स्वानंद गांगल
बार बार देखो, हजार बार देखो… हे गाणं कानावर पडलं की आपण ते गुणगुणू लागतो, पण त्याच वेळी पटकन डोळ्यांसमोर हातात गिटार घेतलेला मिशीवाला शम्मी कपूर उभा राहतो. हे असं अनेक गाण्यांच्या बाबतीत होतं. फक्त चित्रपटातलीच नाही, तर अगदी यूट्यूबवर किंवा इंस्टाग्राम रीलमध्ये पाहिलेली गाणी जेव्हा पुन्हा कानावर पडतात, तेव्हा त्यातली दृश्यं, त्या गाण्यावर चित्रित झालेलं नृत्य डोळ्यांसमोर उमटतं. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की ये सिर्फ सुनने की नहीं, देखने की चीज है…

तंत्रज्ञानाची प्रगती होऊन जेव्हा रेडिओची जागा टेलिव्हिजन सेट्सने घेतली तेव्हा किंवा भारतात जेव्हा बोलपट, चित्रपट येऊ लागले तेव्हा आपला हा दृकश्राव्य प्रवास सुरू झाला असं नाही. त्याच्याही आधीपासून हा प्रवास सुरू झाला तो लाइव्ह परफॉर्मन्समधून. उदाहरणार्थ बालगंधर्व जेव्हा रंगमंचावर उभे राहायचे तेव्हा रसिक श्रोते फक्त त्यांचं गाणं ऐकायला येत नव्हते, तर ते त्यांना बघायलाही यायचे. बरं ते बघायला येणं म्हणजे फक्त एक स्त्री पात्र करणारा पण विलक्षण सुंदर दिसणारा पुरुष कलाकार पाहणं, इथपर्यंतच ते मर्यादित नसायचं. तो एक दृकश्राव्य अनुभव असायचा. अर्थात, ते संगीत नाटक असल्यामुळे ते अपेक्षितही होतं, पण हेच सूत्र मास्टर दीनानाथ किंवा भीमसेनजी यांच्या मैफिलींनाही लागू होते. आता बदलत्या काळानुसार मात्र त्याची परिभाषा बदलली आहे. नव्या काळाची नवी आव्हानं आणि नवी मागणी उभी राहिली. गाण्याच्या कार्यक्रमात अधिकाधिक ‘व्हिज्युअल एक्सपिरियन्स’ कसा वाढवता येईल यावर भर दिला जाऊ लागला.

Loksatta viva Human Calculator Priyanshi somani
फेनम स्टोरी: ह्युमन कॅल्क्युलेटर प्रियांशी
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
loksatta editorial on payal kapadia won grand prix award at the cannes film festival
अग्रलेख : प्रकाशाचा ‘पायल’ पायरव!
neet student marathi news
‘शिक्षणाच्या फॅक्टरी’तून पळून गेलेल्या एका मुलाची सगळ्यांचे डोळे उघडणारी गोष्ट
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
article about different colours of aurora
ध्रुवीय प्रकाशाचा झगमगाट

याबद्दल बोलताना अशा लाइव्ह कॉन्सर्ट्सचं दिग्दर्शन करणारे पराशेअर एन्टरटेन्मेंट्सचे संस्थापक हर्षद पराशरे यांनी सांगितलं, ‘आजचा प्रेक्षक जेव्हा गाण्याचे लाइव्ह शो पाहायला येतो तेव्हा त्याच्या मनात पहिला प्रश्न असतो की मला नवीन काय मिळणार आहे? कारण आज आमची सांगीतिक भूक भागवणारी अनेक माध्यमं अगदी सहज उपलब्ध आहेत. स्पॉटिफाय, अॅमेझॉन म्युझिकपासून ते यूट्यूब, इन्स्टाग्रामपर्यंत अनेक माध्यमं आहेत, या माध्यमांवर माझ्या सोयीने मी कधीही गाणी ऐकू, पाहू शकतो. मग तरीही मी माझ्या आयुष्यातले २ ते ३ तास खर्च करून एखादा कार्यक्रम किंवा कॉन्सर्ट ऐकायला का जावं? तर यातला जो डिफरन्शिएटिंग फॅक्टर ठरतो, तो आहे व्हिज्युअल एक्सपिरियन्स! तो घेण्यासाठी मी तिथे जातो. मग ज्यात अनेक गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात. कलाकाराचा पेहराव, सादरीकरणाची पद्धत म्हणजे एखादं गाणं मांडी घालून बसून सादर करणं, स्टूल किंवा हाय-आर्म खुर्चीवर बसून सादर करणं किंवा उभं राहून सादर करणं यातून मिळणारा दृश्य अनुभव वेगळा असतो. तेच गाणं, तोच कलाकार, पण अनुभव पूर्णपणे भिन्न. याच भिन्नतेसाठी प्रेक्षक तिकीट काढून कार्यक्रमाला हजेरी लावतात, नाहीतर फुकट असलेल्या कार्यक्रमाकडेही पाठ फिरवतात’.

