खादी म्हटलं की त्याग हाच शब्द डोळ्यासमोर येतो, ब्रिटिशांविरुद्धच्या लढय़ात शस्त्र म्हणून वापरली गेलेली खादी.. सर्वसाधारण फॅशनच्या परिघाबाहेरच राहिली होती. राजकारणी मंडळी किंवा अधिकारपदावर असणाऱ्या मोजक्याच व्यक्ती सोडल्या तर खादीची दखल फॅशन विश्वात हवी तशी घेतली गेली नाही. मात्र, परीकथांमधली सुताची गुंडी गडगडत पुढे पुढे जाते तसेच हे धागेही काळाबरोबर संपले नाहीत. ते पुढेच जात राहिले आज ते धागे पुन्हा विणले गेले आहेत आणि कधीकाळी केवळ गांधीजींच्या गोष्टीपुरती लक्षात राहिलेली ‘खादी’ आज फॅ शनविश्वात ब्रॅण्ड म्हणून डेरेदाखल झाली आहे.
खादीचे कपडे डोळ्यासमोर आले की तेच डल रंग, तेच एकाप्रकारचं टेक्श्चर आणि तेच पॅटर्न सातत्याने आपल्यासमोर येत राहिले आहेत, त्यामुळेच की काय या कापडाविषयी एकाचवेळी कुतूहल आणि अनास्था हातात हात घालून वावरत आली आहे. खादीचं काही तरी घायचं म्हटलं तरी कुर्ता, शर्ट कधी तरी बॅग याशिवाय अजून काही विकत घायचा विचारही येत नाही. पण तुम्हाला खादीसुद्धा बाकीच्या कपडय़ांप्रमाणे नवीन रूपात, नवीन ढंगात बघायला मिळाली तर? मग तर तुम्ही नक्कीच त्यापासून बनवलेले प्रॉडक्ट्स विकत घ्याल. बाजाराचा हाच व्यवहारी विचार आज ‘रेमंड’सारख्या कपडय़ाच्या मोठय़ा ब्रॅण्डने केला आणि या खादीला पूर्ण नवीन रूपात त्यांनी लोकांसमोर आणलं.
खादी हातमागावर विणली जाते. त्यामुळे त्याची किंमत नेहमीच जास्त असते. त्यात आता गेल्या काही वर्षांपासून खादी भांडाराचीही अवस्था काही चांगली नाही. तिकडे कामगार नाहीत, खादी भांडारमध्ये काही थोडकेच प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. अशा परस्थितीतही खादी दुसऱ्या कापडासारखीच वापरली जावी म्हणून सरकारने ‘मेक इन इंडिया’अंतर्गत अनेक उपक्रम सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून अनेक ठिकाणी खादीविषयी माहिती देणारे कार्यक्रम तर कुठे प्रश्नमंजूषा आणि खादीशी संबंधित खेळी आयोजित करण्यात आले होते. या सगळ्याला जोड म्हणून अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि फॅ शन ब्रॅण्ड्सनीही खादीची नवनवीन कलेक्शन बाजारात आणायला सुरुवात केली.
‘रेमंड’ या सुप्रसिद्ध फॅशन ब्रॅण्डने ‘रेमंड द कम्प्लीट मॅन’ या अंतर्गत खादीचं नवीन कलेक्शन आणि सोबतच त्याविषयीच्या मोठमोठय़ा जाहिराती एप्रिल महिन्यापासूनच सुरू केल्या. गुलजारांच्या ‘फिर से कातें एक कहानी खादी की’ या कवितेच्या ओळी घेऊन एक जाहिरात ‘रेमंड’ने सुरू केली आणि त्यासोबत वापरला गेलेला #३ँी२३१८१ी२स्र्४ल्ल हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. आणि या सोशल मीडियावरील प्रमोशन्समुळे पुन्हा एकदा लोकांचं लक्ष खादीकडे वळलं. या रेमंड खादी कलेक्शनमध्ये ‘आज के वक्त में आज का अंदाज है खादी’ या वाक्याला अनुरूप असे पॅटर्न दिसत आहेत. या कलेक्शनमध्ये तुम्हाला मेन्स डिझायनर शर्ट, कुर्ते, शेरवानी, क्लासिक जॅकेट्स, प्रिंटेड शर्ट, स्कार्फ, बंदगला जॅकेट्स, फिट बंडी असं सगळचं बघायला मिळेल.
