प्राजक्ता कोळी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तुला मोठं होऊन काय व्हायचंय,’ असं कोणी विचारलं तर सगळ्यांची उत्तरं ठरलेली असतात. गंमत तेव्हा येते जेव्हा ठरवलेली गोष्ट मिळाल्यावर ती नकोशी वाटायला लागते आणि सुरू होतो शोध एका अशा गोष्टीचा जी आयुष्यभर आनंद देऊ  शकेल. ध्यानीमनी नसताना अचानक ‘यूटय़ूब’वर झळकण्याची संधी चालून आली आणि रेडिओ जॉकी प्राजक्ता कोळी ‘मोस्टली सेन’ झाली. कल्पना आणि वास्तविकता यांच्यातील फरक जाणवल्याने स्वत:साठी एक वेगळी वाट निर्माण केलेल्या आणि यशस्वीरीत्या ती गेली तीन र्वष निभावत असलेल्या प्राजक्ताची कहाणी म्हणूनच महत्त्वाची वाटते.

मी लहानपणापासूनच अभ्यासू वगैरे होते. पण त्यासोबतच कला खूप आवडायची. माझ्या घरात आजी, आजोबा, आई, बाबा या सगळ्यांना रेडिओ ऐकायला आणि विशेषत: त्यावरची गाणी ऐकायला खूप आवडायचं. मला त्यामुळेच रेडिओ नावाचं प्रकरण खूप जवळचं वाटायला लागलं. खरं तर घरातले सगळे गाण्यांसाठी रेडिओ ऐकायचे पण मला ‘रेडिओ जॉकी’चं बोलणं खूप आवडायचं. कधी एकदा गाणं संपून रेडिओ जॉकी बोलेल असं व्हायचं मला. शाळेत साधारण सहावीत असताना आईने नवीन फोन घेतला आणि मला स्वत:चाच आवाज रेकॉर्ड करून पुन:पुन्हा ऐकायचा नाद लागला. ‘रेडिओ’वर पण अशी नुसती बडबडच तर करावी लागते, असं वाटून मीसुद्धा मोठी झाले की रेडिओ जॉकी होणार असं मला वाटायचं. माझे बाबा मला सांगायचे की ‘पुढच्या पाच वर्षांत तू काय करणार ते तुला माहीत असलं पाहिजे.’ अगदी त्यानुसार माझी आवड लक्षात घेता ‘रेडिओ जॉकी’ व्हायचं असं मी मनाशी ठाम केलं.

योगायोगाने दहावीनंतरच्या ‘करिअर कौन्सिलिंग’मध्येसुद्धा माझा कल कलेकडे आहे असा कळल्यावर केळकर महाविद्यालयातून अगदी साग्रसंगीत अकरावी, बारावी आणि मग ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’च्या पदवीची तीन वर्षे असं शिक्षण पूर्ण झालं. दरम्यान, आजच्या अनेक नामवंत कलाकारांसोबत ‘जो भी होगा देखा जायेगा’, ‘बायको असून शेजारी’ अशी दोन व्यावसायिक नाटकंही केली. खरं तर केळकर कॉलेजमधली पाच र्वष मस्त गेल्याने तशी मी थोडी हवेत होते आणि ‘सोने पे सुहागा’ म्हणजे पदवीनंतर अगदी लगेच मला एका रेडिओस्टेशनमध्ये ‘रेडिओ जॉकी’ म्हणून इंटर्नशिप करण्याची संधीही मिळाली. अर्थातच, लहानपणापासून ‘आर.जे.’ व्हायचं होतं आणि ते मी झाले. अशा परिस्थितीत माणसाने खूश झालं पाहिजे. मीसुद्धा खूश झाले पण लवकरच माझा हिरमोडही झाला. माझ्या कल्पनेपेक्षा इथलं काम खूप वेगळं आणि कठीण होतं. फार पूर्वीपासूनच माझा आवाज बरा असल्याने मला लोक माझ्या आवाजाबाद्दल आणि रेडिओ जॉकी होण्याच्या स्वप्नाबद्दल शाबासकी द्यायचे. इथे आल्यावर मला हे काम आपल्या कल्पनेपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने केलं जातं, असं कळल्यावर मात्र माझं अवसान गळलं. त्यात मला ‘ऑन एअर’सुद्धा खूप कमी काम करायला मिळायचं. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध करायला मिळालेला रात्री उशिराचा शो ‘कॉल सेंटर विथ प्राजक्ता’देखील तीन महिन्यांत माझ्याकडून काढून घेण्यात आला. मग मी त्यानंतरही या परिस्थितीत प्रॉडक्शन विभागात खूप काम केलं. तिथे एडिटिंग, आवाजावरचं काम शिकले.

