या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रस्तावना द्यायला ही काही कादंबरी नाही. साधी गोष्ट. इसापनीती, पंचतंत्र, बोधिसत्त्व यांसारखीच. थेट वाचा तुम्ही.  

तब्बल १४३ वर्षांचा इतिहास असलेले मुंबईतील भायखळा परिसरातील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान अर्थात राणीची बाग. १८०० स्क्वेअर फूट व्यापलेला खास क्लायमेट कंट्रोल्ड कक्ष. सदैव एसीची गार झुळूक. वेळ उत्तररात्रीची. सातपैकी पाच पेंग्विन निद्रादेवीच्या अधीन झालेले. उरलेल्या दोघांमध्ये कुजबुज सुरू आहे.

अ‍ॅडम : अरे, झोपतोस कसला, आपल्याला जायचंय!

स्टीव्ह : मुंबई कधी झोपत नाही असं सांगण्यात आलंय मला. पण असली वचनं आपण का चिकटवून घ्या अंगाला.

अ‍ॅडम : अरे, जीवाची मुंबई करायचं ठरलं की नाही आपलं काल?

स्टीव्ह : वेळ काय, तुझं चाललंय काय. आपण आहोत त्या प्राणी संग्रहालयाचा मॉरटॅलिटी रेकॉर्ड बघ.

अ‍ॅडम : मॉरटॅलिटी म्हणजे?

स्टीव्ह : डोंबल माझं. मॉरटॅलिटी माहीत नाही आणि चाललाय जीवाची मुंबई करायला. अरे मृत्युदर. इंडियातल्या प्राणी संग्रहालयांपैकी सगळ्यात जास्त मॉर्टलिटी रेट या संग्रहालयाचा आहे. अरे आपण आलो, स्थिरस्थावर होतोय तोच ‘डोरी’ (मुंबईत दाखल झाल्यावर काही दिवसांत गतप्राण झालेली मृत पेंग्विन) गेली नाही का? बाकीचे प्राणी काय रे भूमिपुत्र आहेत. आपण पाहुणे आहोत, तरी ही हालत.

अ‍ॅडम : डोरीचं नशीब नव्हतं रे. इम्युनिटी चांगली नव्हती तिची. लोकल फूड झेपलं नाही तिला. जाणारा जातो. शोक करून काय होणार. आहोत मुंबईत तोपर्यंत शौक तरी पुरवून घेऊ.

स्टीव्ह : म्हणजे नक्की काय करायचं आपण?

अ‍ॅडम : आपण इथून सटकायचं आणि थेट

त्याचं वाक्य तोडत

स्टीव्ह : अरे ए, ४५ कोटी खर्च केलेत तुझ्यामाझ्यासाठी. ‘मुंबई दर्शन’ सहल काढणारे टूरवाले या संग्रहालयाचं नाव लिस्टमधून कट करणार होते. आजारी जर्जर केविलवाण्या प्राण्यांना काय बघायचंय असं म्हणत होते. आपल्यामुळे टीआरपी वाढणारे. आणि तू निघायचं म्हणतोस. झोपेत बरळतोस की काय?

अ‍ॅडम : तू असशील झोपेत, माझी झोप केव्हाच उडालेय. आता सामसूम आहे, आपण ‘सेल्फी पॉइंट’ला आता सहज जाऊ शकतो.

स्टीव्ह : कुठला पॉइंट??

अ‍ॅडम : आपण आता भायखळ्यात आहोत. शिवाजी पार्क फार लांब नाही. गुगल मॅप चेक केला मी.

स्टीव्ह : अरे, परवा इथला एसी पाच मिनिटं कमी झाला तर तुला दमसास काटेना.

अ‍ॅडम : नवं काही करायचं म्हटलं की विरोधाचं बटण प्रेस करायला हवं की नेहमी. इथले लोक म्हणे मोस्ट पोल्युटेड एअर खात जगतात. एकदा थ्रिल अनुभवू की लेका.

