नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजची प्लेलिस्ट शेवटची! खरं सांगतो.. पूर्ण वर्षभर इमानेइतबारे दर आठवडय़ाला मी काहीही लिहू शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण ‘लोकसत्ता व्हिवा’ने माझ्यावर विश्वास टाकून हे काम मला दिलं आणि आवडीचा विषय असल्यानेच हे शक्य झालं. ‘व्हिवा’च्या अरुंधतीने जेव्हा या स्तंभासाठी मला विचारलं, तेव्हा ही संकल्पना मला मजेशीर वाटलीच; पण त्याचबरोबर भीतीही वाटत होती. मला (पक्कं) ओळखणाऱ्या लोकांनी विचारलंसुद्धा, वर्षभर न चुकता जमेल ना रे? पण म्हटलं, बघू करून.. लिहीत गेलो तसं अजून अजून मजा येत गेली. या स्तंभाच्या निमित्ताने माझ्या लहानपणापासूनच्या किती तरी कॅसेट्स परत वाजल्या गेल्या, माझ्या विस्मृतीत गेलेली किती तरी गाणी धूळ झटकल्यासारखी पुन्हा आठवू लागली आणि नव्याने पुन्हा आवडू लागली. लहानपणी आवडणाऱ्या, कानावर पडणाऱ्या संगीतावर नव्याने विचार झाला. त्याचे नवे अर्थ, त्यातली नवी मजा कळू लागली. किंबहुना एखादं गाणं, एखादा कलाकार, एखादा राग मला तेव्हा नक्की का आवडायचा हे लिहिता लिहिता उमजत गेलं.
केवळ जुन्याच नाही, तर या निमित्ताने माझ्या खूप नवनवीन गोष्टी ऐकणंसुद्धा झालं. या वर्षांत माझं ऐकणं अनेक पटींनी वाढलं; लिहिण्यासाठी म्हणून अनेक गोष्टींचा थोडा थोडा अभ्यास झाला. अनेक गोष्टींशी तोंडओळख झाली. खूप वेळा प्ले लिस्ट्समध्ये विविधता असावी म्हणून मी कधीही न ऐकलेलं संगीतप्रकार ऐकले गेले आणि ते आज मला आवडू लागले आहेत. आपण एक व्हर्सटाइल, अष्टपैलू श्रोता असावं असा मी नेहमीच प्रयत्न करत आलोय आणि या लेखमालिकेच्या निमित्ताने या प्रयत्नांना अजूनच बळकटी आली खरी; पण प्रत्येक लेखाच्या शेवटी, आपण काहीच ऐकलेलं नाही, अजून किती तरी गोष्टी अशा आहेत, असं संगीत आहे ज्याच्याविषयी आपण ऐकलंसुद्धा नाहीय याचीच जाणीव होत गेली.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याशी गप्पा झाल्या. पत्रव्यवहाराद्वारे, ई-मेल आणि फोन करूनदेखील तुम्ही मनापासून कौतुक केलं, प्रोत्साहन दिलं, आशीर्वाद दिलात, सल्ले दिलेत. लिहिताना अजाणतेपणे, अनवधानाने अनेक चुकासुद्धा झाल्या; पण तुम्ही त्या मोठय़ा मनाने पाठीशी घातल्यात. तुमच्याशी संवाद झाला आणि संवादातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणता म्हणता वर्ष संपलासुद्धा आणि आता आज शेवटची.
पहिली प्ले लिस्ट होती २०१४ मधल्या आवडत्या हिंदी गाण्यांची. शेवट करतो २०१५ मधल्या आवडत्या गाण्यांनी. तुलना करता एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते की, दिवसेंदिवस बॉलीवूड म्युझिक हे जास्तीत जास्त एकसुरी होत चाललं आहे. नृत्यगीतं आणि त्याच त्याच चालीची प्रेमगीतं या दोनच प्रकारांमध्ये आज गाणी येतायत. वर्ष-दोन वर्षांनंतर आवडणार नाहीत, किंबहुना ऐकूही येणार नाहीत अशा ‘चायनीज’ गाण्यांचाच भरणा या वर्षी दिसतोय. म्हणजे हा प्रकार गेली तीन-चार र्वष खूप वाढलाय, पण या वर्षी जरा जास्तच झालाय. भरीस भर म्हणजे जुनी हिट गाणी नव्या वेष्टनात आणण्याचा सुरू झालेला प्रकार म्हणजे २०१५ मध्ये तेरावा महिना! असो.. त्यातही मरुद्यानासारखी काही लक्षवेधी गाणी म्हणजे – आपल्या अजय अतुल यांचं ‘सोनू इज बॅक’ असं म्हणायला लावणारं ‘सपना जहां’ ज्यात नीती मोहनचासुद्धा फारच मोहक सहभाग आहे. सोनू निगमचं नुकतंच आलेलं, त्याच्याच ‘दिवाना’ वगैरे अल्बम्सची आठवण करून देणारं ‘आ भी जा तू कहीं से’, ‘बदलापूर’मधलं सचिन-जिगर या नव्या दमाच्या जोडीचं आतिफने गायलेलं ‘जीना जीना’ आणि ‘जी करदा’ – दिव्य कुमारने गायलेलं. यांचेच ABCD 2 मधलं ‘सून साथिया’, पंजाबी गाण्यांमध्ये नावीन्य (?) आणायचा चांगला प्रयत्न झालेलं ‘सिंग इज ब्लिंग’मधलं ‘टुन्ग टुन्ग बाजे’ आणि ‘शानदार’मधलं ‘गुलाबो’.
बाकी मराठीत मात्र स्फूर्तिदायक चित्र आहे. ‘कटय़ार..’च्या जुन्या आणि नव्याने बनलेल्या सर्वच गाण्यांवर होणारा कौतुकाचा वर्षांव पाहून मराठी सूर अजूनही निरागस आहे, असं अभिमानाने म्हणावंसं वाटतं. हा सूर उत्तरोत्तर अधिकाधिक निरागस होत चाललाय असं स्वप्न बघत आपली रजा घेतो.


