यंदा पावसाळा भारीच लवकर चालू झाला आहे. वळवाचा वाटणारा पाऊस आता जवळपास मोसमी पर्जन्यकाळ म्हणून ठिकठिकाणी बरसू लागला आहे. पावसाने दिलेल्या सुखद धक्क्यामुळे सगळ्यांचीच थोडी तारांबळ उडाली आहे. पावसासाठी छत्र्या, रेनकोट, काही विशिष्ट कपडे अशी तयारी आधीच करून पावसाळ्यासाठी पूर्ण रेडी राहण्यात जरा गडबडच झाली. रोजच्या प्रवासातही, बाहेर पडताना प्रत्येक जण पावसाळ्यात घालण्यासाठी म्हणून कपड्यांची वेगळी अशी तयारी करून ठेवतात. मुंबई-पुण्यासारख्या दमट आणि ओल्या वातावरणात फॅशनची सगळी गणितं सांभाळून कपड्यांची काळजी घ्यावीच लागते.

हलके आणि लवकर सुकणारे फॅब्रिक

पावसाळ्यासाठी कपड्यांची निवड करताना फॅब्रिकला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागते. या वर्षी हलक्या वजनाचे आणि लवकर सुकणारे फॅब्रिक ट्रेंडमध्ये आहेत. कॉटन जरी आरामदायक असले तरी ते लवकर ओले होते आणि सुकायला वेळ लागतो. त्यामुळे जॉर्जेट, शिफॉन, रेयॉन आणि सिंथेटिक मटेरिअलचे कपडे उत्तम ठरतात. हे फॅब्रिक लवकर सुकतात आणि त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या ओलसरपणामुळे होणारी अस्वस्थता कमी होते. उदाहरणार्थ, जॉर्जेट किंवा शिफॉनचे फ्लोरल प्रिंटचे कुर्ते किंवा टॉप्स दिसायला अतिशय सुंदर आणि स्टायलिश दिसतात. त्याचबरोबर, रेयॉनचे लूज फिटिंगचे पॅन्ट किंवा पलाझो तुम्हाला आरामदायी अनुभव देऊ शकतात.

ट्रेंडी आऊटरवेअर

पावसाळ्यात थंड हवा आणि अचानक येणाऱ्या सरींपासून बचाव करण्यासाठी योग्य आऊटरवेअर निवडणे महत्त्वाचे आहे. या वर्षी ट्रेंच कोट आणि वॉटरप्रूफ जॅकेट्स फॅशनमध्ये आहेत. हलक्या वजनाचे आणि ब्राइट रंगांचे विंडचीटर हादेखील एक चांगला पर्याय आहे. उदाहरणार्थ, नी-लेंथ ट्रेंच कोट वेस्टर्न वेअरसोबत खूप स्टायलिश दिसतो. तर, रंगीत वॉटरप्रूफ जॅकेट्स तुमच्या कॅज्युअल लुकला एक फंकी टच देतात.

ड्रेसेस

शक्यतो शर्ट पॅन्ट किंवा बॉटम-टॉप घालायला पावसाळ्यात नको वाटतं, कारण कितीही काळजी घेतली तरी धुवाधार पावसात भिजायला होतंच. त्यामुळे खास पावसाळ्यासाठी मुलींमध्ये मिडी-ड्रेसेस हा प्रकार सध्या खूप ट्रेंडिंग आहे. यात असंख्य स्टाइल्सचे पर्याय उपलब्ध आहेत, जे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे, वेगेवगेळ्या ठिकाणी अगदी सहज घालू शकता.

मिडी ड्रेसेस

गुडघ्याखालील लांबीचे मिडी ड्रेसेस पावसाळ्यासाठी सोयीचे आणि स्टायलिश ठरतात. फ्लोरल प्रिंट्स किंवा सॉलिड ब्राइट कलर्समधील मिडी ड्रेसेस सध्या ट्रेंडी आहेत. यामध्ये फॉर्मल प्रकारसुद्धा मिळतात, जे तुम्ही ऑफिसला घालून जाऊ शकता. पावसाळी फुटवेअरमध्येही फॉर्मल शूज मिळतात जे या ड्रेसवर अगदी छान सूट होतील.

शर्ट ड्रेसेस

बटन-डाऊन स्टाइलचे शर्ट ड्रेसेस नेहमीच क्लासी दिसतात. तुम्ही ते बेल्ट लावून किंवा लूज फिटिंगमध्येही घालू शकता. हलक्या फॅब्रिकमधील शर्ट ड्रेसेस पावसाळ्यात आरामदायक वाटतात. तसेच, हे शर्ट्स जॉर्जेटमध्येही उपलब्ध आहेत. हे फॅब्रिक पावसाळ्यात सोयीचे ठरते.

ए-लाइन ड्रेसेस

ए-लाइन सिल्वेटचे ड्रेसेस कोणत्याही बॉडी टाइपला सूट करतात. प्रिंटेड किंवा प्लेन रंगातील ए-लाइन ड्रेसेस पावसाळ्यासाठी एक चांगला आणि स्टायलिश पर्याय आहे.

