कट्टेकरी दिवाळीच्या पहिल्या दिवशी मंदीराच्या बाहेर उभे होते, कारण चोच्याने कॉल करून सांगितलं होतं की मी दोन मिनटांत येतोय, आपण एकत्रच दर्शन घेऊ. त्यामुळे सगळे जणं रस्त्यावर त्याची वाट पाहत उभे होते. सगळ्यांच्या हॅप्पी दिवाली, या शुभेच्छा देऊन झाल्या होत्या.  बस कोणती आणि कधी येतेय, याकडे साऱ्यांचं लक्ष होतं, पण हे मियाँ उतरले ते रीक्षातून. रीक्षावाल्याच्या हातात दहाच्या नोटा ठेवल्या आणि पहिल्यांदाच शेरवानीमध्ये कट्टेकरांनी चोच्याला बघितला, एरव्ही तो सदरा वैगेरे काही ट्रेडिशनल डे ला घालायचा, पण मस्त मोती कलरची शेरवानी चोच्याला शोभत होती. अरे यार, सॉरी, यायला लेट झाला, ट्रॅफिक एवढं आहे ना रस्त्यावर की जाममध्ये वाट लागली यार. त्याला रीप्लाय कुठूनही मिळाला नाही, कारण सर्वच त्याचा हा नवीन अवतार बघत होते. चोच्या, लय झॅक दिसतोय लेका, कंजूस मारवाडी तू, कधी पैसे काढत नाहीस, पण एव्हढी महागडी शेरवानी कशी काय परवडली तुला, असं स्वप्नाने विचारल्यावर चोच्या म्हणाला, असं महाग वैगेरे काही नाही, आपला मित्रच आहे एक, पण ते जाऊदे, आपण आधी दर्शन घेऊया आणि मग बोलत बसूया.
आल्यापासूनच चोच्यावर सारे फिदा होते, आता तो त्यांचा न बोलता बॉस होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं, प्रसाद तोंडात भरडला आणि मंदिराच्या मागच्या रस्त्यावर त्यांना चोच्या घेऊन आला.ह्यांनी हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी चोच्याच्या सांगण्यावरून देवदर्शनाचा घाट घातला होता. चोच्याने जे कौतुक केलं होतं, त्याची भुरळ साऱ्यांनाच पडली होती आणि इथे आल्यावर पारंपरिक वेशातील तरुणाई बघुन धन्य झाल्याचा फिल सगळ्यांना आला. मस्त वातावरण होतं, तरुण मुलं-मुली आपल्या ग्रुपसोबत रस्त्याच्याकडेला, काही जणं रस्त्यावर उभी होती, त्या रस्त्याला वाहतुक नसल्याने हे सारं चालून गेलं होतं. काही जणांच्या ग्रुपमध्ये चमचमीत दिवाळीचे पदार्थही होते.
व्वा चोच्या, साल्या आम्हाला जे काय तू आज दाखवलं ना, त्याबद्दल काय बोलणार यार, सही वातावरण आहे, एवढी आपल्या एजची पोरं-पोरटी आणि ती पण ट्रेडिशनल ड्रेसमध्ये, सहीच यार, असं अभ्या बोल्ला खरा, पण एरव्ही बकबक करणाऱ्या चोच्याचा रीप्लाय आलाच नाही. अभ्याने चोच्याकडे पाहिलं, तर हा भाई कुठे तरी हरवलेला होता. त्याची नजर दूरवर कुठेतरी गेलेली होती, ३० अंशांमध्ये लेफ्टहँड साइडला. साऱ्यांनी तिथे पाहिलं, तर असाच एक फक्त तरुणींचा ग्रुप होता आणि या साहेबांची नेत्रपल्लवी सुरू होती. अभ्या हळूच चोच्या जवळ गेला आणि त्याच्या कानात हळुच म्हणाला, कोण, आकाशी रंगाची साडीवाली ना, चोच्या काही भानावर नव्हता. त्यामुळे त्याच्या तोंडातून खरं ते निघालंच, हा यार, काय सही आयटम आहे, असं चोच्या बोल्ला आणि दिवाळीचा पहिला दिवस सार्थकी लागल्यासारखं अभ्याला वाटलं. कारण या दिवसाची हीच गंमत असते, या अशा शहरांतल्या काही रस्त्यांवर कुणीतरी नजरेत भरतं आणि पुढे तिचं आयुष्याची साथीदार म्हणून प्रत्येक रस्त्यावर आपल्या सोबत असते. संत्याला सुप्रिया भेटलेली, अभ्या तर सेटल झाल्यावर यामध्ये पडणार होता, पण चोच्याच्या मनात अजूनपर्यंत फार काही मुली भरलेल्या नव्हत्या. त्याची चॉईसच, अशी काही होती. अभ्याला, हे कळल्यावर त्याच्याकडून ऐकण्यासाठी सारेच आसूसलेले होते. अभ्याने सर्वाना सांगितलं, तेव्हा साऱ्यांच्याच माना तिच्या दिशेने वळल्या, याचं नशीब असं की, त्याचवेळी तिची नजरही यांच्याकडे वळली. कदाचित हे सर्व माझ्याकडेच बघतायत, हे तिला कळल्लं, असावंम्हणून तिने नजर फिरवली. त्यामुळे चोच्या या सर्वावर वैगातला, च्यायला असं काय बघता सर्व तिच्याकडे तिला डाऊट येईल ना. चोच्याचं बोलणं काही गैर नव्हतं. पण चोच्यासाठी ते चांगलं ठरलं, कारण तिने यांच्याकडून नजर फिरवल्यावर पुन्हा एकदा यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि सुप्रिया अशी हाक मारली, सुप्रियाने चाचपून पाहिलं, तर पहिल्यांदा तिला ही कोण हे स्ट्राइक झालं नाही, पण त्यानंतर समजलं की ही तर आपल्या काकांच्या बिल्डींगमधली कविता होती. हे सगळं घडत असताना सारेच आवाक झाले होते. सुप्रियाला काय करावं ते सुचेना, एवढय़ात चोच्या हळुवार, पण थोडासा वैतागलेल्या सूरात तिला म्हणाला, अगं सुप्रिया जा ना तिला भेट. असं म्हटल्यावर सुप्रिया थोडी ताळ्यावर आली आणि ती या मुलींच्या ग्रुपच्या दिशेने जायला लागली. आता कट्टेकरांना थोडसं हायसं वाटत होतं, कारण चोच्याची सेटिंग होणार होती. चोच्या, लेका, झाली तुझी सेटिंग समज, असं संत्या म्हणाला खरा, पण  त्यानंतर ‘ही एन्गेज तर नसेल ना, असं म्हणत संत्याने माती खाल्ली आणि चोच्या थोडासा टेन्शनमध्ये आला आणि सर्वाचं लक्ष सुप्रियाच्या परतण्याकडे लागलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onविवाViva
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viva katta
First published on: 09-11-2012 at 05:09 IST