पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची साद घालत यंदा अनेकांनी शाडूच्या मूर्ती घरात आणल्यात. तरुण कार्यकर्त्यांच्या पिढीने विधायक गणेशोत्सवासाठी यापुढचा विचार करीत काही वेगळे संकल्प यंदा केलेत. गणेशमूर्तीमधून माशांना खाद्य आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देणाऱ्या अशाच काही संकल्पांविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गॉड सेव्ह द ओशन’ अशी साद घालत ‘स्प्राऊट्स’ या संस्थेने गणेशमूर्तीमध्ये माशांना खाण्यायोग्य घटकांपासून तयार केलेले लाडू ठेवले आहेत. तर खालच्या छायाचित्रातील ‘टीम रेनसान्स’ – दाता तू गणपती.. हे सांगत दुष्काळग्रस्त बळीराजापर्यंत मदत पोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

‘गॉड सेव्ह द ओशन’ अशी साद घालत ‘टीम स्प्राऊट्स’नं यंदा समुद्रातील माशांचाही विचार करत पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवलीय. पर्यावरणस्नेहासोबतच सामाजिक जबाबदारीचं भान असणारे गणेशभक्त नि गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करतानाच उत्सवासाठीच्या दिल्या जाणाऱ्या किंवा जमा होणाऱ्या देणगीच्या माध्यमातून नसíगक आपत्तीनं ग्रासलेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देता येईल, असं आवाहन ‘रेनसान्स्’ ही सामाजिक संस्था करतेय. उत्सवी वातावरणात आपल्याच कोशात राहून एन्जॉय करण्याच्या पलीकडं जाऊन सामाजिक बांधीलकीचा विचार करणाऱ्या या तरुण सुजाण कार्यकर्त्यांविषयी.
गॉड सेव्ह द ओशन
भक्तांच्या संकटांचं निवारण करणाऱ्या श्रीगणेशाचं विसर्जन झाल्यावर समुद्रकिनाऱ्यांवर प्रदूषणाचं दृश्य गेली अनेक र्वष दिसतंय. ते टाळण्यासाठी पीओपीऐवजी पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीचा आग्रह सुरू झाला. शिवाय मूर्तीची उंची कमी ठेवण्याचं आवाहनही मूर्तिकार नि गणेशभक्तांना करण्यात येतंय. मात्र शाडूची मूर्ती तयार करतानाही रासायनिक रंग वापरल्यानं विसर्जनानंतर जलप्रदूषण होऊन माशांना त्रास होतो. केवळ समस्या मांडून न थांबता ‘स्प्राऊट्स’ या पर्यावरणविषयक संस्थेनं त्यावर उपाय शोधलाय. या संस्थेचे तरुण संस्थापक आनंद पेंढारकर सांगतात की, ‘गेली सहा वर्षे कागदाच्या लगद्याच्या नि शाडूच्या मूर्ती आम्ही करतोय. मूर्तीच्या उंचीविषयीही लोकांची-मंडळांची समजूत काढायचा प्रयत्न आम्ही करतोय. कारण शाडूच्या उंच मूर्तीमुळंही समुद्रात प्रदूषण होऊ शकतं. काळानुसार बदलायला हवं, हा विचार अनेकांना पटूही लागलाय. त्या दृष्टीनं विचार करता ‘गॉड सेव्ह द ओशन’ ही कल्पना पुढं आली. समुद्र नि माशांच्या हिताच्या दृष्टीनं ‘ओएनएम’ संस्थेनं इनपुटस् दिले. यावर जवळपास वर्षभर सखोल विचार, अभ्यास नि संशोधन चालू होतं. या नऊ इंचांच्या मूर्तीचा आतला भाग पोकळ करून त्यात माशांना खाण्यायोग्य घटकांपासून तयार केलेले लाडू ठेवले गेले. या मूर्तीत कमीत कमी शाडूचा वापर केला असून त्याखेरीज मक्याचं पीठ नि पालकाची पावडर वापरलेय. त्यातले हे घटक, रंग, त्यांचं प्रमाण, विसर्जनानंतर त्यांचा पाण्यावर होणारा परिणाम या चाचण्या घेऊन, तज्ज्ञांशी बोलून ठरवण्यात आलंय.’
