळ शिल्पकला आणि चित्रकलेतून हत्ती आपल्याकडे पहायला मिळतो असं नाही. तर कपडय़ांमध्ये पारंपरिक सिल्क साडय़ांपासून आत्ताच्या आधुनिक टॉप, कुर्ती यांच्यावरही वेगवेगळ्या पध्दतीची हत्तीची प्रिंट पहायला मिळते. दागिन्यांमध्येही हत्ती आढळून येतो. पण अशाप्रकारे वास्तवातही हत्तीला वाचवण्यासाठी म्हणून या कलाकारांनी केलेला हा प्रयत्न वेगळा आणि स्तुत्य ठरणार आहे. यात केवळ हत्तीच नव्हे तर वाघ आणि नामशेष होत चाललेल्या अन्य वन्यजीवांना वाचवण्यासाठीही काही ठोस उपाय केले जाणार आहेत. या उपक्रमामागचा उद्देश आणि त्याचं वेगळेपणच सध्या फॅशन डिझायनर्सनाही यात सहभागी होण्यासाठी बळ देऊन गेलं आहे. त्यामुळे एरव्ही कपडय़ांवर दिसणारी त्यांची कलाकुसर हत्तीच्या पाठीवरही पहायला मिळणार आहे.