scorecardresearch

आधी फोटोबा

मग यात घरच्या वरणभातापासून ते पंचतारांकित हॉटेलमधील कॉन्टिनेन्टल पदार्थ व्हाया स्ट्रीट फूड सगळं काही मुखात जाण्याआधी मोबाइलच्या गॅलरीत जाऊन बसतं.

food viva

स्वानंद गांगल

आपले पूर्वज फार विचारपूर्वक म्हणी देऊन गेले, पण आता कालानुरूप त्याच्यात बदल करण्याची वेळ आली आहे. माणसासाठी प्राधान्यक्रमात विठोबाच्या आधी पोटोबा येतो हे आजही खरंच आहे. पण फोनच्या संपर्कात येऊन ‘स्मार्ट’ झालेल्या माणसासाठी आता हा क्रम आणखी बदलला आहे. आता पोटोबाच्या आधीही ‘फोटोबा’ येऊ लागला आहे. मग यात घरच्या वरणभातापासून ते पंचतारांकित हॉटेलमधील कॉन्टिनेन्टल पदार्थ व्हाया स्ट्रीट फूड सगळं काही मुखात जाण्याआधी मोबाइलच्या गॅलरीत जाऊन बसतं.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजांमध्ये पहिला क्रमांक अन्नाचा लागतो. ही गरज आम्ही कशी भागवतो हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाला ओरडून सांगण्यात आम्हाला अधिक रस असतो. असं म्हणतात की अस्सल खवय्या कोणत्याही पदार्थाची समीक्षा ही तीन पातळींवर करतो. पहिले म्हणजे पदार्थ दिसतो कसा? दुसरं म्हणजे त्या पदार्थाचा गंध आणि सगळय़ात शेवटी परीक्षण होते ते चवीचे. पण आता मानवी नजरेला खाद्य पदार्थ कसा दिसतो इथपर्यंत हे मर्यादित राहिलेलं नसून ‘कॅमेराच्या लेन्स’ला तो कसा दिसतो याला अधिक महत्त्व येऊ लागलं आहे. याचा संबंध फक्त सामान्य माणूस मोबाइलमध्ये टिपत असलेल्या छायाचित्रांशी नसून ‘फूड फोटोग्राफी’ या व्यावसायिक गरजेशी आहे.

फूड फोटोग्राफी ही आता फक्त आवड किंवा छंद इथपर्यंतच मर्यादित राहिलेली नाही, त्याला व्यावसायिक रूप आले आहे. सध्या फोटोग्राफी क्षेत्रात फूड फोटोग्राफी ही नवीन शाखा वाढताना दिसते आहे. आज बाजारात या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना चांगली मागणी आहे. तर हीच मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचाही या शाखेकडे ओढा वाढताना दिसतो आहे. या बदलत्या ट्रेंडविषयी माहिती देताना ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’च्या ‘स्कूल ऑफ फोटोग्राफी’मध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि प्रोग्राम डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेले अक्षय शिंत्रे म्हणाले ‘‘सध्या फोटोग्राफी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फूड फोटोग्राफीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. एकूण २० – २५ टक्के विद्यार्थी हे या क्षेत्राकडे वळतात. अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना या विषयातले धडे दिले जातात. ज्यामध्ये त्यांना भारतीय आणि पाश्चिमात्य खाद्य पदार्थाची वैशिष्टय़े, फोटोग्राफीसाठी आवश्यक असणारे पदार्थाचे गुणधर्म, फोटो अधिक आकर्षक व्हावेत यासाठी करायच्या क्लृप्तय़ा, एडिटिंगमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा अशा अनेक बाबी शिकवल्या जातात. विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षांतील स्पेशलायझेशनसाठी आणि मास्टर्ससाठी सुद्धा फूड फोटोग्राफी हा विषय उपलब्ध असतो. या क्षेत्रात करिअर करू बघणाऱ्या तरुणांना खाद्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बडय़ा कंपन्या, पंचतारांकित हॉटेल्स इथपासून ते मुक्त छायाचित्रकार (फ्रीलान्सर) म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.’’

भारतीय खाद्यसंस्कृती मुळातच फार समृद्ध आहे. इथे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक प्रांताची स्वतंत्र चव आहे. स्वत:चे असे खाद्यपदार्थ आहेत. एकटय़ा महाराष्ट्राचा विचार केला तरी कोकण, विदर्भ, खान्देश अशा प्रत्येक क्षेत्राची वेगळी खाद्यसंस्कृती आढळते. त्यात १९९१ साली झालेली ‘खाऊ जा’ क्रांती नावाप्रमाणे खाद्य क्षेत्रावर भरपूर परिणाम करून गेली. भारतीय माणसाची बर्गर, पिझ्झा, पास्ता, चायनीज, मेक्सिकन अशा सर्व प्रकारच्या खाद्यसंस्कृतीशी ‘तोंड ओळख’ झाली. त्यात झपाटय़ाने बदलणारी जीवनशैली आणि कामाचे स्वरूप याचा परिणाम भारतीयांच्या आहार विषयक सवयींवरही झाला.