यात दिग्दर्शकाची भूमिका फार महत्त्वाची ठरते. दिग्दर्शकाला तो शोआधी स्वत:च्या डोक्यात पूर्ण व्हिज्युअलाइज करायला लागतो. तो जर त्याला करता आला, तरच तो प्रेक्षकांपर्यंत तेवढ्या ताकदीने पोहोचवू शकतो. गाण्यांची मैफल आणि लाइव्ह कॉन्सर्ट्स यांच्यातला महत्त्वाचा फरक इथे आहे. याबद्दल हर्षद पराशरे म्हणाले, ‘दिग्दर्शक हा सूत्रधार असतो. तो फक्त शो डिरेक्टर असून चालत नाही, तर त्याला शो डिझायनर असावं लागतं. त्याला शोचं डिझाइन नीट करता आलं तर तो हिट होतो, नाहीतर फ्लॉप ! कलाकार कोण आहे? तो कोणती गाणी सादर करणार आहे? शोची जागा काय? त्यानुसार काय पेहराव चांगला वाटेल? मग त्यानुसार सहकलाकारांचा पेहराव काय असावा? या सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो’. अगदी हवामानाचाही विचार करणं गरजेचं असतं. नाहीतर कलाकार एकतर घामाने बेजार, नाहीतर थंडीने कुडकुडत ! ज्याचा परिणाम अर्थातच सादरीकरणावर होतो. लाइट्सचा खेळ करताना मुख्य कार्यक्रम गाण्याचा आहे, लाइट्सचा नाही याचं भान ठेवावं लागतं. हेज (स्मोक) वापरताना तो प्रमाणाच्या बाहेर नसेल याची खबरदारी घ्यावी लागते, नाहीतर कलाकारच दिसणार नाहीत, अशा विविध बाबींची काळजी घ्यावी लागत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

याव्यतिरिक्त सगळ्यात मोठं आव्हान असतं प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपला अटेन्शन स्पॅन खूपच कमी झाला आहे. सहा सेकंद ही सरासरी आहे. अशा वेळी प्रेक्षकांना तुमच्या कार्यक्रमात गुंतवून ठेवणं फार आव्हानात्मक ठरतं. याला बऱ्याच अंशी सोशल मीडियाची क्रांती जबाबदार आहे. यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर आपल्याला हव्या असलेल्या गाण्यांचे व्हिडीओ किंवा रिल्स आपण बघतो, ती आवडली तर पुन्हा पुन्हा बघतो. पण नाही आवडली तर काही सेकंदांतच स्क्रोल करून पुढे सरकतो. उदाहरणार्थ ‘गुलाबी साडी’ सारखं गाणं घेऊ किंवा कोक स्टुडिओमधली ‘खलासी’ किंवा ‘आफरिन’ सारखी गाणी घेऊ. ही गाणी त्या कलाकारांनी इतरही व्यासपीठांवर गायली, पण जितकी पसंती या व्यासपीठांवर मिळाली तेवढी इतर ठिकाणी नाही मिळाली. याला कारण ठरला तो व्हिज्युअल एक्सपिरियन्स.

‘लाइव्ह कार्यक्रमातही आता तसंच आहे. तुमच्या कार्यक्रमात सादर होणारी गाणी लोकांनी ऐकली आहेत. त्याची पारायणंही केली आहेत. तरीही तुमच्या कार्यक्रमात ती ऐकायला लोक येतात, कारण त्यांना वेगळा काहीतरी अनुभव घ्यायचा आहे. तो तुम्ही कसा देता त्यावर कार्यक्रमाचं यश अवलंबून आहे. तो अनुभव ठरवणार आहे की प्रेक्षक खिश्यातून त्यांचा मोबाइल नेमका कशासाठी काढणार? स्वत:चा सोशल मीडिया बघायला की तुमचं सादरीकरण शूट करून त्यांच्या सोशल मीडियावर टाकायला…’ असंही त्यांनी सांगितलं.

मग यात प्रेक्षकांना कार्यक्रमात सहभागी करून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यांच्याशी मध्ये मध्ये संवाद साधणं. मग तो संवाद फक्त गप्पांमधून नसतो. देहबोलीतून असतो, नजरेतून असतो, हावभावातून असतो आणि एका छानशा स्माईलमधूनसुद्धा असतो. मग कधी त्यांना टाळ्यांसाठी आग्रह केला जातो, तर कधी मोबाइलचे फ्लॅशलाइट मारायला सांगितलं जातं, तर कधी थेट फर्माईश विचारली जाते. गाणं बघताना वादन बघणं हाही एक वेगळा अनुभव असतो. तो पण तितकाच महत्त्वाचा असतो आणि प्रेक्षकांना हवा असतो. मग त्या वाद्यावृंदातले कलाकार वादन करताना कसे बसले आहेत, इथपासून ते कसे ग्रेसफुली वाजवतायेत अशा अनेक गोष्टी पाहिल्या जातात. मग एखादं नवीन वाद्या असेल तर त्याची माहिती प्रेक्षकांना सांगितली जाते. दोन वादकांमधली जुगलबंदी, गायक आणि वादक यांच्यातील जुगलबंदी, गायक आणि वादक यांच्यातील समन्वय असे अनेक खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात आणि त्यांना गुंतवून ठेवले जाते. पण हे करताना पंगतीच्या ताटात कोशिंबीर किती वाढायची आणि भाजी किती वाढायची याचं भान असणं गरजेचं आहे.

असं म्हणतात की दृकश्राव्य गोष्टी आपल्या सगळ्यात जास्त स्मरणात राहतात, पण हेही तितकंच खरं आहे की आपण कोणत्या आठवणी जपून ठेवायच्या हे माणूस फार चोखंदळपणे ठरवतो. तेव्हा दृकश्राव्य आहे म्हणून एखादा कार्यक्रम रसिकांच्या स्मरणात राहीलच असं नाही. त्यासाठी तेवढी मेहनत घेऊन नव्या पद्धतींचा अवलंब करून त्यांच्यापर्यंत तो व्हिज्युअल एक्सपिरियन्स पोहोचवावा लागेल. मग तो केवळ त्यांच्या मोबाइलमध्ये नाही तर मनातही कैद होईल. अगदी कायमचा!!

viva@expressindia.com