जी. सिंग /  सुचिता तांबवेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली खाण्याच्या बाबतीत आधीपासूनच संपन्न होती. चाट, पराठे (प्राँठे), छोले कुलचे, कबाब हे दिल्लीकरांचं आवडतं खाणं. इथल्या खाऊगल्लय़ांमध्ये या पदार्थाचे असंख्य स्टॉल्स आहेत.

न्याहारी किंवा मग नाश्त्यापासून सुरुवात करायचं झालं तर, जामा मशिदीजवळच ‘हाजी शरबती निहारीवाले’ हे दुकान आहे. सकाळी सकाळी १२ मसाल्यांची ‘निहारी’ खाण्याचा अनुभव तुम्ही कधी घेतला नसेल तर या ठिकाणाला एकदा जरूर भेट द्या. चिंचोळ्या गल्लीतल्या या दुकानासमोर नेहमीच खवय्यांची गर्दी असते. पण, सकाळी इथे विशेष गर्दी असते. ‘हाजी शरबती जैसी निहारी कही और नही मिलेगी.. जनाब’ असं म्हणत इथले खवय्ये मोठय़ा गर्वाने आणि चवीनं निहारीचा घास घेतात.

निहारी हा सकाळच्या न्याहारीच्या वेळी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. मुघल सम्राटांच्या राज्यापासून दिल्लीमध्ये निहारीचं प्रस्थ आहे. जुन्या दिल्लीमध्ये या पदार्थाची लज्जत इतर ठिकाणांपेक्षा जरा जास्त आहे. बकऱ्याचं मटण, बोटी, नळी आणि विविध प्रकारचे खास मसाले घालून मंद आंचेवर शिजवलेल्या या निहारीची चव तुमच्या जिभेवर तरळत राहील अशीच आहे. दिल्लीमध्ये राहणारी लोकसंख्या पाहता उत्तर भारतीयांच्या खाद्यपदार्थाचा राजधानीवर जास्त प्रभाव पाहायला मिळतो. पण, दाक्षिणात्य पदार्थाची चव चाखण्यासाठीही अनेकांचे पाय वळतात. ‘सागररत्न’, ‘सर्वणम भवन’ या ठिकाणी. इथे मिळणारा वडा-सांबार, इडली-वडा, डोसा हे पदार्थही दिल्लीकर चवीनं खात आहेत.

आता वळूया, पराठे आणि पंजाबी खाद्यान्नाकडे. जवळपास सर्व भारतावर पंजाबी खाण्याचा प्रभाव पाहायला मिळतो. कोणत्याही हॉटेलचं मेन्यू कार्ड हातात घेतलं की त्यामध्ये अध्र्याहून अधिक पदार्थ पंजाबीच असतात. पण अस्सल पंजाबी चव दिल्लीत मिळेलच, कारण इथे पंजाबी लोकसंख्या जास्त आहे.

चांदनी चौकमध्ये असणारी पराठेवाली गल्ली आणि दिल्लीचं नातं काही वेगळंच आहे. पालक, पनीर, आलू, गोभी, गाजर, मुली, अंडा, मिक्स व्हेजी आणि अशा विविध प्रकारच्या खमंग पराठय़ांचे वास चांदनी चौकमध्ये फिरताना येत असतात. इथे कुठल्या एका दुकानाचं नाव सुचवणं कठीण आहे, कारण प्रत्येक दुकानदार आपापल्या परीने हे पराठे खवय्यांपुढे सादर करत असतात. तेलात अगदी डुंबवून, खरपूस तळलेल्या या पराठय़ाला इथे ‘प्राँठा’ असं म्हटलं जातं. गरमागरम पराठय़ासोबत कांदा, चटण्या, कद्दू-आलू की सब्जी, दही किंवा मग छोले दिले जातात. हे एवढं सर्व खाल्लय़ावर आणखी काही खाण्यासाठी पोटात जागा उरेल तर नवलच. पराठय़ाशिवाय लस्सीसुद्धा दिल्लीकरांचं आवडतं पेय आहे. चांदनी चौक या गजबजलेल्या ठिकाणी बरीच अशी ठिकाणं आहेत जिथले पदार्थ खाल्याशिवाय तुमची राजधानीतील खाद्यसफर पूर्ण होऊच शकत नाही. या काही ‘मस्ट’ आणि मस्त ठिकाणांपैकी एक आहे, ‘नटराज के  दही भल्ले’. दहिभल्ले म्हणजे दहिवडे.