हे ऐकाच.. वर्षभरातला भारी अल्बम

मागे एकदा म्हणालो होतो की, फिल्म चालली नाही तर गाणीही चालवायची नाहीत ही आपली वाईट सवय आहे. या सवयीमुळे कानाडोळा झालेला, माझ्या मते निर्विवादरीत्या वर्षांतील सर्वात भारी अल्बम म्हणजे अमित त्रिवेदीचा ‘बॉम्बे वेलवेट’. जॅझ प्रकारातली यातली सगळीच गाणी केवळ अप्रतिम आहेत. प्रत्येक कडव्याला एक एक सूर वरती चढणारं ‘धोबी का कुत्ता’ शेफाली अलवारीसने फार म्हणजे फार भारी गायलं आहे. नीती मोहनचं ‘धडाम धडम’ हे वेगळ्याच पद्धतीने दु:ख मांडलेलं गाणं, तिने कमाल गायलेलं आहे. या दोन्ही गायिकांनी या पूर्ण अल्बममध्ये कहर केला आहे. पॅपोनने गायलेलं ‘दरबान’सुद्धा तितकंच मस्त. अल्बममधलं एक एक गाणं परत परत ऐकावं असं आहे. प्रत्येक गाणं न चुकता ऐकावं असा अल्बम खूप दिवसांनी आलाय. अजून किती कौतुक करू? या वर्षी कुठल्याही अवॉर्ड फंक्शनमध्ये याला एक दरी अवॉर्ड मिळालं, तर मी आपलं नाव बदलेन; एवढा भारी! नक्की ऐका.

viva.loksatta@gmail.com

 

More Stories onविवाViva
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music and songs that you must hear before you die
First published on: 25-12-2015 at 01:20 IST