चॉकलेट ही आबालवृद्धांची आवड. तरुणाईसाठी तर मैत्री, प्रेम सबकुछ व्यक्त करण्यासाठीचा हक्काचा पदार्थ. ‘कुछ मीठा हो जाए…’ म्हणत आनंदक्षण साजरा करण्यासाठी चॉकलेट हा गोड पदार्थ म्हणून एकमेकांना दिला जाऊ लागला. मात्र, आता काळानुसार तरुण पिढीसाठीही चॉकलेटचं माहात्म्य बदलत चाललं आहे. जुलै महिन्याची सुरुवातच मुळात ‘वर्ल्ड चॉकलेट डे’ने होते. त्यानिमित्ताने चॉकलेटचे बदलत गेलेले स्वरूप जाणून घेण्याचा हा प्रयत्न…

चॉकलेट हे सगळ्या वयाच्या व्यक्तींचं ‘कम्फर्ट फूड’ म्हटलं जातं. लहानपणापासून आपल्या रोजच्या दिवसाचा भाग असलेलं चॉकलेट आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यापासून दूर होत नाही. याच चॉकलेटच्या सुरुवातीची आठवण म्हणून सेलिब्रेट केला जातो चॉकलेट डे. अनेक चॉकलेट हाऊसेसमध्ये, चॉकलेट फॅक्टरीजमध्ये, केक शॉप्स, डेझर्ट शॉप या सगळीकडे अगदी उत्साहाने चॉकलेट डे साजरा केला जातो. या चॉकलेटचं स्वरूप आणि मार्केटही काळानुरूप बदलत गेलं आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या तसं चॉकलेटही बदललं.

हेल्थ कॉन्शस आणि डाएटप्रेमी असणाऱ्यांना आजकाल गोड आणि अॅडेड शुगर असलेल्या चॉकलेटपेक्षा काहीतरी वेगळा पर्याय हवा असतो. त्यामुळे सध्या शुगर फ्री चॉकलेट, नॅचरल चॉकलेट आणि पर्सेंटेज डार्क चॉकलेट हे ट्रेण्डमध्ये आहेत. डार्क चॉकलेटचा वाढता फॅन क्लब बघायला मिळतो. या चॉकलेटमध्ये कमी असणारा गोडवा त्याला हेल्थ आणि डाएटप्रेमींच्या ‘फेवरेट्स’मध्ये अॅड करतो. याचसोबत फ्लेवर्ड चॉकलेट्स जसे की टँजी, मिंटी, सॉल्टी अशा फ्लेवर्सनासुद्धा मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते आहे.

रॉ डार्क चॉकलेटपासून घरी मिल्क चॉकलेट बनवण्याचाही ट्रेण्ड बरेच जण फॉलो करताना दिसतात. स्वत: चॉकलेट बनवल्यामुळे त्यात त्यांना आवडते फ्लेवर्स, नट्स, ड्राय फ्रुट्स अशा विविध घटकांप्रमाणेच सी-सॉल्टसारखी काहीशी वेगळी आणि आवडत्या टेस्टही त्यात अॅड करता येतात. तसंच हे पर्याय वापरून चॉकलेट बनवताना अॅडेड शुगरचाही धोका नसतो. त्यामुळे प्रत्येकजण स्वत:ला हवं तसं चॉकलेट बनवू शकतो. चॉकलेट डेच्या निमित्ताने ठिकठिकाणी सेल्फ-मेड चॉकलेट्सची वर्कशॉप्ससुद्धा पाहायला मिळतात आणि त्यांना यूथचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसतो.

सेल्फ- मेड चॉकलेट्स जशी ट्रेण्डमध्ये दिसतात, तशीच हेल्थ आणि शुगर कॉन्शस चॉकलेटप्रेमींसाठी होममेड चॉकलेट्स हा एक आवडता पर्याय ठरताना दिसतो. प्रिझर्वेटिव्ह्जची कमीत कमी शक्यता, आर्टिफिशिअल शुगरचा नसलेला धोका आणि मॅक्सिमम फ्रेश चॉकलेट्स मिळण्याची शक्यता यामुळे होममेड चॉकलेट्सना मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. आपल्याला हवी तशी चॉकलेट्स बनवून घेण्याचा म्हणजेच कस्टमायझेशनचा पर्यायही होममेड चॉकलेट्समुळे मिळतो. त्यामुळे गिफ्टिंगसाठीही हल्ली होममेड चॉकलेट्सना प्राधान्य दिलं जातं. एफर्ट्स घेऊन निवडलेलं गिफ्ट अशी प्रतिमा आपोआप तयार करणारा ‘होममेड चॉकलेट्स’ हा सध्याचा सगळ्यात उत्तम पर्याय आहे.