स्टीव्ह : अरे आपल्यासाठी एवढे लिटर शुद्ध पाणी मॅनेज करतात. खास क्लायमेट कंट्रोल्ड सेक्शन उभारलाय. आपलं फूडही व्हेरीफाइड असतं. आपल्या सेफ्टीसाठी सीसीटीव्हीपण आहेत.

त्याचं वाक्य मध्येच तोडत

अ‍ॅडम : ठाऊक आहे रे मला. तुला कॉन्ट्रॅक्ट दिलंय का रे? काही सांगायला घेतलं की पाढा वाचतोस फॅसिलिटीजचा. आपण निवांत होतो सेऊलला. त्यांनी आणलं आपल्याला. त्यांचं कर्तव्यच आहे ते.

इथल्या लोकांना बेसिक गोष्टी मिळत नाहीत. त्याला मी काय करू. ‘नाही रे’ गटाकडे बघत राहिलास तर आपली ग्रोथ स्टॅगनेट होते.

स्टीव्ह : आपण इथे ग्रोथ करायला थोडेच आलोय. आपण तर पाहुणे.

अ‍ॅडम : तेच तर म्हणतोय. पाहुण्यांसारखंच राहूया की. मुंबईत रोज अनेक पाहुणे म्हणून येतात आणि इकडचेच होतात. आपलं तसं नाही.

स्टीव्ह : सेल्फी पॉइंटला जायचं खूळ कुठून काढलंस?

अ‍ॅडम : खूळ नाही म्हणायचं. आपली पॅशन लोकांना खूळ वाटते.

स्टीव्ह : इथल्या एका माणसाचा स्मार्टफोन घे आणि काढ की सेल्फी. ‘कूल’ येईल एकदम.

अ‍ॅडम : विठ्ठलाचं मंदिर वडाळ्यालाही आहे तरी भाविक पंढरपूरला जातात ना. स्थानमाहात्म्य नावाचा प्रकार ऐकलास की नाही?

स्टीव्ह : सेल्फीत कसलं आलंय स्थानमाहात्म्य? काढला खिशातून स्मार्टफोन. फ्रंट कॅमेरा केला ऑन, थोडय़ा उंचीवर धरला फोन, ओठांचा केला चंबू, से चीज म्हणत काढायचा सेल्फी.

अ‍ॅडम : ध्रुवावरचा पेंग्विन तू आणि तरीही इतका अरसिक.

स्टीव्ह : अरे जाणं एवढं सोपं नाही. निखळलेले पेव्हर ब्लॉक आहेत वाटेवर. खूप ठिकाणी मेट्रोच्या कामामुळे ट्रॅफिक जॅम होतं म्हणे. टेपरेंचर डिफरन्समुळे तुला टॉयलेट ब्रेक घ्यावा लागला तर?

अ‍ॅडम : अख्खं वावर आपलंच की. कुठेही जायचं. इथल्या लोकांना जो पर्याय तो आपल्याला.

स्टीव्ह : इथल्या लोकांनी पेंग्विन डस्टबिन केलेत म्हणे. चोचीत कचरा टाकायचा असतो.

अ‍ॅडम : अरे चोच्या..

स्टीव्ह : इथल्या लोकांना काय सांगायचं?

अ‍ॅडम : मंद आहेस का??  या कानाचं त्या कानाला न कळता जाऊन यायचं. थोडं चहापाण्याचं बघ लोकांच्या. म्हणजे कोणी डाऊट घेतला तरी तोंड उघडणार नाही कोणी.

स्टीव्ह : कसला स्वार्थी आहेस रे

अ‍ॅडम : लवकर समजलं तुला. क्विक जाऊन ये. मग लिही तू ‘सेल्फिश पेंग्विन’ची गोष्ट. गोष्टीचं पुस्तक होईल आणि तेही असेल विक्रीला इथेच पेंग्विन गॅलरीच्या बाहेर..

 (सदरहू कथा काल्पनिक नाही. वास्तवाशी साधम्र्य आढळणं योगायोग नसून ते सजग वाचकाचं लक्षण समजावं)

viva.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Penguins and selfie point issue in mumbai
First published on: 10-03-2017 at 00:35 IST