trendingसरत्या वर्षांच्या आठवणींसोबत आपण नवीन वर्षांत अजून काही घेऊन जात असू तर ते म्हणजे संकल्प! मागच्या वर्षी ज्याची उणीव भासली, जे करायचं राहून गेलं किंवा नवीन गोष्ट जिच्याकडे आपण आकर्षित झालो ते आपण करायला हवं असं जिथे वाटायला सुरुवात होते तिथे सुरू होतो काही तरी करण्याचा संकल्प..! त्यातले काही संकल्प पूर्ण होतात तर काही तसेच हवेत विरून जातात.
नव्या वर्षांच्या पहिल्या आठवडय़ात फेसबुकवर या संकल्पांविषयी बरंचसं बोललं गेलं आणि ट्विटरवर #Resolution2016 च्या माध्यमातून लोकांनी आपले संकल्प शेअर केले. इन्स्टाग्रामवरसुद्धा त्या आशयाचे फोटो कॅप्शनसह झळकताना दिसले. जिमला जाणे, नियमित डायरी लिहिणे, बचत करणे, घरी जास्त वेळ देणे, धूम्रपान न करण्याचा, जास्तीत जास्त ठिकाणी भटकंती करणे, पुस्तकं वाचणे, काही नवीन गोष्टी शिकणे.. हे आणि असे अनेक संकल्प लोकांनी करण्याचं ठरवलं.
ज्यांनी काहीच संकल्प केला नाही, पण काही तरी संकल्प करायची इच्छा आहे अशांसाठी एक व्हिडीयो फिरत होता.  तुम्ही ज्या क्षणी तो व्हिडीयो पॉज करणार त्या वेळी ज्या संकल्पांचं चित्र समोर असणार ते असणार तुमचा यंदाचा संकल्प..! या खेळाच्या गमतीत कोण जाणे खरोखर एखाद्याला साजेसा संकल्प गवसला असेल.
मागील वर्षी केलेले संकल्प पूर्ण न झाल्यामुळे ‘हमसे ना हो पायेगा’ म्हणत काही जणांनी तर संकल्प न करण्याचाच संकल्प केला. संकल्प हे मोडण्यासाठीच असतात असं म्हणून संकल्पाची सुरुवात केलीये. तर काही जणांनी जिद्दीने ‘रिन्यू रिझोल्यूशन’चा मार्ग अवलंबला. यंदा तरी ते पूर्ण होतील या आशेवर..!

अशाच काही संकल्पाविषयी :
सानिका कुलकर्णी : ‘सामाजिक आणि राजकीय विषयांवर भरपूर वाचन करायचंय जेणेकरून मला माझ्या पत्रकारितेच्या कामात उपयोग करून घेता येईल.. fear & favour च्या पलीकडे जाऊन पत्रकारिता करायची आहे हा संकल्प मी यंदा केलाय.
चार्मी छेडा : येत्या वर्षांत मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचंय. त्यामुळे आळस झटकून आणि सोशल मीडियावर अपलोड, अपडेट, टॅग करण्यात वेळ वाया घालवायचा नाहीये. त्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे.
सौरभ चव्हाण : अभ्यासामुळे मला इतर गोष्टींकडे जास्त वेळ देता आला नाही. आता या वर्षी फोटोग्राफी, गाणं या गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्यासाठी दिवसातला एक तास तरी वेळ द्यायचाच असा संकल्प मी केलाय.