युरोपीयन हायस्ट्रीट मार्केटच्या जवळ जाणारा ‘ग्रेट इंडियन बझार’ मुंबईत अवतरला तर? हे फक्त स्वप्न नाही, तर विविध देशातल्या तज्ज्ञांनी याचा प्लॅन कागदावर उतरवला आहे. मुंबईतला शॉपिंग एक्स्पिरिअन्स या ग्रेट इंडियन बझारनं बदलला तर उद्या आश्चर्य वाटायला नको.

लंडनसारख्या शहरात शॉपिंग करायला जाणारे तिथल्या बाजाराच्या नक्कीच प्रेमात पडतात. लंडनच नाही तर संपूर्ण युरोपात हे छोटय़ा, गजबजलेल्या रस्त्यांवरही आटोपशीर जागेत उभे केलेले बाजार दिसतात. काही दुकानं तिथं परमनंट असली तरी अनेक स्टॉल्स हे तात्पुरते असतात. ठरावीक वेळेकरिता उभारलेला बाजार नंतर पाहावा तर तिथे नसतो. बाजारच्या रस्त्याला सहसा ‘हायस्ट्रीट मार्केट’ असं म्हणतात. ही हायस्ट्रीट मार्केटची संकल्पना उद्या मुंबईत दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण मुंबई हायस्ट्रीट बाजार होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले आहेत.
लंडनसारख्या जुन्या शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे जागा अपुरी पडू लागली; तेव्हा हा फिरता बाजार सुरू झाला. मुंबईसुद्धा अशाच काहीशा अडचणीत पडलीये. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा फिरता बाजार मुंबईकरांसाठीसुद्धा निश्चित सोयीचा ठरेल. ‘इंटरनॅशनल काऊन्सिल ऑफ सोसायटीज ऑफ इंडस्ट्रियल डिझाईन (आय. सी. एस. आय. डी.)’ आणि ‘वेिलगकर इन्स्टिटय़ूट (वुई स्कूल)’ यांच्यातर्फे गेल्या महिन्यात प्रदर्शन उभं केलं होतं. त्यामध्ये या ग्रेट इंडियन बाजाराची संकल्पना मांडण्यात आली. हे ‘ह्य़ुमनायिझग मेट्रोपॉलीज’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन होतं आणि भारतातल्या ३०, तसंच परदेशातल्या ८ डिझायनर्सनी मिळून हे प्रदर्शन उभं केलं. त्यात ‘झीरो वेस्ट हाऊस’, ‘हेल्थ ऑन द गो’ यांसारख्या संकल्पनांवर आधारित प्रोटोटाइप्स प्रदíशत केले गेले. त्यातली ‘ग्रेट इंडियन बाजार’ ही संकल्पना युरोपीयन ‘हायस्ट्रीट मार्केट’च्या जवळ जाणारी होती. या विषयावर काम करणाऱ्या डिझायनर प्रतिमा खडके म्हणतात की, ‘मुंबईतला बाजार एकाच जागी ठाण मांडून बसतो आणि खूप जागा अडवतो. तेव्हा तो सोयीस्कररीत्या फिरता कसा ठेवता येईल, तसंच कमी जागेत अधिक विक्री कशी करता येईल, याचे काही उपाय आम्ही सुचवले. अगदी आईस्क्रीमसारख्या गाडय़ा जरी आपण भाज्यांकरिता वापरल्या तरी त्या भाज्या ताज्या-ताज्या मिळू शकतील आणि फोल्डिंगच्या गाडय़ा पोर्टेबलसुद्धा असतील. या उपाययोजना प्रत्यक्षात आणण्याजोग्या असल्यामुळे सरकार याची दाखल घेईल अशी अपेक्षा मी करते.’
सलग १५ दिवस मुंबईचा अभ्यास करून प्रदर्शनात सहभागी डिझायनर्सनी हे अनेक उपाय आणि योजना सुचवल्या आहेत. यात निचरा प्रणाली, कचरा व्यवस्थापनापासून ते अगदी शैक्षणिक, सामाजिक व जीवनशैलीशी निगडित असलेल्या समस्यांचा अभ्यास होता. या प्रदर्शनाला एम.एम.आर.डी.च्या आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावली. त्यामुळे मुंबईकरांना हा ग्रेट इंडियन बझार प्रत्यक्षात येण्याची किमान स्वप्नं तरी रंगवायला निश्चितच हरकत नाही. थोडक्यात काय, माटुंग्यातील फाईव्ह गार्डनसारख्या ठिकाणी दर आठवडय़ात एखादा मेळावा भरावा, मुंबईतले स्पीड ब्रेकर्स थ्री आर्टने सजवलेले असावेत, शाळांप्रमाणेच इतर अनेक इमारतीसुद्धा वॉल पेंटिंगने नटाव्यात, शहरातलं प्रदूषण कमी व्हावं.. अशी स्वप्नं पाहणारे तुम्ही एकटेच नाहीत. अभ्यासू तज्ज्ञ ऑलरेडी त्यासाठी योजना आखायला लागले आहेत. त्यामुळे मुंबईतला शॉपिंग एक्स्पिरिअन्स पुढच्या काही वर्षांत बदलला, तर आश्चर्य वाटायला नको.