व्हायरलची साथ : जागतिक ‘बुद्धिबळ’ स्पर्धा

यावर्षी पहिल्यांदाच जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या लोगोची इतक्या चवीने चर्चा होताना पाहायला मिळते आहे.

 

लंडनमध्ये २०१८ साली होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेला अद्याप अकरा महिने शिल्लक असले तरी त्याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे. त्याला निमित्त ठरलं दोन आठवडय़ांपूर्वी अनावरण झालेल्या स्पर्धेच्या नव्या आणि वादग्रस्त लोगोचं. ‘फेडरेशन इंटरनॅशनल देस इचेक्स’ (फिडे) आणि ‘इंटरनॅशनल करस्पाँडन्स चेस फेडरेशन’ या दोन आंतरराष्ट्रीय संघटनांतर्फे भरवल्या जाणाऱ्या संघटनांनी स्पर्धेचा नवीन लोगो रशियात मॉस्कोमधील ‘शुका डिझाइन’ या कपंनीकडून तयार करून घेतलाय. २०१६ साली न्यूयॉर्क येथे झालेल्या स्पर्धेचा लोगोही याच कंपनीने तयार केला होता, परंतु यावर्षी पहिल्यांदाच जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या लोगोची इतक्या चवीने चर्चा होताना पाहायला मिळते आहे. केवळ चर्चाच नाही तर विविध तर्कवितर्क लावून आयोजकांना सदर लोगो माघारी घेण्याचा (मोफत) सल्लाही दिला जातोय. विशेष म्हणजे भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथ आनंदनेही मिश्किल भाषेत प्रतिक्रिया नोंदवली आहे.

बुद्धिबळ हा मानवी बुद्धिचातुर्याचा खेळ. एका जागी समोरासमोर बसून ६४ घरांवर अधिसत्ता गाजवण्याचे कौशल्य खेळाडूंना पणाला लावावे लागते. प्रतिस्पध्र्याच्या राजाला शह, म्हणजे मृत्यूचा धाक देऊन मात करणे (हरवणे) हा खेळाचा उद्देश. खेळ सुरू असताना दोन्ही खेळाडू एकमेकांच्या शरीराच्या कुठल्याही भागाला स्पर्श करत नाहीत. मुळात तशी गरजच भासत नाही किंवा कुठलीही शक्यता नसते. परंतु, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या नव्या लोगोमध्ये दोन खेळाडू अतिशय अवघडलेल्या स्थितीत बसून बुद्धिबळ खेळताना दिसतात. शिवाय त्यांच्या समोर दाखविण्यात आलेल्या पटावर केवळ ३६ घरं आहेत. त्यामुळे बुद्धिबळप्रेमींनी स्पर्धेच्या आयोजकांना चांगलंच धारेवर धरलेलं आहे. ‘कामसूत्रा’तील एखाद्या आसनाप्रमाणे असणाऱ्या या लोगोला घेऊन स्पर्धेचा आणि बुद्धिबळाचा प्रचार कसा करायचा असा सवालही उपस्थित केला जातो आहे. असं असलं तरी लोगोचं खुल्या मनाने स्वागत करणारा वर्गही मोठा आहे.

पण मुळात ज्या लोगोबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे तो स्पर्धेचा मुख्य लोगो नसून पर्यायी लोगो आहे. याबाबतची नोंदही इंटरनेटवर ठळकपणे आढळते. इंटरनेटवर स्पर्धेचे दोन्ही लोगो असून स्पर्धेच्या मुख्य लोगोमध्ये केवळ हातांचा वापर केलेला असून अतिशय कलात्मकरित्या दोन व्यक्तींच्या चार हातांऐवजी जास्तीत जास्त हात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुख्य लोगोमध्ये पट ६४ घरांचाच दाखवण्यात आला असून प्रत्येक हातामध्ये महत्त्वाची प्यादीही दिसतात.

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्ताने का होईना वर्षांच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली. कुठल्याही गोष्टीची चर्चा घडवून आणायची असेल किंवा प्रसिद्धी हवी असेल तर प्रवाहाच्या उलटय़ा दिशेलाच हातपाय मारावे लागतात. एरव्ही जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या लोगोचे अनावरण झाल्याची नोंद बातमीच्या चौकटीने घेतली असती आणि विषय तिथेच संपला असता. पण या लोगोच्या निमित्ताने स्पर्धेची चर्चा होत राहील यात शंका नाही.

बुद्धिबळ जगातील सर्वात प्रसिद्ध बैठय़ा खेळांपैकी एक आहे. जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लब्जमध्ये, इंटरनेटवर व विविध स्पर्धामधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो. त्यामुळे नवीन लोगोच्या मागची विचारप्रक्रिया काय असेल याचा अधिक गांभीर्याने आढावा घ्यायला हवा. तो आता वर्षभर कोणत्या ना कोणत्या निमित्ताने घेतला जाईलच आणि त्यातून अधिक रंजक गोष्टी समोर येतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

हे झालं बुद्धिबळाचं. पण गेली दोन वर्षे इंटरनेटवर आणि त्याच्यापलीकडेही जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडतंय-बिघडतंय आणि त्याचा समाजमनावर काय परिणाम होतोय याचा आढावा घेण्याचा प्रयत्न ‘व्हायरलची साथ’ या सदराच्या माध्यमातून केला गेला. विविध घटना, प्रसंग, व्यक्तींच्या आनंदी, करुण कहाण्या सांगताना चांगल्या-वाईट गोष्टींमधून आपण काय धडा घ्यायला हवा हेदेखिल मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. इंटरनेटवर एखादी गोष्ट कशी व्हायरल करायची याचे व्हिडिओ टय़ुटोरिअल्सही आता उपलब्ध आहेत. त्यानुसार प्रमोटेड गोष्टी व्हायरल होत असतातच, पण कोणत्याही फं डय़ांचा वापर न करता लोकांनीच दखल घेऊन व्हायरल केलेल्या गोष्टींचा परिणाम अधिक काळ टिकतो आणि तेच येथेही अधोरेखित केलं जात होतं.

शेवटी आपली स्पर्धा प्रामाणिकपणाशीच आहे. इंटरनेटवर टॉपला व्हायरल होणाऱ्या हॅशटॅग, ट्विट, फेक न्यूज, वादग्रस्त विधानं, व्हिडीओसोबत नाही. खोटी प्रसिद्धी आणि क्षणिक आनंद मिळवण्यासाठी बुद्धीचा फार वापर करावा लागत नाही. पण लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवायचे असेल, योग्य गोष्टी लोकांपर्यंत पोहचवायच्या असतील तर मैदानात उतरून प्रतिस्पध्र्याशी समोरासमोर भिडण्याला आणि बुद्धीचा वापर करण्याला पर्याय नाही. त्याच गोष्टी व्हायरल होत राहतील आणि कायमस्वरूपी स्मरणातही राहतील, हेच खरं.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World chess championship 2018 fide world chess federation

ताज्या बातम्या