व्हाइट चॉकलेट हे खरं तर चॉकलेट नाहीच. त्यामध्ये कोकोचा अंशही नसतो. कोको बटर मात्र असतं. म्हणूनच त्याचा रंग पांढरा. या व्हाइट चॉकलेटचे अनेक फॅन आहेत. त्यांच्यासाठी या आगळ्या मिठाईचे चॉकलेटी रसग्रहण..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला स्वत:ला व्हाइट चॉकलेट अजिबात आवडत नाही, हे मी आधीच कबूल करतो. एक चॉकलेटिअर म्हणून काम करताना देशोदेशीचे चॉकलेटचे विविध प्रकार मला पाहता आणि खाता आले. त्यांच्यावर काम करण्याची अनेकदा संधी मिळाली.. मग ते डार्क चॉकलेटच असो, मिल्क चॉकलेट किंवा मग व्हाइट चॉकलेट. व्हाइट चॉकलेट आणि माझं काही ‘शोले’तल्या गब्बर-ठाकूरसारखं वैयक्तिक वैर नाही. पण व्हाइट चॉकलेट हे इमिटेशन चॉकलेट आहे.. नकली चॉकलेट म्हणूनच ते जगभर ओळखलं जातं. हीच बाब व्हाइट चॉकलेटला माझ्या आवडत्या चॉकलेट्सच्या लिस्टमध्ये सर्वात खालचं स्थान देऊन जाते.
व्हाइट चॉकलेट म्हणजे खरं चॉकलेट नाहीच असं मी म्हणतो. कारण त्यात चॉकलेटचा अतिमहत्त्वाचा घटक असणाऱ्या ‘कोको’चा अंशही नसतो. व्हाइट चॉकलेटमध्ये फक्त कोको बटर, साखर, दूध आणि व्हॅनिलासारखे काही नॅचरल किंवा आर्टिफिशिअल फ्लेव्हर्स असतात. या सर्वाना अर्थात या फ्लेव्हर्ससहित एकत्र करण्यासाठी काही इमल्सिफायर आणि सॉय लेसिथिनचा वापर केला जातो. थोडक्यात कोकोच नसल्यामुळे या चॉकलेटमध्ये राम नाही, असं मला वाटतं. तरीही आंबटगोड चवीच्या फळांची साथ मिळालेली व्हाइट चॉकलेट्स मला आवडतात. पॅशन फ्रूट, लिंबू, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, संत्री किंवा मग फार फार तर मिंट (पुदिना ) यांच्यासारख्या चवीची व्हाइट चॉकलेट्स मला पसंत आहेत. पण व्हाइट चॉकलेट्सचे फॅन असणारी बरीच मंडळी आहेत. त्यांना चॉकलेटचा कडवटपणा पसंत नसतो. त्यामुळे कोणत्याही खऱ्या फळांच्या फ्लेवरची किंवा कृत्रिम स्वादाची व्हाइट चॉकलेट..अगदी प्लेन व्हाइट चॉकलेटही ते आवडीने खातात.
व्हाइट चॉकलेटविषयी आणखी काही सांगण्यापूर्वी माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट नमूद करतो. अनेकांना मिल्क चॉकलेट आणि व्हाइट चॉकलेटमधला फरकच समजत नाही. त्यामुळे या दोन्ही संज्ञा ते एकाच गोष्टीसाठी पर्यायी शब्द म्हणून वापरतात. याच काही कन्सेप्ट क्लिअर करण्याची हीच ती वेळ, इट्स टाइम फॉर ‘प्रिन्स की पाठशाला.’ तर.. मी जेव्हा मुंबईच्या ऑबेरॉय हॉटेलमध्ये काम करत होतो तेव्हा अनेक पाहुणे ‘मिल्क चॉकलेट’ ऑर्डर करायचे. पण ते जेव्हा त्यांना सव्‍‌र्ह केलं जायचं, तेव्हा त्यांचं असं म्हणणं असायचं की, हे तर पांढरं नाहीये. त्यांच्यासाठी मिल्क चॉकलेट म्हणजेच व्हाइट चॉकलेट. केवढा हा गोंधळ! आता मी तुम्हाला यातला फरक सांगतोच. खरं तर मिल्क चॉकलेट सफेद नसतं. ते ब्राउन (आपल्या मराठीत त्याला चॉकलेटी असंच म्हणायचं खरं तर!) रंगाचं असतं, ज्यात काही प्रमाणात कोको, मिल्क सॉलिड्स आणि साखरही असते. व्हाइट चॉकलेटमध्ये कोको नसल्यामुळे ते पांढरं असतं. यावरून निदान तुम्ही समजू शकता की, मिल्क चॉकलेट आणि व्हाइट चॉकलेट हे परस्परांपासून पूर्ण वेगळी आहेत.
