केंद्रीय प्रशासकीय सेवेत (यूपीएससी) करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणींना यशाचा मंत्र देण्यासाठी या वेळच्या ‘व्हिवा लाऊंज’मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा पाटणकर- म्हैसकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या जडणघडणीची ओळख व्हिवा लाऊंजमधून उलगडत असते. मनीषा म्हैसकर या राज्यातील एक आघाडीच्या व कर्तबगार आयएएस अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत. त्या १९९२च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद स्वीकारण्याआधी त्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक म्हणून काम केले आहे. त्यांची विद्यार्थिदशा, आयएएस परीक्षेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत व सरकारी अधिकारी म्हणून काम करताना आलेले अनुभव असे व्यक्तिगत जीवनाचे अनेक पैलू या निमित्ताने उलगडले जाणार आहेत. ख्यातनाम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत.
तारीख : २९ मार्च २०१३
वेळ : दुपारी ३ वाजून ३० मिनिटे
स्थळ : पु.ल. देशपांडे मिनी थिएटर, प्रभादेवी  
प्रवेश सर्वासाठी खुला आहे.