केवळ हेल्थ, शुगर किंवा प्रिझर्वेटिव्ह्ज नव्हे तर आजकाल चॉकलेटचा विचार कम्फर्ट म्हणून जास्त मोठ्या प्रमाणावर केला जातो. खाण्याचा प्रत्येक पदार्थ हा मेंटल हेल्थवर कशा पद्धतीने परिणाम करतो याचा विचार पहिल्यांदा केला जातो आणि त्यानुसार खाल्ला जातो. चॉकलेटही त्याला अपवाद नाही. ज्या खाण्यातून आनंद मिळतो, समाधान मिळतं ते आपलं कम्फर्ट फूड. आणि अशा मानसिक समाधानासाठी चॉकलेटवर मोठ्या प्रमाणावर लोकांचा विश्वास असतो. त्यामुळे चॉकलेटकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केवळ लहान मुलांचं आकर्षण किंवा लहानपणीची न सुटलेली सवय किंवा केवळ आवड म्हणून राहिलेला नाही. तर विचारपूर्वक निवडलेलं कम्फर्ट फूड म्हणून चॉकलेटकडे पाहिलं जातं. डार्क चॉकलेट हे मेंटल हेल्थसाठी चांगलं असतं, असं वेगवेगळ्या रिसर्चमध्ये वाचल्यापासून आणि त्याचा ‘ट्रेण्ड’ बनल्यापासून डार्क चॉकलेट हे प्रत्येकाचं ‘सूदिंग’ फूड बनलं आहे.

सध्या मात्र प्रत्येक बाबतीत सस्टेनेबिलिटीचा विचार करण्याचा काळ असताना चॉकलेटला तरी त्यातून सुटका कशी मिळेल? त्यामुळे सूदिंग फूड असतानाही ते ‘सस्टेनेबल फूड’ आहे का याचा विचारही चॉकलेट घेताना केला जातो. सिंपल लेबलिंग, म्हणजेच साधेसोपे कळणारे घटक पदार्थ, वाचता येईल आणि समजेल असं लेबलिंग, एथिकली सोर्स केलेलं चॉकलेट म्हणजेच वातावरणाला कोणत्याही पद्धतीचा त्रास न देता, आर्टिफिशिअल काही न वापरता उगवलेल्या कोको बीन्स, आणि पॅकेजिंगमध्ये कमीत कमी वापरलेली धोकादायक मटेरियल्स अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून चॉकलेटची खरेदी केली जाण्याचादेखील ट्रेण्ड लक्झरी चॉकलेट ब्रँड्सच्या कस्टमर्समध्ये पाहायला मिळतो.

याच एथिकल चॉकलेटच्या आग्रहामुळे वेगन चॉकलेटही मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि त्याचा ग्राहकवर्गही खूप मोठा आहे. तसंच इन्क्लुजिव्हिटी अर्थात सगळ्यांना चॉकलेट खाता यावं यासाठी, त्यातले अॅलर्जी असू शकणारे घटक वगळून, त्याऐवजी सब्स्टिट्यूट वापरून बनवली गेलेली ग्लूटनफ्री, फॅटफ्री, लॅक्टोजफ्री अशीदेखील चॉकलेट्स मार्केटमध्ये मिळायला लागली आहेत.

एक रुपयाच्या साध्या चॉकलेटपासून सुरू केलेली चॉकलेट जर्नी अनेक वेगवेगळे सीरियस टप्पे घेत आजचं मार्केट सेट करते आहे. मात्र कोणत्याही रूपात असलं, तरी चॉकलेट हे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचं ‘कम्फर्ट फूड’ राहणार हे नक्की!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva@expressindia.com