इंटरनेटवर तरुणाईचं आवडतं स्थळ म्हणजे यूटय़ूब. वेगवेगळ्या यूटय़ूब चॅनेलवर अनेक व्हिडीओज गाजत असतात. यूटय़ूबवर सध्या एक सुपरवुमन गाजतेय. अनिवासी भारतीयांनी लोकप्रिय केलेल्या सुपरवुमनची अर्थात लिली सिंगची ही गोष्ट.

शाहरुख खानच्या सुहानापासून ते सामान्यांच्या सलोनीपर्यंतच्या यंगस्टर्समध्ये सध्या ‘ती’ पॉप्युलर आहे. ‘तिच्या’ टीशर्टवर अनेकदा अवतरणारा तो बोल्ड ‘एस’ नि वनसाइडेड कॅप.. तिचं बोलणं, तिचं चालणं.. सॉलिड फिदा होण्यासारखं.. हे तरुणाईमध्ये पॉप्युलर कॅरॅक्टर आहे कॅनडास्थित ‘सुपरवुमन’ लिली सिंग. ‘यूटय़ूब’वरच्या अनेक लाडक्या स्टारपकी एक होण्याचं भाग्य लिलीच्या नशिबी आलंय. लिली तशी कोण्या थोरा-मोठय़ाची लेक नाही की काही नाही. अनेक विषयांवरचे पॅरडी व्हिडीओज करता करता आजघडीला ती स्वत:च एक ब्रॅण्ड झाली आहे. तिची ‘सुपरवुमन’ यंगस्टर्समध्ये अगदी हिट आहे. विशेषत: विदेशात राहणाऱ्या भारतीय मुलांमध्ये लिलीची सुपरवुमन खूपच फेमस झाली आहे. पॅरडी करता करता लिलीनं स्वत:चं यूटय़ूब चॅनेल सुरू केलंय आणि या सुपरवुमनबरोबर यूटय़ूबवर झळकायचा मोह साक्षात माधुरी दीक्षितलाही आवरलेला नाहीय हे विशेष.
‘सुपरवुमन’ या नावाचं रहस्य सांगायचं झालं, तर ‘यूटय़ूब’वरचे व्हिडीओज करण्याआधीच तिने हे नाव ठरवलं होतं. त्याच दरम्यान तिला ‘एस’ अक्षर असलेली िरग मिळाली नि ‘सुपरवुमन’ नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यातही मजा म्हणजे ती यूटय़ूबवर ‘युजरनेम’ रजिस्टर करायला गेल्यावर ते आधीच रजिस्टर असल्यानं तिला ‘kIISuperwomanIIlअसं युजरनेम घ्यायला लागलं. या व्हिडीओजमधल्या आयडिया अनेकांना आऊट ऑफ बॉक्स वाटल्या नि ती ‘यूटय़ूब’वर लोकप्रिय ठरली. या व्हिडीओजचे विषय तरी काय होते? तर त्या होत्या आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या काही घटना. मग त्यात एवढं विशेष ते काय? तर आपण या घटनांना एक लेबल लावून मोकळं होतो. पण लिलीला याच घटना प्रेरक वाटल्या. हीच साधीसुधी माणसं तिला ‘लय भारी’ वाटली नि मग त्यांनीच तिच्या व्हिडीओजमध्ये महत्त्वाचं स्थान पटकावलं. मग तो व्हिडीओ ‘टाइप्स ऑफ पेरेंट’ असो, ‘हाऊ गर्ल्स गेट रेडी’ असो, ‘टाइप्स ऑफ किड्स’ असो किंवा ‘शॉिपग’ असो.. ते लोकप्रिय ठरलेत नि ठरताहेत.
बरेच कॉमेडियन्स आधी स्टँडअप करतात नि मग एखाद्या ग्रुपला जॉइन होतात. मात्र तिचं असं नाहीये. अर्थात लिलीचा सगळा कारभार एकहातीच आहे, असंही नाहीये. आतापर्यंत तिनं इतर ‘यूटय़ूबर्स’ आणि काही अॅक्टर्ससोबत काम केलंय. ‘या प्रोजेक्टसमुळं मला बरंच काही शिकायला मिळालं’, असं ती सांगते. ती स्वत:ही स्क्रिनवरच्या ‘सुपरवुमन’एवढीच क्रेझी गर्ल असल्याचं मान्य करते.
तिच्या कामावर माधुरी दीक्षितचा बराचसा प्रभाव दिसतो नि तिला शाहरुख खान, जॉन अब्राहम नि प्रियांका चोप्रा खूप आवडतात. लिली तिच्या मतांशी ठाम असते. आपल्या व्हिडीओतून ती एक प्रकारे एखादा मेसेज देते. फक्त हा मेसेज बोअर न ठरता त्याला आपसूकच तिच्या कॉमेडी नि अॅटिटय़ूडचं ग्लॅमर प्राप्त होतं. ‘ग्लोबल ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्यासारख्या नवख्यांना व्हिडीओ ब्लॉग्ज हा मोस्ट अॅक्सेसेबल प्लॅटफॉर्म होता. हे व्हिडीओज रेकॉर्ड करणं, ते एडिट करणं, हे सगळं काम मी खूप एन्जॉय केलं’, असं लिली तिच्या मुलाखतींतून मोकळंपणानं सांगते. ती कायम ‘पर्सनल मिट अप्स’वर भर देते. आपल्या चाहत्यांसाठी ती ट्विटरवर वेळ ठेवते नि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपल्या व्हिडीओजच्या माध्यमातून देते. तिच्या व्हिडीओजचे सपोर्टर्स जगभर पसरलेत. इंटरनेटवरील आकडेवारीनुसार ४० लक्ष लोकांनी तिला सबस्क्राइब केलंय. हे व्हिडीओज पाहून आमचं लाइफ बदललं हे मान्य करणारे काही फॉलोअर्स तिला प्रत्यक्ष भेटलेत. ती अभिनेत्री नि मॉडेलही आहे. लिलीच्या कुटुंबीयांनी नि मित्रमंडळींनी तिला कायम सपोर्ट केलंय. तिला आपण भारतीय-पंजाबी असण्याचा अभिमान वाटतो. या क्रिएटिव्ह पर्सनॅलिटीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतेय. तिच्या या व्हिडीओजमुळं यंगस्टर्सचे माइंडसेट पॉझिटिव्हली बदलायला मदत होणार असेल तर यू आर ऑलवेज वेलकम ‘सुपरवुमन’.
viva.loksatta@gmail.com