भीती..पाण्याची, आगीची, उंचीची..कसलीही! भीती ही मनाची एक अवस्था आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते ती प्रत्येक वेळी भीतीदायक असतेच असं नाही. मात्र कोणतीही भीती काढून टाकण्यासाठी स्वत:च्या मनाला स्वत: समजवावं लागतं. त्यासाठी कधी कधी इतरांचे अनुभवही उपयोगी पडतात. काहीसं अशाच प्रकारचं वातावरण सध्या सोनम कपूरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आहे. १९ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘नीरजा’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तिने प्रसिद्धीचा एक नवा फंडा वापरला. सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या चाहत्यांना स्वत:च्या मनातील भीतीबद्दल सांगणारा व्हिडीओ अपलोड करण्याचे आवाहन केले. मनातली भीती कशी दूर केली हे सांगणारा १५ सेकंदांचा व्हिडिओ #ऋीं१५२ल्ली१्नं या हॅशटॅगने अपलोड करायचा होता. सोनमने तिच्या अकाउंटवरून यातील निवडक व्हिडिओज् रीपोस्ट केले. हा तिचा उपक्रम एकप्रकारे ‘सोशल काउन्सेलिंग’च्या जवळपास जाणारा आहे. चित्रपटाची प्रसिद्धी त्यातून झालीच. शिवाय सर्वाच्या अनुभवांमधून इतरांना उपाय सापडतील, दिशा मिळेल, हिंमत वाढेल, हा यामागचा एक सद्हेतू.
सोनमने रीपोस्ट केलेल्या व्हिडिओजमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. सामान्यत: सर्वानाच भेडसावणारी ‘लोक काय म्हणतील’ या भीतीपासून ते ‘मी काहीही केलं तरी लोक त्यांना हवं तेच बोलणार आहेत’ या विचारापर्यंत पोचलेल्या एका मुलीच्या व्हिडीओला सोनम कपूरने दाद दिली. एका वकील असणाऱ्या मुलीने केवळ आवड म्हणून, पॅशन म्हणून घरच्यांचा विरोध असतानाही ‘फॅशन डिझायनिंग’चं करिअर निवडलं. ‘एवढी चांगली वकिली सोडून हे कसले शिंप्याचे उद्योग’ असे टोमणे ऐकूनही ती मागे हटली नाही. स्वत:च्या आवडीनिवडींचा आदर आपण स्वत:च करायला हवा असं ती म्हणते. ‘स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारणं हा स्वत:मध्ये बदल आणि सुधारणा घडवण्याचा पहिला मोठा टप्पा आहे, इंग्लिश चांगलं नसल्यामुळे ठिकठिकाणी ‘रिजेक्ट’ होण्याची भीती इंग्लिश सुधारूनच ‘ओव्हरकम’ केली’, असं कुलजित सांगते. स्पर्धेची, यशापयशाची आणि इतरांनी जाणूनबुजून पाय खेचण्याची भीती बाळगून कधीच कोणी यशस्वी झालं नाही हे जाणवल्यापासून रोज सकाळी उठताना ‘आय विल विन’ असं म्हणून स्वत:ला हिंमत द्यायला सुरुवात केली असा दिव्याने शोधलेला उपाय आहे. अशा अनेक व्हिडीओजमुळे सध्या इंस्टाग्रामवर सोनम कपूरच्या ‘नीरजा’ची चांगलीच चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • वेदवती चिपळूणकर
More Stories onविवाViva
Web Title: While facing to fear confidence is important
First published on: 04-03-2016 at 01:07 IST