खरं तर या काळात मी प्रचंड डिप्रेशनमध्ये होते आणि आत्मविश्वास तर मुळीच उरला नव्हता, पण म्हणतात ना देव एक दार बंद करतो आणि दुसरं उघडतो तसं काहीसं माझ्या बाबतीत घडलं. ‘वन डिजिटल एंटरटेन्मेंट’च्या सुदीप लेहरीनं मला माझ्या ऑफिसमध्ये हृतिकसोबत टाकलेला एक इन्स्टाग्राम व्हिडीओ बघून भेटायला यायला सांगितलं. मी त्याला भेटणं टाळत होते पण त्याने कसं तरी सतत माझ्यामागे लागून मला ‘तुझं व्यक्तिमत्त्व खूप दिलखुलास आहे आणि तू यूटय़ूब का नाही सुरू करत?,’ असं भंडावून सोडत शेवटी मला यूटय़ूब नावाच्या जाळ्यात खेचलंच. रेडिओ माझं स्वप्न होतं पण मला प्रत्यक्षात तिथे काम करायला मजा येत नव्हती. आयुष्यात कधीच ‘प्लॅन बी’ ठरवलेला नव्हता, कारण काहीही झालं तरी रेडिओ जॉकी बनायचं ठरवलं होतं. पण तसं झालं नाही कारण नियतीने काही दुसरे ‘प्लॅन्स’ आखले होते. मी सुदीपला यूटय़ूबसाठी हो म्हटलं, पण माझ्यासाठी तेव्हा यूटय़ूब ही संकल्पना खूप नवी होती. काय बोलायचं, कसं करायचं काही कल्पना नव्हती. पण ‘वन डिजिटल एंटरटेन्मेंट’ आणि त्यातही सुदीपने सगळी गणितं सोपी करून ठेवली. अनेक जण मला माझ्या यूटय़ूब चॅनलचं नाव कसं पडलं विचारतात तर मला सांगायला आवडेल की नाव काय ठेवायचं, हा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा माझ्या डोक्यात सगळ्यात आधी ‘मोस्टलीसेन’ हे नाव आलं. त्यानंतर बरीच नावं शोधली पण हे नाव मनात बसलं होतं आणि १० फेब्रुवारी २०१५ पासून माझा ‘सेन’प्रवास सुरू झाला. पहिला व्हिडीओ कैक हजार लोकांनी पाहिल्यावर वाटलं हे मस्तं आहे. जे अपलोड होतं त्यावर लगोलग प्रतिसाद मिळतो आणि हेच मला हवं होतं. रेडिओ स्टेशनमध्ये माझं म्हणणं कोणी ऐकतंय की नाही याची शाश्वती तर सोडाच पण कार्यक्रम कसा होतो आहे हेसुद्धा कळायला मार्ग नव्हता. असो.. यूटय़ूब आवडू लागल्यावर मग आई-बाबांशी बोलून एक वर्षांचा कालावधी मागितला. त्यांनीही हा प्रयोग करायला होकार दिल्यावर मग माझा प्रवास सुसाट सुरू झाला.

सुरुवातीचे अनेक व्हिडीओ फसले पण खूप काही शिकवून गेले. पहिला एक महिना तर यूटय़ूब आणि रेडिओ एकत्र करत होते. तेव्हा धावपळ व्हायची पण मजाही येत होती. यूटय़ूब मस्त वाटत असलं तरी इथे मेहनतही तितकीच आहे. तुम्ही काय लिहिता आणि कसं प्रदर्शित करता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, कारण त्यावर व्हिडीओचे सबस्क्रायबर्स, लाइक्स आणि व्ह्य़ुज अवलंबून असतात. या वर्षभरातला एक काळ असा होता जेव्हा मला काय लिहू आणि काय शूट करू कळत नव्हतं. अशीही वेळ येते जेव्हा आता काय ‘शूट’ करायचं कळत नाही पण या परिस्थितीत तुम्ही किती पॉझिटिव्ह राहता आणि कसं सांभाळता ते महत्त्वाचं असतं.

माझ्या व्हिडीओजमधूनही मला बरंच शिकायला मिळतं. लोकांना काय आवडतंय, काय नाही हे लगेच कळत असल्याने काम करताना खूप शिकायला मिळतं. तसंच माझे व्हिडीओज आवडीने बघणारे जितके आहेत तसेच टीका करणारेही आहेत पण त्यांच्याकडेही मी हसून पाहते आणि प्रगती करत राहते. यूटय़ूबने मला गेल्या वर्षभरात बऱ्याच गोष्टी दिल्या. माझ्या ‘शेमलेस’ गाण्यामुळे ‘ओबामा फाऊंडेशन’ने आयोजित केलेल्या दिल्लीतील कार्यक्रमात देशभरातून आलेल्या चार ‘यूटय़ूबर्स’मध्ये माझा समावेश झाला. पहिल्या रांगेत बसून ओबामांचं भाषण ऐकता आलं जो माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण होता. गर्लीयापाच्या ‘पागल्स’ (P.A.GALS) नावाच्या वेब सीरिजमध्ये काम करत आलं. अनेक यूटय़ूब चॅनल्सबरोबर काम करायला मिळालं. आणि वर्षअखेरीस ‘चेक रिपब्लिक’च्या टुरिझम प्रमोशनल प्रोग्रामअंतर्गत देशभरातल्या अनेक प्रसिद्ध यूटय़ूबर्ससोबत ‘प्राग’ फिरायला मिळालं.

या तीन वर्षांत खूप वळणं आली, पण या सगळ्यात माझे आई-बाबा, मित्र माझ्यासोबत होते. यूटय़ूब प्रवास खूप काही शिकवून गेला आणि त्याहूनही जास्त देऊन गेला. नव्या वर्षांतही माझं काम लोकांना आवडत राहील या दृष्टीने मी प्रयत्न करत राहीनच. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून भरभरून प्रेम आणि शुभेच्छा!

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radio jockey prajakta koli mostlysane
First published on: 05-01-2018 at 01:34 IST