परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असंस्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी

‘नमिता, लक्ष कुठे असतं तुझं हल्ली? किती चुका होतायत? इथे क्लायंट माझं डोकं खातोय. यू बेटर इम्प्रुव्ह युवरसेल्फ’. बॉसच्या केबिनमधून नमिता कशीबशी बाहेर आली. लंच अवर झाला होता पण तिला काही खावंसंच वाटेना. टेबलावर डोकं ठेवून ती पडून राहिली. मेघालीनं जाताजाता हाक मारली  तरी तिनं दुर्लक्ष केलं.  सगळे परतले तरी ती तशीच बसलेली पाहून मेघालीला तिची काळजी वाटली. ‘काय गं, बरं वाटत नाहीये का? जेवायला का आली नाहीस?’ आता मात्र नमिताला इतकं रडू आलं की आवरेचना.  मेघाली तिला बळेबळे कॉफी शॉपमध्ये घेऊ न गेली. ‘हं, आता बोल. काय झालं? बॉस ओरडले म्हणून रडतेयस का? जाऊ दे गं, लक्ष नको देऊ स. बाय द वे, आजकाल समीर सारखाच तुझ्याविषयी बोलत असतो हं. काय भानगड आहे? ’

‘समीर’ हाच प्रॉब्लेम होता नमिताचा.  ती नवीन जॉईन झाली तेव्हा खरंतर त्यानं खूप मदत केली तिला. एकदा दोनदा कामासाठी उशिरापर्यंत थांबायला लागलं तर तोही सोबतीसाठी थांबला. मग एकदा कॉफी प्यायला बाहेर चल म्हणाला. ती नाही म्हणाली तसा बिथरला. तेव्हापासून सारखा तिला त्रास द्ययला लागला.  तिच्याबद्दल बॉसकडे तक्रार करायची, शॉर्ट डेडलाईन असलेल्या असाईनमेंटस द्यायच्या, सगळ्यांसमोर पाणउतारा करायचा.. आता तर त्यानं सगळीकडे पसरवलं की नमिता त्याच्या मागे लागली आहे म्हणून. कारण नसताना सगळे तिच्याकडे वेगळ्याच नजरेनं बघायला लागले. नमिता अगदी वैतागून गेली. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा कात्रीत सापडली ती. आज शेवटी मेघालीशी शेअर केलं तिनं. ‘अग, मग आधी का बोलली नाहीस कधी?’

कामाच्या ठिकाणी हे असं लैंगिक शोषण होणाऱ्या स्त्रियांपैकी सत्तर टक्कय़ांहून अधिक गप्प बसतात. जर त्यांनी आवाज उठवलाच तर त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडतील, आपली नोकरी जाईल अशीही भीती त्यामागे असू शकते. बॉसच जर असं वागत असेल तर तो आपल्यावर डूख धरेल, आपल्याला त्रास देईल असं वाटतं.  काही वेळा स्त्रियांना न्याय मिळतोही पण त्यासाठी जबर किंमत मोजावी लागते. सहकारी त्यांच्याकडे निराळ्या नजरेनं पाहू लागतात. नवरा शंका घेऊ लागतो. त्यांच्याबाबत गॉसिप केलं जातं.

कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण हा सध्या ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. स्त्रियांना अवघड वाटेल असे शेरे मारणे, त्यांच्या कपडय़ांवर, दिसण्यावर टिपणी करणे, सहेतुकपणे स्पर्श करणे, अस्वस्थ वाटेल इतक्या जवळ येणे, अश्लील चित्रे दाखवणे इथपासून ते प्रत्यक्ष लैंगिक अत्याचार अशा सगळ्याचा यात समावेश होतो. का होतं हे? याला जबाबदार आहे आपली पुरुषप्रधान संस्कृती. दु:खाची गोष्ट अशी की अनेक पुरुषांना हे शोषण वाटतच नाही. नुसती आपली एक गंमत म्हणून ते याकडे पाहतात. बहुतेकांना असं वाटतं की ‘एवढा आरडा-ओरडा करण्यासारखं काय आहे त्यात? हातच धरला होता ना?’ काही जणांना तर तो आपला हक्क वाटतो.  त्या स्त्रियांच्या कामावर याचा परिणाम होतोच, पण तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही जबरदस्त परिणाम होतो.  शारीरिक आणि मानसिक तब्ब्येत बिघडते. नैराश्य, चिडचिड, निरुत्साह अशा नकारात्मक भावना व्यापून टाकतात.  सगळ्या मानवजातीवरचा विश्वस उडाल्यासारखा वाटायला लागतो.

२०१३ मध्ये यावर कायदा झाला, ‘द सेक्शुअल हरासमेंट ऑफ वुमेन अ‍ॅट वर्कप्लेस (प्रीव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल) अ‍ॅक्ट, २०१३’ नावाचा. त्याआधी विशाखा नावाचा कायदा होता. या नवीन कायद्यांमुळे स्त्रियांना बरंच संरक्षण मिळालंय. दहाहून अधिक कामगार असलेल्या ठिकाणी यासाठी एक कमिटी स्थापन करणं आवश्यक केलं गेलंय.  लैंगिकदृष्टय़ा काही त्रास झाला तर या कमिटीकडे तक्रार करता येते. त्यावर पूर्ण तपास करणं या कमिटीवर बंधनकारक असतं. तपासादरम्यान तुमचं नाव गोपनीय ठेवलं जातं. शिवाय काही त्रास होऊ नये म्हणून तात्पुरती कामाची जागा बदलली जाते.

लैंगिक शोषण झालं आहे की नाही हे कोण ठरवणार? कायदा याबाबत अगदी स्पष्ट आहे. ज्या व्यक्तीवर अन्याय झालाय त्याचं मत महत्त्वाचं धरलं जातं. म्हणजे समजा एखाद्या स्त्रिला काम करत असताना मशीनचा थोडा धक्का लागला आणि तिच्या पुरुष सहकाऱ्यानं तिचा हात धरून त्यावर फुं कर घातली, तिला जवळ घेतलं, तर ते लैंगिक शोषण होईल का? नक्कीच होईल. कारण ते तिला त्रासदायक, किळसवाणं वाटेल. तो म्हणेलही की मी फक्त मदत करत होतो, पण तिला काय वाटलं हे जास्त महत्त्वाचं.

मनात येणारी एक शंका म्हणजे स्त्रिया याचा गैरफायदा घेतील का? हे अगदीच अशक्य नाही, पण या घटकेला तरी स्त्रियांचं तक्रार करण्याचं प्रमाण इतकं कमी आहे की त्यांना तक्रार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवंय. शिवाय त्यांच्या तक्रारीची पूर्णपणे चौकशी झाल्याशिवाय कारवाई केली जात नाही. इतर सर्व माणसांसारखेच स्त्रियांना काही बेसिक हक्क आहेत. या मानवाधिकारांचा आदर आपण करायला हवा. फक्त पुरुषांनीच नव्हे तर स्त्रियांनीही इतर स्त्रियांच्या मागे उभं राहायला हवं. अशी वेळ कुणावरही येऊ  शकते. नाहीतर स्त्री स्वातंत्र्याचं स्वप्न हे स्वप्नंच रहायचं.

viva@expressindia.com