नेहमीप्रमाणे दिसणाऱ्या रंगांसोबत अगदी गडद, ब्राइट लाल, काळा, निळा, ग्रे असे रंगही उपलब्ध आहेत. प्लेन ते चेक्स अशा प्रिंट्सही कलेक्शनमध्ये आहेत. काही ब्लेझरवरती तर छोटय़ा छोटय़ा चरख्याचा प्रिंट्सही आहेत. रेमंड प्रमाणे ‘उर्वशी कौर’ या लेबल अंतर्गत ‘प्रहारा’ नावाचं मेन्स आणि वुमेन्स कलेक्शन नुकतंच बाजारत आलं आहे. यातही बऱ्याच ड्रेसमध्ये खादीचा वापर केला गेला आहे. यामध्ये तुम्हला एकदम फॅ शनेबल असे खादीचे बॉक्सी शर्ट, पॅट आणि लॉग जॅकेट् असा मुलांसाठी लुक तर मुलींसाठी इंडोवेस्टर्न वनपीस, शर्ट ड्रेस, खादी पलाझो, खादी ब्लाऊज असे अनेक प्रकार उपलब्ध केले आहेत. हे सगळे कलेक्शन बनवताना त्यासोबत हॅन्ड प्रिंट टेक्निकचा, क्राफ्ट्सचाही वापर केला गेला आहे.
‘कलरसोवीव’ हा वुमन क्लोथिंग ब्रॅण्ड अनेक र्वष खादीचं कलेक्शन बजरात आणतो आहे. ‘ईरा – द खादी’ या त्यांच्या कलेक्शनमध्ये खूप सुंदर फ्रेश रंगाच्या साडय़ा तुम्हाला बघायला मिळतील. त्या साडीवरती नाजूक एम्ब्रॉयडरी आणि त्याचे ट्रॅडिशनल मोटीवज् चार चांद लावतात. सध्या अशा अनेक छोटय़ा मोठय़ा लेबल्स, ब्रॅण्डंसबरोबर अनेक मोठे फॅशन डिझायनरही या ‘खादी कॅम्पेनिंग’मध्ये सहभागी झाले आहेत. शंतनू आणि निखिल या फॅशन डिझायनरनेही त्यांच्या नवीन कलेक्शनसह ‘खादी कॅम्पेनिंग’मध्ये सहभाग दाखवला आहे. त्यांच्या या कलेक्शनमुळे आणि त्याचा उत्तम जाहिरातीमुळे सगळ्यांचंच लक्ष खादीकडे वळलं आहे. खादीला कधीही न बघितलेल्या रूपात शंतनू निखिल यांनी बाजारात आणलं आहे. खादी प्रिंटेड अनारकली, साडी, पॅन्ट, शर्ट, वनपीस असं सगळंच तुम्हाला त्यांच्या कलेक्शनमध्ये बघायला मिळेल. या कलेक्शनकडे बघताना तुम्हाला वाटणारही नाही की हे खादीचं कलेक्शन आहे. शंतनू निखिल प्रमाणेच या वर्षी सर्वाधिक गाजलेला फॅशन डिझायनर म्हणजे सब्यासाची. सब्यासाची म्हटलं की वेडिंग कलेक्शन आलंच. त्याने वेडिंग कलेक्शनमध्येही खादीचा वापर केला आहे. समर डेस्टीनेशन वेडिंगसाठी त्याने नुकतंच खास खादी कलेक्शन बाजारात आणलं आहे. त्या कलेक्शनमध्ये साडी-अनारकली आणि घागरा-चोळी आहेत. खादी हे उन्हाळ्यात वापरण्यासाठी बेस्ट कापड आहे. त्यामुळे एलिगंट लुकबरोबरच उन्हामध्येही तुम्हाला कम्फर्ट नक्कीच जाणवेल.
एक प्रकारे मोठय़ा डिझायनर, ब्रॅण्डकडून खादीला नवीन रूपात आणलं गेलं असल्यामुळे आपसूकच खादीकडे ग्राहक वळू लागतील. आणि त्यामुळे खादी विणणाऱ्या कामगारांनाही फायदा होईल. सोबतच खादी हे एक इकोफ्रेडली, सस्टेनेबल कापड आहे त्यामुळे याच्या वापराचा पर्यावरणावरही काहीही वाईट परिणाम होणार नाही. या सगळ्या गोष्टी खादीने पुन्हा बाजारात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाऊल टाकलं आहे हे फॅशनप्रेमींच्याही नक्कीच लक्षात येईल आणि गुलजारांच्या म्हणण्याप्रमाणे ‘खादी’ची कातलेली ही नवीन कहाणी रंगायला वेळ लागणार नाही..
viva@expressindia.com