या संकल्पनेला लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून नागपूर, वाकोल्यातल्या कारागिरांखेरीज संस्थेच्या स्वयंसेवकांनीही त्या घडवायला शिकून, करायला सुरुवात केलेय. ‘मार्गम’ या महिला बचत गटातील स्त्रियांनाही या मूर्ती करायचं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानिमित्तानं त्यांना कलाशिक्षण मिळून रोजगाराचं साधन उपलब्ध झालंय. विद्यार्थी स्वयंसेवकांनाही कलाशिक्षणासोबतच कॉलेजच्या शिक्षणासाठी या रोजगाराचा वापर करता येणारेय. सोशल मीडियावर या मूर्तीची माहिती मिळाल्यावर हजारो पर्यावरणस्नेही भक्तांचा प्रतिसाद मिळालाय. मुंबईत आठ सेंटर्सवर आणि नागपूरलाही या मूर्ती उपलब्ध आहेत.
चौपाटीची स्वच्छता
गणेश विसर्जनानंतर चौपाटी साफसफाईची ‘स्प्राऊट्स’ची मोहीम गेली १२ र्वष चालू आहे. केवळ साफसफाई न करता पर्यावरणविषयक जनजागृती करणं हाही या मोहिमेचा एक महत्त्वाचा उद्देश असतोच. यंदाही २८ सप्टेंबरला ही मोहीम होणार आहे.
शेतकऱ्यांना मदत
‘दाता तू गणपती गजानन’ या ओळी केवळ गणेशभक्तीपुरत्या मर्यादित न राहता, त्या प्रत्यक्षात येऊन गणेशभक्तांनी आणि मुख्यत्वे गणेशोत्सव मंडळांनी या संदर्भात हवालदिल शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी ‘रेनसान्स्’ या सामाजिक संस्थेनं एक पाऊल उचललंय. ‘टीम रेनसान्स’मधले आशीष जोशी सांगतात की, ‘शेतकरी आपलं सर्वस्व पणाला लावून शेती करतो. पावसाची आतुरतेनं वाट बघतो. पण कधी आतासारखा दुष्काळ तर कधी गारपीट होऊन शेतकरी हवालदिल झालेत. समस्याग्रस्त शेतकऱ्याला नुकसानीचा पंचनामा आणि आश्वासनांशिवाय बहुतांशी वेळा काहीच मिळत नाही, ही शोकांतिका आहे. हे लक्षात घेऊन आम्ही शेतकऱ्यांसाठी मदतीचा खारीचा वाटा उचलायचं ठरवलंय. आमच्याकडं मराठवाडा नि विदर्भातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांची यादी आहे. त्यांचे बँक अकाऊंट नंबर आहेत. शेतकरी वाचले तर आपण जगू शकू, एवढं सरळ समीकरण लक्षात घेऊन आम्ही गणेशोत्सव मंडळांना पत्रक देत आहोत. मंडळांकडं जमा झालेल्या देणगीतील काही रक्कम शेतकऱ्यांना द्यायचं आवाहन या पत्रकाद्वारे आम्ही केलंय.’
शेतकऱ्यांची यादी पाहून त्यातील देणगीसाठीचा शेतकरी निवडून देणगीची रक्कम इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फर करता येईल किंवा आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून समन्वयानं देणगीची रक्कम थेट शेतकऱ्याला भेटून देता येईल. गणेशोत्सव मंडळं आणि गणेश भक्तांच्या आíथक सहकार्यामुळं शेतकऱ्यांना नक्कीच बळ मिळेल, असा विश्वास ‘रेनसान्स’च्या कार्यकर्त्यांना वाटतोय.
ही आहेत प्रातिनिधिक उदाहरणं. याखेरीज अनेक तरुण कार्यकत्रे आपापल्या परीनं पर्यावरणासह अनेक क्षेत्रांत काम करत सामाजिक बांधीलकी जपताहेत. या तरुण पिढीला ‘अथर्वशीर्षां’तील ‘त्वमेव केवलं कर्ताऽसि..’ ही ओळ नक्कीच लागू पडतेय. नाही का?
राधिका कुंटे – viva.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesha idol making with sadu
First published on: 18-09-2015 at 01:09 IST