असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असंस्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

प्रचंड गर्दी, असंख्य गाडय़ा, कर्कश्श हॉर्न्‍स आणि पावलोपावली लागणारे रस्त्यातले खड्डे यातून वाट काढत नीरजा कशीबशी चालली होती. मधेच एका सायकलवाल्याला तिचा थोडा धक्का लागला. त्यानं लगेच उतरून वाद घालायला सुरुवात केली. तो वाद मिटवेपर्यंत समोरचा सिग्नल पुन्हा लाल झाला.  आत्तापर्यंत नीरजाचं ब्लडप्रेशर कधी हाय तर कधी लो व्हायला लागलं होतं.  पोटात गोळा आणि छातीत धडधड व्हायला लागली होती. तिला मीटिंगला सव्वा दहा वाजता पोचायचं होतं आणि दहा तर ऑलरेडी वाजले होते. तिथे पार्ंगला जागा मिळणे, लिफ्टला गर्दी, असे अनेक अडथळे पार करायचे होते अजून.  धापा टाकत ती जस्ट वेळेत पोचली. प्रेझेंटेशन करायला सुरुवात केली तरी तिच्या डोक्यात ते सायकलवाल्याबरोबरचं भांडण, ट्रॅफिकचे आवाज आणि टेन्शन हेच होतं. ती काहीसं ऑटोमॅटिकलीच बोलली. प्रेझेंटेशन मनासारखं छान नाही झालं अशी हुरहुर वाटत राहिली तिला. पुढच्या वेळेपासून चांगलं अर्धा तास आधी निघायचं, म्हणजे अशी घाई होणार नाही असा आत्तापर्यंत हजार वेळा केलेला निश्चय तिनं पुन्हा केला. आजचं प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं होतं. एक मोठी असाइनमेंट मिळणार होती. दुपारी तिला कळलं की ती तिच्या कलीगला मिळाली.  तिचा एकदम मूडच गेला. डोकं दुखायला लागलं. बॉसला सांगून ती सरळ घरी गेली. घरी गेल्यागेल्या आईनं विचारलं, आज तरी भेटून आलीस का गं काकांना? नीरजानं नेहमीचं उत्तर दिलं, ‘नाही गं, वेळच मिळाला नाही.’ खरं तर हे उत्तर तिलाही पटलं नव्हतं. असा कसा कधीच वेळ नसतो आपल्याला?

ऑफिस घरापासून जवळच होतं, दहा मिनिटांच्या अंतरावर. पण अगदी निघेपर्यंत तिची लगीनघाई चालू असायची. नेमकी अशावेळी त्यांच्या बिल्डिंगची लिफ्ट प्रत्येक मजल्यावर थांबत जायची.  कधी सोसायटीतले काका काही चौकशी करायचे. कधी गाडी पहिल्या किकला चालू व्हायची नाही. गेटमधून बाहेर पडता पडताच पाचएक मिनिटं संपलेली असायची. रस्त्यावरचा ट्रॅफिक, अपघात, मोर्चे हे सगळंच अनप्रेडिक्टेबल. एकूण रोजच नीरजा ऑफिसमधे घाईघाईत पोचायची. बरं, डोकं तरी शांत असायचं का? तेही नाही. मीटिंगच्या वेळी ट्रॅफिकचे विचार, जेवताना कामाचे, काम करताना सुट्टीचे आणि मजा करताना व्यायामाचे विचार.

तुम्हाला आठवतंय कधी शांतपणे बसल्याचं? म्हणजे समोर टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप असं काहीही नसताना? आपण एका जागी बसलेलो जरी असलो तरी आपले हात शिवशिवत असतात. विचार तिन्ही लोकांत संचार करत असतात.  मन भूतकाळात तरी प्रवास करत असतं किंवा भविष्याची चिंता तरी करत असतं.  आत्ता काय चाललंय याकडे आपलं लक्षच नसतं. मग निवांत क्षण अनुभवायचे राहून जातात. नीरजाच्या मोठय़ा बहिणीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आठवडाभर निरनिराळे सोहळे चालू होते. पण तिला मात्र त्यातली एकच गोष्ट ठळकपणे आठवतेय, खूप दमल्याची. लग्न जेव्हा अ‍ॅक्चुअली घडत असतं तेव्हा त्याचा पूर्ण आस्वाद घेताच येत नाही. इतक्या गोष्टी एकाच वेळी, एकापाठोपाठ घडत असतात, आपले सेन्सेस इतके सँच्युरेट झालेले असतात की काहीही अ‍ॅबसॉर्ब करणं शक्य नसतं. म्हणूनच लग्नाचं एवढं डिटेलमध्ये डॉक्युमेंटेशन करतात बहुतेक.

मोठं होण्याची घाई, प्रवास संपवण्याची घाई, मजा करण्याची घाई, वजन कमी करण्याची घाई, मसल्स बिल्ड करण्याची घाई.. अगदी क्रिकेटसुद्धा ट्वेंटी-ट्वेंटी झालंय. कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीची अ‍ॅड बघा, सात दिवसांत पूर्ण युरोप, वीकएण्डच्या दोन दिवसांत दुबई. मग त्यात तिथल्या असंख्य साइट्स, शॉपिंग, एंटरटेनमेंट, सगळं आलं. असं म्हणतात की टायटॅनिक बुडण्याचं मुख्य कारण हे होतं की त्यांना सर्वात वेगानं जाणाऱ्या बोटीचं रेकॉर्ड मोडायचं होतं. त्यामुळे आइसबर्गविषयी वॉर्निग्ज मिळूनही न थांबता ती तशीच पुढे गेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घाईतून सुटका मिळवण्यासाठी आपण ब्रेक घेतो. काय बरं करतो आपण रिलॅक्स होण्यासाठी? पार्टीज, वीकएण्ड आउटिंग्ज, मूव्हीज, मॉल्स.  दिवसभर धम्माल, हिंडणं-फिरणं, रात्रभर मस्ती, गप्पा.  इतक्या अ‍ॅक्टिव्हिटीज, की रिज्युविनेट होण्याऐवजी अधिकच थकून जायला होतं. परवा तर गडबडीत जाताना नीरजाची स्कूटर घसरली. नशिबानं खरचटण्यावर भागलं. आता मात्र तिला सीरिअसली वाटायला लागलं की हे फार होतंय. काहीतरी केलं पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे. पण तिचा प्रश्न असा आहे की थांबून कसं चालेल? मागे नाही का पडणार आपण? मागे? कशाच्या? कुठल्या रेसमध्ये धावतोय का आपण मागे पडायला? कुठे पोचायचं असतं आपल्याला? एवढं सगळं आपण का आणि कशासाठी करतोय याचा आपल्याला पत्ता तरी असतो का? असं वाटतं का, की संधी मिळेल तेव्हा भराभरा गिळून घ्यावं. कसली ना कसली इनसिक्युरिटी असते मनात. उद्याचं कुणी सांगितलंय? भरपूर काम करून घ्या, पैसे मिळवून घ्या, नंतर नाही जमलं तर? अचानक कशासाठी तरी गरज पडली तर?

आपला मुक्काम काय आहे हे ठरवू या, कशाच्या पुढे जायचंय आणि कशाच्या मागे पडायचं नाही ते निश्चित करू या आणि मग प्रवासाचा मार्ग आखूया. उगीच घाईघाईत सगळ्यांमागे फरफटत का जायचं? तुम्हाला काय वाटतं?

या घाईवर काही तोडगा काढता येईल का, ते पुढच्या आठवडय़ात बघू.

viva.loksatta@gmail.com