कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मित्र-मैत्रिणींचा घोळका दंगामस्ती करत असतो. अचानक तिथून प्रोफेसर येतात आणि मुलांना हटकतात. मुलामुलांनी एकत्र बसा, मुलींनी मुलांपासून लांब बसा अशी तंबी देतात. हे असले धंदे करायला महाविद्यालयात यायचं नाही असंही बजावतात. तरुण मुला-मुलींचा तो घोळका गोंधळून जातो. त्यांना आपण काय चूक केलीय हे कळायला मार्गच नसतो.

प्रसंग दुसरा : संध्याकाळची वेळ. शिवाजी पार्कसारखा गजबजलेला परिसर, एक प्रेमी युगुल बाकावर एकमेकांच्या खांद्यावर हात ठेऊन बसलेले असतात. अचानक तिथे पोलीस येतात आणि त्या प्रेमी युगुलाला नीट बसायला सांगतात. असे चाळे केले पोलीस स्थानकात घेऊन जाण्याची धमकीही देतात. आजुबाजूला बसणाऱ्यांना त्यांचा त्रास होतो आहे असं त्या पोलिसांचं म्हणणं असतं. पण खांद्यावर हात टाकला तर दुसऱ्यांना कसा त्रास होईल हे काही त्या जोडप्याला उमगत नाही.

या दोन्ही प्रसंगांमध्ये कायद्यानुसार या तरुणांनी कुठला गुन्हा केलेला नाही. पण त्यांचं वागणं भारतीय संस्कृतीनुसार ठरलेल्या सामाजिक नियमांचं उल्लंघन करणारं होतं. त्यामुळे अनेकांना ते चुकीचं वाटू शकतं. बसमध्ये कोपऱ्यातील जागेवर, सिनेमागृहात, पार्कमध्ये, ट्रेनमध्ये प्रेमी युगुलांचे ‘पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन’ या व्याख्येत बसणारं वागणं आणि त्याला विरोध करणारे विरोधक असे अनेक प्रसंग आपण पाहतो. त्यावर उपाय म्हणून प्रेमी युगुलांसाठी ‘लव्हर्स पार्क’ असले पाहिजेत, अशी टूम काही वर्षांपूर्वी निघाली होती. जसे नाना-नानी पार्क असतात त्या धर्तीवर खास राजा-राणी पार्क का असू नयेत, असे अनेक विचार तरुणांनी मांडले. या अशा पार्कस्ची गरजच का असावी किंवा असू नये, असे अनेक मुद्देही तेव्हा चर्चिले गेले.

आता व्हॅलेंटाइन्स डेच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा या लव्हर्स पार्कवर तरुणाईमध्ये चर्चा झडते आहे. अशा पार्कस्ची गरज आहेच या मुद्दय़ाला दुजोरा देत २८ वर्षीय उद्योजिका अर्चना सोंडे म्हणते, ‘अनेकदा प्रेमी युगुलं एकांत मिळावा म्हणून  निर्जनस्थळी जातात, पण अशा वेळी त्यांना भिकारी, गर्दुल्ले अथवा गुंडांचा त्रास सहन करावा लागतो. विशेषत: सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो. राजा-राणी पार्कसारखी संकल्पना पुढे आली तर त्यांना आपलं प्रेम व्यक्त करण्याची  हक्काची जागा मिळेल. तसंच काही वेळा लहान मुलांवर वाईट संस्कार होतील अशी भीती काही जणांना, आजी-आजोबांना वाटते ती वाटणार नाही.’’ २९ वर्षीय शिक्षक असणारा अमित मिश्रा म्हणतो,  ‘इथेच खरी गोम आहे,’  त्याच्या मते असे वेगळे पार्क तयार करण्यापेक्षा सामाजिक दृिष्टकोन बदलणं केव्हाही उपयोगी ठरेल. मुलांना लहानपणापासून निकोप मैत्रीचा, प्रेमाचा अर्थ समजावून सांगणं ही खऱ्या अर्थाने गरज असल्याचं म्हणणं अमितनं मांडलंय. त्याच्या मते असे पार्क  निर्माण करण्यात आले तर ते कसे असावेत. त्यातही सुरक्षिततेच्या कोणत्या योजना आहेत याबाबतचा सांगोपांग विचार होणंही गरजेचं आहे. याबाबत २८ वर्षीय क्रिमिनल लॉयर आशुतोष म्हणतो की, ‘एकमेकांविषयी असणारं प्रेम व्यक्त करणं यात काहीही चुकीचं नाही. पॅरिसमध्ये कुणी व्यक्ती प्रेमी युगुलांना चुंबन घेताना बघून अजिबात काही व्यक्त होणार नाही. इंग्लंडमधली व्यक्ती रस्त्यावर घाण टाकणाऱ्याला हटकेल. पण भारतातील व्यक्ती मॉरल पोलिसिंग करेल आणि रस्त्यावर घाणही टाकेल. इथे फरक मूल्यांचा आणि आपण कसा विचार करतो याचा आहे.’

कायद्याच्या मते..

भारतीय कलम २९४ नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तणूक करणं, असभ्य खाणाखुणा करताना, शब्द, गाणी म्हणताना कोणी आढळल्यास तो गुन्हा ठरतो.

प्रत्यक्ष स्थिती..

या कायद्याचा धाक दाखवून अनेकदा पोलीस, पोलिस असल्याची बतावणी करणारे, संस्कृतीरक्षक प्रेमी युगुलांना त्रास देतात. काही वेळा तरुण-तरुणींना मारहाण केली जाते, काही वेळा तरुणीवर बळजबरीही केली जाते. अश्लील व्हिडीओ काढून धमकावलं जातं.

इतर देशांमधील स्थिती

युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड , कॅनडा, अमेरिका अशा ठिकाणी पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शनला कायद्याने व संस्कृतीतही विरोध केला जात नाही. मात्र भारत, इंडोनेशिया, जपान या देशांमध्ये पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शनला कायद्याने व संस्कृतीतूनही पूर्ण विरोध आहे.

viva@expressindia.com