को-ऑर्ड सेट

सिंथेटिक किंवा पातळ कपड्यातसुद्धा को-ऑर्ड सेट मिळतात. मान्सून ट्रिपसाठी हा जीन्स ऐवजी उत्तम पर्याय आहे. हे कॅरी करायला अगदी हलके, ट्रेंडी आणि स्टायलिश लुक, प्रिंट्समध्ये उपलब्ध असतात शिवाय, दिवसभर हे को-ऑर्ड सेट्स घालून वावरू शकतो. या कपड्यांचा अजून एक फायदा म्हणजे कुठल्याही वयातील स्त्री-पुरुष दोघांसाठीही को ऑर्ड्सचे हटके पर्याय उपलब्ध आहेत.

कपड्यांच्या फॅशन तर आवड आणि गरज म्हणून आपण करतोच, पण सध्या सगळ्यात महत्त्वाचं आहे रेनकोट. आता साधा प्लास्टिक रेनकोट नाही तर त्यामध्येही अनेक वेगवेगळे प्रकार उपलब्ध झाले आहेत.

ट्रेन्च कोट स्टाइल रेनकोट

हा रेनकोटचा एक क्लासिक प्रकार आहे. याची लांबी साधारणपणे गुडघ्यापर्यंत असते आणि त्याला बटणं व बेल्ट दिलेला असतो. हा वेस्टर्न वेअरसोबत खूपच स्टायलिश दिसतो. जर तुम्हाला फॉर्मल लुक हवा असेल किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल, तर हा प्रकार तुमच्यासाठी उत्तम आहे. हे रेनकोट वॉटर-रेझिस्टंट फॅब्रिकमध्ये उपलब्ध असतात.

पोंचो

पोंचो हा रेनकोटचा एक आरामदायक आणि स्टायलिश प्रकार आहे. हा अगदी लूज रेनकोट असतो आणि तो डोक्यावरून घातला जातो. याची खासियत म्हणजे तो कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर सहजपणे घातला जाऊ शकतो. पोंचो एक चांगला पर्याय आहे. हे विविध रंग आणि प्रिंट्समध्ये उपलब्ध असतात, ज्यामुळे ते फॅशनेबलही दिसतात.

विंडचीटर

विंडचीटर हे हलक्या वजनाचे आणि कॉम्पॅक्ट रेनकोट असतात. हे प्रामुख्याने वादळीवाऱ्यापासून आणि हलक्या पावसापासून बचाव करण्यासाठी बनवलेले असतात. हे सहजपणे फोल्ड करून बॅगेत ठेवता येतात, त्यामुळे अचानक आलेल्या पावसासाठी ते उत्तम ठरतात. स्पोर्ट्स वेअर किंवा कॅज्युअल वेअरसोबत हे छान दिसतात आणि विविध रंगांमध्ये उपलब्ध असतात.

फुल-बॉडी रेनकोट

ज्या लोकांना जोरदार पावसात किंवा बाइक चालवताना संरक्षणाची जास्त गरज असते, त्यांच्यासाठी फुल-बॉडी रेनकोट उत्तम पर्याय आहे. यात जॅकेट आणि पॅन्टचा समावेश असतो, ज्यामुळे संपूर्ण शरीर पावसापासून सुरक्षित राहते. सतत बाहेर काम करावं लागणाऱ्यांना, तसंच नियमितपणे दुचाकी वापरणाऱ्यांसाठी हा प्रकार खूप उपयोगी आहे.

ट्रान्सपरंट रेनकोट

आजकाल ट्रान्सपरंट रेनकोटची फॅशन खूप लोकप्रिय आहे. हे दिसायला स्टायलिश असतात आणि तुमच्या आतील कपड्यांची स्टाइलही त्यातून दिसते. हलक्या पावसासाठी हा एक चांगला पर्याय आहे आणि तो फॅशन स्टेटमेंट म्हणूनही वापरला जातो. हे रेनकोट लहान मुलांच्या फॅशनमध्येही फार आकर्षक दिसतात.

पावसाळ्यातील फॅशन म्हणजे स्टाइल आणि सोयीचा योग्य समन्वय साधणे. हलके फॅब्रिक, चमकदार रंग, ट्रेंडी आऊटरवेअर आणि आरामदायक वॉटरप्रूफ फुटवेअर यांचा वापर करून तुम्ही या ऋतूतही स्टायलिश आणि कम्फर्टेबल राहू शकता. तर मग, या पावसाळ्यात या नवीन ट्रेंड्स नक्की ट्राय करा!

रेनकोट निवडताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

फॅब्रिक: रेनकोट वॉटरप्रूफ फॅब्रिकचा असावा. नायलॉन किंवा पॉलिस्टरसारखे फॅब्रिक उत्तम ठरतात.

फिटिंग: रेनकोट जास्त घट्ट किंवा खूप ढिला नसावा. तो आरामात घातला जाईल अशा मापाचा असावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुणवत्ता: चांगल्या प्रतीचा रेनकोट जास्त काळ टिकतो, त्यामुळे खरेदी करताना गुणवत्तेकडे लक्ष द्या. सोय: काही रेनकोटमध्ये पॉकेट्स आणि हुड (Hood) दिलेले असतात, ते असतील तर तुम्ही तसे रेनकोटसुद्धा घेऊ शकता.