जरा जपून..

‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या अलीकडच्या आकडेवारीनुसार २००८ नंतर भारतात मद्यपानाचं प्रमाण वाढलं आहे.

नववर्षांच्या स्वागताचा जल्लोष हा नाताळपासूनच सुरू झालेला असतो. संस्कृतीच्या कक्षा विस्तारत प्रत्येक सणाला आपलंसं करणाऱ्या तरुण पिढीची सेलिब्रिशनची समीकरणंही बदलत आहेत. लहानपणीच्या रसना आणि वेफरच्या पार्टीचं स्वरूप बदललंय. त्याची जागा आता व्होडका, वाइन, व्हिस्की, रम, कॉकटेल अशा नाना मद्यप्रकारांनी घेतली आहे. मद्यप्राशन हे बरे की वाईट याबाबत प्रत्येकाची वैयक्तिक मतमतांतरे असू शकतात, मात्र सध्या कुठलेही बंधन न मानणारी पिढी मद्यपान करणार नाहीच, असे मानणे चुकीचे ठरेल. त्यामुळे सेलिब्रेशनच्या नादात मद्यपान करताना, बाहेर वावरताना थोडी काळजी घेतली तर नववर्ष स्वागताच्या तुमच्या आनंदावर विरजण पडणार नाही. त्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयी तुमच्यासाठी टिप्स..

‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या अलीकडच्या आकडेवारीनुसार २००८ नंतर भारतात मद्यपानाचं प्रमाण वाढलं आहे. त्यात १५ वर्षांवरील महिलांच्या मद्यसेवनाचं प्रमाण १० टक्के आहे. त्याच वेळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. महिलांनी या काळात आपली सुरक्षितता जपणं गरजेचं आहे. शक्यतो पार्टीत मद्यपान करूच नका. पण केलेच तर कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी स्वत:च्या वैयक्तिक सुरक्षिततेबाबत खबरदारी घेणं गरजेचं आहे.

  • ३१ डिसेंबरला मित्रमैत्रिणींसोबत मद्यपान करण्यासाठी जाणार असाल तर तुमच्या त्या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन करा. जाण्याचं ठिकाण, त्या ठिकाणाची सुरक्षितता, त्याचं घरापासूनचं अंतर, जाण्याची-येण्याची वेळ, संपूर्ण कार्यक्रमाचा कालावधी, जाताना आणि विशेषत: येताना प्रवासाचे माध्यम काय असेल, याचे योग्य रीतीने पूर्वनियोजन करा. ज्यांच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल आणि सुरक्षित आहात अशाच मित्रमैत्रिणींसोबत कार्यक्रमाला जा. अनोळखी व्यक्तींसोबत जाणे पूर्णपणे टाळा.
  • आपल्या घरच्यांना या कार्यक्रमाची कल्पना द्या. मित्रमैत्रिणींचा संपर्क क्रमांक, रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर किंवा खासगी वाहनाने प्रवास करत असल्यास वाहनाचा क्रमांक, चालकाचा क्रमांक कुटुंबीयांना, मित्रमैत्रिणींना द्या. पार्टीमध्ये मद्यपान करत धम्माल करताना, नृत्य करताना अथवा खेळ खेळताना मित्रमैत्रिणींसोबत राहा. पार्टी संपल्यावर शक्यतो एकत्रच निघा, तसे शक्य नसल्यास सतत मित्रमैत्रिणींच्या आणि घरच्यांच्या संपर्कात राहा. मोबाइल पूर्णपणे चार्ज असेल याची काळजी घ्या.
  • पब किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर मद्य भरण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या. ज्या प्रमाणात तुम्ही मद्याची मागणी केली आहे त्याच प्रमाणात ते भरून दिले जात आहे याची खात्री करून घ्या. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने दिलेले पेय पिऊ नका. कोणालाही आग्रह करू नका अथवा कोणाच्याही आग्रहाला बळी पडू नका. स्त्री आणि पुरुषांसाठी प्रत्येक आठवडय़ासाठी १४ मद्याचे ग्लास इतकी मर्यादा आरोग्यतज्ज्ञांनी निश्चित केली आहे. त्यानुसार आपल्या क्षमतेप्रमाणेच मद्यपान करा.
  • मद्यासह अमली पदार्थाचे सेवन करणे हा गुन्हा आहे. त्याबाबत तुम्हाला कायद्याने शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर अशा प्रकारांमुळे तुमच्या जिवाला धोका पोहचू शकतो. त्याचबरोबर मद्याचे अतिसेवन करून वाहन चालवणे हा देखील गुन्हा आहे. अशा वेळी ज्या सहकाऱ्यांना गाडी चालवण्यास येते त्यांना चालवायला द्या अथवा ओला, उबेरचा पर्याय स्वीकारा आणि वर नमूद केल्याप्रमाणे योग्य ती काळजी घ्या.
  • जोडप्यांनी मित्रमैत्रिणींसोबतच जाण्याचा पर्याय निवडा, एकटे जाणे टाळा.

मद्याचे अतिसेवन झाल्यास काय काळजी घ्याल?

तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणी मद्याचे अतिसेवन केल्यास त्या व्यक्तीची काळजी घेणे गरजेचे आहे. अशा वेळेस त्याला किंवा तिला एकटे सोडून कुठेही जाऊ नका. ती व्यक्ती बेशुद्ध पडल्यास त्याला सुस्थितीत ठेवा. त्याचा श्वासोच्छ्वास व्यवस्थित आहे का याकडे लक्ष द्या. ती व्यक्ती उलटय़ा करत असल्यास त्याचे तोंड, श्वासनलिकेत अन्न अडकणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी त्याला व्यवस्थित बसवा. त्या व्यक्तीचा श्वास गुदमरत असल्यास तातडीने रुग्णवाहिका बोलावून वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घ्या.

मद्यपान करताना जबाबदारीचे भान प्रत्येकाने बाळगणे गरजेचे आहे. अनेकदा नववर्ष पाटर्य़ामध्ये उत्साहाला उधाण आलेले असते. अशा वेळी महिलांनी आपली सुरक्षितता जपणं गरजेचं आहे. आजकाल तरुणी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि विवाहित असल्यास पतीसोबत या विषयावर संवाद साधतात. आई-वडिलांसोबत याबाबत संवाद साधण्याचे प्रमाण फारच कमी आहे.’

डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचारतज्ज्ञ, मानसोपचार विभागप्रमुख,

केईएम रुग्णालय

बऱ्याचदा महिलांच्या पेयात नशायुक्त पदार्थ मिसळले जातात. यामुळे विनयभंग आणि लैंगिक अत्याचार असे गंभीर गुन्हे घडतात. महिलांनी याबाबत दक्षता घेणं गरजेचं आहे. पेयाचा ग्लास इतरत्र न ठेवणं, एकंदरीत सावधानता बाळगणं गरजेचं आहे. आपत्तीच्या काळात पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. पोलीसही सेलिब्रेशन पार्टी, पब व गर्दीच्या ठिकाणी गस्तीवर असतात.

रुपाली आंभुरे, पोलीस उपायुक्त

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New year celebration year end celebration

ताज्या बातम्या