विनय जोशी

गेल्या आठवड्यात ६ फेब्रुवारीला सुरक्षित इंटरनेट दिन होऊन गेला. इंटरनेटच्या सुरक्षित वापराला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश. पण इंटरनेटचा अतिरेकी वापर बघता सायबर साक्षरतासोबतच सायबर निरामयताही तितकीच महत्त्वपूर्ण ठरते.

Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या? या प्रश्नाच्या ‘अन्न, वस्त्र आणि निवारा’ या पारंपरिक उत्तरात आता आणखी एक भर पडली आहे इंटरनेटची. फक्त सर्फिंग आणि एन्टरटेनमेंट एवढाच उपयोग न राहता इंटरनेट आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शॉपिंग, बँकिंग, डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया, हॉटेलिंग अशा अनेक कारणांसाठी इंटरनेटचा वापर होतो आहे. आणि या वाढत्या वापरासोबतच अनेक धोके आणि आव्हानेही उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर इंटरनेटच्या सुरक्षित वापराविषयी सजगता दिवसेंदिवस गरजेची ठरते आहे.

गेल्या आठवड्यात ६ फेब्रुवारीला सुरक्षित इंटरनेट दिन (सेफर इंटरनेट डे) होऊन गेला. गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन सेफ्टीच्या दृष्टीने सेफ इंटरनेट डे हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम बनला आहे. एव SafeBorders प्रकल्पाचा भाग म्हणून २००४ मध्ये युरोपियन युनियनमध्ये पहिल्यांदा असा दिवस साजरा करण्यात आला. विशेषत: तरुणांमध्ये इंटरनेटच्या सुरक्षित आणि अधिक जबाबदार वापराला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश होता. पुढच्या काही वर्षांतच या उपक्रमाला गती मिळाली आणि युरोपच्या पलीकडे याचा विस्तार झाला. डिजिटल युगातील नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जगभरातील अनेक देश या उपक्रमात सहभागी होऊ लागले. गेल्या वीस वर्षांत सेफ इंटरनेट डे या उपक्रमाची पोहोच आणि प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येतो आहे. २०१२ पासून एक थीम ठरवून त्याला अनुसरून याविषयी जगभर उपक्रम राबवले जात आहेत. या वर्षीची थीम आहे ‘टुगेदर फॉर अ बेटर इंटरनेट’.

हेही वाचा >>> जुनंच प्रेम, नवं सेलीब्रेशन

सायबर हल्ला, हॅकिंग, फिशिंग, आर्थिक फसवणूक असे सायबर गुन्हे फक्त मोठ्या कंपन्या किंवा सेलिब्रेटींच्या बाबतीत होतात असा गैरसमज सर्वसामान्यांमध्ये आढळतो. इंटरनेटमुळे अवघे जग जसे वैश्विक खेडे झाले आहे तसे आपण सगळेच जण सायबर गुन्हेगारांच्या टप्प्यातदेखील आलो आहोत. एरवी टेकसॅव्ही म्हणून मिरवणारी तरुणाईदेखील सायबर सुरक्षेच्या बाबतीत काहीशी निष्काळजीपणा करताना दिसते. मालवेअर, व्हायरस अटॅक, आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंग असे जुने सायबर धोके आहेतच, पण सोशल मीडियाच्या वाढत्या वापरातून काही नव्या समस्यादेखील तयार होत आहेत. पासवर्ड स्ट्राँग ठेवला आणि अँटी व्हायरस टाकला की आपण सेफ या गोड गैरसमजातून या नव्या सायबर जोखिमांविषयी एकंदरीतच अनास्था आढळून येते आहे.