भारतातही व्हाइट चॉकलेट्सचे वेगवेगळे देशी-विदेशी ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत. व्हाइट चॉकलेट्ससाठी काही नावाजलेल्या ब्रॅण्ड्सच्या यादीत पुन्हा लिण्ड्ट आहे. ‘मादागास्कार व्हॅनिला’चा फ्लेव्हर असलेल्या ‘लिण्ड्ट एक्सेलेन्स व्हाइट चॉकलेट बार’ चांगला आहे. याशिवाय या यादीत ‘रिटर स्पोर्ट्स व्हाइट व्होल हेजलनट चॉकलेट’, ‘हर्शेज कुकीज् अ‍ॅण्ड क्रीम व्हाइट चॉकलेट विथ कुकी कॅण्डी चॉकलेट बार’ अशा जिभेवर तरळणाऱ्या चॉकलेट्सचा समावेश होतो. आता कुणा आवडत्या व्हाइट चॉकलेट्स आवडणाऱ्या व्यक्तीला प्रेमाची भेट द्यायची असेल तर मिल्क आणि व्हाइट चॉकलेटने भरलेला ‘चोकोलिक बेल्जिअम’चा ‘व्हॅलेन्टाइन लव गिफ्ट बॉक्स’ परफेक्ट ठरेल.
तुम्ही काही स्वीट ट्रीट्स जसं मफिन्स किंवा चीजकेक बनवण्याच्या बेतात असाल तर, ‘एमआयआय’चं स्पेशल व्हाइट चॉकलेट, ‘चकल्स’चं व्हाइट चोकोचिप्स तुमची ही ट्रीट आणखीनच स्वीट अ‍ॅण्ड हिट करतील. व्हाइट चॉकलेटशी आणखीन काही प्रयोग करून बघायचे असतील, ‘बिगल्स’चे डार्क अ‍ॅण्ड व्हाइट चॉकलेट पॉपकार्न्‍स ट्राय करा. हो हो…तुम्ही बरोबर वाचलंय. डार्क आणि व्हाइट चॉकलेटमधले पॉपकॉर्न आहेत. आत्तापर्यंत चीझ, कॅरामल पॉपकॉर्नचीच लज्जत घेतली असेल तर हे चॉकलेट पॉपकॉर्न एकदा ट्राय कराच. याव्यतिरिक्त ‘हर्शेज्’चं व्हाइट चॉकलेट पुडिंगही जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आहेच की!
व्हाइट चॉकलेटवर तसं बोलण्यासारखं बरंच आहे. पण या व्हाइट चॉकलेटच्या गप्पा ‘नेस्ले’च्या मिल्कीबारच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होणार नाहीत. कारण भारतात व्हाइट चॉकलेटला पहिलावहिला चेहरा मिळाला तोच मुळात नेस्लेच्या मिल्कीबारने. तेव्हापासून आत्तापर्यंत मिल्कीबारची ती चव सर्वानाच हवीहवीशी वाटते.
व्हाइट चॉकलेटबद्दल आतापर्यंत मी जे काही लिहिलं आहे, ते या व्हाइट चॉकलेट इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांच्या आदरापोटी. पण अनेकांचं आवडतं असलं तरी व्हाइट चॉकलेटबद्दलचं माझं मत मात्र ठाम आहे. व्हाइट चॉकलेट खाण्यापेक्षा मी फ्लेवर्ड मिल्कचा एक ग्लास पिऊन शांत झोपी जाण्याला प्राधान्य देतोय.

– वरुण इनामदार
(अनुवाद : सायली पाटील)

मराठीतील सर्व द चॉकलेट क्रिटिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: White chocolate
First published on: 15-07-2016 at 01:04 IST