दिल्लीमधील विशेषत: जुन्या दिल्लीमधील बऱ्याच दुकानांना अनेक वर्षांची एकप्रकारची ऐतिहासिक परंपराच लाभली आहे. गेली कित्येक वर्षे या दुकानदारांच्या पिढय़ानपिढय़ा खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत आहेत. आपल्या दुकानाचा इतिहास जागवताना, दुकान मालकाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान पाहण्यासारखा असतो. चमचमीत, चटपटीत खाण्यात दिल्लीकरांचा हात कोणी धरणार नाही. दिल्लीला गेलात तर मग बिल्ले दी हट्टीकडचे छोले भटुरे खाल्लेच पाहिजेत. चांदनी चौकच्या तौबा गर्दीतून वाट काढत बाहेर आल्यावर पुढे जाण्याआधी चांदनी चौकमधल्या गुरुद्वारामध्ये डोकावायला हरकत नाही. या गुरुद्वारातील लंगरमध्येही अप्रतिम भोजन मिळतं.

जुन्या दिल्लीच्या सफरीनंतर नव्या दिल्लीची झगमग बघायला हवीच. प्राँठे, छोले कुलचे झाल्यानंतर चाखायची राहिलेली दिल्लीची आणखी एक खासियत म्हणजे कबाब. म्हणूनच इथले खवय्ये पसंती देतात, ‘खान चाचा कबाब सेंटर’ला. चिकन टिक्का रोल, मटण टिक्का रोल, व्हेज पनीर टिक्का, व्हेज हरियाली टिक्का, व्हेज आलू कबाब आणि बरीच लांबलचक यादी असणाऱ्या खान चाचांच्या कबाब सेंटरमध्ये गप्पांपेक्षा पदार्थ मागवण्यासाठीचेच आवाज जास्त येतात. अनेकांनी सांगितल्याप्रमाणे इथे मिळणारा चिकन टिक्का रोल लाजवाब आहे. चिकन टिक्का रोल.. नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना? रुमाली रोटी, त्यात चिकन टिक्का आणि कांदा आणि काही चटण्या यांचा रोल करून ही देसी फ्रँकी आपल्या हातात येते. त्यांनतर गप्पांचे विषयच संपतात.

‘कनॉट प्लेस’ म्हणजे समुद्र नसलेलं मरीन ड्राइव्ह. इथे वीकेंडला अनेक दिल्लीकर एंजॉय करताना दिसतात. ‘राजधानी’मध्ये विविध थाळ्यांचे प्रकार आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तयार असतात. जवळपास एका थाळीत १२ ते १५ प्रकारच्या पदार्थाच्या वाटय़ा असतात. ज्या संपता संपत नाही. इथलंच आणखी एक रेस्टॉरन्ट म्हणजे ‘देसी वाइब्स’. पारंपरिक वातावरणात इथे आपल्यासमोर काही नवीन खाद्यपदार्थ ठेवले जातात. मुख्य म्हणजे देसी वाइब्समध्ये सूप्सऐवजी शोरबा दिला जातो. तर इथल्या चविष्ट स्टार्टर्सपैकी एक म्हणजे दही के कबाब. ‘देसी वाइब्स’ हे नाव या हॉटेलला सार्थ ठरतं कारण, इथल्या प्रत्येक गोष्टीत देसी बाज जपण्यात आला आहे. मोमोज, चिले, चाउमिन, विविध प्रकारचे रोल्स हे दिल्लीच्या तरुणाईचे आवडीचे पदार्थ.

खाद्यपदार्थाच्या या गर्दीत दिल्लीमध्ये काही पदार्थानी स्वत:ची अशी एक वेगळी ओळख ठेवली आहे. अशा काही पदार्थापैकी एक म्हणजे राम लड्डू. मूगडाळीचे हे चविष्ट लाडू तळले जातात. बाहेरून खुसखुशीत पण आतून मऊ असलेल्या या लाडवावर हिरवी चटणी आणि किसलेला मुळा घातला जातो. हे आगळे लाडू खायला दिल्लीत जायलाच हवं.

दिल्लीचा चेहरा झपाटय़ाने बदलतोय. जागतिकीकरणाला अनुसरून इथे अनेक पाश्चिमात्य ब्रँड्सही येतायत. पण या सगळ्यातही इथली देसी खाऊगल्ली आपलं अस्तित्व टिकवून आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haji shabrati nihari wale delhi
First published on: 19-05-2017 at 03:01 IST