सतत अपडेट टाकण्याच्या नादात आपले खासगीपण नकळत गमावतो आहोत याविषयीचे भान हरपताना दिसते आहे. ‘सबसे पहले, सबसे तेज’च्या नादात आलेले मेसेज कुठलीही सत्यता न पडताळता सर्रास फॉरवर्ड केले जातात. डिजिटल प्लॅटफॉर्मवर बदनामी, ट्रोलिंग करत मानसिक छळ करणे म्हणजे ‘सायबर बुलिंग’चे प्रमाणही सातत्याने वाढताना दिसते आहे. आपल्या पोस्ट, सर्च केलेले शब्द यांचं विश्लेषण करून आपल्याला दिसणाऱ्या अॅड आपल्या आवडीनिवडींवर प्रचंड प्रभाव टाकत आहेत. इंस्टाग्रामवरील झकास रील हा एखाद्या वस्तू- सेवा यांच्या गुणवत्तेचा एकमेव निकष होतो आहे. ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हा विवेक मागे पडत ‘व्हॉट्सप विद्यापीठात’ विज्ञानापासून इतिहासापर्यंत सगळ्या विषयात प्रवीण असलेल्या नवनव्या पोस्टकर्त्यांची भर पडत आहे. ‘इंटरनेटवर आहे म्हणजे खरेच असणार’ या बाळबोध समजातून कुठलीही शहानिशा न करता हे भंपक ‘ज्ञान’ संदर्भ म्हणून सर्रास वापरले जात आहे.

यापेक्षाही अवघड ठरत आहेत इंटरनेटच्या वापरातून उद्भवलेल्या नव्या मानसिक समस्या. सतत इंटरनेटवर पडीक असण्याचे इंटरनेट अॅडिक्शन डिसऑर्डर, ऑनलाइन गेमिंग, लॉटरीचे व्यसन, पोस्टला अपेक्षित लाइक्स न मिळाल्याने आलेले नैराश्य या अशा नवनवीन प्रॉब्लेम्समध्ये सातत्याने भर पडते आहे. ‘मै मोबाइल के सिवा जी नही सकता’ या नोमोफोबियातून मोबाइल २४ तास हातातच राहू लागला आहे. जरा इंटरनेटची रेंज वरखाली झाली की जिवाला घरघर लागते. मूव्ही असो की हॉटेलिंग, ट्रेकिंग असो की वाचन, सगळं कसं आधी इंटरनेटवर रिव्यू आणि रेटिंग पाहूनच ठरवलं जातं. अनपेक्षितता, अपूर्वाई हे शब्द आता गूगल करूनही सापडत नाहीत. स्टिम्युलेशनची मेंदूला इतकी सवय लागली आहे की हाताचा अंगठा कायम स्क्रोलच करत राहतो आहे. ‘इंटरनेटशिवाय एक दिवस’ हा निबंधाचा विषय बऱ्याच मंडळींना दु:स्वप्न वाटावं अशी परिस्थिती आहे.

सोशल मीडियावर काही टाकलं नाही किंवा लेटेस्ट ट्रेण्ड फॉलो केले नाही तर ‘लोग क्या कहेंगे?’ हा FOMOचा किडा डोक्यात कायम वळवळत राहतो. सगळ्यांनी केलं ते मी पण करायलाचं हवं या अट्टहासातून आपले वेगळे छंद, आवडीनिवडी, नैपुण्य असू शकतात हेच विसरलं जातं. आणि मग या सायबर सपाटीकरणातून सगळे एकाच ठिकाणी वीकेंडला गर्दी करतात, एकाच गाण्यावर डान्स करतात. आभासी जगात रमायची इतकी सवय होते की खऱ्या जगात येऊन गेलेली श्रावणसर किंवा बहरलेला वसंत दिसेनासा होतो.

या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘सायबर साक्षरता’सोबतच ‘सायबर निरामयता’ही तितकीच महत्त्वपूर्ण ठरते. ‘टुगेदर फॉर अ बेटर इंटरनेट’ या यंदाच्या थीमला अनुसरून इंटरनेटचा विवेकी आणि मर्यादित उपयोग करणं आता अपेक्षित आहे. यासाठी इंटरनेट हे आपल्यासाठी असून आपण त्याच्यासाठी नाही ही शहाणीव गरजेची ठरते. कधी ऑनलाइन शॉपिंगऐवजी बाजारहाट करून पाहावा. रिव्यूचे गणित सोडून कधी नवी वाट चालावी, नवी चव चाखावी, नवं काही वाचावं. ग्रुपवर चॅट करण्यापेक्षा कधी थेट भेटावं मित्रांना आणि गप्पांची मैफील जमवावी. जगाला नाचू दे ‘गुलाबी शरारा’, ‘काचा बदाम’वर आपण आपलं गाणं गुणगुणत ठेका धरावा. आणि अर्थात हे सगळं सोशल मीडियावर मोजकंच टाकावं. कुणास ठाऊक आपलं हे अनवट जगणं ट्रेण्डिंग होईल!! बी सेफ बी वाईज!!

viva@expressindia.com