परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शौनक पटकन जेवून तयार झाला. रात्री दहा म्हणजे त्याची रोजची यूएसच्या कॉलची वेळ. ‘अरे एक दिवस तरी वेळेवर झोप! काही दिवसरात्रीचं भान आहे की नाही?’ आईला अजिबात आवडायची नाही ही कामाची विचित्र वेळ. ‘अगं आई, अमेरिकेत आत्ता कुठे दिवस सुरू झाला आहे. आपण झोपलो म्हणून जग चालायचं थांबत नाही. तुला नाही कळायचं ते.’ पण मग हा तर दिवसभरही ऑफिसमध्ये असतो, तेव्हा काय करतो? याचा दिवस संपतच नाही की काय?

शौनकच्या दिनक्रमावरून मला एक कथा आठवली. एका राजाला गोष्टी ऐकायला खूप आवडायचं. एकदा त्याने फर्मान काढलं, मला न संपणारी गोष्ट ऐकायचीय. अनेकांनी प्रयत्न केले, पण कधी ना कधी त्यांची गोष्ट संपायची. एका मुलाची गोष्ट तर चांगली तीन महिने चालली, पण शेवटी संपलीच. मग एक साधू आला आणि त्यानं ती सुप्रसिद्ध न संपणारी गोष्ट राजाला सांगितली. तो म्हणाला, ‘एके वर्षी खूप पाऊस झाला, भरपूर धान्य उगवलं. एका शेतकऱ्याने शंभर धान्याची कोठारं भरून ठेवली. काही चिमण्यांनी हे पाहिलं. त्यांनी खूप प्रयत्न करून त्यातल्या एका कोठाराला भोक पाडलं. मग एक चिमणी आली, एक दाणा घेतला, उडून गेली, दुसरी चिमणी आली, एक दाणा घेतला, उडून गेली..’ साधूची गोष्ट अशीच सुरू राहिली. राजाला कळून चुकलं, ही गोष्ट जरी न संपणारी असली तरी निर्थक आहे. म्हणजे न संपणाऱ्या गोष्टी नेहमी चांगल्याच असतात असं नाही. त्याने साधुबाबांसमोर हार पत्करली.

‘टेड टॉक’ नावाचा एक व्याख्यानांचा प्रसिद्ध कार्यक्रम आहे. काही दिवसांपूर्वी जो टेड टॉक ऐकला, त्याचा विषय फार इंटरेस्टिंग होता, ‘स्टॉपिंग क्यूज’, म्हणजे थांबण्याचे इशारे. विसाव्या शतकामध्ये प्रत्येक गोष्ट कधी ना कधी संपायचीच. तेव्हा सूर्याबरोबर सुरू होणारा दिवस सूर्य मावळल्याबरोबर संपायचा. टीव्हीवरचे कार्यक्रम घडय़ाळात एक वेळ झाली की संपायचे आणि तो बंद व्हायचा. अकरा वाजता रेडिओवरचं ‘बेला के फुल’ संपलं की तो बंद करायलाच लागायचा. थोडक्यात, प्रत्येक गोष्टीची आपली एक वेळ असायची आणि आपला एक लाइफ स्पॅन असायचा. आता मात्र त्या न संपणाऱ्या गोष्टीसारखी आपली दिवाळी, सेलिब्रेशन, काम, एन्टरटेनमेंट, हाव, गरजा, टेक्नोलॉजी.. काही संपतच नाही. संपत नाही म्हणण्यापेक्षा ते कधी आणि कसं थांबवायचं ते आपल्याला कळत नाही. चोवीस तास रेडिओ सुरू असतो, टीव्हीवर चोवीस तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या असतात. कुठे सुट्टीला गेलो तरी लोक लॅपटॉपवर काम करत असतात, मोबाइलवर मोठमोठी डील्स करत असतात.

न संपणारी ही गोष्ट फक्त टेक्नोलॉजीच्याच बाबतीत होतेय असं नाही. तुमच्यातले किती जण पुस्तक वाचतात? त्यात वेगवेगळी प्रकरणं असतात, हो ना? एक प्रकरण संपलं की पुढचं प्रकरण वाचायचं की नाही हे ठरवायला उसंत मिळते. आणि कधी ना कधी पुस्तक वाचून संपतं. तेच पेपर वाचतानाही होतं. वाचून झालं की घडी करून आपण पेपर बाजूला ठेवून देतो. तीच गोष्ट दिवाळीची. आधी चिवडा, चकलीचा खमंग वास यायला लागला की दिवाळी आली हे आपोआप समजायचं. पण आता? आपली दिवाळी तर कायम चालूच असते. खास दिवाळीशी रिलेटेड ज्या गोष्टी होत्या, फराळ, सुगंधी साबण, नवीन कपडे त्या आता कायम असतातच आपल्या घरात, नाही का? म्हणजे एखादी गोष्ट ‘आता संपली’ हे लक्षात येण्याचा कोणता मार्गच आपल्यासमोर नसतो आजकाल.

त्याच टॉकमध्ये यातले काही उपाय सांगितलेले ऐकले. ‘डाईमलर’ नावाची जर्मन कार कंपनी आहे. तिथे असा नियम आहे की एखादा कुणी जर सुट्टीवर असेल तर त्याला आलेल्या ई मेल्स डीलीट केल्या जातात. म्हणजे तो जेव्हा परत येईल तेव्हा ढीगभर काम त्याच्यासाठी वाट बघत नसतं. तो खरोखरच कामापासून पूर्णपणे डिसकनेक्टेड असतो. स्टीव्ह जॉब्जनं आय पॅड बनवलं, पण त्याच्या घरी ते नव्हतं. त्यानं जाणीवपूर्वक मुलांना त्यापासून दूर ठेवलं होतं.

वजन जास्त वाढलं किंवा फार खाल्लं तर आपण डी-टॉक्स डाएट करतो ना, तसं मधून मधून टेक्नोलॉजीचं डी-टॉक्स करायला हवं, तिलाही नाही म्हणायला शिकायला हवं. नाहीतर आपला स्नो बॉल होईल. उतारावरून गडगडत जाताना वाटतं तसं हेल्पलेस वाटायला लागेल. पण ते ‘जुनाट’ स्टॉपिंग क्यूज कुठे आहेत आता? त्यामुळे हा सिग्नल किंवा इशारा तयार करण्याची जबाबदारी पूर्णपणे आपलीच असणार असं दिसतंय. म्हणजे काहीतरी तरकीब शोधायला हवी यावर. मग ते स्वत:नं स्वत:ला घातलेले नियम असतील, एखादी खूण असेल, अलार्म असेल किंवा चक्क मोबाइल कडीकुलूपात ठेवणं असेल.

तुमचा स्टॉपिंग क्यू काय आहे?

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stopping cues stress management tips real life experience
First published on: 27-10-2017 at 05:20 IST