|| तेजश्री गायकवाड

‘डिझायनर मंत्रा’ हे सदर सुरू झाल्यापासून आपण अनेक पुरुष फॅशन डिझायनरला भेटलो, पण या वेळी आपण हातमागाच्या फॅशन इंडस्ट्रीमधील एका यशस्वी महिला डिझायनर आणि उद्योजिकेला भेटणार आहोत. मुलींकडे मुलांप्रमाणे स्वत:च्या करिअरसाठी कितीही म्हटलं तरी जास्त वेळ नसतो. कित्येकांचं तर शिक्षण होता होता किंवा लगेच शिक्षण झाल्यावर लग्न होतं. पण तरीसुद्धा घरचा सगळा कारभार सांभाळत ती पुढे जाते आणि आपापल्या क्षेत्रात नाव मोठं करते. अशीच एक फॅशन डिझायनर म्हणजे उज्वल सामंत.

ज्या काळी फॅ शनडिझायनर म्हणजे काय? असंही काही शिक्षण असतं का? हे काय शिकायचं फिल्ड आहे का? असे अनेक प्रश्न उभे होते त्या वेळी उज्वल यांनी आपण फॅशनडिझायनिंगच करायचं हा निर्धार केला होता. या निर्णयाप्रत त्या कशा येऊन पोहोचल्या हे सांगताना, मला आधीपासूनच कपडा, रंग, फॅशन या सगळ्यांची खूप आवड होती, असं त्या म्हणतात. या आवडीमुळेच फॅशनडिझायनिंगचं शिक्षण घ्यायचा विचार त्यांच्या मनात मूळ धरून होता, पण अगदी ९०च्या काळात या क्षेत्रात शिक्षण घेणं कठीणच होतं. कारण तेव्हा अभिनयक्षेत्रातील लोक सोडले तर फॅ शनविश्वाविषयी लोकांमध्ये फारशी माहिती नव्हती, असं त्या म्हणतात. त्यामुळे अशा अनोळख्या क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेतल्यावर विरोध होणारच होता. तसाच तो झालाही. खूप प्रयत्न करूनही माझ्या घरचे मला या क्षेत्रात शिक्षण घेऊ देण्यासाठी तयार झाले नाहीत. शेवटी मी कॉमर्समधून पदवीधर झाले, असं त्यांनी सांगितलं.

पुढे पदवीधर होता होताच त्यांचं लग्न झालं आणि खरं म्हणजे लग्नानंतर त्यांना त्यांची वाट सापडली. लग्नानंतर मी माझं फॅ शनडिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलं. १०-१२ वर्ष घर सांभाळल्यावर आता आपल्याला काही तरी करायला पाहिजे असं वाटलं आणि मग आपलंच राहिलेलं स्वप्न, आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्या तयारीनिशी उतरल्या. कोणत्याही क्षेत्रात रोज नवनवीन बदल होत असतात मग यात फॅ शनइंडस्ट्री तरी कशी मागे राहील. १०-१२ वर्षांनंतर व्यवसाय करण्यासाठी बाहेर पडलेल्या उज्वल यांच्या मनात आपल्याला काय करायचं आहे याचं चित्र स्पष्ट होतं. त्यामुळेच शिक्षण पूर्ण करून खूप गॅप घेतल्यानंतरही त्यांनी फॅ शन डिझायनिंग क्षेत्राची नव्याने सुरुवात केली. त्यांनी ‘उज्वल तारा’ हा त्यांचा ब्रॅण्ड सुरू केला. शिवाय, आर्ट एक्स्पोही त्यांनी सुरू केले. इतक्या वर्षांनंतर नव्याने कामाला सुरुवात करतानाचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, मी सुरुवातीला जॉब केला आणि तोही फॅ शन इंडस्ट्रीमध्ये न करता दुसऱ्या क्षेत्रात काम केले. पण असं म्हणतात की शिक्षण वाया जात नाही. त्याचा अनुभव मला आला. मी त्या जॉबमध्ये, कॉमर्सच्या शिक्षणातून जे काही शिकले त्याचा उपयोग आज मला माझा हा फॅशन उद्योग सांभाळण्यासाठी होतो आहे, असं त्या म्हणतात. आपल्याला जे करायचं आहे त्यावर आपण ठाम असू तर मग आपण त्यात यशस्वी होतोच. मी सुरुवात केली ती मार्केट रिसर्चने आणि सगळी माहिती मिळवत या कामाचा शुभारंभ केला. आता जवळजवळ १२ वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

