परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी
लॉच्या दुसऱ्या वर्षांला असलेल्या जयचा डायलेमा आपण मागच्या लेखात पाहिला. हा कोर्स सोडावा आणि काही तरी दुसरं जॉइन करावं असं त्याला आता वाटायला लागलंय. त्यात वाया जाणारा वेळ, पैसे, आईबाबांना वाटणारी काळजी आणि त्याला स्वत:ला भेडसावणाऱ्या शंका या चक्रव्यूहात तो सापडलाय आणि त्यातून बाहेर कसं पडावं या प्रश्नात त्याचा अभिमन्यू झालाय. खरं तर कुणाचाही अभिमन्यू व्हावा अशीच परिस्थिती आहे ही.
मुळात आपल्याला काय करायला आवडेल हे आयुष्यभर बदलत राहू शकतं. कोर्स ठरवताना गोंधळून जाणं साहजिक आहे त्यामुळ. पण आता अॅडमिशन घेतलीये, दीड वर्ष पूर्ण झालंय, मग आई-बाबांना वाटणारी काळजी आणि शंका रास्त आहेत. अर्थात यात थोडा पिढीचा फरकही असेलही. आई-बाबांच्या पिढीला हा असला काही विचारसुद्धा मनात आणणं म्हणजे पापच. कारण जे काही हाती घेतलं असेल ते मनात असो वा नसो, पूर्ण करायचं, अशी शिकवण त्यांना मिळालीय.
काळानुसार विचार बदलले आहेत. आजच्या मुलांच्या मते सांगायचं झालं तर, अनेक पर्याय उपलब्ध असताना कशाला नकोसं काम आयुष्यभर करत राहायचं? त्यापेक्षा वेळीच योग्य निर्णय घेऊन टाकलेला बरा. पण प्रश्न इतकाच असतो की आत्ता आहे हा पर्याय चुकीचाच आहे हे ठरवायचं कसं? आणि तो बरोब्बर पर्याय शोधायचा कसा?
सर्वात आधी जयला शोधून काढायला लागेल की त्याला लॉ नक्की का सोडायचंय? कारण दुसरं काय करायचं हे अजून नीटसं क्लीअर नाहीये त्याला. कुठलाही ठाम रस्ता समोर ठेवून तो हा निर्णय घेत नाहीये. बघू, ठरवू, असाच विचार चालू आहे. चालू कोर्स बदलून टाकायला इतका मर्यादित विचार पुरेसा आहे? याचं खरं कारण शोधून काढायला हवं. अभ्यास खरोखरच अवघड जातोय का? तो विषय आपल्या अजिबात आवडीचा नाही असं वाटतंय का? की काही दुसऱ्या गोष्टींनी विचारप्रक्रिया झाकोळून गेली आहे? डिप्रेशन, ब्रेकअप, चुकीचा मित्रपरिवार, अॅडिक्शन्स अशा अनेक कारणांनी अभ्यासावरचं लक्ष उडू शकतं. मग असाइनमेंट्स मागे पडतात, झोप पूर्ण होत नाही, आधीचा अभ्यास झालेला नसल्यामुळे सध्या कॉलेजमध्ये काय चाललंय ते समजत नाहीत हे दुष्टचक/ चालूच राहतं.
बहुतेकदा यावर रिफ्लेक्स रिअॅक्शन दिली जाते. म्हणजे आजार एक आणि उपाय तिसराच अशी गत होते. काही जण कसे, डिप्रेशन आलं म्हणून खूप खातात, काही जण वेळ जात नाही म्हणून शॉपिंग करतात तर काही काही जण काम नाही म्हणून चक्क झोपा काढतात. तसंच खरं कारण शोधून त्यावर उपाय न करता काही जण कोर्सच बदलून टाकायचं ठरवतात.
प्रोफेशनल कॉलेजमध्ये गेल्यावर अभ्यास प्रचंड वाढतो. शिवाय तो फक्त घोकंपट्टी करण्याच्या स्वरूपातला नसतो. त्यावर संशोधन करावं लागतं, विचार करावा लागतो. स्पून फीडिंगची सवय झालेल्या मनाला हा प्रकार नवीन असतो. याव्यतिरिक्त न आवडणाऱ्या गोष्टी असंख्य असू शकतात. उदा. एखादे प्रोफेसर, जेवण, रूम, रूमपार्टनर, होमसिकनेस, पोर्शन असं काहीही. पण एक तर हे प्रश्न कोणत्याही कोर्सला उद्भवू शकतात. त्यामुळे कोर्स बदलून ते सुटणार नाहीत. दुसरी, काहीशी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे या समस्यांवर उपाय शोधण्यासारखा असतो. उदा. जेवण आवडत नसेल तर मेस बदलून बघणे, घरगुती डबा लावणे, बरोबर खाण्यासाठी लोणचं, तूप, मेतकूट, चटण्या असे पदार्थ घरून नेणे. राहण्यासाठी खरं तर कॉलेजचं हॉस्टेल ही सगळ्यात सोयीची जागा असते खर्च, जाणं-येणं, सुरक्षितता. पण जर हॉस्टेलमध्ये राहणं अजिबातच सहन होणार नसेल, तर पेइंग गेस्ट म्हणून दुसरा पर्याय बघता येतो. अभ्यासाचं म्हणाल तर नवीन पद्धतीशी जुळवून घेण्याला पर्याय नाही. बॅकलॉग भरून काढायचा, एखाद-दुसरा विषय समजायला अवघड जात असेल तर त्यासाठी टीचर, एखादा सीनिअर, किंवा आणखी कुणाची तरी मदत घ्यायची. फक्त अभ्यास एके अभ्यास न करता तुमची पॅशन, हॉबी जी अडगळीत जाऊन पडलेली असते तिला जीवदान द्यायचं. सुरुवातीच्या काही दिवसांतच पक्का निर्णय झाला तर कोर्स बदलला तरी टर्म वाया जाणं टळतं. पण खूपदा इतक्या लवकर काहीच अंदाज येत नाही.
जयचं आता दुसरं र्वष संपत आलंय. त्यामुळे आत्ताच घाईघाईत निर्णय घेण्यापेक्षा शांतपणे, वेळ घेऊन, इतर शक्यता तपासून मग पुढे काय करायचंय हे नीट ठरवता येऊ शकेल. आमच्या चर्चेनंतर सध्या जयनं असं ठरवलंय की आत्ताच्या सगळ्या असाइनमेंट्स वेळेवर पूर्ण करायच्या. ही परीक्षा जमेल तितकी चांगल्या पद्धतीने द्यायची आणि सुट्टीमध्ये काय तो निर्णय घ्यायचा. बाबांच्या ज्या लॉयर मित्राकडे तो गेला होता, तिथे एक-दोन महिने पुन्हा जायचं म्हणजे मुळात त्याला काय आवडलं होतं? आणि ते आता बदललंय का? याचा त्याला मागोवा घेता येईल. करिअरचे इतर पर्याय शोधायचे. आपल्या मनातल्या सगळय़ा शंका बाजूला ठेवून आई-बाबांनी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्याला दिलंय. त्यामुळे तो जबाबदारीनं विचार करतोय. हेतू इतकाच, की कुठलाही निर्णय आततायीपणे, परिणामांची पर्वा न करता घेतला जायला नको. नाही तर मनाविरुद्ध कोर्स करायला लागण्याहून जास्त पश्चात्ताप व्हायचा!
viva@expressindia.com

