वेदवती चिपळूणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच दिवसांचा आठवडा आणि शनिवार-रविवार सुट्टी ही पाश्चात्त्य देशातली संस्कृती म्हणून ओळखली जाते. पाच दिवस मरमर काम करून, प्रचंड राबून झाल्यावर ‘रिलॅक्स’ म्हणून शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी मिळते. कॉर्पोरेट आणि मल्टिनॅशनल कंपनी आपल्याकडे वाढल्यापासून आपल्याकडेही पाच दिवसांच्या आठवडय़ाची संकल्पना हळूहळू रुजायला लागली. त्यामुळे वीकएंड आऊटिंग आणि पार्टी कल्चर वाढीस लागलं आहे. शुक्रवार रात्र आणि शनिवार रात्र या पार्टी करण्यासाठीच असतात ही संकल्पना घट्ट झाली. अगदी बॉलीवुडी गाण्यांमध्येही हा शनिवार राती.. सूर आळवला गेला आहे.

पाश्चात्त्य देशांत या कल्चरमुळे ‘टीजीआयएफ’ ही संकल्पना प्रसिद्ध होती, तीच आपल्याकडेही प्रचलित झाली आहे. ‘टीजीआयएफ’चं पूर्ण रूप ‘थँक गॉड इट्स फ्रायडे’ असं होतं. पाच दिवस काम करून, घाम गाळून फायनली आपल्याला हवं तसं वागण्याचा दिवस आला म्हणून हे देवाचे आभार ! खरं तर हे केवळ शब्द नसून ही एक संस्कृती आहे, जी परदेशातून आपल्याकडे आलेली आहे. शुक्रवार रात्र म्हणजे पार्टीची रात्र अशी या संस्कृतीची धारणा आहे. ड्रिंक्स, क्लब, डान्स, पार्टी या सगळ्या गोष्टी या संस्कृतीच्या आधारस्तंभ आहेत. दर आठवडय़ाला नवीन कपडे घेणं, नवीन मेकअप करणं अशा गोष्टींवर यांची अर्थसंस्कृती उभी राहते. दोन दिवसाच्या सुट्टीत काय करायचं याचे बेत आठवडाभर सुरूच असतात. दर आठवडय़ाला वेगळं ठिकाण, वेगळं आऊटिंग, वेगळा क्लब, वेगळा कॅफे, वेगळा ग्रुप अशा पद्धतीने ही संस्कृती जपली जाते. एन्जॉय करण्याच्या तरुणाईच्या आवडीला पाच दिवसांच्या आठवडय़ाने खतपाणीच मिळालं आहे. कॉर्पोरेटमध्ये करावी लागणारी प्रचंड मेहनत आणि बुद्धीलाही येणारा प्रचंड शीण घालवायला या दोन दिवसांच्या आऊटिंगची आणि आरामाची गरज असते. ‘टीजीआयएफ’ या हॅशटॅगने सोशल मीडियावरही कल्ला केला आहे.

पाचच दिवस काम करायचं ही मुळात पहिल्यापासून भारतीय संकल्पना नसल्याने आपल्याकडे आपली संस्कृती जपतील अशा कोणत्या गोष्टी वीकएंडला करायची पद्धतच नाही. रविवारची सुट्टी हीसुद्धा ब्रिटिशांनी आपल्याकडे रुजवलेली सवय आहे. जशी मूळ संकल्पना तिथून आली तशा त्याला पूरक अशा इतरही गोष्टी तिथूनच आल्या आहेत. त्यामुळे आपण वीकएंड हा पाश्चात्त्य पद्धतीच्या गोष्टींनीच ‘सेलिब्रेट’ करतो. त्याला कोणताही ‘इंडियन टच’ वगैरे कधीच नव्हता आणि तो फारसा कधी असणारही नाही. मात्र, कामाची संस्कृती आणि त्या ओघाने बदललेली ही जीवनशैली यामुळे साहजिकच तरुणाईच्या डिक्शनरीत या ‘टीजीआयएफ’ शॉर्ट फॉर्ममध्ये दडलेल्या फुल्ल इमोशन्ससह कायमचं प्रेमाचं स्थान मिळालं आहे. अर्थात, या कॉलमच्या निमित्ताने आपली भेटही याच वारी ठरलेली असल्याने मीही प्रेमाने म्हणते, ‘थँक गॉड.. !’

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tgif concept popular in india
First published on: 25-05-2018 at 01:05 IST