आज स्थिती अशी आहे की भारतातले खाद्य आणि अन्नप्रक्रिया क्षेत्र फार वेगाने वाढते आहे. भारताची लोकसंख्या ही एक फार मोठी बाजारपेठ या क्षेत्रासाठी आहे. यासोबतच झपाटय़ाने वाढणारे क्यूएसआर, क्लाउड किचन, फूड डिलिव्हरी कंपन्यांचे जाळे, ईकॉमर्स, तसेच सेल्स आणि मार्केटिंगमध्ये वाढता डिजिटल मीडियाचा वापर यामुळे चांगल्या फूड फोटोग्राफर्सना मागणी आहे. याविषयीचा आपला अनुभव सांगताना झोमॅटोशी संलग्न असलेले मुक्त छायाचित्रकार ओंकार कोंजारी यांनी सांगितले की, ‘‘आज अनेक मोठय़ा उद्योगांप्रमाणेच छोटे व्यावसायिकसुद्धा फूड फोटग्राफीसाठी पैसे खर्च करायला तयार असतात. ते याकडे खर्च म्हणून न बघता गुंतवणूक म्हणून बघतात. कारण फूड फोटोग्राफीमुळे व्यवसायात वृद्धी आल्याची अनेक उदाहरणे आज आहेत. खास करून जेव्हा ऑनलाइन एखादा पदार्थ मागवला जातो तेव्हा त्या पदार्थाचा फोटो आकर्षक असेल तर त्याचा खूप जास्त फायदा होतो. तसेच नव्या उद्योजकांसाठी त्यांच्या पदार्थाचे फोटो हीच त्यांची सगळय़ात मोठी जाहिरात असते. त्यामुळे याची मागणी वाढताना दिसते आहे. अगदी कोविड काळातही या क्षेत्रात काम करणाऱ्या फोटोग्राफर्सकडे काम होते. कारण हॉटेल व्यवसाय हा फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या माध्यमातून सुरू होता आणि अशात आपल्या पदार्थाचे फोटो हे ग्राहकाला आकर्षित करण्याचे एक महत्त्वाचे साधन होते.’’

फूड फोटोग्राफीमध्ये पॅकेज फूडच्या फोटोग्राफीलाही बरीच मागणी आहे. कारण हल्ली या प्रकारातले अनेक खाद्य पदार्थ हे ईकॉमर्स वेबसाईट्सवर विक्रीसाठी उपलब्ध असतात. तर त्यासोबतच पदार्थाचे पॅकेजिंग बनवताना त्यावर पिंट्र करण्यासाठी फोटोग्राफची आवश्यकता असते. त्या जोडीलाच हल्ली जवळपास सगळेच व्यावसायिक हे सोशल मीडियाचा वापर करतात. इथेही हे फोटोज टाकले जातात. पण अनेकदा आपण या पाकिटांवर लिहिलेली एक सूचना वाचतो की फोटोमधील पदार्थ आणि प्रत्यक्षातील पदार्थाचा रंग आणि आकार यात तफावत असू शकते. असे का होते? कारण फूड फोटोग्राफी करताना फोटो अधिक आकर्षक दिसावा यासाठी काही ‘जुगाड’ केलेले असतात. यात एडिटिंग आणि इमेज करेक्शनमध्ये रंगांशी खेळण्यापासून ते प्रत्यक्ष पदार्थाऐवजी वेगळंच काहीतरी वापरणे असे अनेक प्रकार त्यात येतात.

म्हणूनच फूड फोटोग्राफी ही इतर शाखांच्या तुलनेत अधिक आव्हानात्मक तर असतेच, पण त्यासोबतच यात फोटोग्राफरच्या कल्पकतेचा कस लागतो. यात मोठे आव्हान असते ते म्हणजे ताज्या आणि नाशवंत पदार्थाच्या फोटोग्राफीचे किंवा मसालेदार पदार्थाच्या फोटोग्राफीचे. यासाठी अनेक वेगवेगळय़ा क्लृप्तय़ा लढवल्या जातात. ‘‘अनेकदा आम्हाला खाद्य पदार्थाचे आकर्षक फोटो येण्यासाठी काही आयडिया वापराव्या लागतात. उदाहरणार्थ समजा आम्हाला किसलेले खोबरे दाखवायचे आहे, पण जेव्हा आपण खोबरे किसताना बघतो तेव्हा त्या किसाचा प्रत्येक कण हा सुटा नसतो, तो एकमेकांना चिकटलेला असतो. फोटोसाठी हे आकर्षक नसते. मग अशा वेळी विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक वापरून त्याचा किस वापरला जातो. जो फोटोसाठी वापरला जातो. आम्ही अनेकदा पूर्ण शिजवलेल्या अन्न पदार्थाऐवजी अर्धवट शिजवलेल्या अन्न पदार्थाचे फोटो काढतो. कारण ते फोटोग्राफीच्या दृष्टीने अधिक सोयीचे ठरतात. पनीर, दूध अशा पांढऱ्या रंगाच्या पदार्थाचे फोटो काढताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. मग अशा वेळी पांढऱ्या शुभ्र पदार्थाचा फोटो न काढता दुसऱ्या रंगाचा आधार घेतला जातो आणि नंतर एडिटिंगमध्ये तो रंग काढून टाकला जातो’’ असे मुक्त छायाचित्रकार संदेश जाधव सांगतात.

फूड फोटोग्राफी क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढते आहे. त्याला अनुकूल असे वातावरण आणि संधीही उपलब्ध आहेत. फक्त यात काही अडचणीही आहेत. जसं हल्ली जवळपास सगळय़ा मोबाइलमध्ये चांगल्या प्रकारचे कॅमेरा उपलब्ध आहेत. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी छोटे व्यावसायिक हे स्वत:च फोटोग्राफी करतात किंवा फोटोग्राफरच्या तुलनेत इंटरनेटवरचे स्टॉक फोटो हा स्वस्तातला पर्याय ठरतो. पण असं असलं तरीही एका चांगल्या, कल्पक फूड फोटोग्राफरला संधी आहेतच. असं म्हणतात की मनुष्याच्या हृदयाचा रस्ता हा पोटातून जातो. पण पोटापर्यंतची वाट फोटोतून जाते आणि वाटाडय़ा असतो फूड फोटोग्राफर!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priority for man from home continental food in a five star hotel viva article ysh

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×