हातमागाचे कपडे हीच त्यांची खासियत. व्यावसायिकदृष्टय़ा हातमागाला ग्लॅमर आण्यासाठी अनेक डिझायनर प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे उज्वल सामंत. ‘मला हातमागाविषयी वेगळंच प्रेम आधीपासून होतं. त्या काळात इंदिरा गांधी आणि अशा अनेक राजकारणी स्त्रिया या सगळ्या हातमागाच्या साडय़ा घालत असत. आणि हे सगळं मला खूप प्रभावित करायचं. म्हणून मी जेव्हा मार्केटमध्ये रिसर्च करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा हातमागाविषयीच माहिती घेतली. आपण स्वत: हातमागाचे कपडे घालतो हे ठीक आहे, पण एक डिझायनर म्हणून सगळ्यांना काय आवडेल याचा विचार करायला मी सुरुवात केली, असं त्या सांगतात. मी हातमागावर काम करायचं ठरवलं आणि अनेक विणकरांना भेटले. आज अनेक डिझायनर हातमागाला रॅम्पवर घेऊन येत आहेत. त्यामुळे विणकरांचा स्ट्रगल थोडा कमी झाला आहे. परंतु मी जेव्हा सुरुवात केली त्या वेळी त्यांना कामाची खरंच खूप गरज होती. म्हणूनच माझ्या मनात असा विचार आला की आपण पुढे जाताना त्यांनासुद्धा पुढे घेऊन जाऊ . या विचारातूनच ‘उज्वल तारा’ आणि ‘आर्ट एक्स्पो’ची सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘आर्ट एक्स्पो’ या संकल्पनेंतर्गत उज्वल विणकर, कारागीर यांना एकत्र घेऊन भारतात अनेक ठिकाणी प्रदर्शनं भरवतात. त्यामुळे विणकरांना त्यांचं काम विकण्यासाठी एक थेट मंच मिळतो. त्याचा त्यांना आर्थिकदृष्टय़ा चांगला फायदा होतो आहे. अनेक वर्ष फॅशनविश्वात काम करताना अनेक अप्स आणि डाऊन्स येत असतात. असाच एक अनुभव उज्वल सांगतात, मी जेव्हा या क्षेत्रात व्यवसाय करायचं ठरवलं तेव्हा मी एक महिला उद्योजिका, एक टेक्स्टाइलमध्ये काम करू इच्छिणारी म्हणून म्हणून सरकारी नियोजनाच्या माध्यमातून मदत घायची असं ठरवलं. पण प्रत्यक्षात खूप वाईट अनुभव आला आणि मला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. अर्थात आता ती परिस्थिती बदललेली असेल. पण त्या वेळी अनेक महिने प्रयत्न करूनही मला त्यांची साथ लाभली नाही, असं त्यांनी सांगितलं. पण या अनुभवातून खचून न जाता त्यांनी उलटं मोठय़ा हिमतीने हे सगळं स्वत:च करायचा निश्चय केला. या निर्धाराबरोबरच आपल्याकडे हे काम तडीस नेण्याची क्षमता आहे हेही प्रकर्षांने जाणवल्याचं त्यांनी सांगितलं.

या क्षेत्रात येऊ  पाहणाऱ्यांना उज्वल ठामपणे सांगतात की, हे क्षेत्र म्हणजे काही गंमत नाही. दिवसरात्र तुमची मेहनत करायची तयारी हवी. या क्षेत्रात कोण कोणाचा स्पर्धक नसतो. तुमची स्वत:शीच स्पर्धा असते. हे क्षेत्र तुम्हाला एवढं भरभरून देतं की, तुम्ही दुसऱ्याशी स्पर्धाच करू शकत नाही, असं त्या म्हणतात. कल्पनांनी भरलेलं आणि काम करण्यासाठी उंच भरारी घेता येईल असं अमर्याद आकाश हेच या क्षेत्रात पुढे जाण्याचं बळ देते, असं त्या ठामपणे सांगतात.

viva@expressindia.com